#टॅंकर

टॅंकर अजूनही पोहोचला नव्हता. शेजारच्या गावातल्या सुकत आलेल्या विहिरीतून मोजकीच भांडी भरायची परवानगी मिळाली खरी, पण जास्तीच्या पाण्यासाठी सगळच कुटुंब वणवण फिरत होतं. सरकारी कचेरीत खूप विनंती केल्या नंतर एक टॅंकर उपलब्ध झाला होता. घरात पाहुणे मंडळींची रैलचैल, लेकीच ‘राणी’चं लग्न, आणि भीषण दुष्काळाने वेढलेलं गाव.

          “मा वं!…. मले हाळद लागली का नई… तं मंग मह्या रानाला बी हाळदीच बोट लावजो बरं!”

दुष्काळात कुटुंबाला हातभार म्हणून रोजगारासाठी कुठेतरी शहरात राहणाऱ्या राणीने घरच्या गायीला वासरू झालंय हे आईकडून कळलं तेव्हा मोठ्या उत्साहाने सांगितलं. तिने त्याचं ठेवलेलं ‘राना’ हे नाव आईला खूप आवडलं होतं. घरच्या गाईला आठच दिवसांपूर्वी झालेलं वासरू ओल्या बाळंतिणीसोबत सरकारी चारा छावणीत ठेऊन घरच्या मंडळींना लग्नाच्या धावपळीत गुंतणं भाग होतं.

          राणी सुट्टी मिळवून हळदीच्याच दिवशी गावात पोहोचलेली. काटकसर करून वाचवलेल्या पैशांतून लहानांसाठी खाऊ आणलेला आणि मायसाठी लग्नात नेसायला जरिकाठाची सहावारी साडी. अप्पांना मात्र काही आणता न आल्याची सल मनात होतीच. आल्या पासूनच तिची रानाला भेटण्यासाठी तगमग सुरू होती. रानासाठी आणलेली तांब्याची नक्षीदार घंटा कधी एकदा त्याच्या गळ्यात बांधतेय असं तिला झालेलं. आल्यापासून तिचा रानाला भेटण्याचा हट्ट माय वेगवेगळी कारणं देऊन मागे सारत होती.

“मा वं!!! ऊन्ह त् जसा विस्तव है जनू!.. मह्या रानाला छप्पर हाये का वं तीठं?” मायला तिच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं सुचत नव्हतं.

“आवं राने दहा बारा गावाह्यचे ढोरं नेऊन ठेवेल हैत तीठं… छप्पर नसतं त मंग लोकाह्यनं तीठं ठेवले असते का जनावरं एवढ्या उन्हाचे ?”

“आन पानी का टॅंकर न देऊ राहिलेत का ढोराह्यला?” राणीचा पुढचा सवाल तयारच होता.

” अन् मंग!… माणसाह्यचं काय है!… ते शोधत्यात कुठबी पानी… पन सरकार मुक्या जनावरासाठी जास्त लक्ष देऊ राहिलय… बक्कळ पानी है लगे तीठं.”

“अन् महा राना?”

“आता तू परतवनीला आली का परत त जाऊन पाह्यजो!… मह्ये कान नको किटवू बाई!”

आईने कसं बसं राणीला थोपवून धरलं.

चारा छावणी घरापासून बरीच लांब होती. आणि नवरीला हळद उतरवून देवाचा आशीर्वाद घेई पर्यंत कुठेही जायला परवानगी नव्हती. गोतावळ्यातून सवडही मिळत नव्हती. तिची त्यामुळे गोची झाली होती.

          दिवे लागणीची वेळ झाली… गेले दिवस लाईटचाही पत्ता नव्हता. उन्हाच्या झळांनी सगळ्यांच्या अंगाची नुसती लाहीलाही होत होती. टॅंकर आणायला गेलेला  शेजारचा किश्या धापा टाकत धावत आला…  “अर्रर्र… लय बेक्कार झालं आप्पा! वाटत लोकाह्यंन टॅंकर अडवला अन् पार रिकामाच केला. मी हातापाया पडू पडू सांगू राह्यलो घरात कार्य ह्ये बाबाहो! पण कोन ऐकून राह्यलय. लोकाह्यले आडवायले डीरायवर पुढं झाला त् लोकाह्यनं बेसुद पडेस्तोवर हानलाय! म्या जीव तोडून चींगाट पळालो तवा जीव वाचलाय मव्हा!”

          किश्याच्या बातमीने घरात शोककळा पसरली. मायनं धावत जाऊन घरातली भांडी तपासली. रात्रीच्या जेवणापूरतं पाणी होतं. पण मग सकाळची न्याहारी!… आणि इतक्या लोकांच्या आंघोळी पांघोळी!! अन् आता इतक्या ऊशिरानं दुसरा टॅंकर तरी कुठून मागवायचा! आधीच पाण्यासाठी मारामाऱ्या. तिनं फुटलेल्या माठावरचं झाकण सरळ केलं. सकाळी सगळं वऱ्हाड आंघोळी शीवायच दामटायचं. तिने मनाशी पक्क केलं. 

          एकीकडे अर्धमेल्या सरपणाला फुंकून फुंकून जिवंत करण्याच्या प्रयत्ना सोबत रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. तर दुसरीकडे म्हाताऱ्या बींदुनं हळदीचे खडे पेलाभर पाण्यात भिजवून पाट्यावर वाटायला सुरुवात केली. वातावरण हळू हळू रंग धरू लागलेलं. लहान मुलांचा तर भुकेने जीव कासावीस झालेला. त्यांनी आपापल्या आयांच्या मागे हिंडत भोकाड पसरायला  सुरुवात केलेली. अप्पांच काळीज तर धडकता धडकता अचानक थांबेल की काय असच वाटू लागलेल.

“एे सायब्या… वाड्यात जाऊन सांग सगळ्याह्यला… जमल तितक्याह्यनं थोडं थोडं पाणी आणून द्या म्हणा. घरात कार्य ह्यें देतील आणून ज्याह्यला जमतंय तेवढे!… जाय व्हय पटकन…!”

सायब्याला माहित होतं. आत्ता लोक एक वेळेस ढुंगणाचं फेडून देतील पण पाणी काही द्यायचे नाहीत. पण तरीही तो वाड्याच्या दिशेने मुकाट निघाला.

          नवऱ्या मुलीला पाटावर बसवत हळदीच्या सोहळ्याला अंधारातच सुरुवात झाली. 

“पाणी थोडं थोडं घ्या वं! राती अंधारात काही सुदरनार नई म्हनून दुपारीच अंघोळ घातलीय म्या तिलं!” पाटाशेजारी अर्धी भरलेली कळशी टेकवत माय म्हणाली. 

म्हातारी बिंदू पुढं काही बोलणार तितक्यात मायनं तिचा हात दाबत तिला गप्प केलं. आणि हळदीच्या परातीत बोट टेकवून नवरीच्या गलांवर दोन बोटं उमटवली. चंद्राच्या पिवळ्या जर्द प्रकाशात राणी अगदीच खुलून दिसत होती. मायने तिच्या गालांवरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडून तिची नजर काढली. चंद्राच्या चांदण्यात राणीला तिच्या मायच्या गालावरून ओघळणाऱ्या मोत्यांच्या धारा स्पष्ट दिसू लागल्या. तिला गदगदून आलं तस बिंदुबाईनं हळदीनं भरलेला हात तिच्या चेहऱ्यावर फिरवत तिला मायेनं गोंजारायला सुरुवात केली. हळदीनं माखलेल्या नवरीच्या अंगावर कळशीतल्या पाण्याचा पहिलाच पेला रिकामा होत होता तोवर सायब्या धावतच आला…  त्याच्या ओरडण्यानं वातावरण अचानक स्तब्ध झालं..

“आप्पा… नवऱ्याकडच्या लोकाह्यला पोलिसांनं धरून नेलं म्हणत्यात… नवरदेवाला बी ठेसनात ठेवलंय त्याह्यनं!”

“ऐ… दारू पिऊन आला का रे तू भाड्या?… तोंड फोडू का तूव्ह!!!” अप्पांचं काळीज आणखी जोरानं धडकायला लागलं. त्यांच्या रागाचा पारा आता आभाळ शिवू लागला होता. सायब्याला मात्र रडू आवरत नव्हतं…

“आवं नई ना… खरंच ना आप्पा… पोलिस पाटील खबर घेऊन आलाय आत्ताच… त्याह्यनं पाण्याचा टँकर अडवून लुटला म्हनी… अन् डीरायवरला इतकं हानलय की जागीच मेलाय त्यो. साऱ्या गावात बोलन सुरूय आप्पा… तुमचा सोयरा चोर है… टॅंकर चोरलाय त्याह्यनं… आपला टॅंकर चोरलाय …”

आप्पांनी डोळे मोठ्ठे करत डोक्याचं उपरण काढून छातीला लावलं. मायच्यातर पायाखालची जमीनच सरकली. भीतीनं तिला कापरं भरलं. 

          राणीनं हुंदका आवरत पाटावरचा एक पाय खाली घेतला… मायचा हळदीनं माखलेला हात पदरानं पुसत ती कापऱ्या आवाजातच मायला म्हणाली…

“मा वं… आता तरी रानाला भेटायला जाऊ का वं छावनीत?”

अन् माय न हंबरडा फोडला!

– नागराज पद्मा कौतिकराव (कविरंग )

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.