1 ऑगस्ट साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती दिनानिमित्त आपण या वेळेस ‘ऐसा भारत बनाऍंगे” अनियतकालिक चा 8 वा विशेषांक अण्णाभाऊंच्या गुलामांमध्ये निर्माता घडविणाऱ्या झुंजार, क्रांतिकारी लेखणीची प्रेरणा घेऊन आम्ही युवक आपल्या लिखाणातून समाजाचे वास्तव्य मांडून अण्णांना अभिवादन करून प्रकाशित करीत आहोत.
अण्णाभाऊ साठे जयंती दिनानिमित्त लिहिण्यासाठी आम्हा युवकांना अण्णाभाऊंची लिखाणातून आणि सांस्कृतिक उपक्रमातून व्यवस्थेला घाव घालणारी चळवळ समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामी चळवळीतील ख्यातनाम लोकशाहीर साथी संभाजी भगत यांनी साथ दिली आणि आपल्या या युवकांच्या प्रक्रियेला समाजमना मध्ये कसे पुढे घेऊन जाता येईल याचे योग्य मार्गदर्शन केले. त्याबद्दल आम्ही ‘ऐसा भारत बनाऍंगे’ च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.
अण्णाभाऊंनी स्वतःची ओळख “मी असा-तसा कलावंत नाही. “फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला मी कलावंत आहे.” अशीच सांगितली. ते म्हणायचे “कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही. त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो.” हे त्यांच सांगण त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होत. जमीनिवरच्या लोकांची परिस्तीथी, त्यांच जगण, जाती-पातीरहीत समाजात माणूस म्हणून जगण्याच्या संघर्षाची वास्तविकता आपल्या विद्रोही लिखाणातून मांडणारे मराठी साहित्यातील ते एकमेव. इथल्या नीच व्यवस्थेने ज्या समुदायाची पिढ्यान पिढ्या शोषण, पिळवणूक केली, ज्यांच्या निर्माणाच्या योगदानाला हजारो वर्षांपासून नाकारलं, बहिष्कृत केलं. अश्या प्रस्थापितांना “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून दलित, शोषीत व कष्टकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे” अस ठणकावून सांगुन शोषितांच समाज निर्माणातील योगदान जगासमोर मांडले.
ज्या शोषित समुदायाचे व्यवस्थेकडून, प्रस्थापितांकडून शोषण होत होते, ज्यांना हजारो वर्षांपासून गुलाम बनविले, अश्या शोषित समाजाला “हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहे” असे आपल्या लिखाणातून व्यवस्थेने गुलाम केलेल्या गुलामांना स्वतंत्रपणाची जाणीव करून देऊन नायक बनवले. मराठी साहित्यात प्रस्थापित लेखकांनी कधीच दलितांची व्यथा आपल्या लेखणीतून मांडली नाही; म्हणून अण्णाभाऊ आपल्या एका भाषणात लेखकांना सांगतात की, “हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे.. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही, तोपर्यंत तो दलितांचे साहित्य निर्माण करू शकत नाही.”
अन्नाभाऊंच्या जयंती दिनानिमित्त लिहीत असतांना आम्ही सर्व युवकांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यांचा अभ्यास केला आणि त्यांचे विचार, त्यांची लिखाण शैली, त्यांच्या लिखाणाचे केंद्र बिंदु म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या शोषित, पीडित, दीन-दुबळ्या समाजाचे वास्तव्य आणि आपल्या लिखाणातून व्यवस्थेला घाव घालून समाजाला शोषण मुक्त करण्याचा त्यांचा संघर्ष यावरून अण्णांच्या लिखाणाच्या हेतु विषयी जाणीव झाली आणि लिहिण का महत्वाचे आहे हे समजून आले. हे सर्व समजून घेतल्यानंतर युवकांनी आपल्या लिखाणातून सामाजिक मुद्द्यावर पुढील प्रकारे मांडणी केली: जसे की, आपण निर्माते होऊन शोषण मुक्त समाजाचे निर्माण करणार अशी अपेक्षा अण्णांची होती पण आपण हिंसक, द्वेषरहित समाज निर्माण केला अशी समाजाची वास्तविकता पत्राद्वारे मांडली, जेव्हा सरकार जबाबदारी विसरते आणि नागरिक त्यांना प्रश्न करतात तेव्हा आत्मनिर्भरतेच्या ढोंगाखाली नागरिकांना कसे मॅनिप्युलेट केले जाते यावर प्रकाश टाकला, क्रांतिकारी लिहिलेलं वाचून आपली जबाबदारी संपत नसते, तर ते लिहिलेलं समाजात रुजविण्यासाठी जमिनीवर येवून व्यवस्थेशी दोन हात करावे लागतात झालेल्या या जाणिवेबद्दल लिहीलं, लिखाण जगण्याला कस बळ देत हे स्पष्ट केले, शासन-प्रशासन यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उभा करून त्यांना जवाबदेही बनविण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी असे आवाहन केले, समाजात जाती-भेद नष्ट करून समता-समानता प्रस्थापित करून परिवर्तनाची लाट येईल हा विश्वास व्यक्त केला. अश्या महत्वपूर्ण विषयावर अभ्यासपूर्व, अनुभवातून युवकांनी निर्भीडपणे लिहिले.
“जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव” या अण्णाभाऊंच्या आवाहनाला ‘ऐसा भारत बनाऍंगे’ अनियतकालिक च्या माध्यमातून आम्ही युवक समाजातील जात, धर्म, वर्ण, वर्ग आधारित विषमता, हुकुमशाही, द्वेष याचा विरोध करून; स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही प्रस्थापित करून माणसाने माणसाला फक्त माणूस म्हणून बघावं हा दृष्टिकोण समाजमना मध्ये रुजवून अण्णांच्या स्वप्नाचा शोषण मुक्त समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अण्णा हेच तुम्हाला आमचे अभिवादन !!
