पाण्याच्या दुष्काळामुळे महाराष्ट्रात गावागावांमधल्या लोकांचं जगणं कठीण बनले आहे. अनेक गावांमध्ये घोटभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. आता माझा नंबर आहे, तुम्ही एकाच टायमाला चार – पाच भांडे घेतले तर मग बाकीच्यांनी पाणी भरायचे की नाही? असे हे वादग्रस्त संभाषण अनेक स्त्रियांचे गावागावात पाहायला मिळते. हंडाभर पाण्यासाठी वणवण करणारी माणसं आणि तेच हंडाभर पाणी कमी येणार म्हणून त्यासाठी वाद घालणारी माणसे यामध्ये मोठा फरक आहे. दर वर्षी पाऊस येऊन गेल्यानंतर निघणारे निकष लक्षात घेता; आज पाणी वाचवण्यासाठी अनेक माध्यमांची गरज भासते. पण या माध्यमातून धडा शिकून त्या गोष्टी आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. पण आज जर सर्व तरुण पिढीची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर पाणी वाचवण्याची सुरुवात आपण आपल्या घरातूनच करायला हवी. तरुणांच्या मनात पाण्याचे महत्व रुजवण्यासाठी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन त्यांना या विषयाचे काही महत्त्वाचे आणि फायद्याचे मुद्दे उपक्रमातून समजवावे. जाहिरातीतून लोकांपर्यंत पाण्याचे महत्व पोहोचवावे. कारण अजूनही बऱ्याच गावांमध्ये पाणी विकत घेतले जाताना दिसत आहे. पण मग याला कारणीभूत कोण? सृष्टी, पर्जन्य, शासन? की आपणच? एकीकडे आंघोळ करण्यासाठी देखील पाणी नसणारे लोक, तर दुसरीकडे दिवसातून २-३ वेळा आंघोळ करणारे आणि गाडी धुण्याकरिता पाण्याची उधळण करणारे आपण, एकीकडे दुषित पाणी उकळून वापरणारे लोक, तर दुसरीकडे उपलब्ध पाणी घाण-कचरा टाकून दुषित करणारे आपण लोक, अशी ही पाणीटंचाईची भीषण समस्या, तर दुसरीकडे मात्र केवळ तोंडी कळवळा. तर मग या सर्वावर एकच उपाय म्हणजे पाणीटंचाईविषयी समाजजागृती करणं.
आत्ताच उपलब्ध पाण्याचं नियोजन केलं नाही, तर नंतर पैसे देऊन विकत घेण्यासाठी किंवा नियोजनासाठीही पाणी उरणार नाही. माझ्या मते, तरुणांनी ठरवलं तर ते कोणताही बदल घडवून आणू शकतात. त्यांनीच स्वतःपासून सुरुवात करून आपल्या कुटुंबाला, हळूहळू मित्र-मैत्रिणींना, जवळच्या लोकांना पाणी नियोजनाचे महत्त्व, गांभीर्य आणि उपाययोजना समजावून सांगायला हव्यात. सरकार काही करेल, ती त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी सांभाळायला हवी असं न म्हणता, सुरुवात स्वत:पासून करावी. कारण हक्कांची मागणी करत असताना आधी आपली कर्तव्य पार पाडायला हवीत. प्रत्येकाने आपापल्यापरीने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पाण्याचा योग्य वापर होईल.
– पूनम निर्भवणे
कळवा
