लोकशाही राज्यघटनेचा मुहूर्त!

 बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते उगाच नाही! आपण कितीही मोठे झालो तरी बालपणीचा आणि शालेय काळ कधीच विसरू शकत नाही. शालेय जीवनातील अनेक आठवणी, प्रसंग मलादेखील अजून आठवतात. असाच एक प्रसंग सुविचार लिहिण्याचा! स्वच्छ, सुंदर अक्षर हाच खरा दागिना! आणि याच युक्तीप्रमाणे माझं अक्षर असल्याने मला शाळेत आल्यावर फळा लिहिण्याचा दिनक्रम होता. काळ्या करकरीत फळ्यावर मी रोज सुविचार लिहीत असे . आणि असाच एक सुविचार लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य! या सुविचाराचा अर्थ तेव्हा बारा-तेराव्या वर्षी मला फारसा उमगला नाही. पण जशा इयत्ता पुढे गेले तसा मात्र उमगला. 

इतिहासाबरोबरच नागरिकशास्त्र हा विषय आपल्या सर्वांनाच होता. या नागरिकशास्त्रात भारताच्या लोकशाही राज्यघटनेची मुहूर्तमेढ समजली आणि त्या सुविचाराचा अर्थ खऱ्या अर्थाने समजला. २६ जानेवारी १९५० ज्या दिवसापासून आपल्या भारतीय संविधानाला व्यवस्थेत समाविष्ट करून लोकांचीसत्ता सुरू झाली तो हा दिवस! संविधानाची रचना, संविधान बनवणे या सर्व प्रक्रियेत जेवढा कालावधी लागला तेवढंच अमूल्य योगदान हे डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ भीमराव आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबूल कलाम यांचं होतं. पण ज्या नागरिकांसाठी हे लोकशाही राज्य उभं करायचं ते नागरिक ती जनता सुद्धा या घटनेत संविधान सभा बैठकीत उपस्थित होती. 

विविधतेतून एकतेचं दर्शन ज्या संस्कृती, वेशभाषा, लोककलेतून घडतं ते आपलं लोकशाही राज्य! जनतेला  प्रगतीसाठी योजना आखण्याचा आणि अंमलात आणण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हाच अधिकार दिला लोकशाहीने! अधिकार, स्वातंत्र्य आणि मताधिकार जरी जनतेला मिळाला असला तरी त्याचे पालन आणि योग्य निर्णय घेणे हे देखील जनतेचे कर्तव्य आहे. आणि हेच राष्ट्रीय कर्त्यवाचं भान असणं ही आजच्या काळाची  गरज आहे. ज्यांनी आपल्या बलिदानाने वर्चस्वाच्या साखळ्या तोडल्या त्या महान देशभक्तांचं कायम स्मरण ठेवून लोकशाही राज्यघटनेची ही मुहूर्तमेढ अधिक बळकट करूयात!

– अनु मुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *