सोहळा…

रात्रभर जागून डोळे नुसते जळजळत होते. तरीही रहिम पहाटे लवकर उठला. ट्रंकेतून पांढरा शर्ट काढला..तसं म्हणायला शर्टाचा पांढरा रंग कधीच उडुन गेला होता..उरल्या होत्या फक्त शर्ट पांढरा असल्याच्या काही खुणा. झपाझपा अंगावर पाणी मारुन रहिम धंद्यावर जायला तयार झाला. रशीदा अजुनही गाढ झोपेत होती. अम्मी मात्र सकाळीच शिलाई मशीनवर काम करत होती. अम्मीने दिलेला काळा चहा संपवून रशिदने रामुचाचाच्या अड्ड्यावर  धाव घेतली. तिथे आधीच कमली, पारो,पक्या, छोटू, सलीम,अवत्या..सारी टोळी जमा होती. चाचानी सर्वांना एक-एक कटींग व दोन पारलेजीची बिस्कीटं दिली. रहिमने घटाघटा चहाचा ग्लास रिता केला अन् बिस्किट मात्र रशीदासाठी खीशात सरकवली. चाचानी सर्वांच्या हातात झेंड्याचे बंच दिले.

“सब बच्चालोग अलग अलग सिग्नल पे रुकने का”

“जी चाचा”

“कुछ भी करके ११ बजेतक सब माल खतम होना मंगताय” “माल रीर्टन लाया तो..तुमकोच पैसा देना पडेगा”

सगळे गप्पचं झाले..

“रात का ओवरटाईम और सारे झंडे बेचने का मीलाके ७० रुपया मिलेगा सबको..आई बात समझमे..चलो भागो अभी धंन्देपे..”

रशिदच्या चेह-यावर हास्य फुलले.. ७० रुपये मिळणार म्हणून…! जवळच्या पिशवीत झेंडे ठेवताना ते इवले-इवले हात झेंड्यांना गोंजारु लागले…… रात्र जागून बनवले होते ते झेंडे.

 सर्व पोरं वेगवेगळ्या सिग्नलवर विखुरली. रशिद सिग्नलवर थांबणा-या प्रत्येक गाडीकडे त्याची नजर भरधाव वेगाने धाव घ्यायची…. कोणी झेंडे घेत होतं..तर कोणी फक्त नजरेनेच नकार देत होतं…तर कोणी २ रुपयाच्या झेड्यांचा भावतोलही करत होतं….तर कोणी 5 ते 10 रुपये जास्तही देत होतं……परत सिग्नल उठला आणि गाड्या चालु झाल्या की, रशिदची नजर समोरच्या कंपाऊंडकडे जात होती. तिथे पूर्ण सफेद पोषाखात माणसं लगबगीने इथे तिथे वावरत होती..कोणी स्टेजवर तर कोणी खाली..बसले होते.. त्यातल्या एकाने हात करुन रहिमला जवळ बोलावलं. अर्धे अधीक झेंडे विकतही घेतले.. पैश्या बरोबर त्याच्या हातात एक वडापावही दिला…..   

तितक्यात एक लाल दिव्याची गाडी आली…. पूर्ण सफेद कपड्यात माणसं उतरली गेली….. रशिदने वडापाव बहिणी साठी पिशवित ठेवला..

चौकात मोठमोठ्यांनी भाषणं सुरू झाली. तितक्यात सिग्नल लागला अन् त्याला पुन्हा गाड्यांकडे धाव घ्यावी लागली. पण कान मात्र चौंकातच मागोवा घेत होते.

१ च्या सुमाराला पोटातली भुक कलकलायला लागली. झेंडे ब-यापैकी विकले गेले होते. आलेले पैसे मोजून खिशात ठेवताना, बिस्किटांना हात लागला..पण लगेच रशीदाचा चेहरा समोर आला.भुक पुन्हा स्मित  हसली अन् बिस्किट पुन्हा खिशात सरकवली गेली….

पुन्हा चौंकातल्या आवाजानी रशिदची नजर तिथे वळली. गाडीतून आलेल्या पांढ-या कपडेवाल्यानी झेंडा फडकवला..

“सावधान…राष्ट्रगीत शुरू करेंगे…शुरु कर…”

रशिदही उत्साहात जागच्या जागी उभा राहीला.एका हातात झेंडे..पोटात भुक अन् एका हाताने झेंड्याला सन्मान.

जयहिंदच्या जल्लोषात कार्यक्रमाची सांगता झाली. ११ वाजता पूर्ण चौंक सामसुम.. इतकावेळ गजबजलेला चौंक शांत झाला. रहिमही घरी जायला निघणार तेवढ्यात एक ओझरती नजर पुन्हा चौंकात गेली. क्षणभरासाठी ते पोर कळवळलं अन सरळ चौंकात धाव घेतली. गुढग्यावर बसून खाली पडलेले प्रत्येक झेंडे तो उचलू लागला. भरल्या डोळ्यांनी पायाखाली तुडवलेले झेंडे उचलू लागला. सर्व झेंडे छातीशी कवटाळून अनेक प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेवून एक कोवळा भुकेला जीव देशाच्या प्रतिमेला छातीशी कवटाळून चालू लागला घराकडे….

    ध्वजस्तंभावर झळकणारा तो मलमलचा कपडा थोडावेळ का होईना खुष होता..निदान त्याच्या नशीबी रस्त्यावरची धुळ तर नव्हती.

 अम्मीने बनवलेली भाताची पेज भुरक्या मारत संपवून रशीदाच्या हातात दोन बिस्कीटं अन् वडापाव देवून थकलेला तो कोवळा जीव जमीनीवर पहुडला.

कारण आज रात्रीही पुन्हा जागायचं होतं त्या इवल्या हाताना उद्याची भुक आसमंतात भिरकवण्यासाठी…

…………

      (कसले हे स्वातंत्र आपुले, जिथे रोज मरते भुक हास्य लपेटुन)

   –   शिल्पा परुळेकर पै

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *