१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सदिच्छा!

जिंदाबाद साथी!

या महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपण ‘ऐसा भारत बनाएंगे’ चा विशेषांक अंक १२ वा फक्त मराठी भाषेत ‘असा भारत घडवूया’ या नावाने प्रकाशित करीत आहोत.

या विशेषांक मध्ये युवती युवकांनी लेख कवितांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील संत परंपरा, कामगार, सरकारी शाळांची स्तिथी, एस.टी कर्मचाऱ्यांची स्तिथि, महाराष्ट्राची संस्कृती सारख्या विषयावर आपले विचार, मत अभ्यासपूर्वक मांडले आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशस्वी प्रयत्नाने महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठीचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. व १ मे १९६० महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचा दिवस ठरला. व १ मे महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला…

एस.एम.जोशी, श्रीपाद डांगे, प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, डॉ. भीमराव आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, भाई उद्धवराव ठाकरे, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी या लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. पण या व्यतिरिक्त १०७ जण या लढयात शाहिद झाले. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत उभारले गेलेले स्मारक आजही आपल्याला ‘हुतात्मा स्मारक’ नावाने पाहायला मिळते.

यावरून हे तर नक्कीच कळते की हा लढा लहान मोठा नव्हता तर इतिहास घडवणारा होता. पण तरीही शालेय शिक्षणात या संबंधी नीट, गांभीर्याने शिकवले जात नाही.

या चळवळीतील नेत्यांची भूमिका आणि महाराष्ट्रातील आजच्या नेत्यांची भूमिका पाहता प्रश्न पडतो, आपण इतिहासाचे कृतज्ञ बनतोय की कृतघ्न… करण आपण पाहतोय. आपल्या मूलभूत सुविधांसाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले पण ते सारे भाषा, धर्म, जात, भोंगे, हिंदू – मुस्लिम द्वेष आपल्यात मुरण्यात बसलेत… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजांची, विकासाची भाषा आता इथे दिसेनाशी झाली आहे. पाणी, लाइट,घर,शिक्षण, रोजगार, महागाई या जगण्यासाठीच्या महत्वाच्या प्रश्नांना दुर्लक्षित करून मात्र हनुमान चाळीसा पाठ करण्यात राजकीय नेते गुंतलीत …. का ह्याच साऱ्या गोष्टी घडाव्यात म्हणून स्वतंत्र झाला का हा महाराष्ट्र…? तर नाही…

ही संतांची भूमी आहे, श्रमिकांची भूमी आहे… संत तुकाराम, गाडगेबाबा, शिवाजी महाराज, साऊ – ज्योती, आंबेडकर, अण्णाभाऊंची भूमी… वऱ्हाडी, कोकणी, खांदेशी, घाटी अशा विविध ४० भाषा येथे बोलल्या जातात आणि त्याच सोबत लावणी, ठेचा – भाकरी आपले वैशिष्ट्येच. माणुसकीचे संस्कार करणाऱ्या या भूमीची ही संस्कृती जपणे आपली जबाबदारी आहे.

आज महाराष्ट्र दिन त्याच सोबत जागतिक कामगार दिन देखील आहे. कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळावे म्हणून भारत व जगभरात विविध चळवळी उभारल्या. १८८४ साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हेड्स ची स्थापना केली. आणि त्यांच्या प्रयत्नांतुन रविवार ही साप्ताहिक सुट्टी सर्व कामगारांना मिळू लागली. त्याचसोबत डॉ. आंबेडकरांमुळे कामगारांना प्राथमिक सेवा, कामगार राज्य विमा, कामाचे तास १२ ऐवजी ८ झाले, कामगार संघटनेला मान्यता मिळाली, भरपगारी सुट्टी, महागाई भत्ता, कायदेशीर संपत्तीचा अधिकार, आरोग्य विमा, कल्याणकारी निधी, भविष्य निर्वाह निधी, प्रसूतीच्या वेळेस पगारी रजा, स्त्री पुरुष समान काम आणि समान वेतन पगार, महिला कामगार संरक्षण कायदा ई. सुविधा मिळू लागल्या. पण तरीही कामगार त्यांच्या हक्काची आजही लढत आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे आजही मोठ्या प्रमाणात शोषण होताना दिसते. काम करूनही कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समान यांना समान मोबदला असून सारख्या कामाच्या मानधन स्त्रियांना कमी पुरुषानं जास्त दिले जाते. ट्रांजेंडर कामगारांना प्रत्यक्षात योग्य वागणूक दिली जात नाही. कामगारांना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे… आणि प्रत्येक कामगाराच्या कामाचा दर्जा हा वाढला आणि किमान वेतन प्रत्येकाला मिळेलच पाहिजे.

