महाराष्ट्राने जपलेला मानवतेचा सांस्कृतिक वारसा: महाराष्ट्रातील मुद्रणकलेची सोनेरी वाटचाल….

१ मे २०२२: महाराष्ट्र दिन विशेष…

“बहु असोत सुंदर संपन्न कीं महा..

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..”

या ओळींप्रमाणेच वैभवशाली वाटचाल असलेला आपला महाराष्ट्र..! याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत निसर्गसौंदर्य जपलेली, भौगोलिकतेबरोबरच ऐतिहासिक वारसा दाखवणारी,आध्यात्मिक्तेबरोबरच सांस्कृतिक जडणघडण जपणारी आणि अनेक प्रांतांना एकत्र, भक्कमपणे एका धाग्यात जोडणारी संस्कृती आपल्याला दिसून येते. आपलसं करणारी आपली मराठी भाषा आणि हेच मराठीपण जपणारा आपला महाराष्ट्र..! आता केवळ मराठी ही भाषाच म्हणून तिच्याकडे बघितलं जात नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील अस्मिता जोडणारी “महाराष्ट्रीयन भाषा” म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. आज जगातल्या कुठल्याही देशांत कोणी मराठी माणूस भेटला आणि त्याची भाषा ऐकली की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? असा प्रश्न विचारला जातो. आणि हो मी “महाराष्ट्रीयन” आहे असं आदरार्थी आणि अभिमानाने म्हणटलंही जातं. 

“जितके प्रांत तितक्या भाषा..!” आणि याच भाषेचा वारसा जपण्याचं आणि जतन करण्याचं काम माणसाने केलं ते मुद्रणकलेच्या माध्यमातून..! मुद्रणकलेमुळे वृत्तपत्रांचा प्रसार होईल आणि साहजिकच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार वाढेल या उद्देशाने १८०० च्या काळात महाराष्ट्रात मुद्रणकलेची खरी सुरुवात झाली. १८१८ मध्ये म्हणजे पेशवाईचा शेवट झाल्यावर मुंबईमध्ये वृत्तपत्रांच्या वाटचालीला खरी सुरुवात झाली. आपल्या मायबोली म्हणजे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणजे “दर्पण”.. हा सुरुवातीचा काल म्हणजे १८००-१९०० च्या काळात आपलं तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं नव्हतं आणि याच काळात दगडी शिळांवर वृत्तपत्रांची छपाई केली जायची. 

या छपाईची सुध्दा एक विलक्षण कहाणी आहे. या काळातील बहुतांश वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके ही सोमवारी प्रसिध्द होत असत. सोमवारी प्रसिद्ध होणा-या या साप्ताहिकाचं काम रविवारपर्यंत चालत असे. दगडी शिळाप्रेसवर मजकूर उलट्या पद्धतीने कोरला जायचा. वृत्तपत्र प्रसिद्ध झालं की दुस-यादिवशी त्या शिळेवरील बातमी पूर्णपणे पुसावी लागे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही छपाई शैली गाजली होती. या छपाईशैलीचं खरंच कौतुक म्हणावं लागेल कारण त्या काळात जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते तेव्हा मानवाने ही संकल्पना वापरून छपाई केली. 

