हा लढा पाण्याच्या हक्कासाठी!

पाणी  मिळणे हा प्रत्येकाचा मुलभुत अधिकार आहे. 21 व्या शतकात सरकार सांगतय पाणी हा मुलभुत अधिकार आहे. संविधान सांगतय पाणी हा आमचा अधिकार आहे. महानगरपालिका सांगते सर्वाना पाणी  मिळाल पाहिजे. ह्या मुंबई सारख्या सुंदर नगरीत आजही पाण्यासाठी वणवण फिरावं लागतयं. कित्येक भाषणात व पुस्तकात पाणी हे जीवन ऐकताना व बोलताना किती चांगल वाटत. आम्ही वन विभागाच्या जमिनीवर राहत आहे. तर मग पाणी हा माझा हक्क नाही का? मग मला हे पाणी का भेटत नाही. आम्हाला पाण्यापासून का वंचित ठेवल जात? आम्हाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? मुळात म्हणजे पाणी हे कोणी घरात बनवत नाही. पाणी निसर्गाची देण आहे. त्यामुळे पाण्यावर प्रत्येक सजीवांचा समान अधिकार आहे. पाणी हे प्रत्येक सजीवाला मिळालचं पाहिजे.

 इथे पाणी भेटत ते पण दलाल लोकांकडून, ते पण चोरीचं, बेकायदेशीर भेटत. इथे तर राजकीय दलालांनी पाण्याचा बाजार मांडून ठेवला आहे. राजकीय लोक निवडणुका आल्या की धडपड करतात. फक्त पाण्याचं अमीश  दाखवतात. व त्यातील काही राजकीय नेत्याची पॉवर असेल ते पाणी कनेक्शन देण्यासाठी पुढे येतात. पाण्यासाठी पाईप लाईन व इतर कामासाठी 4 ते 5 हजार आम्हीच द्यायचे आणि महिन्याला पाण्याचे बिल म्हणून 200 ते 300 रु देऊन पण 4 ते 5 दिवसा नंतर पाणी दिल जात. तेही फक्त 25 ते 30 मिनिट. व ह्याच पाण्यासाठी अहोरात्र जागावं  लागतं.तेही पाणी नाही भेटल तर डोक्यावरून आणायला लागतं.आणि एक हंडा आणायला 20 ते 25 मिनिट लागतात. आणि सरकार सांगतयं पाणी वाचवा! ते कसं? इथे तर पिण्यासाठी पाणी दिल जात नाही. हे कधी पर्यंत चालणार? हे आम्ही थांबवणार आहे. पाण्याचा संघर्ष आम्ही नेहमीच करणार आहे. उन्हाळा वाढला आहे. पाण्याचे प्रश्न अजुनचं वाढले आहेत. पाण्यासाठी  नागरिकांना अधिकचं वणवण करावी लागणार आहे. दुर्दैव म्हणजे 20 लाख श्रमिक नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यातील काही श्रमिक नागरिक वनविभागाच्या जमिनीवर स्थायिक आहेत. आणि म्हणून महानगर पालिका त्यांना पाणी देत नाही. 

कोविड सारख्या महामारीत सरकार आम्हाला सांगतय; सतत हात धुवा, ते कुठंन? आणि कस धुणार? महापालिकेला नागरिकांबद्दल थोडी पण संवेदना, जाणीव नाही का? जरी माणुस कोविड सारख्या महामारीपासुन वाचला असेल पण पाण्याविना तो नक्किच मरेल. त्यामुळे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक पाणी प्रत्येकाला मिळालेच पाहिजे. पाणी हा आमचा हक्क आहे. जो पर्यंत मुंबई महापालिका आम्हाला आमचे हक्काचे पाणी देत नाही; तो पर्यंत आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहू आणि आमचा पाण्याचा हक्क मिळवून घेऊ.. 

~  शिल्पा नवघरे

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.