मुलीच्या लग्नाचे  वय  21 वर्षे बरोबर  की चूक??

मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे असताना 21 वर्षे करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. या बैठकीनंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होताना पाहायला मिळाल्या. अनेकांना हा निर्णय पटला तर बऱ्याच लोकांनी यावर विरोध ही केला.

माझ्यामते तरी हा निर्णय योग्यच आहे. कारण कितीतरी मुलींच्या मना विरोधात 18 वयाच्या आधीच लग्न होताना दिसत होते आणि अजूनही असे पाहायला मिळतेच. मुख्यतः ग्रामीण भागात गरीब पालकांना तरण्याताठ्या मुलींचा फार दिवस सांभाळ करणे धोक्याचे वाटते. मुलीचे हि लक्ष इथे – तिथे वळते की काय? याची चिंता असते. मुलगी जेव्हा मोठी होते म्हणजे तिला मासिक पाळी येण्यास सुरुवात होते तेव्हा कित्येक लोकांच्या घरी वातावरण बदलण्यास सुरुवात हो.आई राग राग करते, रडते वडील चिडतात शाळाच बंद म्हणतात! किंवा अशी मुलगी शाळेत येत राहिली तर बाकीच्या मुली तिच्याशी बोलत नाहीत.असे कित्येकदा निदर्शनास आले आहे या गोष्टींकडे सर्वांगीण विचार झाला पाहिजे तो होताना दिसत नाही.

खरे तर यावर उपाययोजना करायला त्याच्या टोकाशी जाऊन निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे भारतातील कोट्यावधी मुलींचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. वय वर्षे अठरा पर्यंत मुलींचे शिक्षणही पूर्ण होत नाही. 21 वय असेल तर मुलगी पूर्णतः शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या पदावर असेल. म्हणून या निर्णयामुळे येणाऱ्या भावी पिढ्याही सुधारताना पाहायला मिळतील. पूर्वी तर मुलींचे लग्न चौदाव्या वर्षीच पार पाडत होते आणि मग त्यामुळे लहान वयातच मातृत्व आणि पोषण आरोग्याचे प्रश्न समोर येतच होते.  जर 14 –  15 व्या वर्षात स्त्री गर्भवती असेल तर या वयात फार समज नसते,योग्य तशी स्वतःची काळजी घेण्यास समजत नसते. त्यामुळे बाळाची वाढ ही व्यवस्थित होत नाही.त्यामुळे कितीतरी गर्भवती महिलांचे बाळ पोटातच मृत्युमुखी पडते. त्यामुळे माझ्या मते तरी मुलीचे वय 21 असावे पण त्यासोबतच मुलींच्या कुटुंबांना अनेक पातळींवर आधार हवा, त्यासाठी वेगळे शोषण भ्रष्टाचार होणार नाही यावर देखील सरकारने विचार करायला हवा.आपल्या पाल्यांना मुलगी वयात आल्यावर चिंता असतेच यात काही तथ्य नाही. तर एकंदरीतच समाज मुलीकडे / स्त्रीकडे कशाप्रकारे बघतो त्याकडेही प्रामाणिकपणे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यावर प्रचंड सुधारणा करणे गरजेचे आहे.मुलीचे शोषण होऊ नये म्हणून तिच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करायला हवे. मुलीच्या कुटुंबाचे समुपदेशन व्हायला हवे. आणि मुलगी आपणहून पीडित होऊ नये म्हणून तिलाही वेळोवेळी समुपदेशन हवे.

      ग्रहउद्योग -व्यवसाय किंवा नोकरीसाठी पूरक असे शिक्षण मिळण्याची काहीतरी सोय करायला हवी. अशा काही थोड्याफार सुधारणा करण्यात आल्या तर पालकही मुलींचे लग्न घाईने उरकणार नाहीत. आणि कितीतरी मुलींची शिक्षणासाठीची जिद्द ते या निर्णयामुळे पूर्ण करू शकतील. आणि येणारी भावी पिढी यातून शिकेल. स्वतःच्या पायावर मुली उभ्या राहतील समाजासमोर त्यांचा एक आदर्श निर्माण होईल. शिक्षण असेल तर कोणतीही मुलगी न डगमगता समोरच्या गोष्टींचा सामना करण्यास ठामपणे उभी  राहताना पाहायला मिळेल.

पुनम संजय  निरभवणे.

Leave a Reply

Your email address will not be published.