मागील वर्षी ( १ मे २०२१ ) ऐसा भारत बनाएंगे च्या ७ व्या आवृत्ती मध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त युवकांनी लेख, कविता लिहिले आहेत. व त्याचसोबत, संविधान दिन, गणतंत्र दिन, संवित्रीमई फुले जयंती, निमित्त विशेष अंक, वेलेन्टाइन डे, जागतिक जल दिन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त व आशा वेगवेगळ्या विषयांवर हिन्दी, मराठी भाषेत वाचण्यास उपलब्ध आहेत. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.

– संपादन – पूजा, विशाल

आजचं प्रबोधन

महाराष्ट्रात तुकाराम जन्माला आले, लोकहितवादी जन्माला आले, जोतिबा-सावित्रीबाई आणि ह्यांसारखे अनेक सुधारक ह्या महाराष्ट्रात होऊन गेले. ह्या सर्व व्यक्तींच्या योगदानामुळेच महाराष्ट्रात प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा सुरू झाली. ती पुढे आगरकर, महर्षी कर्वे ते अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अखंड सुरू राहिली. ह्यानंतर नरेंद्र दाभोलकरांसारख्या विज्ञाननिष्ठ विचारांच्या व्यक्तींमुळे ती परंपरा महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने नांदली. असं असूनही ह्याच महाराष्ट्रात तुकारामांच्या मृत्यूविषयी वेगवेगळ्या अंगांनी चिकित्सा केली जाते. आणि ह्याच महाराष्ट्रात डॉ. दाभोलकरांचा खून होतो. हे वास्तव अजिबातच दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही. आज ह्या सगळ्या सुधारकांची आपल्यापैकी खरंच किती जणांनी आठवण ठेवली आहे ? किंबहुना ह्यांचं ह्या प्रबोधनपरंपरेचं केवळ स्मरण करणं पुरेसं आहे का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आहे.

आतापर्यंत होऊन गेलेल्या सुधारकांच्या काळातली आव्हानं आणि आज आपल्यापुढे उभी ठाकलेली आव्हानं ह्यांचा विचार केल्यावर लक्षात येतं की समाजात पूर्णपणे सुधारणा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. त्यांच्यामुळेच अनेक सुधारणा घडल्यादेखील. परंतु आता आपण अशा टप्प्यावर आले आहोत जिथे काही भागात सुधारणा घडल्या आणि काही भागात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. आपल्याला ही विषमता त्रास देत आहे. 

ज्या प्रबोधकांच्या समाजसुधारकांच्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीतलं आजचं वास्तव आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे. त्याकाळी प्रबोधकांना ज्या गोष्टी खटकत होत्या विज्ञानविरोधी वाटत होत्या त्या त्या गोष्टींवर त्यांनी त्यांची धारदार लेखणी फिरवली. प्रसंगी आंदोलने छेडली, संप पुकारले. सनातन्यांचा प्रखर विरोध पचवला. त्यांनी सुरुवात केली कदाचित म्हणूनच आपण पुढचं विज्ञाननिष्ठ आणि सुसह्य आयुष्य जगू शकतोय. पण त्यांनी उभारलेल्या लढयाने आज पूर्णत: सुधारणावादी विचार समाजात रुजले आहेत का ? याचा विचार व्हायला हवा. आजही आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी बालविवाह केले जाताहेत जातीपातींमध्ये वाद निर्माण होताहेत. तथाकथित बुवा – बाबा माणसांना बळी देऊन मारताहेत. या आणि अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रांत, समाजमाध्यमात वाचत असतो, पाहत असतो. पण केवळ वाचतो ह्याविरोधात काही करण्याची खरंच आपली इच्छा होते का ? नसेल तर ती व्हायला हवी. आजच्या घडीला अनेक संस्था, संघटना अशा विज्ञाननिष्ठ विचारांचा पुरस्कार करत आपापली कामे करत असतात. किमान या प्रबोधकांच्या भूमीत जन्मलेले युवक म्हणून तरी आपण या मार्गाने जाऊन काही कामं करायला हवीत आणि बदल घडवायला हवेत.