१८०० ते १९००च्या काळात शिळेवर छपाई करण्यात आलेली वृत्तपत्रे आजच्या वृत्तपत्रांएवढी रंगीत नसली ना तरीही नीटनेटकी स्तंभ मांडणी, फॉन्टस् व भाषेतील आकर्षक शैलीमुळे वैशिष्ट्यपूर्ण होती. आजच्या काळाप्रमाणे त्याही वेळेस वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी किंवा नोटीशींसाठी पैसे मोजले जातं. प्रत्येक ओळीस ३ पैसे, पुनः प्रसिद्धीसाठी ४ आणे, अगदी भाषांतर करण्यासाठी दुप्पट आकार घेतला जात असे. आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात कुठला ना कुठला वारसा मिळालेला आहे जो मानवाने जपलेला आहे. अनेक अशी ऐतिहासिक शहरं आहेत जिथे मुद्रणाची परंपरा सुरु झाली. १८४२ साली आलं ते ‘ज्ञानोदय’ नियतकालिक. ज्ञानोदय नंतर आलेले दुसरे वृत्तपत्र म्हणजे ‘वृत्तवैभव’ तेदेखील दगडी शिळेवरीलच! सगळ्यात गाजलेले व जास्त काळ आपला पाया भक्कमपणे रोवून ठेवलेले वृत्तपत्र म्हणजे ‘न्यायसिंधू’. सध्याचा काळ आपण स्पर्धेचा काळ असं म्हणतो पण त्याकाळी सुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रांची स्पर्धा, खरमरीत टीका या व्हायच्याच. ‘न्यायसिंधू’ या वृत्तस्पर्धेचा प्रतिस्पर्धी म्हणजे ‘जगदादर्श’..! १८७७ साली आलेलं साप्ताहिक ‘मुत्सद्दी’. या साप्ताहिकात इंग्लंडमध्ये निघणाऱ्या इंडिया या साप्ताहिकातील लेखांची भाषांतरे छापून येत असतं. याच काळात आलेली इतर वृत्तपत्र म्हणाल तर ‘गावगन्ना’,’विचारसाधना’, ‘सुदर्शन’, ‘शेतकरी’ ही होती. १९१४ व १९१५ साली महायुद्ध झाल. महागाईमुळे काही वृत्तपत्रं ही बंद पडली.

आपल्या मराठी माती असलेल्या या महाराष्ट्रात अनेक अल्पायुषी, दीर्घा वृत्तपत्रं आली. काही इतिहासजमा झाली. काहींनी आपला जम बसविला आणि शहराच्या राजकीय,औद्योगिक, शैक्षणिक, वैचारिक गोष्टींनी परंपरेचा वारसा मिळवून दिला. आपल्या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे साहित्यिक व संत परंपरा लाभली आहे त्याप्रमाणेच वृत्तपत्रांचा उज्वल वारसा देखील लाभला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वृत्तपत्रांनीदेखील काळानुरूप आपलं रुपं बदललं. छपाईच्या सोप्या पद्धती आणि मोबाईलमधील व्हॉईस टायपिंगमुळे कुठल्याही माहितीची प्रिंट काढणं सोपं झालं. 

पूर्वी ‘टिपणं लिहिणं’ ही एक पद्धत होती. पद्धतच म्हणावी लागेल कारण हल्ली आपल्या हाताने कागद-पेन घेऊन कोणी फारसं लिखाण करताना आपण कोणाला बघत नाही. अगदी शाळा-कॉलेजमध्ये शिकणारी आजची पिढी जणू हाताने लिहिणेच विसरू लागली आहे की काय, असे वाटावे इतकी ही पिढी मुद्रण अर्थात “प्रिंटिंग” माध्यमावर विसंबून आहे. अगदी शिळाप्रेसपासून सुरु झालेला हा मुद्रणप्रवास आता डिजिटल प्रेसपर्यंत येऊन ठेपला आहे. ज्या मुद्रणकलेने ज्ञानाची अखंड कवाडे खुली केली आणि या कलेची आपल्या मराठी माणसांनी वारसारुपी चळवळ सुरु ठेवली त्या सर्व महाराष्ट्रीयन आर्थात मराठी माणसांना त्रिवार अभिवादन..! 

( या लेखासोबत दगडी शिळा व शिळेवर कोरलेली वृत्तपत्र यांची दुर्मिळ छायाचित्र जोडीत आहे. जी आपल्या मराठी माणसांनी ऐतिहासिक वारसा म्हणून संग्रहित ठेवली आहे.)  

(फोटो सौजन्य: अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र, अहमदनगर.)

– आर.जे.अनु, अहमदनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *