घ्वाटभर पानी…

घ्वाटभर पान्यासाठीच बाय

आता डोल्यातनं पानी काढायचं हाय…..

ह्या पल्याड आमचं गाव

अन् त्या पल्याड इरीचं नाव

दोन डोंगार उतरून धा कोस चालून

इरी म्होरं लाईन लावायची हाय

घ्वाटभर पान्या…

तशी आमच्या गावातबी इर हाय

 पर भट बामनांचा नियोम हाय

आमचं प्वार मेलं तरी

टिम्बाभर पानी बी दियाचं न्हाय

 घ्वाटभर पान्या…

आमच्या डोंगराखाली सरकारचं मोठं धरान हाय

धरणाच्या पान्याखाली आमची बी जमीन गेली हाय

पर तो खाकीवाला खाक्यात म्हणतो

पान्याकडं जराबी बघायचं न्हाय

घ्वाटभर पान्या…

गावातला शिद्या मुंबयला राहतो

गेल्याच महिन्यात त्याच्याकडं गेलतो

गटारावरल्या त्याच्या झोपड्यात गटारातल्या

 पान्याशिवाय घडू घेऊन जायला बी पानी न्हाय

आता घ्वाटभर पान्या…

परत येताना यष्टी स्टँडवर, पान्याचा नल खोलला व्हता

पर कचऱ्याच्या ढिगात बसलेल्या तुटक्या नलाला

पान्याचा एक बी थेंब नव्हता

परीश्न पडला भर पावसात

यष्टी स्टँडवर दुस्काल कसा काय ?

आता घ्वाटभर पान्या…

इतक्यात शिद्या परत आला, म्हणतो…. 

गेलो व्हतो पान्याची बाटली इकत आनायला

म्या सहजच इचारलं शिद्याला

काय रं शिद्या आपून पान्याची बाटली इकत घ्यावी

म्हणून कुनी तो नल तोडला का काय ?

आता घ्वाटभर पान्या…

आव पानी आनन्यात दिवस गेला

पान्यासाठी जलम गेला

 पान्याबिगर काय काय व्हतं

चांगलं ठाऊक हाय या जिवाला

 म्हणून म्या सांगूनशान ठेवलंय समद्यानला

आवो डोल्यातलं पानी जालं म्हणून

माझ्या मैतावर कुनीबी रडायचं न्हाय

घ्वाटभर पान्या…

– नागेश जाधव

संघर्ष…

घराघरात एकच नारा..

हात धुवा अन कोरोनावर घाला आळा…

असे शब्द कानी पडावे, 

अन् पाण्याचे महत्त्व 

नव्याने कळावे..

जिथं तू असतोस दिवसभर, 

तिथं नाहीं र कसलाच अभाव ..

अन दुसरी कडे जनतेची लूटमार,

हाचं दलालांचा स्वभाव…

खरंतर तुला म्हणतात जीवन,

पण तुझ्यासाठी होणाऱ्या राजकारणामूळ होते सामान्यांची वणवण,

तू मिळावा हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार,

पण तरीही आजही त्याकरिता होतोय

जीवासाठी जीव उदार,

इतिहास देतो ग्वाही,

रोहिणीची धग सिद्धार्थ वाही,

समानतेच्या हक्कासाठी झाला चवदार लढा,

अन तरीही जातीपातीच्या भिंतींमध्ये आजही चालतोय गावगाडा…

नर्मदेसाठी मेधा ने ही लढला आहे लढा,

पण कावेरीचा अजूनही सुटत नाही तिढा…

कधी होईल र तुझ्या सारखं निर्मळ सारं जग,

खरचं कधी मिटेल रे ही तहानेची धग..

पाणी आहे रे सर्वांचा हक्क,

आणि हे सरकारं मात्र सारं विकण्यात व्यस्त,

होईल रे तेव्हाच सुखकर सारं..

जेव्हा माणूस म्हणून वाहिल जगण्याच्या अधिकाराचं वारं…

~ ऍड. अनुराधा भगवान नारकर

विभाग – मुंबई

पाण्याची लढाई सुरु झाली …….

