आता अजुन किती सहन करावे?

मुलींना आजची सावित्री, रमाई माता,  जिजाऊ,  झाशीची राणी होण्याचे प्रयत्न करावे असं सार जग सांगते. पण मुलींना ह्या महान महिलांचे गुण आपल्या अंगी आत्मसात करतांना याच जगातील काही लोकांना चांगलं वाटत नाही.  त्यांचे विचार या मुलींबद्दल फार क्रूर बनतात आणि मग ते कूट नीती चालू करतात.  ह्या मुलींनी थोडं जरी ज्ञान इतरांना वाटण्याचा प्रयत्न केला तर तिला लगेचच लोकांचे टोचणे/ टोमणे येतात. “एक/दोन पुस्तक काय वाचलस खूपच हुशार झाली असं समजते स्वतःला, आम्हाला चालली शिकवायला. हिच्यापेक्षा तर चार उन्हाळे जास्तच पाहिलेत आम्ही!” अस बोलून मुलींचे खच्चीकरण करतात. आणि वरून नियम पण लावतात रस्त्याने जाताना, कुणाला बोलतांना, चार माणसात  मुलींनी लाजून खाली मान घालून राहावं, जास्त बोलू नये. लॉन्ग ड्रेस घालावे, कोणती ही स्टाईल करू नये,  इत्यादी नियमात ठेऊन तिच्यावर मानसिक अत्त्याचार करतात. तरी पण मुली कोणताच प्रश्न न करता खंबीरपणे जगतात.  एवढा सारा अन्याय सहन करून सुद्धा मुलींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते.

चला मान्य केल कि मुलींनी समाजाचाच्या सांगण्याप्रमाणे अंगभरून कपडे घातलेही पण बलात्कारासारखे प्रकरण थांबलेत का? कोणती मुलगी आज एकटी सुनसान रस्त्याने जाण्याचे धाडस करते का? याचं कारण फक्त आणि फक्त काही ‘हवस’ चे शिकारी कुत्रे माणसाच्या रूपात असतात. पहिले म्हणतं होते कि सोळावं वर्ष धोक्याचं ग… पण आजकाल तर महिला वर्ग प्रत्येक वयात धोक्यात असते. यांच्या नजरेत म्हातारी आजी सुद्धा तरुण मुली प्रमाणेच दिसते. मग सांगा ना अजून त्या म्हाताऱ्या बाई न शॉर्ट ड्रेस घातला असेल का? एवढंच नाही प्रत्येक ठिकाणी असे काही नराधम आहेत.

बस मध्ये सुद्धा महिलावर्गाची छेड काढतात. बस मध्ये जागा देण्याच्या नावाने अंगाला हात लावतात, एकदम टक लावून महिलांकडे बघतात. तरी पण काही महिला त्यांचा स्टॉप येईपर्यंत त्यांच्या घाण प्रकरणाला सहन करतात, आणि काही तिथेच कानाखाली लगावतात. एवढा सारा अपराध करून सुद्धा महिला वर्गालाच तुच्छ, निर्लज्ज इत्यादी बोलतात.

सावित्री बाई फुलेंना सुद्धा समाजकार्य करतांना अंगावर शेण फेकले, जे नाही ते बोलणं बोलले, तरी पण सावित्री बाई डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. आज त्यांच्यामुळेच मुली शिकल्या, सावरल्या आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकल्या. आज महिलांना स्वातंत्र्य असलं तरी ती सती जातं आहे. माणसांच्या मानसिक त्रासाच्या अग्नित भाजून तिच्या इच्छा आकांक्षा ची होळी पेटून राख होत आहे. एवढंच नाही तर संसाराच्या नावाने तिच्यावर मर्यादेची सीमारेखा टाकलेली आहे. आता अजून किती सहन करावे?

एखादा मुलगा दारू, पुड्या, इत्यादी व्यसन करत असेल, तर लगेच त्याच्या घरची मंडळी त्याचे लग्न करायचं ठरवतात. का? तर लग्न झाल्यावर तो सुधारेल. पण त्या बिघडलेल्या मुलाला सुधारवण्यासाठी त्या मुलीची कशाला आहुती देता? तिचे पण काही स्वप्न असतील. तिला कोणता अधिकारी बनायचे असेल? स्वतःच्या पायावर उभं रहायचं असेल? तिची का जिंदगी बरबाद करतात? त्यांचं म्हणणं अस असते कि, मुलीने कितीही मोठ्ठ शिक्षण शिकूदे तिला तव्याचंच बुढ घासावं लागते. बर असो! लग्नालाही ती तयार होईल पण कमीतकमी तिचा होणारा जीवनसाथी तर चांगला असावा, असं तर तिला वाटत असेल. इतकच नाही तर आमच्या घरी इतकं आहे, आमच्या घरी तितकं आहे, अस सांगून  भरमसाठ हुंडा पण घेतात. तिचा बाप कर्ज काढून लोकांच्या हात/ पाय जोडून कसं तरी  तीचे लग्न लावून देतो, चार /आठ दिवस सगळेच तिच्याशी चांगल वागतात. मग हुंड्यापायी म्हणा किंवा मुलगाच हवा आणि  इतर काही गोष्टींमुळे तिच्यावर अन्याय अत्याचार सुरु होतात. तिचा बळी घेतला जातो किंवा तिला माहेरी कायमच पाठवलं जाते. मग लोक  याचा विचार का करत नाहीत. प्रत्येक वेळेस तिच्याच इच्छा आकांक्षाचा खून करावा का? समाजाच्या इतक्या कडक  बेड्यातुन स्त्री कधी सुटेल हा प्रश्नच आहे?  स्त्रियांनी आता अजून किती सहन करावे?

मुलींना पहिली मासिक पाळी आली रे आली कि तिला घरात, समाजात वावरायचा अधिकार संपतो. देवळाचे दरवाजे बंद होतात. का? तर मासिक पाळी हा  विटाळ असतो. असे म्हणतात.  एवढेच नाही तर काही स्त्रियांना मासिक पाळी मध्ये स्वयंपाक करण्याचा सुद्धा अधिकार नाही. पुजापाठ करण्याचा अधिकार नाही. तुळशी जवळ, फुलांच्या झाडाजवळ सुद्धा जाण्यास बंदी असते. लोक का अस वागतात कळतच नाही. स्त्रियांसाठी काय चांगल काय वाईट हे तेच ठरवतात. काही ठिकाणी तर पहिली पाळी आली कि मुलींच लग्न करून टाकतात. तिला अठरा वर्षे पूर्ण सुद्धा होऊ देत नाहीत. त्यांना काही उपदेश दिला तर ते म्हणतात कि ही आमच्या  घरची  रीत आहे आणि ती  पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे; असे गर्वाने सांगतात. पण कमी वयात लग्न केल्यामुळे मुलीच्या जीवाला धोका असतो, ती आई होण्यास  पात्र नसते. पण तिच्यावर संसाराचा गाडा ओढून नेण्यासाठी जबरदस्तीने लादली जाते. मुलगी लवकर आई होण्यास पात्र नाही झाली तर लगेच बाहेरबांधा (जादू मंत्र ) करतात. पण तिला चांगल्या डॉक्टर कडे नेण्यासाठी थोडा विचारच करतील. या कारणामुळे मुलींना  प्रसूती मध्ये कुपोषित बाळ जन्माला येते. यात बाळ आणि आई दोघांच्या जीवाची चिंतच असते. बऱ्याच जाहिरातीत, अंगणवाडीत, हॉस्पिटल मध्ये, आणि इत्यादी ठिकाणी मुलींचं अठरा वर्षं पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका म्हणून सांगतात. पण याचा परिणाम फक्त 75% लोकांवरच होतो बाकी 25% लोकांवर याचा काहीच परिणाम होत नाही. आज प्रत्येक ठिकाणी मुलगी/ महिला ह्या असुरक्षित आहेत. त्यांचं मानसिक शोषण केल जाते. बऱ्याच स्त्रिया  मानसिक गुलाम बनलेल्या आहेत. यात स्त्रियांचा सुद्धा बऱ्यापैकी वाटा आहे. स्त्रिया तरी  कूठ  एकमेकांच्या अडचणी समजून घेतात. एखाद्या स्त्री वर काही अन्याय होत असेल तर चुपचाप बघतात. “ते तिचं म्याटर आहे. जाऊदे अस म्हणतात.’ पण खंबीरपणे एकमेकींना साथ देत नाही; ही एक दुःखाची बाब आहे. या कारणानेच काही नराधमांची अजून हिम्मत वाढते. आणि बलात्कार इत्यादी घटनेत त्याचे रूपांतर होते. आता अजून किती सहन करावे?

 

~ दिक्षा गौतम इंगोले

   विभाग औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published.