आज आपण ऐकलेल्या सगळ्या व्यक्तींनी आपापला विवेक जागृत ठेवला म्हणूनच वेळावेळी अंधश्रद्‌धा आणि ढोंगी विचारांना ते आळा घालू शकले. त्यांची ते राहत असलेल्या समाजाप्रती काहीएक निष्ठा होती म्हणूनच त्यांनी त्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर आणण्यास सहाय्य केले.ह्या सगळ्यामुळे त्यांना होणारा त्रास त्यांनी सहन केला. धर्मांध समाजाच्या विरोधाला जुमानले नाही. ह्यांचा एखाद्या विज्ञाननिष्ठ विचाराप्रती असलेला विश्वास, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पणभाव, ध्येयवेडेपणा ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आपण स्वतःची प्रगती तर करायला हवीच पण आपल्या समाजातल्या इतर घटकांसाठी जर आपण काम करणार नसू तर त्या प्रगतीचा काहीच उपयोग नाही.

एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस म्हणून आपली जबाबदारी काय, हे आपण ओळखायला हवं. आपण आपल्याला घटनेने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरंच वापरणार आहोत की केवळ त्याच्या गप्पा मारून ते वापरतोय असं भासवणार आहोत. मूळात अभिव्यक्ती कशासाठी ? आपल्या अभिव्यक्तीने समाजात तेढ निर्माण व्हावी का समाजोपयोगी गोष्टींसाठी ती कामी यावी ? आज आपली मतं मांडताना, आपले विचार मांडताना आपण का घाबरतो आहोत ? ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करताना आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. खरंच कोणत्या व्यवस्थेच्या दबावाखाली आपण जगतोय का ? जगत असू तर हा दबाव हे बंधन झुगारून द्यायला हवं. खरेपणातली, विज्ञानातली ताकद नक्कीच हे करू शकते. गरज आहे ती डोळसपणे आपल्या आजुबाजूची परिस्थिती न्याहळण्याची आणि त्यायोगे कृती करण्याची. थोडक्यात, आजवरच्या प्रबोधकांनी केलेल्या कार्याची जाण ठेवत त्यांच्या पाऊलखुणा तर जपूयाच आणि आपल्या जबाबदारीचं भान बाळगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करू या.

– वनश्री अनंत अपर्णा राडये.

“एस. टी कर्मचारी काय म्हणतोय ?”

संप….. संप….. संप…..

अरे संप संप काय म्हणताय

हा तर आमचा दुखवटा हाय

अजून किती संप किती? आंदोलन करू. माझे सहकारी लागले आत्महत्या करू.

50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याची कल्पना आहे का कुणाला.

50 पेक्षा जास्त कुटुंब पोरके झाले. दुसऱ्याच्या हाती एसटी कर्मचाऱ्यांचे मोरके  गेले.

एसटी आमची रोजी रोटी तिला समजतो आम्ही स्वतः ची बेटी

दंगलीत तिला पेटून देता.आणि खलनायकाचा खिताब घेता.

काही गुन्हा नसूनही सती तिला केल जातं. कधी कधी तर एस टी कर्मचाऱ्याच बलिदान दिल जातं.

दुःख तर याचे जास्त आहे. एसटी संपामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहे.

विध्यार्थी, शेतकरी, वृद्ध वर्ग,शेतमजूरांना नाईलाजास्तव पर्यायी मार्ग स्विकारवा लागत आहे.

रोज धुऊन-पुसून अगरबत्ती तिला लावतो देवा आधी तिचा मी धाव घेतो.मी तिला चालवतो म्हणून ते माझं घर चालवते.काय सांगू लालपरीत जीव किती आहे माझा.ती माझी राणी अन मी तिचा राजा.

ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्ही संपाच हत्यार उपसलय.एसटी ला आम्ही आजवर मुलाप्रमाणे जोपासलय. कुठवर ऍडजेस्ट मेन्टवर जगणार, कधी सुखाचा मोकळा स्वास घेणार.घरच्यांची आठवण करत करत रात्रंदिवस प्रवास करतोय.गरजा,स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीळ-तीळ मारतोय.

पगाराचे 10,000 यात घर कस? चालवायचं म्हाताऱ्या आई वडिलांच्या गोळ्या, मुलीच लग्न, मुलाचं शिक्षण करायचं कि घरात महागलेलं राशन खायला आणायचं. हा विचार करुन तर मी अर्धा मेलो म्हणून तर मी संपात आलो.

– दिक्षा गौतम इंगोले

महाराष्ट्राने जपलेला मानवतेचा सांस्कृतिक वारसा: महाराष्ट्रातील मुद्रणकलेची सोनेरी वाटचाल….

१ मे २०२२: महाराष्ट्र दिन विशेष…

“बहु असोत सुंदर संपन्न कीं महा..

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..”

या ओळींप्रमाणेच वैभवशाली वाटचाल असलेला आपला महाराष्ट्र..! याच महाराष्ट्राच्या मराठी मातीत निसर्गसौंदर्य जपलेली, भौगोलिकतेबरोबरच ऐतिहासिक वारसा दाखवणारी,आध्यात्मिक्तेबरोबरच सांस्कृतिक जडणघडण जपणारी आणि अनेक प्रांतांना एकत्र, भक्कमपणे एका धाग्यात जोडणारी संस्कृती आपल्याला दिसून येते. आपलसं करणारी आपली मराठी भाषा आणि हेच मराठीपण जपणारा आपला महाराष्ट्र..! आता केवळ मराठी ही भाषाच म्हणून तिच्याकडे बघितलं जात नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील अस्मिता जोडणारी “महाराष्ट्रीयन भाषा” म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. आज जगातल्या कुठल्याही देशांत कोणी मराठी माणूस भेटला आणि त्याची भाषा ऐकली की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? असा प्रश्न विचारला जातो. आणि हो मी “महाराष्ट्रीयन” आहे असं आदरार्थी आणि अभिमानाने म्हणटलंही जातं. 

“जितके प्रांत तितक्या भाषा..!” आणि याच भाषेचा वारसा जपण्याचं आणि जतन करण्याचं काम माणसाने केलं ते मुद्रणकलेच्या माध्यमातून..! मुद्रणकलेमुळे वृत्तपत्रांचा प्रसार होईल आणि साहजिकच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार वाढेल या उद्देशाने १८०० च्या काळात महाराष्ट्रात मुद्रणकलेची खरी सुरुवात झाली. १८१८ मध्ये म्हणजे पेशवाईचा शेवट झाल्यावर मुंबईमध्ये वृत्तपत्रांच्या वाटचालीला खरी सुरुवात झाली. आपल्या मायबोली म्हणजे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणजे “दर्पण”.. हा सुरुवातीचा काल म्हणजे १८००-१९०० च्या काळात आपलं तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं नव्हतं आणि याच काळात दगडी शिळांवर वृत्तपत्रांची छपाई केली जायची. 

या छपाईची सुध्दा एक विलक्षण कहाणी आहे. या काळातील बहुतांश वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके ही सोमवारी प्रसिध्द होत असत. सोमवारी प्रसिद्ध होणा-या या साप्ताहिकाचं काम रविवारपर्यंत चालत असे. दगडी शिळाप्रेसवर मजकूर उलट्या पद्धतीने कोरला जायचा. वृत्तपत्र प्रसिद्ध झालं की दुस-यादिवशी त्या शिळेवरील बातमी पूर्णपणे पुसावी लागे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही छपाई शैली गाजली होती. या छपाईशैलीचं खरंच कौतुक म्हणावं लागेल कारण त्या काळात जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते तेव्हा मानवाने ही संकल्पना वापरून छपाई केली. 