पाणी हा आपला मुलभूत अधिकार आहे. पाणी आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इतका की जर ते नसेल तर आपल जगण कठीण होऊन जात.  आपल्या देशात तर सांस्कृतिक आणि धार्मिक जिवनात पाणी अत्यंत महत्त्वाच आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आरोग्य व पुर्ण जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज १५० लि. एवढ्या पाण्याची गरज असते. पण आज मुंबईतील झोपडपट्टी मध्ये ३० लि. हून ही कमी पाणी पिण्यासाठी आणि इतर सर्व घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे.  सध्याची पाण्याची बिकट परिस्थिती पाहताना नटसम्राट सिनेमातील “कोणी घर देता का घर तसच ” कोणी पाणी देता का पाणी ” अशी म्हणायची वेळ आली आहे. पाणी म्हणजे जिवन म्हणतात पण सध्याच्या परिस्थितीत पाणी म्हणजे वणवण फिरणे अशी अवस्था झाली आहे.

माझ लहानपण गावाकडेच  गेलंय, त्या ग्रामीण वस्तीमध्ये सुध्दा आम्ही पाण्यासाठी वणवण फिरायचो. पण तिथे कधी कळलच नाही की आमचा पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. कारण आम्ही वापरण्यासाठी नदी, धरण, किंवा  विहीरी असतात त्याच पाणी आणायचो. तसेच  पिण्यासाठी पाणी दर आठवड्यातुन एकदा यायच ते सुद्धा एक तास पाणी असायच. त्यात आठ नंबर असायचे. प्रत्येकाने ठरवून १० ते १२ हंडी पाणी घ्यायच. सर्वांचे १२ हंडी झाले की, पुन्हा १-२ हंडी घ्यायचे किंवा अचानक पाणी गेल तर, राहिलेल्या नंबरला झालेल्या नंबरने १ हंडा पाणी द्यायचे. पण हे चालू असताना कधीही जाणवल  नाही की तो आमचा पाण्यासाठीचा संघर्ष होता. 

आम्ही मुंबईला म्हणजे ज्या शहराला भारताची अर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते, अश्या शहरात स्थायिक झालो. तर इथे सुध्दा तिच पाण्याची परिस्थिती आहे. पण इथे एक लक्षात आल की, इथे बिल्डिंग मध्ये पाण्याची काहीच अडचण नाही आहे. पण मात्र  झोपड्डपट्टी मध्ये राहणाऱ्यांना, कष्टकरी वर्गाला मात्र आजही पाण्यासाठी दिवस रात्र मराव लागतयं.  हा कु़ठला न्याय? आम्ही एकंल होत व वाचल ही होत की , अस्पृश्यांसाठी पाणी नव्हतं त्यांना पाणी खुप लांबुन द्यायचे किंवा शिवाशिव होऊ नये म्हणून शारीरिक अंतर ठेऊन  पाणी द्यायचे.  ही परिस्थिती आजही आमच्या पर्यंत आहे. असे का ? असे प्रश्न सातत्याने मनात येतात. पण लगेच लक्षात येते की  समान पाणी आम्हाला मिळणारच! कारण भारतीय संविधाना मध्ये  पाण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. पाण्यासाठी संघर्ष करून  तो आम्ही मिळवणारच. महानगरपालिकेला आज पर्यंत सांगत आलो आहोत व यापुढे ही सांगू कि, पाणी हा आमचा मुलभूत अधिकार आहे, प्रत्येक सजीवाला पाणी हे मिळालेच पाहिजे.  येत्या “जागतिक जल  दिनानिमित्त” आम्ही वेवेगळ्या सामाजिक माध्यमातून आमच्या हककाच्या पाण्याची मागणी सुध्दा करू. 

 पाणी हक्क समिती गेल्या ११ वर्षा पासून सर्वांना समान पाणी वाटप झाले पाहिजे तसेच पाणी आधिकारासाठी  संघर्ष  करत आहे. व त्यांनी आजपर्यंत बऱ्याच पाण्यापासून वंचित ठेवलेल्या  वस्त्यांमध्ये पाणी अधिकाराची जनजागृती करून नागरिकांसोबत मिळून पाण्याचा अधिकार मिळविला आहे. पाणी हक्क समिती पाण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच आम्ही सुध्दा त्यांच्या सोबत येऊन पाण्यासाठी संघर्ष करणार, व जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीस हक्काच पाणी मिळत नाही,  तो पर्यंत आम्ही हा हक्काचा लढा देत राहू. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या कष्टकरी माणसासाठी हे एक  मोठे आव्हान आहे. तर ह्या आव्हानाला आम्ही सामोरे जाऊन, आमच्या हककाच्या पाण्यासाठी  संघर्ष करणार आहोत. आम्ही आमचा हक्क घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. आम्हाला आमच्या हक्कांसाठी लढण्याची-संघर्ष करण्याची शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून मिळाली आहे.

