प्रिय समाज,
मला आज खुप लिहावस वाटत आहे ….! म्हणून मी आज तुम्हाला हे पत्र लिहित आहे!
तुम्ही काही दिवसांपूर्वी सरकारने काढलेल्या लग्नाच्या कायद्या विषयी चर्चा करत होतात, म्हणजेच सरकारने मुलीच्या लग्नाचे वय वर्ष १८ वरून २१ केले आहे. तर… तुम्ही ह्या कायद्याचा विरोध का करत आहात ? असे म्हणून की मुलीच्या लग्नासाठी वय वर्ष १८ च असले पाहिजे. असे का ?
वय वर्ष १८ पर्यंत आम्ही मुली आमचे आयुष्य जगतोच केवढे ? त्यावेळेस बाहेरचे जग सुद्धा पाहिलेले नसते! मग याच वयात आमच्यासाठी संसाराचे जग कसे वसते?
वयाच्या २१ वर्षांपर्यंत तरी लग्न झालेच, तर आमच्या भवितव्याकडे लक्ष द्यायला अजून चांगला वेळ मिळेलच. स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहू, मग आमचे भवितव्य ही चांगले घडलेच ना! आणि १८ वर्षांपर्यंत फारशी समज नसतेच म्हणून अल्लड पणात लग्नाच्या दबावामुळे चुकीचे पाऊल उचले जातात. म्हणजे कमी वयात आपला पार्टनर निवडण्याची पूर्णपणे समज नसतांना अस्पष्ट प्रेमाच्या नात्यात जाऊन घरच्यांचा लग्न संबंधातील जबरदस्तीचा विरोध करून स्वतःच्या मनाने पळून जाऊन लग्न करतात; तर २१ वर्षापर्यंत समज आल्यानंतर पळून न जाता आपल्या घरच्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तसेच योग्य निर्णय घेतले जातील. नात्या बाबतीतील ज्ञानहीन पळून जाण्याच्या निर्णयाचे प्रमाण ही कमी होईलच ! मग मुलीने कमी वयात चुकीचे निर्णय घेतलेले चालतील, की योग्य वेळी स्वतःच्या पायावर उभे राहून एक योग्य सुखी संसार सांभाळला तर चालेल ? आणि पळून जाण्यापेक्षा घरच्यांच्या सल्ल्यानुसार चालेल !
एक मुलगी असण्या व्यतिरिक्त मी ही मानव आहे !
आपल्या संविधाना नुसार तर “स्वतंत्रपणे”
राहण्याचा बिनधास्त पणे जगण्याचा,
हक्काने बोलण्याचा अधिकार आहेच ! मग
आम्हा मुलींकडून हे अधिकार चोरणारे तुम्ही कोण !
मुलगी जरा काही उच्च शिक्षण घेत असेल तर
तुम्ही आमच्या आई बाबांना बोलता “’काय हो मुलीला
एवढं शिक्षण देऊन काय होणार आहे? शेवटी लग्नानंतर
“चूलं आणि मुलं” करायचे आहे!” ‘”तुमची मुलगी आता मोठी झाली आहे, तिच्यासाठी आता चांगले स्थळ बघा नाही तर तिला शिंगं फूटतील आणि कोणाच्या तरी प्रेम प्रकरनात पडून पळून जाईल.. जर का पळून गेली ना….तर तुमची पूर्ण प्रतिष्ठा, नाव , अब्रू नष्ट होईल ! मग समाजाला तोंड दाखवता येणार नाही!”
बर ! मग असे बोलणारे तुम्ही आमचे कोण ?
आई….की बाबा…?
वयाच्या २१ वर्षापर्यंत शारीरिकच नाही तर मानसिक, सामाजिक, आर्थिक दृष्टीने सुध्दा विकास होणार. याचा विचार करणे गरजेचे आहे आणि त्या विचारांना सकारात्मक दृष्टिने घडवणे सुध्दा. मी तर माझ्यासाठी विचार केलाच आहे. आता तुम्ही ही थोडा विचार करा नक्की! आम्ही आमचे जीवन जिवंत पणे जगले पाहिजे की, जिवंतपणी मरता मरता जगले पाहिजे . ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतांना मनात एक छोटी कविता सूचली ….. म्हंटलं तुमच्या पर्यंत पोहचवावी.
मुलगी, मुलगी म्हणजे फक्त लग्नच का ?
आयुष्यभर चूल मूल म्हणून पुस्तक बंदच का !
आमच्या चिमुकल्या हातांवर शाहीच्या जागी मेहंदीच का?
मुलगी, मुलगी म्हणजे फक्त लग्नच का ?
आम्हाला ही उंच भरारी घेऊ द्या ना..
हवे ते आम्हाला करु द्या ना..
पिंजऱ्यातल्या चिमण्या आता तरी उडु द्या ना !
संविधानाचे लेखं साक्षात घडु द्या ना !
मुलगी , मुलगी म्हणजे फक्त लग्नच का ?
शेवटी समाज हितासाठी बाबासाहेबांनी समाजाला दिलेली सुचना इथे लिहिते
“मी कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलेच्या प्रगतीवर मोजतो.”
काय मग वाचवाल ना आमच्या विचारांना , स्वतंत्र हक्कांना, चिमुकल्या जिवाला !
आणि सुंदर आयुष्याला!
आणि हो….
आमच्या समवेत स्वतःला सुध्दा!
तुमची एक मुलगी,
प्रिया.