१८०० ते १९००च्या काळात शिळेवर छपाई करण्यात आलेली वृत्तपत्रे आजच्या वृत्तपत्रांएवढी रंगीत नसली ना तरीही नीटनेटकी स्तंभ मांडणी, फॉन्टस् व भाषेतील आकर्षक शैलीमुळे वैशिष्ट्यपूर्ण होती. आजच्या काळाप्रमाणे त्याही वेळेस वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी किंवा नोटीशींसाठी पैसे मोजले जातं. प्रत्येक ओळीस ३ पैसे, पुनः प्रसिद्धीसाठी ४ आणे, अगदी भाषांतर करण्यासाठी दुप्पट आकार घेतला जात असे. आपल्या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात कुठला ना कुठला वारसा मिळालेला आहे जो मानवाने जपलेला आहे. अनेक अशी ऐतिहासिक शहरं आहेत जिथे मुद्रणाची परंपरा सुरु झाली. १८४२ साली आलं ते ‘ज्ञानोदय’ नियतकालिक. ज्ञानोदय नंतर आलेले दुसरे वृत्तपत्र म्हणजे ‘वृत्तवैभव’ तेदेखील दगडी शिळेवरीलच! सगळ्यात गाजलेले व जास्त काळ आपला पाया भक्कमपणे रोवून ठेवलेले वृत्तपत्र म्हणजे ‘न्यायसिंधू’. सध्याचा काळ आपण स्पर्धेचा काळ असं म्हणतो पण त्याकाळी सुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रांची स्पर्धा, खरमरीत टीका या व्हायच्याच. ‘न्यायसिंधू’ या वृत्तस्पर्धेचा प्रतिस्पर्धी म्हणजे ‘जगदादर्श’..! १८७७ साली आलेलं साप्ताहिक ‘मुत्सद्दी’. या साप्ताहिकात इंग्लंडमध्ये निघणाऱ्या इंडिया या साप्ताहिकातील लेखांची भाषांतरे छापून येत असतं. याच काळात आलेली इतर वृत्तपत्र म्हणाल तर ‘गावगन्ना’,’विचारसाधना’, ‘सुदर्शन’, ‘शेतकरी’ ही होती. १९१४ व १९१५ साली महायुद्ध झाल. महागाईमुळे काही वृत्तपत्रं ही बंद पडली.

आपल्या मराठी माती असलेल्या या महाराष्ट्रात अनेक अल्पायुषी, दीर्घा वृत्तपत्रं आली. काही इतिहासजमा झाली. काहींनी आपला जम बसविला आणि शहराच्या राजकीय,औद्योगिक, शैक्षणिक, वैचारिक गोष्टींनी परंपरेचा वारसा मिळवून दिला. आपल्या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे साहित्यिक व संत परंपरा लाभली आहे त्याप्रमाणेच वृत्तपत्रांचा उज्वल वारसा देखील लाभला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वृत्तपत्रांनीदेखील काळानुरूप आपलं रुपं बदललं. छपाईच्या सोप्या पद्धती आणि मोबाईलमधील व्हॉईस टायपिंगमुळे कुठल्याही माहितीची प्रिंट काढणं सोपं झालं. 

पूर्वी ‘टिपणं लिहिणं’ ही एक पद्धत होती. पद्धतच म्हणावी लागेल कारण हल्ली आपल्या हाताने कागद-पेन घेऊन कोणी फारसं लिखाण करताना आपण कोणाला बघत नाही. अगदी शाळा-कॉलेजमध्ये शिकणारी आजची पिढी जणू हाताने लिहिणेच विसरू लागली आहे की काय, असे वाटावे इतकी ही पिढी मुद्रण अर्थात “प्रिंटिंग” माध्यमावर विसंबून आहे. अगदी शिळाप्रेसपासून सुरु झालेला हा मुद्रणप्रवास आता डिजिटल प्रेसपर्यंत येऊन ठेपला आहे. ज्या मुद्रणकलेने ज्ञानाची अखंड कवाडे खुली केली आणि या कलेची आपल्या मराठी माणसांनी वारसारुपी चळवळ सुरु ठेवली त्या सर्व महाराष्ट्रीयन आर्थात मराठी माणसांना त्रिवार अभिवादन..! 