मी मानसी, अण्णा तुम्ही मला कदाचित नाही ओळखणार पन म्या तुम्हाला आणि लहू बाबा ना ओळखते. मी बुलढाण्यात राहते आता ७ वी ल असते. पन सोडा, जाउद्या त्या विशाले, अण्णा मा सांगायची तुम्ही अन् लहू बाबा कड लय ताकत होती. तुम्ही लयं हुशार. तुम्ही आमच्या समाजासाठी लय मोठं काम केल. तात्यान त मला तुमची कितकाली गाणी बी ऐकवलयात आणि मला बी विश्वास आहे की, तुम्हीच मला आता सारं सांगू शकाल अण्णा. आम्ही ना चिखली ला राहतो अन् आम्ही लय चांगली लोक हाय. तात्या शेती करतो अन् मा त्याले हातभार लावते. आमच्या कड १ एकरच भल मोठा शेत आहे. सर्व लय चांगलं. पन अण्णा मला ना शाळात बाहेर बसवीत्यात ,आणि त्या दिवशी मी असच शाळा वरुण निघाले थंडीचे दिन होते, अन आमच्या कड काय तरी गावात चाललेलं. रोज सांच्याला लय मोठी माणसं वेगवेगळ्या रंगाच झेंडे घेऊन गावात बोंबलत फिरायच. कोणी केशरी, कोणी नीळा, कोणी हिरवा, कोणी पिवळा.
अन् तश्याच एक दिवशी शेतात ल्या पायवाटेन चालत घरा कड जात असताना पाटलाचा मोठया पोरानं माझा हात धरला. मला लय भीती वाटली अण्णा ! म्हणून म्या हात सोडवून घराकड पळाली. तात्या न मले शेताच्या पारा वरुण पाहिल होत वाटते, ते बी मले काय झाला हे पायाले घरी आले. मा घरी वऱ्यानड्यातून बसून गहू साफ करत होती. मले पाहून तिले बी भ्या वाटला, अन तात्या पन मागून पळत आले. म्या सार काही मा अन तात्या ले सांगितलं. सार काही ऐकून तात्या ला धासकी भरली, तात्या घरात गेला अन् सामानाची बांध बूंद करू लागला. पण मा ने सर्व थांबवलं, मा नि एकदम भल्या मोठ्या आवाजात तात्याले अन मले सांगितलं की, “आपण कुठं बी जायचं नाय “ तेव्हा मले मा मध्ये तुम्हीच दिसलात! फक्त तुम्ही शायरी म्हणताना तुमच्या कड डफ असती अन मा कड गहू निसाच सूप व्हत मा फटकण उठली “ ताने तू घरी राह मी तुया तात्या ल घेऊन सरपंच्या कड जाऊन येते, हे गाव ही जमीन आपली बी हाय! अन् बाबासाहेबा न आपल्या साठी बी कायदा लिव्हलाय, अन आपण बी काय साद नाय अण्णाभाउच्या विचाराण पेटलेला समाज आहे. कोणी ऐकला नाय तर आपण पोलीसाकड जाऊ ” मा चे भले मोठ मोठे शब्द ऐकून अंगात असा संचारूनच आल की, आता रडायच नाय लढायच.तात्या अन मा गेले, सरपंच्याने पाटलाच्या पोराला समजाऊन सांगतो अस म्हणला.
दुसऱ्या दिवशी सांच्याला तात्या ले सरपंच्यान बोलवन धाडल. मा ले घरीच थांबाले सांगून तात्या गेला, तेवढ्यात गावतली सपकाळ काकू मा ले आवाज देयत घरा पुढं आली. मी अन् मा अंगणताच होतो. मा नि मले घरातून पानी आनाले सांगितलं. मी आत गेले अन मागून मला त्या सांच्याला निघणाऱ्या माणसांच्या नेहमी सारख बोंबलन्याचा आवाज आला. मी पानी घेऊन अंगणात आले पण मा किवा सपकाळिण काकू तिकड नवत्या. मले फक्त रस्त्याचे कडे ने बोंबा मारत जाणारी गर्दी दिसली. मी घराच्या अवती भवती सारा काही हुंडकुण काढला, पण मा काही घावली नाय. तात्या घरी आला तात्याचा बी हात अन तोंडाला जखमा झाल्या होत्या. मले लय भ्याव वाटायला लागल. लय रात झाली होती. तात्या मला घराच्या खालच्या खोलीत बंद करून मा ले शोधायला गेला. तात्या जाऊन बराच येळ झाला व्हता, मी खिडकीतून बाहेर शेता कड बघत होतो. भल्या मोठ्या अंधारात काय बी दिसत नवत, अचानक तिकडून काही मानस मले शेतात मशाली घेऊन चालताना दिसली. त्यांनी चटकी सरशी आमच्या शेताले आग लावली. हे पाहून मी कशी बशी दार खोलायचा प्रयत्न करत असताना बाहेरून कोणी तरी दार उघडला. मले वाटला मा आली बाहेर. बघितलं तर सपकाळ काकू होत्या! त्यांनी माया हात पकडला अन् मले घेऊन जंगल कडे पळत सुटल्या, तिकडं मी अन् त्या एक झाडावर चडून बसलो. ती लोक शेत जाळून घरा कडे आली होती. माझ साऱ्या अंगात कापरी भरली होती. म्या माया सारा जीव एकवटून माया घरा कड पाहून राहिली होती. तिकडून मी बेंल गाडी घरा पाशी येताना पायली, त्यात एक बाई अन बाप्या झोपलेला व्हता. गाडी थोडी जवळ आली, मी अजून थोडा नीट पायचा प्रयत्न केला, त्या बाई च्या अंगावर जखमा झाल्या व्हत्या, तिच्या अंगावरचे कपडे बी फाटले होते. मी अजून थोडा निरखून पाहिला तिच्या अंगावर मा ने आज घातले ली साडी व्हती… मी बाजूच्या बाप्या कड पाहिला त्याला बी खूप लागला व्हता, अन त्यांनी बी तात्या सारखा सदरा घातला व्हता… मी अजून निरखून बघणार तेवढ्यात त्यांनी आमच्या घराले आग लावली .. कागद जळत तस आमच्या घराण पेट घेतली. अजून आमच्या शेताची आग कमी पन नवती झाली, अन् ह्या साऱ्या गर्दीत मला पाटलाचा पोरगा दिसला. अन तेवढ्यात हयाणी त्या बाई अन बाप्या ला आगीत लाकडं फेकतात तसा फेकून दिल. माइ मा… तात्या… घर… शेत… अस हाहा म्हणत जळून गेल. तात्या मले सांगायचे अण्णा की “आपण माणूस आहोत गुलाम नाही अन आपणच ह्या जगाचे निर्माते आहोत” .. अण्णा हे कसं जग निर्माण केला व्ह आम्ही!
आज माझ्या एका कवी मित्राला मुद्दाम भेटायला गेलो. समाजाला पडलेल्या किड्यांना ठेचून मारणाऱ्या कित्येक कविता प्राण कंठात आणून वाचताना ऐकलंय मी त्याला कधीकाळी. त्याला इतक्या दिवसांनी भेटून आज फारच बरं वाटलं. खरं तर गर्वाने छाती भरूनच आली होती म्हणा ना!
गेले कितीतरी महिने त्याने आजच्या या दिवसासाठी त्याच्या एका पुस्तकांचं प्रकाशन थांबवून ठेवलं होतं. वाटलं आता या पुस्तकाच्या निमित्ताने तो नजाणो कोणा कोणा नालायकांचे असामाजिक बुरखे टराटरा फाडून त्यांना समाजा समोर नागडं उभं करील.
मी म्हणालो “असत्याच्या या युगातही लेखणीची ढाल आणि शब्दांची तलवार करून सत्त्याच्या बाजूने उभा आहेस तू!!! मित्रा! मला तुझा अभिमान वाटतो!!” तो दाढीच्या कोनातून मिश्किलसा हसला… डोळे लालसर… कदाचित झोपला नसावा…
फोडतात टाहो आज कोंडलेले शब्द हे
पुस्तकाच्या कागदाशी भांडलेले शब्द हे
अंकुशांनी वेढलेली लेखणी गुलाम ही
लेखणीच्या आसवांत सांडलेले शब्द हे
तो बोलू लागला…. मी मनाशीच म्हणालो… वाह्ह!!.. झाली तर सुरुवात… आता आणखी काही वेळाने पेटून उठेल रक्त. तेव्हा त्याला ऐकताना पेटायचं ना, तसंच. पण तो बोलता बोलताच थांबला… पुढे काहीही बोलणं टाळत त्याने त्याचं ते नवीन पुस्तकं माझ्या हातात दिलं. मला वाटलं थांबूच नये त्याने. पण पुस्तक उघडण्याचा मोह मला आवरताच आला नसता.
“माझ्या लेखणीतून”….. वाह्हह!!! काय सुंदर शीर्षक पुस्तकांचं. खाली लाल रंगात छान calligraphy केलेलं त्याचं नाव आणि तेवढंच त्याच्या वास्तववादी कवितांच्या जवळ नेणारं सुंदर मुखपृष्ठ. मी पुस्तक उघडण्या आधीच गर्वाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे किंचितही हलले नाहीत. मी पुस्तक उघडून वाचायला गेलो. पण मुखपृष्ठा पलीकडे वाचायला काहीच नाही. सगळी पानंच्या पानं कोरीच. मी गोंधळून विचारायला जाणार तेवढ्यात तोच म्हणाला…
“जिथून मी सुरुवात केली आजही तिथेच थांबून आहे सारं… आजवर मी जे लिहिलं त्याने कितीसा बदल घडला समाजात?!!!…. थांबलो!!”….
मी म्हंटलं
“अरे थांबून कसं चालेल?…. तुझ्या सारख्या लोकांनीच तर लेखणीतून चाबूक ओढलाय, समाजाला ओरबाडून खाणाऱ्या त्या गिधाडांच्या पाठीवर… तुम्हिच हि अशी माघार घेणं म्हणजे त्या गिधाडांना रान मोकळं झाल्या सारखंच आहे!!…” तो म्हणाला “समाजाची आता मला चिंता नाही. आपल्या सुखासाठी जराही मेहनत न करता अवताराची वाट पाहत बसणारा हा समाज. परिवर्तनाची भूक कधीच मेलिय त्याची. आणि चमत्कारावर विसंबून राहणाऱ्यांनी परिवर्तनाची स्वप्नं बघूही नयेत… मित्रा… इतकी वर्ष झाली मी कवितेतून चितारलेल्या समाजाच्या सडलेल्या जखमांवर तुझी ‘वाह्ह’ ऐकतोय… पण कविता ऐकताना तुझ्या डोळ्यात पेटलेल्या ठिणगीचा वणवा होताना कधी दिसलाच नाही….” त्याचं म्हणणं कळूनही त्याला प्रत्युत्तर देण्याची हिम्मत आणि धमकही माझ्यात नव्हती. मला अगदी पटतही होतं त्याचं म्हणणं. कारण आज पर्यंत त्याच्या कविता ऐकून मनात निर्माण होणारं वादळ पुढच्या काही क्षणातच कुठे नाहीसं होतं.
“मला ना! आजूबाजूला कुणीच जिवंत आहेत असं वाटत नाही.” त्याचा कोंडलेला बांध फुटला… “कितीही केलं तरी त्यांच्या रक्ताला उकळी फुटतंच नाही. कवितेतून त्यांच्याच जखमा उघड्या पडत असताना दाद देणारे; याच शब्दांना काही लोक स्वैराचाराने अंकुश लावु पाहत असताना मूग गिळूण बसून आहेत. म्हणून शब्दांचं हे मौन आज त्यांच्या स्वाधीन करतोय. कदाचित हे मौनच बोलतं करील त्यांना.” त्याच्या लाल डोळ्यात वेगळीच खंत दिसत होती.
मला आज पहिल्यांदाच रक्ताला उकळी फुटल्याचं जाणवलं. ‘परिवर्तनाची भूक म्हणजे नेमक काय?’ ते रंध्रा रंध्रातून जाणवायला लागलं. मित्रा तुझ्या या कोऱ्या पुस्तकातून परिवर्तनाच्या निशब्द आरोळ्या ऐकू येताहेत मला.
लेकिन जब भी जनता अपनी गरीबी की बात करती तब वह क्षणिक भिकारी बन जाता। गरीब जनता राजा की मार्मिक फकीरी सुन के भावुक हो जाती और अपने दीन- दुखी जीवन पर खुश होने लगती।
लेकिन महंगाई के बढ़ते सवाल जब ज़्यादा उठने लगे और महामारी ने भी दस्तक दी , तब लोग मरने लगे और राजा अपने महल में अपनी गरीबी का अभ्यास करने लगा।
जब गरीबी और फकीरी काम न आयी तो राजा ने रोना शुरू कर दिया और जनता जो पहले राजा की फकीरी सुन के रोती थी अब परेशान हो गयी कि राजा के रोने पर क्या प्रतिक्रिया दे।
राजा हर बार जन संवाद में रोने लगा और जनता शीघ्र माफ करने लगी, जिसके चलते जनता शीघ्रपतन का शिकार हो गयी।
शीघ्रपतन के चलते जनता के वैवाहिक और फिर पारिवारिक जीवन पर असर पड़ने लगा। जनता गरीबी और महामारी से परेशान थी ही, अब मानसिक दबाव के चलते रिश्ते बिगड़ने लगे और कइयों के घर बर्बाद हो गए।
तब राजा ने नगर में ढिंढोरा पिटवाया और जन संवाद में आत्मनिर्भरता का नारा दिया।
अब नगर में खुशफहमी का माहौल है; सारी जनता हस्तमैथुन में लगी है और नगर के हर घर आत्मनिर्भर बन गए।
“कोऱ्या कागदांच्या हाका कानावर पडतात नि संवेदनशील माणसं लिहिती होतात..” ही गोष्ट अनेक लेखक आणि साहित्यिकांच्या बाबतीत मला नेहमीच जाणवते. आपल्याला थोर लेखक, साहित्यिकांची ओळख त्यांच्या साहित्य वाचनातून होत असते. प्रत्येक लेखकांची, साहित्यिकांची लेखनशैली वेगळी, त्याची धाटणी वेगळी, विषयाचा गाभा ही वेगळा आणि त्यांचे विचार, मतं ही वेगळी! एखाद्या लेखकाचे विचार आपल्या विचारी मनाला पटले की आपल्याला त्यांच्या साहित्यातील प्रत्येक गोष्टी मनापासून आवडू लागतात. असे अनेक थोर साहित्यिक ज्यांनी वयाच्या खूप कमी वर्षी साहित्य क्षेत्रात योगदान दिलेलं आहे.
साहित्यातील एक शाहीर ज्यांनी आपल्या लोकभाषेतून, बोलीभाषेतून अनेक वाङ्मयप्रकारात साहित्यलेखन केलं. आश्चर्य या गोष्टीचं की, वयाची पुरती पन्नास वर्षे सुद्धा ते जगले नाही, शाळेचं फारसं तोंड देखील त्यांनी पाहिलं नाही आणि केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस ज्यांनी साहित्य लेखनात त्यांच्या जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांत आपल्या लोकजीवनाचा साचा लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य केलं ते म्हणजे लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे..! आजपर्यंत त्यांनी केलेल्या लिखाणात मला वैविध्यपूर्ण गोष्टी जाणवल्या. तसं पाहिलं तर त्यांच्या लेखनशैलीत, विचारांत मला समाजात राहणा-या, आपल्या आजूबाजूला असणा-या लोकांच्या आयुष्यातील घटना, त्यांचं आयुष्य, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या मनांची, व्यक्त न केल्या जाणा-या त्यांच्या जाणीवेची, विचारांची मुक्तपणे व्यक्त केलेली शब्दमांडणीच जाणवली.
केवळ आपल्या छंदासाठी नव्हे तर इतरांच्या जगण्यातील धडपड, जाणीवा सांगणारं त्यांचं साहित्य मला नेहमीच एका वेगळ्याच आदर्शवादी लिखाणाकडे घेऊन जातं. आपल्या समाजातील सगळ्यात श्रेष्ठ वर्ग कुठला असं मला विचारलं तर मी सांगेन की ‘सर्वसामान्य जनता’ हा सगळ्यात श्रेष्ठ वर्ग आहे. तो कसा तर; तो निराळा आहे, तो कष्टकरी, निर्भयी, संघर्षमयी आहे. माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही, तोपर्यंत तो त्यांच्या जीवनावर साहित्य निर्माण करू शकत नाही. असे मला वाटते आणि अण्णाभाऊंच्या अनेक लोकसाहित्यात मला हे प्रकर्षाने जाणवले. एखादा लेखक साहित्यातील गुरु तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो आपल्या लेखनशैलीतल्या शब्दांना प्रत्यक्ष, जिवंतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. शोषण मुक्त समाजाचे स्वप्न पाहणा-या अण्णाभाऊ यांनी समाजात एकसुरीपणाने चालणारी व्यवस्था बदलून टाकावी यासाठी आयुष्यभर लढा दिला. शोषणमुक्ती हाच त्यांचा जणू ध्यास होता असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात मला नेहमीच सत्य, विदारक आणि वर्तमानस्थिती दिसून आली. म्हणजे समाजात आपल्या समोर घडणा-या घटनांचं बारीक-सारीक तपशिलांसह केलेलं वर्णन मला दिसून आलं. त्यामुळेच त्यांच्या लिखाणात त्यांनी स्वतः आपल्या भूमीशी जोडलेली नाळ, प्रामाणिकपणा कायम आहे याची जाणीव होते. ३७ कादंब-या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण करून त्यांनी तरुणांपुढे खरंच खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे. इतक्या अल्पशा आयुष्यात समाजातील भीषण वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले.
अनुभवापेक्षा कुठला दुसरा मोठा गुरु असू शकतो का..? आयुष्यात घडणा-या घटनांची अनुभूती आणि त्यातून घडत जाणारा माणसांचा प्रवास त्यांच्या लेखनातून प्रकटपणे जाणवतो. आणि हेच प्रकटपणे मांडलेले विचार आपल्या मनाला अंतर्मुख करून जातात, विचार करायला भाग पाडतात. आयुष्य म्हणजे अव्याहतपणे चालणारा संघर्षमयी प्रवास..! या प्रवासात त्यांच्या लेखनात शृंगाराबरोबरच संघर्षाची जाण आहे आणि त्या जाणिवेबरोबरच जगण्याचं तुफान बळ देखील त्यांनी दिलेलं आहे. एखाद्या शास्त्राला गणिताचं प्रमाण असतं. विज्ञानाला सिद्धांत असतो, पुरावा असतो. पण भावनेला…? भावनेला एकच पुरावा आणि तो म्हणजे अनुभूती! आत्मानुभूती! हीच अनुभूती, जगण्यासाठी केलेला त्याग, मनांत ठेवलेली अस्वस्थता, त्याची होणारी घुसमट आणि आयुष्याचे प्राक्तन! याचं सखोल लेखन ज्यांनी केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे! त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा अण्णाभाऊ साठे यांचा ध्यास होता. कष्टकरी,दलित,शोषित,पीडित यांचे शोषण संपवण्यासाठी आयुष्यभर ते लढत राहिले.जसे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तसेच अण्णाभाऊ साठे यांचीही उपेक्षा झाली. अण्णाभाऊ साठे सामाजिक बांधिलकी मानणारे समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
शौर्यवान, प्रामाणिक, स्वामीनिष्ठ, धैर्यशील आणि कलंदर कसबी कलावंताच्या मांग जातीत 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, 19 कथा संग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. लहानपणी त्यांनी त्यांच्या वाटेगाव या गावात पाटील कुलकर्णींच्या बेमुर्वतखोर वागण्याचा त्यांच्या अत्याचाराचा आणि चांगुलपणाचाही अनुभव घेतला होता. ग्रामदेवतांच्या यात्रा खेत्रातील उत्सवी वातावरणात त्यांचे बालपण गेले. मुंबईला गेल्यानंतर तेथील झोपडपट्टीतील उघडेवाघडे जगणे त्यांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुकेकंगाल पणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी त्यांची होणारी तरफड अवैध मार्गाचा अवलंब या सार्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि त्त्याचे वास्तव त्यांनी साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते असे म्हणायला हरकत नाही.
त्यांनी त्त्यांच्या लोकनाट्यातून लोकांसमोर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. ‘धोंड्या’ नावाचे एक पात्र निर्माण करून अक्षरशः पुंजापतींच्या वृत्तीप्रवृत्तींवर दगड भिरकावले. प्रबोधन करून परिवर्तन घडविले. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कार केले. मार्क्सवादी विचारांची पेरणी केली. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर होते. मानवमुक्तीचे शिलेदार होते!
माझी मैना गावाकडे राहिली…! ही लावणी ऐकली की नाव आठवत ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच. क्रांतीची ठिणगी पेटवून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या थोर अण्णाभाऊ साठे यांची आज 101 वी जयंती आहे. महाराष्ट्राचे लाडके अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे तुकाराम भाऊराव साठे हे क्रांतिकारक, कथाकार, समाजसुधारक, कादंबरीकार, नाटककार, कवी, प्रयोगशील कलावंत आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वपूर्ण लढा देणारे प्रतिभावंत लोकशाहीर होते. अण्णाभाऊंनी २१ कथासंग्रह आणि मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या या कथा-कादंबऱ्यांचे २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. अण्णाभाऊ हे पोवाडा आणि लावणीच्या माध्यमातून जनसमुदायामध्ये लोकप्रिय बनले आणि त्यांच्या या शैलीमुळे त्यांच कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत. अण्णाभाऊंनी त्यांच्या काही कथासंग्रहातून महिलांची पौराणिक प्रतिभा नाकारली आहे आणि महिला आणि पुरुष यांना समान पातळीवर ठेऊन प्राधान्य दिले आहे. अण्णाभाऊ हे शाळेत शिकलेले नाहीत. शाळेत गेल्यानंतर तेथील होणाऱ्या जाती-जाती मधील भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्त्याच योगदान हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरलेल असून देखील पण, आजच्या आधुनिक काळामध्ये जनसमुदायाला त्यांच्या बद्दल पाहिजे तेवढं माहीत नाही. का?
आजच्या विज्ञान काळात अण्णांभाऊच्या साहित्याची दखल हवी तशी घेतली गेली जात नाही. फक्त जयंती व पुण्यतिथी निमित्तच अभिवादन केले जाते. त्यांचे साहित्य केवळ एका जाती-धर्मा पुरते मर्यादित कधीच नव्हते. आजच्या पिढीने त्यांच्या साहित्याची महिती करून घेणं तितकंच गरजेचं आहे तेव्हाच त्यांना अण्णाभाऊ कळतील.
