लोकशाही कडून हुकूमशाहीकडे वाटचाल…

भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेऊन त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करावी. न्यायालयात सुद्धा द्विपक्षीय युक्तिवाद ऐकले जातात, थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचे तसेच मत मांडण्याचा अधिकार आहे. संसदीय लोकशाही नुसार निवडणुकीतील संख्येच्या बळावर सत्ता मिळते. आज केंद्रातील सरकार सत्ते मधील अधिक बहुमताच्या जोरावर  काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, तसेच एनआरसी आणि सीए.ए.ए.  सारखे विधेयके आणून मंजुरी मिळवली जाते. विरोधकांना कस्पटासमान वागवून त्यांच्या मतांचा अनादर केला जातो. एकीकडे ज्या लोकशाहीच्या घटनात्मक अधिकाराने सत्ता मिळवली; तीच घटना सत्तेच्या बहुमताच्या जोरावर फिरवीत असल्याचे दिसून येत आहे.

हुकूमशाही संदर्भात मागोवा घेतला तर सर्वात प्रथम तत्कालीन राज्यव्यवस्था संदर्भात असंतोष निर्माण करणे, लोकांच्या नैराश्य तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत अराजकता -गोंधळ निर्माण करणे, राज्यकर्ते संदर्भात अनादर निर्माण करणे व जनमत प्रक्षोभित करायचे, संविधाना मध्ये आपल्याला हवे असलेले बदल बहुमताच्या जोरावर करून घ्यायचे अशा प्रकारचं वागणं हे सध्याच्या केंद्र सरकार मध्ये खास करून दिसून येत आहे. एकंदरीत हुकूमशाहीकडे त्याचबरोबर झुंडशाही कडे वाटचाल होताना दिसत आहे.

आज भारतातील अनेक जाती ,विविध पंथ, धर्म, वेगवेगळ्या भाषा, असून सुद्धा एक परिपूर्ण भारतीय म्हणून आपण सोबत काम करत आहोत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र बरोबर धर्माचे आचरण करण्याचे, बोलीभाषा तसेच रोजगार निवडीचे सुद्धा स्वातंत्र्य दिलेले आहे . भारतातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात गायी – बैल बाबत श्रद्धा व देव – दैवत पाहिले जाते. हिंदू धर्माच्या रीतिरिवाज प्रमाणे गोमांस वर्ज्य असून गायीला गोमाता म्हणून पाहिले जाते. मात्र त्याच पशुची हत्या करून त्याचे मांस हे जैन, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचे अन्न आणि रोजगार सुद्धा आहे. पण आज लोकशाहीच्या तत्वानुसार देश चालविणारे बहुमताच्या जोरावर, धर्माच्या नावाखाली या रोजगारावर गोमांस बंदीचा कायदा पारित करून गदा आणत आहेत.

आज देशाच्या हिताच्या दृष्टीने कारभार हाकत असल्याचे भासविले जात असले तरी सत्तेच्या बहुमताच्या जोरावर विरोधकांच्या मताला किंमत दिली जात नाही. घटनात्मक लोकशाही आणि हुकूमशाही ही दोन शासन व्यवस्था आहेत. लोकशाही मध्ये पात्र उमेदवारांची निवड ही निवडणुकीद्वारे व कायद्याद्वारे स्थापित केलेल्या नियमानुसार होते मात्र हुकूमशाही  शासन व्यवस्था यामध्ये एक सामर्थ्यवान व्यक्ती किंवा काही शक्तिशाली लोकांचा गट  त्यांना अपेक्षित कायद्याद्वारे कोणत्याही परवानगीशिवाय संपूर्ण देशावर राज्य करतात. याचाच प्रत्यय वर उल्लेख केलेल्या दोन उदाहरणावरून हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकशाहीला मानणारा आणि भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अठरापगड जाती, भाषा, प्रांत,धर्म  या सर्वांना जोडणारा नागरिक म्हणून भारतीय संविधानातील अखंड  भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी या विरुद्ध आवाज उठवूया !!

 

~ जगदीश पाटणकर

     सीपीडी,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.