( या लेखासोबत दगडी शिळा व शिळेवर कोरलेली वृत्तपत्र यांची दुर्मिळ छायाचित्र जोडीत आहे. जी आपल्या मराठी माणसांनी ऐतिहासिक वारसा म्हणून संग्रहित ठेवली आहे.)  

(फोटो सौजन्य: अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्र, अहमदनगर.)

– आर.जे.अनु, अहमदनगर.

संत नाम

संत नाम घ्यावे गोड हरी गुन गान, संतवासाने पवित्र ही महाराष्ट्र भूमी वाढवी शान…. 

घेऊनी ध्यास मनी संतांचा होईल जीवनाचा  उद्धार, मज कळाले संत ऐकोणी होई ज्ञानाचा प्रसार।

संत जसा निळाक्षार समुद्र, ज्यात वेदना प्रेम जिव्हाळ्याचा  सार, संत मुखी गोड अभंग ज्यात साठले ज्ञान अथांग।

कंटाळूनी समाजाच्या जाचाला ज्ञानेश्वराच्या मात -पिताने केला देहत्याग, 

तरी हा कठोर  हृदायी समाजाला नाही फुटला मायेचा पाझर।

माहिती असूनही ज्ञानाला हा समाज निष्ठूर, मनी नाही ठेवला द्वेष, प्रेम केले भरभरून

 भरकटलेल्या समाजामुळे स्वतःला नको व्हायला कठोर भाऊ-बहिणी सांभाळत केला अमृत विज्ञानाचा प्रसार।

कोवळ्या वयात होती अफाट विवेकशील बुद्धी त्याची, 

 होते वेदपठण त्यांच्या तोंडी,

कर्मठ ब्राह्मणांच्या अहंकारापायी, म्हणून घेतली रेड्याच्या तोंडून  वेदवाणी।

ज्ञाना म्हणे अंगी चिटकून नको अहंकार, 

गर्व द्वेष राग हे ज्ञानापुढे होतील क्षणभंगुर।

कर्मकांडयाला तिलांजली देऊन, घ्या नाम हे प्रभुचे होईल ।

होता ज्ञाना एवढा तेजस्वी संत, योगशक्तीने पाठीचा तवा केला ज्वलंत।

 जरी झुकावे लागले होते समाजापायी, 

त्यांनी त्याचा मार्ग ज्ञानप्रसाराचा कधी सोडला नाही ।

– किरण कांबळे

Lock down चा खरा अर्थ…

पोटासाठी वणवण

खुप केली…

आता घरासाठी…

कुठे जायचे कळेना मला…

भुकेलेल पोट घेवून 

कुठे थांबावे कळेना…

श्रीमंतीचा माज असणाऱ्यांना

विमानातुन येणाऱ्या 

किंवा 

मध्यमवर्गीय जनतेला

माझा अट्टाहास कळेल का….?

कि,

तो हसत असेल मला

तांडा उचलून नेताना बघून…?

कि 

शिव्या देइल…?

याच्याशी माझे देण घेण नाही

कारण…,

माझा प्रश्न भविष्यातला नसुन

आजच्या भकारीचा आहे….

सोशल मिडीयावर घरात बसुन

मला हसुन माझ्या अडाणीपणावरती

प्रश्न विचरणाऱ्या सुशिक्षित 

माणसांना 

माझी व्यथा कळलीच नसेल

तर 

त्यांच्या हसण्याने मला फरकच पडत नाही

कारण,

इतकी वर्ष दुर्लक्षीत असणारा मी 

माझा कित्तेक वर्षे चाललेला संघर्ष 

जगण्यासाठी आहे…

मला तुमचा lock down चा अर्थ नाही कळत….

– कविता अनुराधा

मराठी शाळांची अवस्थेची व्यवस्था करूया!