तुम्ही आम्हा अस्पृश्य म्हणत असाल, किंवा जाती मध्ये आम्हाला बाटत असाल, तर ते आम्ही मान्य करणार नाही. मला असं लक्षात आल आहे की, तुम्ही राजकीय दलाला पाणी पुरवता ते सुद्धा चोरीच पाणी.  जे नागरिक कायद्याने पाणी घेऊ पाहता त्यांना पाणी नाकारून , गरिबांच्या हक्काचं  पाणी चोरून राजकीय दलालांना विकता, मग ते दलाल लोक जनते विरुद्ध कट कारस्थान करतात हे मला समजल आहे. म्हणूनच आमचा हा समानतेचा व न्यायाचा लढा आम्ही असाच चालू ठेवणार.

~ सिमरन मनिषा महेंद्र धोत्रे

विभाग – मुंबई

आज नदीकाठी सये,

आज नदीकाठी सये

तुह्ये मिळाले पतुर

तुह्या भेटीसाठी महा

जीव झालाय आतुर.

तूही येनी अशी हालं

जशी नागिनीची चाल

अन् बांधता बुचडा

होती जीवाचे गं हाल 

तुह्या ओठी बोल असे

जशी वाजती सतार

तुह्या भेटीसाठी महा

जीव झालाय आतुर.

तूही चाल लय भारी

तूह्ये बोल लय भारी

तुह्या अंगाशी लागता

उन्हं जळते दुपारी

काय बोलू तुह्या पुढं

शब्द झालेत फितूर

तुह्या भेटीसाठी महा

जीव झालाय आतुर.

 उन्हं तुला गं लागता

जीव महा तळमळे

येनी ओठाशी धरी तू

लय जीव महा जळे

कशी छळतेस मला

लय तू सये चतुर

तुह्या भेटीसाठी महा

जीव झालाय आतुर. 

तूही घागर कोरडी

आड आटलेला सारा

तुह्या मनगटाला पुर

किती डोळ्याला या धारा

कशी तोडावी उन्हाची

पायी बांधलेली बेडी

कशी भरावी साजणी

तुही घागर कोरडी. 

जशी कोरड्या मातीला

पावसाची हुरहूर

तुह्या भेटीसाठी महा

जीव झालाय आतुर. 

– नागराज पद्मा कौतिकराव (कविरंग)

विभाग – मुंबई

इंसानियत को जिंदा रखने के लिये पानी की मुक्तता करनी जरूरी है!          ‘ऐसा भारत बनाएँगे’ के पिछले पाचवे अंक में सभी युवां साथियोने ‘वेलेन्टाइन डे’ के अवसर पर प्यार पर अपनी सोच, भावनाओ को पूरे सच्चाई से खुले दिल से समाज के सामने रखा, इसीलिए हम सभी का शुक्रिया अदा करते है।


              इस बार 22 मार्च ‘विश्व जल दिन’ के अवसर पर हम सभी युवां साथियोने हमारे काफी नजदीकी मुद्दे पर मतलब ‘पानी’ के मुद्दे पर साँझी चर्चा कर के, पानी के हर अंग को समझने की कोशिश कर, उसपर एक समझदारी बनाकर, अपनी सोच और अनुभव को सभी लोगों तक पहुँचाने के लिए ‘ऐसा भारत बनाएँगे’ पत्रिका में ‘पानी’ के बारे में लिखा है।

              पानी पर लिखते हुए काफी साथियोने दूर दूर से पानी भरने के अपने संघर्ष के अनुभव लिखे, किसीने पानी अधिकार के बारे में लिखा, किस तरह से पानी का अकाल पड़े गांव में दो प्यार करने वालो के बीच पानी मुसीबत बन खड़ा होता है, किस तरह से पानी के कारन लोगो की शादी टूट जाती है, प्यासे को पानी पिलाने के संस्कृती के बारे में लिखा, पानी के महत्त्व के बारे में लिखा, किस तरह से शहर निर्माताओं को ही पानी अधिकार नकारा जाता है; या जानबूझकर पानी से वंचित रखा जाता है, किस तरह से आज आधुनिक युग मे भी धर्म के नाम पर पानी पीने की वजह से एक बच्चे की अमानवीय तरीके से मारपीट की जाती है, और कुछ साथियोने पानी बचाने (Save Water) के बारे में भी समाज मे जागरूता फैलाने के लिए लिखा।

              आज हम देख रहे है, जो पानी कुदरत हम सभी को समान दे रहा है, उस पानी पर कुछ लोग अपनी मालकियत जमा रहे है। किसीको बोहत कम या कुछ भी नही और किसी को बोहत ज्यादा तरीके से पानी बाँट रहे है। बरसो पहले उच्च-नीचता, जात-पात,धर्मभेद इस विचारों की वजह से एक तपके को पानी नकारा था। उस वक़्त पानी के लिए बडा जनांदोलन,संघर्ष हुवा और पानी हमारा मानव अधिकार है यह स्थापित हुवा था। पानी का समान बंटवारा होगा इसे अधोरेखित किया गया था। जब कि 2014 को मुम्बई हायकोर्ट ने आदेश दिया, भारतीय संविधान का अनुच्छेद 21 कहता है कि, सभी नागरिकों को सम्मानपूर्वक जीने का अधिकार है; इसीलिए सभी को सम्मान से पानी अधिकार मिलना चाहिये। फिर भी इसके बावजूद आज भी मुम्बई महानगरपालिका ने मुम्बई के 20 लाख श्रमीक नागरिकोंको पानी से वंचित रखा है। रोजाना किसीकी गाली खा कर, पानी की भिख मांग कर, पानी पीने वाले इन लोगो के सम्मान का क्या? इसके बारे में कोई सोचता नही।

               कैलिफोर्निया जैसे  राज्य मे पानी को शेयर मार्केट में कमोडिटी के रुप मे बेंचा जा रहा है, दुनिया भर में सरकार पानी के प्याऊ, फाउंटेन और आसानी से उपलब्ध होने वाले पानी के हर स्त्रोत को नष्ट कर रही है, ताकि हमे पैकेजिंग ड्रिंकिंग वाटर पे निर्भर होना पड़े। बस्ती बस्ती में पानी को पानी माफिया द्वारा बेचा जा रहा है, इस तरह से दुनिया भर में पानी का बड़ा मार्किट तैयार हो रहा है और पानी का निजीकरण जोरो शोरो से चालू है।

              आज भारत मे असिफ जैसे बच्चे को मंदिर में पानी पीने पर बेरहमी से मारा जाता है, मारने वाले लोग अपने धर्म की सुरक्षा कर रहे इस विचारो से ऐसी हरकत कर रहे है; जिन्हें पता नही होता कि प्यासे को पानी पिलाना यह हर धर्म सिखाता है।

              एक तरफ निजीकरण दूसरी तरफ आज भी जात-पात, धर्मभेद, वर्गभेद की वजह से नागरिकों को पानी से वंचित रखा जा रहा है। हमने देखा है, किस तरह से बोलिव्हिया जैसे देश मे पानी के निजीकरण की वजह से वहाँ के नागरिकों का संघर्ष युद्ध मे रूपांतरीत हुवा था। और काफी नागरिक और पोलिस प्रशासन से काफी लोगो को अपनी जान से हात धोना पड़ा था। इसीलिए हर देशों ने , नागरिकों ने पानी सबको समान मिलना चाहिए यह सबका अधिकार है, यह अपने दिल से स्वीकारना चाहिए और किसी के साथ भी पानी बँटवारा करने में किसी भी प्रकार का भेदभाव नही करना चाहिए। सरकारों ने पानी निजीकरण न करते हुए पानी को सार्वजनिक करना चाहिए। तभी सभी को पानी आसानी से उपलब्ध हो सकता है, अन्यथा वो दिन दूर नही जब दुनिया मे पानी के लिए तीसरा महायुद्ध शुरू होगा!

संपादन: विशाल जाधव, पूजा कांबळे

निवडणुकीच पाणी!

चिखला नाल्यात गोणपाटाचं छत होतं आमचं!. जव्हां आमचं मिस्टर मूनसीपालटीच्या गाडीवर कचरा भरायला जायचं. येग्येगळ्या जातींच्या लोकांची गर्दी होती आमच्या वस्तीत. दिवस बदललं गोणपाट बदलून घरावर पत्र चढवले, टीनशेड च घर झालं शहरात. पण तरीही सरकारसाठी आमचीच गलिच्छ वस्ती. 

