गोड उसाची कडू कहाणी…

अरे संसार संसार

जसा तवा चुल्यावर

आधी हाताला चटके 

 तवा मिळते भाकर….

      रामण्णा आणि गिरजा बीड जिल्ह्यातील मजूर कुटुंब घरची शेतीवाडी नाहीच दिवसभर उन्हाचे चटके सोसत मिळेल तिथ कामाला जायच तेव्हा कुठ रात्री चूल पेटायची. यंदा मोठ्या पोरीच लगीन करायच म्हणून पैशाची जुळवाजुळव चालेली. रामण्णा ने कारखान्या कडून लाखभर रुपये उचल म्हणून घेतली अन यंदाचा ऊस तोडी चा सिझन झाला की पोरीच हात पिवळ करायच अस ठरवून टाकल. आसपासच्या गावातील हातावर पोट असलेली ऊसतोड कामगार दिवाळी झाली की गाव सोडण्याच्या तयारीला लागायची.लहान सहान पोर बाळ घरी ठेवून सहा सहा महिने वितभर पोटाच माप भरायला पर जिल्ह्यात निघून जायची.रामण्णा अन गिरजा सुद्धा जायच्या तयारीला लागली. लहान पोराला घरीच आजी आज्याकड ठेऊन त्यांनी बिऱ्हाड ट्रॅक्टर वर बांधुन घेतल. निघताना बारक्या पोराने केलेल्या आक्रोशाने गिरजा च काळीज तुटायला लागल. काळजाच्या तुकड्या पासून लांब जाताना तिचा पाय मात्र निघत नव्हता. पटापटा लेकराच्या गालाच तीन मूक घेत तीन निरोप घेतला. नजरेआड होईपर्यंत त्या बारक्या जिवाने किलकिल्या डोळ्यांनी पाहत केलेला आक्रोश गिरजा अन रामण्णा ला प्रवासभर आठवत राहिला.  ठरलेल्या ठिकाणी  बिऱ्हाड पोहोच झाल. मोकळ्या जागेत माळाला कागदाच्या झोपड्या एका दिवसात बांधुन तयार झाल्या. एकूण 8 कोयत म्हणजे 8 जोडपी त्यांच्या टोळीत सामील होती. पहाटे उठून थंडीत आंघोळ , स्वैपाक आवरून दिवस उजाडायच्या आधी शेतात जायचं. दिवसभर मग हातात कोयता  घेऊन उन्हाचे चटके सोसत उसाच्या पाचटीत जगण्याचा संघर्ष करत उभ राहायचं. लहान लहान पोर झोळीत टाकून दिवसभर राबराब राबायचं. मधेच पोर रडायला लागल की छातीला लावून पाजायच अन पुन्हा नशिबावर वार करायला कोयता घेऊन निघून जायच. असच काय ते हृद्यद्रावक जगणं ह्यांच्या नशिबी आलेल. 

           त्या दिवशी दुपारीच घरी जायच म्हणून सगळे लवकर रानात आलेले. उन्हाचा तडाखा वाढत होता. रामण्णा ऊस तोडत होता अन पाठीमाग गिरजा मोळ्या बांधायच काम करत होती. पाळी आल्यामुळ तिला उभ रहायला सुधा त्रास होत होता पण नशीबाचा भोग भोगावाच लागणार म्हणत उन्हाच्या झळा सोसत ती तशीच उभी होती. वाळून गेलेल्या पाचटीत हात घालून ती मोळ्या बांधत होती.  अन पाचटीत बसलेला भलामोठा साप तिच्या नजरेत आलाच नाही, काम करता करता तिचा पाय त्याच्यावर पडला अन त्या सापाने तिच्या पायाला जोरदार दंश केला. सापाला बघताच गिरजा मोठ्याने ओरडली अन जाग्यावर खाली बसली. सगळ्यांनी आरडाओरडा केला. रामण्णा मात्र पुरता घाबरून गेला. उन्हाच्या तिरीत पडलेली गिरजा अन तिचा सुजत चालेला पाय बघून तो निम्मा गर्भगळित झाला. लोक जमली, गाड्या मोटारीची सोय होईपर्यंत गिरजा डोळपांढर करायला लागली. शेजारच्या पोराने गाडी आणली अन रामण्णा ने उचलून गाडीवर बसवत तिला घट्ट धरली अन गाडी तालुक्याला सुसाट पळायला लागली. एका मोठ्या खाजगी दवाखान्यात तिला डॉक्टरांनी अडमिट करून घेतली. साप विषारी असल्यामुळे अन आणायला उशीर झाल्याने पेशंटची स्थिती नाजूक असल्याच डॉक्टरांनी सांगितल. भयभीत झालेला रामण्णा दवाखान्याच्या पायरीवर खाली बसला अन ओक्साबोक्शी रडू लागला. पाठीमागून आलेल्या टोळीच्या मुकादमाने त्याला सावरला. पैशाची सुधा जुळवाजुळव करायला लागणार होती म्हणून ते निघून गेले. गिरजा मात्र अजूनही बेशुद्ध होती. रामण्णा तिथंच बसून तिच्या निपचित पडलेल्या देहाला न्याहळत होता. आपल्या सहचारिणीची झालेली अवस्था बघुन त्याचा जीव मात्र तिळतिळ तुटत होता. अख्खा दिवस मृत्यूशी झुंज देणारी गिरजा मध्यरात्री मात्र आयुष्याची सगळी लढाई हरली. अन रामण्णाकड भरलेल्या डोळ्यांनी बघत जणू निरोप घेतेय अस सांगत इहलोकाच्या प्रवासाला निघून गेली. तिचा हातातून अलगद निसटलेला हात बघून दिवसरात्र उपाशी पोटी बसलेल्या रामण्णा ने फोडलेला टाहो दवाखान्याच्या भिंती न भिंती हलवून गेला. पोरीच लग्न, पुढचा संसार सगळं सगळं त्याला आठवायला लागलं. दवाखान्यान दिलेल 60 हजाराच बिल घेऊन तो तिथंच पायरीवर निपचित होऊन पडून राहिला. नशिबाच्या खेळाला अन देवाने केलेल्या क्रूर थट्टेला कंटाळून… असे अनेक गिरजा अन रामण्णा वीतभर पोटाच माप भरायला, मैलोन्मैल फिरत असतात. सरकार बदलत, देश बदलतो. पण ह्यांच्या नशिबी मात्र वर्षानुवर्ष जपून ठेवलेला कोयताच आहे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे द्यायला अन आयुष्यात आलेल्या संघर्षावर सपासप वार करायला…..

– गंगाप्पा पुजारी

जिल्हा :- सातारा

Leave a Reply

Your email address will not be published.