आज त्यांना अभिवादन करताना आजच्या वर्तमान परिस्थितीत जर अण्णाभाऊ असते तर…? असा प्रश्न सहजच मनात आला. आधुनिक काळामध्ये स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे, तरी देखील स्त्री वर अन्याय-अत्याचार होत असलेले दिसतात. आधुनिक काळ हा इतका भ्रष्ट झाला आहे की न्याय देखिल आज विकत घेतला जात आहे. आज राज्यपद्धती, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या साऱ्या मूल्यांची अगदी हेळसांडच करून ठेवली आहे. नीट-नेटका राज्यकारभार, कर्तव्यदक्ष सरकार, भ्रष्टाचारविना व्यवहार, यांच कुठेही आज जतन होत असताना दिसत नाही. आज समाजामध्ये होणार शिक्षणाच व्यवहारिकरण, गुन्हेगारी, जाती-धर्मात होणार राजकारण या सर्व गोष्टी आज हळूहळू समाज पोखरत जात आहेत. आज अण्णाभाऊ असते तर त्यांनी त्यांच्या साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरोधात लढा दिला असता. आज जर अण्णाभाऊ असते तर त्यांनी जातीव्यवस्था, गरीबी, शिक्षणाचं होणार बाजारीकरण, भ्रष्ट राजकारण यांची मक्तेदारी थांबवली असती. आज समजामध्ये होणाऱ्या अत्याचारांच्या घटना घडल्या नसत्या. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात त्यांनी साहित्यातून आवाज उठवून त्याला आळा बसवून आजच्या समाजाला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले असते.
समाजामध्ये आज परिवर्तन होणे गरजेचे आहे. योग्य तिथे बदल घडवून आणून ते परिवर्तन करण्याकरता आज आपल्याला अण्णाभाऊ सारख्या थोर क्रांतीकारांनी दिलेले विचार आपल्या अंगी आणले पाहिजेत. तरच आणि तरच आज हा समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होइल..!
आज ती वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपण स्वतः अण्णाभाऊ बनून गुलामगिरीने जखडलेल्या बेड्या तोडण्याची. आता वेळ आली आहे आजच्या सडक्या न्याय व्यवस्थेला खडा सवाल करून समाजाला पोखरत जाणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवण्याची. त्यासाठी प्रत्येकाने अण्णाभाऊचे विचार आपल्या मनी रुजवले पाहिजे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज अण्णाभाऊंच्या कार्याला दिलेला हा उजाळा.
“पुन्हा विचार करावा लागेल. असे मी का आणि कशासाठी बोलत आहे. असा प्रश्न आपल्याला पडला असेल. याचे सविस्तर स्पष्टीकरण देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन देशातील परिस्थिती पाहता, निरिक्षण करता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रश्नांची उकल करताना काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. तर म्हटल आपल्या सोबत शेअर कराव्यात. देशावर-राज्यांवर अनेक संकटे आली, मात्र तरी देशातील-राज्यातील लोक तसेच खंबीरपणे उभे आहेत. यात काही संकटे मानवनिर्मित तर काही नैसर्गिक आहेत. यातील काही मुख्य संकटांना थोड समजुन घेऊ- यातील कोरोना महामारी व महामारी दरम्यान केलेले अनियोजित लॉकडाऊन, सेंच्युरी केलेले इंधनांचे दर, निसर्ग आणि तौंक्ते चक्रिवादळे, आणि गेल्या काही दिवसात झालेली अतिवृष्टी; या सर्वामुळे देशातील नागरीक दिन- लाचार-हतबल-निराश झाला आहे. वाली नसताना किंवा संकटात बुडताना शेवटचा आशेचा किरण जेव्हा मावळतो, आणि आशा सोडली जाते; मात्र त्यानंतर एकदा शेवटाचा अंतर्मनातून जसा आपण उमेदीने प्रयत्न करतो, तसा प्रयत्न देशातील सामान्य नागरीक दररोज करत आहे. व आज आपण खंबीर आहोत यांची ग्वाही देत असतो. या नागरिकांच्या हिताचा व कल्याणाचा कधी ही निखळ विचार सध्यातरी केला जात नाही असे चित्र आपण पाहत आहोत. शहरांपासुन ते अगदी गाव आणि गावकुसाबाहेर राहणारा प्रत्येक माणुस दररोज त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी, अधिकारासाठी तिळतिळ तुटताना दिसतो. आपला देश स्वातंत्र्य होऊन 74 वर्ष गेली मात्र तरी ही स्वातंत्र्य भारतातील नागरीकांना विकास कसा असतो? मूलभूत हक्क-अधिकार काय असतात? याबद्दल अनेकदा पुसटशी ओळख देखील नसते. अनेकांना “असेच जीवन असते” असे वाटू लागते. माझ्याप्रमाणे काहिंच्या मनात अनेक प्रश्न ही पडतात. – विकास का होत नाही? का आज ही शासनाची मदत वेळेवर पोहचत नाही?