दोन पदरी रस्त्याच्या सिग्नल ला डम्पिंगच्या पाशी झुमाण्यांचं चोरीच्या  पाण्याचं कनेक्शन होतं. डोक्यावर दोन हंडे अन काखतं कळशी घेऊन रातरच्या ३ वाजता आमच्या पाण्याची स्वारी निघायची. सगळं नगरच जणू जत्रा भरल्यावानी हांडे-भांडे घेऊन सिग्नल ला असायचं. एकदा तर त्या दुकानवाल्या शिंगण्याची पोरगी ट्रक खाली गेली अन.. जागीचं मेली कळशीभर पाण्यासाठी!  एवढ्या आगीतून दोन फेऱ्या मारल्यावर खटल्याची अंगोळपाणी व्हायची. आज बरेच वर्ष झाले आम्हांलं! तान्ह पोरगं होतं जाधवीन बाईलं! आता लग्नाला आलंय सम्या. पाण्याचं अंतर सोडून काहीच बाई बदललं नाही. बदललंय तर फक्त राजकारण!

पाच वर्षांपूर्वी पाणी देतो म्हणून तीन वेळा निवडून आलेला आमचा नेता, आज आमच्याकड ढुंकूनही पाहायला तयार नाही. बायको आमदार, स्वतः नगराचा अध्यक्ष, अन पोरगा हायच निवडणुकीचा तयारीत.  पाच मजली इमारत, दहा-पंधरा गाळे, अन नाही नाही त्या ठिकाणी जमिनी घेतल्या आमच्या साहेबांन.  स्वतःला म्हाडी, पोराला गाडी, अन बायकोला  नऊवारी साडी, असं त्यांचं बिऱ्हाडं. काही बोलायचं म्हणलं तर! मिलचे भोंगे जसे बंद झाले, तसे आमचे आवाज ही बंद करणार असं वाटायला लागतं. खुर्चीवर बसलेल्या मंत्र्या पासून वस्तीतल्या अण्णा पर्यंत, सगळे आमच्या मुळावर उठलेत. आमचा गुना एवढाच की पाणी मागितलं सरकारला. 

मूनसिपालटीच्या मोठ्या मोठ्या फ्लेक्सवर लिहिलंय कि, या अर्ज करा पाणी घ्या. तेच केलं आम्ही. आंम्हालं भेटलं काय? तर  पाण्याच्या महिन्या वाल्यांन महिना बंद केला. आमच्या पाण्याला तोटी लावली. तवा कळलं की आमचं पाणी कुठं थांबलय! पाणी इकणारे, महिण्यावाले, अन मूनसिपालटीच्या सायब लोकाची मिलीभगत व्हती. आमचा नेत्यालं म्हणायचं म्हणलं तर त्याचं रामायनचं येगळ. दर येळलं असंच होतं. घरो घरी नळ देतो म्हणतो, अन नेता व्हऊन पळून जातो. अन परत आला तर डायरेक पाच वर्षांनी येतो ते पण मत मागायला, अन ते पण हातात बिसलेरी बॉटल घेऊन. आमच्या भाईन म्हणजे आमच्या नेत्यानं हो वस्तीत दोन येळा पाइपलाइन टाकली अन परत उपसली. याच्यावर दोन इलेक्शन जिकले भाईन! असा  कर्तृत्वान नेता. 

पाणी इकणारा राजकारनी  पक्षाचा माणूस असतो, त्याला पाणी चोरून इकणारा मूनसिपालटीचा असतो. अन त्या सायबाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणा की, जबरदस्ती करून आदेश देणारा पण  राजकारणी पक्ष्याचा नेता असतो. अश्या या फिरत्या सायकल मुळं आजही अधिकाराच्या  पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

            इथं दिवसभर हुडकून आजला गावत नाही अन पाण्यासाठी यांच्या मड्यावर रुपया मोजावा लागतो. कधी कधी असं वाटतं की वरवंट्यावर मसाला वाटावा तस यांचं तोंड ठेचाव. पूना कधी तोंडानं मत मागायची हिम्मत करणार नाही. लेकरा बाळाची शाळा गेली, म्हातारीच म्हातारपण गेलं, बाईला चामड्याचा रोग झाला, सूने च कंबरड मोडलं, बाधे बिऱ्हाडचे-बिऱ्हाडं गुलामीच्या मार्गाला लागल्याती. लेकरा…. नाही-नाही ती जिंदगी झाली. लय महागात पडलं हे निवडणुकीचं पाणी! देश जरी स्वातंत्र्य  झाला असला तरी पाणी मात्र गुलमीतच हाय! 

             पण लेकरा इथंच काय हे संपू देणार नाही आमी. जवर या पाण्याला निवडणुकीच्या तावडीतून सुटका करत नाही; अन मह्या पाण्याला गुलामीतून मुक्त करणार नाही. तव्हर ही लढाई लढतच राहणार आमी. तशी आनंच हाय आमाला बाबासायबाची! 

 ~ प्रविण सुनीता रतन..

विभाग – मुंबई