सध्याचे स्पर्धेचे युग, मराठी शाळेत शिकून पुढे काही future नाही, इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी वेगवेगळी कारणं सांगून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये टाकतो याचा परिणाम म्हणून मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येऊ लागल्या आहेत. प्रथम भाषा म्हणून इंग्रजीची सक्ती करण्यापेक्षा आधी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी चांगली शिकू द्या. प्रथम मराठी छान आली की, कोणतीही भाषा शिकता येते. त्यासाठी इंग्रजीचा अट्टहास नको. प्रथम भाषा इंग्रजी करताना शिक्षकांना तसे योग्य प्रशिक्षण दिले आहेत का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. काठीण्य पातळीचा विचार करता इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून व्यवहार्य नाही.

बहुतांश शाळांमध्ये प्रथम भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली आहे. यातच राज्य सरकारने काही शाळांचे माध्यम इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयांमुळे शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण हे केवळ मराठी आणि समाजशास्त्र या दोनच विषयांसाठी उरेल मग मराठी भाषा टिकणार किंवा वाढणार नाही. मराठी भाषेला म्हणजेच पर्यायाने मराठी जनतेला चांगले दिवस यायचे असतील, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यात वाढ झाली पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे आणि या ध्येयाने संपूर्ण मराठी जनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.

मराठी शाळा टिकवण्यसाठी व्यापक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाचे लोकांना आकर्षण वाटते. एका बाजूला प्रादेशिक भाषांच्या शाळा बंद पाडायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शाळांची गुणवत्ता घसरेल, असा सर्वतोपरी प्रयत्न सरकारच करतय. तर दुसऱ्या बाजूला विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खिरापतीसारखी मान्यता मिळते आहे त्यातून प्रादेशिक भाषेच्या शाळात गुणवत्ता नाही असा प्रचार केला जातोय म्हणून पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे आहे. प्रादेशिक भाषेच्या शाळा ओस पडत आहेत.सामान्यपणे मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालत असल्यामुळे त्यांना विविध सरकारी नियमांचं काटेकोर पालन करावं लागत. या उलट मोठमोठ्या इंग्रजी शाळा या वर्षाला  लाखांमध्ये मुलांकडून पैसे घेऊन शाळा चालवतात. शिक्षक भरती, शिक्षकांचे पगार ठरवणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती व पगार आदी सर्व विषय हे त्या त्या शाळांच्या हातात असतात.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेच यासाठी काही ठोस पाऊलं उचलली, तर दरवर्षी नवनवीन सुरू होणाऱ्या इंग्रजी शाळांची संख्या कमी होईल. एकूणच शिक्षक या पेशाकडे समाजाचे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. किंबहुना असंही म्हटलं जातं की ज्याला काहीच करता येत नाही तो शिक्षक होतो. या स्थितीत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. B.Ed. आणि D.Ed. करणाऱ्यांमध्ये सुद्धा इंग्रजीतून ते शिक्षण पूर्ण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे चित्र बदलून उत्तमोत्तम मराठी शिक्षक घडण्याची गरज आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी स्वत:पासून प्रयत्न करायला सुरुवात केली तर भविष्यात हे चित्र नक्की बदललेले दिसेल.

इंग्रजी ही भारतात परकीय भाषा आहे. मुलांना भाषा हा आकलनासाठी अडथळा ठरतो. पालकांच्या आग्रहाखातर इंग्रजी माध्यमामुळे मुलांचे नुकसान होते. यातून मार्ग म्हणजे, प्रादेशिक भाषा शिक्षणाचे माध्यम व दुसऱ्या बाजूला इंग्रजी शिकण्याची उत्तम सोय व उत्तम शिक्षक, भाषेची प्रयोगशाळा असे उपलब्ध झाले तर चमत्कार ठरेल. मलमपट्टीपेक्षा मुळात आजार दुरुस्त करू या!

तेजल मोहिते

माझा महाराष्ट्र…!

शिव छत्रपतींचा वारसा म्हणजे,

माझा महाराष्ट्र…!

शंभू बाळाच संस्कार म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

विठोबा, तुकोबा च्या अभंगाची चाल म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

वारकर्‍यांच्या विना चिपळी चा ताल म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

लेखणीची धार म्हणजे,

माझा महाराष्ट्र…!

माणुसकीचा झरा म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

सह्याद्रीच्या सुंदर रांगा म्हणजे 

म्हणजे माझा महाराष्ट्र…!

गडकिल्ल्यांचा इतिहास म्हणजे, 

माझा महाराष्ट्र…!

मर्द मावळ्यांचा नाद म्हणजे

माझा महाराष्ट्र….!

आंबेडकर फुलेंचा संघर्ष म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

कर्मवीरांच्या ज्ञानाचा वटवृक्ष 

म्हणजे माझा महाराष्ट्र…!

तलवारीचा कणखर घाव म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

राजकारणात ला पक्का डाव म्हणजे, 

माझा महाराष्ट्र…!

समृद्ध संस्कार म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

ताठ स्वाभिमान म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

प्रत्येक माणसाचा अभिमान म्हणजे

माझा महाराष्ट्र…!

जीव, प्राण, संस्कार संस्कृती, स्वाभिमान

म्हणजे माझा महाराष्ट्र…

– गंगाप्पा पुजारी

मराठी सरकारी शाळांची स्थिती आणि त्याच्या विकासासाठी चे पर्याय.

विषय असा आहे की मराठी सरकारी शाळांची स्थिती. नुकताच अर्थसंकल्पना अधिवेशन पार पडलं त्यात अस समजलं की, राज्यात मराठी शाळांची स्थिती एक लाखाहून तेहतीस हजारावर घसरली. ही बातमी थेट विधान परिषदेतुन समोर आली आहे. आणि हीच आपल्याच मराठी सरकारी शाळांची स्थिती. बहुसंख्य मराठी बांधव असं म्हणतात की दुकानांच्या पाट्या मराठीत करा. पण ह्याने ही स्थिती सुधारणार आहे का? नाही…! का..? कारण आपण आपली मानसिकताच तशी बनवून ठेवली आहे. पालकांना अस वाटत आहे की, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकल तर आपल्या ही मुलाला इतर मुलांसारखं इंग्रजी बोलता येईल. पण त्यांना हे कळत नाही की त्यासाठी घरातलं वातावरण पण तसं असावं लागतं. त्या उलट मराठी शाळेतली मूल ही उत्तम इंग्रजी बोलतात. इथेच तर चुकतो आपण इंग्रजी च गुणगान गाता गाता आपण मराठीला कमी लेखत जातो.

                           दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला नेहमी आज पेक्षा जास्त हवं असत आणि ह्याच हव्यासापोटी तो चांगल्या गोष्टी कडे ओढला जातो. इतरांचे राहणीमान बघून तो स्वतः ची तुलना इतरांशी करायला बघतो. ह्या सगळ्या मुळे साहजिकच मराठी शाळांची स्थिती काही सुधरत नाही जेवढी की इंग्रजी माध्यमांची आहे. ह्या सगळ्या मुळे झालं असं आहे की इंग्रजी माध्यम प्रगत आणि मराठी माध्यम मागे पडत चाललंय. निदान महाराष्ट्रत तरी अस होऊ नये. ह्या वर माझं मत अस की, जे शिक्षण तिकडे मिळतंय तेच इकडे मिळालं तर एक समतोल आपण बांधून ठेवू शकतो. जेणेकरून जी उपलब्धता आज सर्वोत्तम शाळेना मिळत्ये तीच जर सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेना मिळाली तर आज जिकडे तेहतीस हजार मराठी शाळा उरल्या आहेत त्यांची संख्या वाढताना दिसेल. हे इथेच थांबणार नाही तर त्याचे डागडुगी करणं,शिक्षण वेळोवेळी अद्यतन करणं, तंत्रज्ञान वापरून कौशल्य विकास करणे.

                     ह्या सगळ्या मुळे सरकारी मराठी शाळांना एक उच्च दर्जाचे स्थान मिळेल आणि ह्या सगळ्यातून निष्कर्ष असा लागेल की लोकांची मानसिकता बदलेल, लोकांचे मराठी शाळे कडे बघायचे विचार बदलतील मुख्यतः बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. ह्याचा फायदा असा ही होईल की जास्त विद्यार्थी येतील आणि ते झाल्यामुळे शुल्क जास्त येईल आणि देशाची आर्थिक स्थिती ही सुधारेल.

– विभावरी पाटणकर