का जनतेला जनताच मदत करताना दिसते? हे प्रश्न काल परवाच्या नैसर्गिक आपत्तीनंतर पडले आहेत. राजकारणी व सरकारे येतात आणि यात दोष केवळ इतरांचा आहे; असे भासवून आणि जनमाणसात ठसवून स्वत:ची बाजू अगदी त्यांच्या स्वच्छ कडक शुभ्र कपडांवाणी करुन मस्त पाच पन्नास माणसांचा ताफा घेऊन निघुन जातात. जाण्यापुर्वी ते एखाद्या जिल्हाधिकार्याला किंवा तत्सम संबंधित अधिकार्याला रुबाबात कॉल करतात आणि त्या पदवीधर-उच्च शिक्षित अधिकार्याला अरे-तुरे करत धमकीवजा इशारा देतात. विरोधकांवर ताशेरे ओढतात, पदावर असणाऱ्या मंत्र्यांना –“आम्ही कोणाला ओळखत नाही” असे निकृष्ट दर्जाचे वक्तव्य करतात. आणि मग असा एखादा नेता जनतेतील आक्रोशाला भाळला जातो. मग अशाच वृत्तीचा आणि धाटणीचा नेता हवा आहे, असे जनतेत रुजवुन जातात. मात्र मग इथे प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या प्रशासकिय यंत्रणेतील हे सर्व अधिकारी असंवेदनशील का बनत आहेत? का राजकिय नेते या उच्च आणि अधिकारसंपन्न अधिकाऱ्याशी असे निकृष्ट भाषा वापरतात किंवा कृष्ट वर्तन करतात.? जेव्हा एखादा नेता अशा अधिकाऱ्याची उचलबांगडी करतो, प्रश्न उभे करतो, त्यावेळी कायद्यांच्या नियमात काम करणारा हा अधिकारी मुक गिळुन गप्प होतो. दबावाखातर तो अनेक नियमांच्या बाहेर जाऊन काम करतो. तर कधी कधी नियमात असुन देखिल निराश मानसिकतेतुन आणि दबावांखातर तो त्यांचे अॅक्शन प्लॅन बनवत असतो. अनेकदा या अधिकाऱ्यांचे म्हणणे असते कि, जे कायद्यात लिहलेले आहे तेच करणे त्यांना बंधनकारक असते. संसद भवनातून बनणारे कागद त्यांच्यासाठी आवश्यक असतात. त्यांनी कोणतेही नवे बदल केल्यास ते अडचणीत येऊ शकतात. त्यांना सेवा-नोकरी गमवावी लागेल. या भितीपोटी ते बघ्याची किंवा कधी कधी दबावाखाली असंवैधानिक पाऊले उचलतात. तर कधी कधी अधिकारी असुन, सर्व अधिकारसंपन्न असुन देखील ते स्वतंत्र विचार करुन त्यांची कामे प्रामाणिकपणे करु शकत नाहीत.
आता प्रश्न असा आहे- जर सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांना नियमा बाहेर जात येत नसेल तर मग ते तरी काय करतील? मग आता याचे उत्तर इथे आहे. हे पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यातील माणसे; प्रति पाच वर्षानी लोकांकडे येऊन मतांची भिक मागतात-परिणामी पैसा उकळतात आणि जनता आपले लोकप्रतिनिधी म्हणुन विश्वास ठेवुन त्या व्यक्तिला निवडून देतात – जेणेकरुन जनतेचे प्रश्न, समस्या, कल्याणाच्या सुविधा देतील. मात्र हे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कायद्यात बदल न करता, नव्या जनतेच्या कल्याणाच्या पॉलिसीस न बनवता, चौकटीत बंद असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेठिस धरतात. आता मला सांगा- सरकार म्हणजे कोण असते. कार्यकारी यंत्रणा की संसदेत नियम-कानुन बनवणारे लोकप्रतिनिधी? कार्यकारी (एडमिनिस्ट्रेशन) यंत्रणा बनवलेल्या लोकहिताच्या योजनांना पुरेपुर अमलबजावणीने लागू करतात. नियम बनवत नाहीत. नवे नियम किंवा नव्या काळानुसार दुरुस्त्या हे तेच पांढऱ्या कपड्यातील लोकप्रतिनिधी करतात. मात्र प्रत्यक्षात इथे या दोन्ही ही यंत्रणा एकमेकांना दोष देत असतात. खरतर लोकप्रतिनिधिनींचे काम हे जनमाणसात जाऊन प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न समजुन घेणे, समस्या सोडवणे, नव्या समस्या शोधणे आणि पॉलिसी मेकिंग साठी आवश्यक लागणारी अभ्यास माहिती देऊन संसदेच्या पटलावर मांडून निराकरण करणारे कायदे बनवणे. मग हे करतात तरी काय ? तर काल परवाचा होणारा सरपंच असो किंवा मंत्री महोदय असो ते स्वत:चाच विकास करतात, घर-गाडी-बंगला अशी त्यांची प्रगती होते. पण मग या उच्च पदावर पदवीधर आणि अधिकारसंपन्न असणारे प्रशासकिय अधिकारी काय बिचारे असतात का? मुलाखती दरम्यान शपथा आणि प्रामाणिकतेच्या कसोटीवर पारखुन येतात ना? मग, का ते त्यांच्या अधिकारांचा उपयोग जनकल्याणासाठी करत नाहीत? असणाऱ्या सुविधांची अमलबजावणी का जबाबदारीने किंवा प्रामाणिकपणे करत नाहीत? का राजकिय दबावाखाली येतात? मुख्यत: प्रशासकिय यंत्रणा एक स्वतंत्र यंत्रणा आहे. इथे आढवा येतो तो राजकिय हस्तक्षेप !! तो अनेकदा असायला ही हवा पारदर्शकता आणण्यासाठी ! मात्र इथे उलटे असते, इथे दबाव असतो, नाहितर बदल्यांवर बदल्या केल्या जातात. काही सच्चे आणि प्रामाणिक प्रशासकिय अधिकारी
असतात. मात्र ते वाढत्या अनावश्यक हस्तक्षेपाला कंटाळुन सेवानिवृती घेतात. आणि “एक्टिव्हीस्ट” म्हणुन स्वतंत्रपणे जनवकालत करतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला माहित असतील. या प्रशासकिय अधिकारांची मानसिकता अशी निराश-नैराश्यवादी-असंवेदनशील बनते त्याला अनावश्यक केलेला हस्तक्षेप कारणीभुत असतो. या हस्तक्षेपाचा आणि दबावाचा परिणाम समाजावर होत आहे. अनेक नवतरुण या सेवा क्षेत्रात जाण्यास नकार आणि निराशा दर्शवतात. कारण इथे असलेले अधिकार वापरता येत नाहित. नवे काही करता येत नाही. राजकारणांच्या दबावातच काम करावे लागत असते. त्यामुळे एक नकाराची कुरकुर असते, मात्र एक उलटपक्षी भाग ही आहे, तो म्हणजे पदाचा वेगळा गर्व ही येतो. अधिकारसंपन्न वर्दी, मान-सन्मानाच्या चर्चा, ऐशा-आरामाची नोकरी, वृध्दापकाळात सुरक्षा- सुरक्षित वेतन यामुळे अनेक जण या सेवा क्षेत्रात जातात. मात्र पुढे जावुन ते त्याच निराश-नैराश्यवादी- असंवेदनशील मानसिकतेचे म्हणजेच एका कानाने एकुन दुसऱ्या कानाने सोडणारे साहेब बनतात. आणि मग या साहेबांच्या समोर सामान्य जनतेला हाँजीहाँजी करावी लागते. त्यावेळी त्यांना मुलाखतीदरम्यान दिलेल्या “आर्टीफिशल” उत्तराची जराही आठवण होत नाही. प्रशासकिय अधिकारी प्रामाणिकपणे काम करत नाही म्हणुन राजकिय हस्तक्षेप होतो. हा हस्तक्षेप पारदर्शकता आणण्यासाठीच न राहता धमक्या-दबाव- बदल्या इतवर पोचतो, तेव्हा मात्र काम करणारे अधिकारी हतबल होतात. दबावातच काम करायचे आहे असे स्विकारुन ते त्या त्या राजकारण्यांचे कटपुतल्या बनतात. आणि ज्यांना काम आधीच करायचे नव्हते ते अधिकारी मग “सरकारी काम आणि बारा महिने थांब” या पॉलिसीच्या आधारावर अनेक जनतेच्या कामात टाळाटाळ करत असतात. मग पुन्हा यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी राजकिय हस्तक्षेप येतो, तोंडाला काळे फसणे, काठ्या-तलवारी च्या जीवावर गुंडेगिरी करणारे लोकप्रतिनिधी हल्ली गल्ली गल्लीत दिसतात. हि प्रक्रिया एखाद्या चक्राप्रमाणे तिथेच गोळाकार फिरत असते आणि जनतेला भुवळ(चक्कर) आणुन सोडते. आतापर्यंत तुम्हाला प्रशासकिय अधिकारी चांगले-वाईट तर राजकिय नेते चांगले-वाईट होताना दिसले असतील. यात विकास केवळ गटांगळ्या खात असतो.
खरतर या दोन्ही यंत्रणा परस्परावलंबी आणि पुरक असतात. मग त्या पुरक किंवा परस्परावलंबी का नाहीत- त्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे “मुल्यांचा अभाव!!!” काय मुल्य इतकी गरजेची असतात का? त्याचे उत्तर आहे होय, मुल्यांच्या आधारावरच आज विश्व तग धरुन आहे. आणि जर नसेल तर त्याचा अंत लवकरच असेल. उदाहरणासाठी एक मुल्य सांगतो- प्रेम!!! हे नसते तर रक्तसंहार झाला असता. संपुन गेली असती मानवी जात ! एकमेकांच्या प्रेमापोटी आपण अनेकांना पाठिशी घालून अनेक तडजोडी करत असतो. आणि म्हणुन मला माझ्या दृष्टिकोणातून मुल्य इथे नसल्याची प्रचिती येते. या सर्वांमध्ये “प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व, समता/समानता आणि मानवतावादी दृष्टिकोण ही मुल्य गहाळ असल्यामुळे हे असे अधिकारी तयार होतात. जे मुलाखती दरम्यान निवडीसाठी मुल्यांचा पाढा वाचतात आणि निवड झाली तीच मुल्य विसरुन जातात. हा फॉर्म्युला तिथे राजकिय नेत्याना ही लागू होतो. ते वस्त्या-वस्त्यात येतात. आश्वासनांचा, विकासाचा, समस्या निर्मूलनाचा जाहिरनामा घेऊन येतात आणि निवडुन आले कि त्याच जाहिरनाम्याच्याच कागदावर जनतेच्या प्रश्नांची भेळ घेऊन खातात. प्रामाणिकपणा असता तर कामे नियोजित झाली असती. उत्तरदायित्व असते तर जबाबदारीने कामे केली गेली असती. समता आणि समानता असती तर शेवटातील शेवटच्याचा ही समान विकास आणि प्रगती झाली असती. मानवतावादी दृष्टिकोण असता तर त्यांच्या नजरा सतत कष्टकरांना-दिन-दलितांना- दुबळ्या-मागासांना, सामान्य जनतेला उत्थानकडेच घेऊन गेल्या असत्या. यात पारदर्शकता आणावी लागली नसती. मदत मागावी लागली नसती, हस्तक्षेप करावा लागला नसता. सगळं कस बहु-जनांच्या हिताचे आणि सुखाचे झाले असते. म्हणुन म्हणत होतो- पुन्हा विचार करावा लागेल. मुल्य शिकवली जात नाहीत, ती रुजवली जातात. घराच्या, शालेच्या, प्रत्येक इयत्तेच्या वर्गा-वर्गात आणि शब्दा- शब्दात वारंवार मुल्यांची जोड दिली तर कृतीत ती सहज फुलू लागतील. सक्तीच्या विषयातून शिक्षणात मुल्यांना पुन्हा आणावे लागेल. लोकशाही मुल्य आणि सामाजिक मुल्य यांची जोड आज ही परिवर्तन करताना गल्ल्या – गल्ल्यान मध्ये
दिसत आहेत. सामान्य माणुस बनुन तर कधी कधी संस्था-संघटनेतून योगदान देत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल. या लोकशाही आणि सामाजिक मुल्यांची पेरणी देखील मुल्यांच्याच आधारावर करावी लागेल. तेव्हा कुठे माणुस समृध्द होईल, आणि बघता बघता माणसांची देहमाणुसे होतील. धन्यवाद !