21 व्या वर्षात लगीन बाई धोक्याचं की मोक्याचं…

काही दिवसांआधी टीव्ही चालू केल्यावर, व्हाट्सअप पाहिल्यावर एक वाक्य दिसू लागले, “आता मुलींचे लग्नाचे वय 18 नसून 21”

 हे स्टेटस पाहताना अनेकांनी त्यांच्या स्टेटसला या निर्णयाबाबत “स्वागतार्ह निर्णय” असेही टाकले.

शक्यतो भारत देशात लग्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नवीन आयुष्यात पदार्पण किंवा एक नवी संधी किंवा आयुष्याचा फिक्स भाग म्हणून त्याकडे बघितले जाते. परंतु त्याच्याच दुसऱ्या बाजूला आपल्याला हे ही दिसून येते की , या देशातील काही आयुष्यात यशस्वी असणारी मंडळी जी आहेत ,ती ‘बिनलग्नाची’ किंवा साध्या सरळ भाषेत म्हणायचं तर ‘सिंगल’ असतात. म्हणजेच मुळात लग्न न केल्यामुळेच तुम्ही चांगले यशस्वी होऊ शकता असच लोक सांगतात.

जसं की मी आता उल्लेख केला की मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात आले. आपण थोडं १८ या वयाबद्दल जाणू. तर मंडळी १८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्तीला बाल अधिनियम २०१५ ( काळजी व संरक्षण ) या अंतर्गत कायद्यात  मूल (बालक) म्हटले जाते. म्हणजेच १८ वर्षापेक्षा तुमचे वय १ दिवस जरी लहान असेल तर मुलांसाठी आवश्यक असणारे सर्व कायदे त्या व्यक्तीला लागू होतात. मग त्या आधी जर त्याचे लग्न झाले किंवा त्याच्या सोबत लैंगिक गोष्टी घडल्या किंवा धोकादायक कामाच्या ठिकाणी नोकरी जरी केली ते बेकायदेशीर ठरते. या ठिकाणी आता आपण थोडं मुलींच्या जीवणाबाबत जाणून घेऊ. अजूनही देशात “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या वाक्याची गरज स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनीही ही भासते. म्हणजेच की आजही लोकांना, आपल्या देशातील नागरिकांना मुलींनी जगवा व त्यांना त्या सोबत शिकायला द्यावं यासाठी सांगावं लागतं.

मुलगी म्हणजे अनेकांना एक ओझं , एक भीती तसेकंग उगीच ची अडचण वाटते. तसेच काही परंपरा रूढी नुसार तिला ही आई-वडिलांसोबत आयुष्यभर राहणे शक्य होत नाही.

आज जरी आपण पाहिलं की अनेक मुली शाळेत येत असल्यातरी मुलांप्रमाणे उच्च शिक्षण घेणं, स्वतःच्या करिअरचा निर्णय घेणं, फक्त शिक्षण एके शिक्षण शिक्षण घेणं त्यांना शक्य होत नाही.तसेच सामाजिक दबावामुळे अनेक आई वडील, आपल्या मुलीचं लग्न कधी होतंय ? याच विचारात तिला मोठं करत त्याचसोबत त्या लग्नासाठी पैसे साठवत त्यांचं दिवस , आयुष्य काढतात.  तसेच शहरी भाग व ग्रामीण भाग जर आपण पाहिला तर दोन्ही ठिकाणी वेगळी परिस्थिती आढळून येते. गावात जर आपण पाहिलं तर अनेक मुलींची लग्न ही  कायद्यानुसार सांगण्यात आलेल्या म्हणजेच १८ व्या वयाच्या आधी ही लावली जातात ज्याला आपण बालविवाह असे संबोधतो. हे गावात जरी जास्त प्रमाणात असले तरी काही प्रमाणात शहरात ही दिसून येते. तसेच गावातील मुलींना शैक्षणिक सुविधा व इतर आवश्यक  करिअरच्या संबंधित संधी अल्प प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे तू घरात एक मोठी अडचण आई बाबांना वाटू लागते. आज आपण किती ही म्हटलं की समाज बदलत आहे तरी ही मुलगी मुलापेक्षा छोटी असो वा मोठी तिचं करिअर होवो अगर न होवो पण तिचं लग्न आधी व्हायला हवं ही पुरुषसत्ताक विचारसरणी व त्यातून निर्माण केलेला मेंदूत व मनात असणारा मुलामुलींबद्दल भेद यातून दिसून येतो. शहर ही काही ठिकाणी  या बाबतीत अपवाद ठरत नाही. आपब म्हणतो मुली शिकत आहेत, त्यांना संधी मिळत आहे. पण १८ च्या जवळपास मुलगी आली की अनेक ठिकाणी घरात “लग्नासाठी स्थळ बघायला येत आहे”, अशी चर्चा सुरू होते.

चला तर आता या १८ वयाच्या मागील शैक्षणिक परिस्थिती ही जाणून घेऊ. सामान्यतः वयाच्या १८ व्या वर्षी विद्यार्थी हे १२ वी पूर्ण केलेले असतात म्हणजेच आयुष्यातील शिक्षणाच्या प्रवाहातील महत्वाच्या टप्प्यात पदार्पण करणार असतात. असं नक्कीच म्हणता येईल की आयुष्यात यशाच्या मार्गावर जाण्यासाठी सज्ज होणार असतात व त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात जाण्यासाठी उत्सुक असतात. म्हणजेच जर आपण मानलं की १८ व्या वयात लग्न करायचं असेल तर मुलींना या संधीपासून मुकावं लागेल. आता काहीजण हे ही म्हणतील की लग्न करून ही शिकू शकते. परंतु खरंच आपण आपल्या परंपरा, पुरुषसत्ताक विचारसरणीतून इतके मुक्त झालो आहोत का की तिला लग्नानंतर घरातील कामे न सांगता शिकायला देऊ. त्याचसोबत त्या घरी तिला “सध्या लगेच मूल नको” असं सांगणारे नातेवाईक, सासू – सासरे भेटतील का ? 

तसेच या वयात येणारं बाळंतपण तिला व तिच्या बाळासाठी पोषक असेल का ? आणि आलेल्या बाळंतपण व येणाऱ्या बाळाच्या जबाबदरीमुळे ती मानसिकरित्या शिक्षण, करिअर व कुटुंब या गोष्टी एकत्र झेलू शकेल का ? 

चला आता जरा २१ व्या वयाचं पाहू…

वय २१ केल्यामुळे कदाचित तिच्या खाण्यापिण्यावर, तिला मिळणाऱ्या आजच्या वागणुकीवर तळागाळात इतका अपेक्षित परिणाम नाही होणार पण या कायद्यामुळे जे आईवडील मुलीला १८ वर्ष आल्यावर लग्नाच्या गोष्टीबाबत बोलणं सुरू करतात ते तरी निदान लग्नाऐवजी करिअर बाबतीत अधिक विचार करू लागतील. तसेच असं नाही म्हणता येत की या वयाच्या आधी पण लग्न व्हायची थांबतील. परंतु हो या कायद्या अंतर्गत सरकारी यंत्रणेत कार्यरत असणारे अधिकारी, तसेच सर्व यंत्रणा जर आपलं काम नित्यनियमाने व जबाबदारीने करतील तर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल. 

शेवटी सर्व नागरिक , शासन आणि प्रशासन यांच्याच हातात आहे की ते 

२१ वय हे धोक्याचं की मोक्याचं ठरवायचं..😊

  • सिद्धेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *