समाजघटकांकडून आरोपी घोषित केलेल्या प्रेमाची निर्दोष मुक्तता करण्यासाठीचा संघर्ष करायला युवा सज्ज !!

 आधुनिक भारतात जिथे विज्ञानाला स्वीकारून बऱ्याच नवनवीन गोष्टी घडत आहे, विकसित होत आहेत. तिथे प्रेमाला मात्र धर्माचं, जातीचं, वर्गाचं, वर्णाचं, आणि नको त्या त्या गोष्टीचं कुंपण घालून प्रेम करणाऱ्यांवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर भलं मोठ बंधन इथल्या दहा तोंडी समाजव्यवस्थेने, धर्म, रूढी, परंपरेने लादलेले आहे. बऱ्याच साथीनी यातून स्वता:ला मुक्त केलेले आहे, काही संघर्ष करत आहेत, तर काहींना अक्षरक्षा: मृत्यू पत्करावा लागलेला आहे. तरीसुद्धा मृत्युला ही न घाबरता लोकांचा प्रेमावर विश्वास आणि प्रेमाविषयीचा आदर कायम आहे. आणि आजही हेच सर्व प्रेम करणारे साथी ‘प्रेमाचा सन’ म्हणून 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ मोठ्या उत्साहाने साजरे करतात.  

       14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ या दिनानिमित्त आपण ‘ऐसा भारत बनाएंगे’ अनियतकालिक च्या पाचव्या अंकात  प्रेम नक्की आहे काय? प्रेमाचा लोक विरोध का करतात? आणि त्यामागील राजकारण हे काय आहे? तसेच प्रेम हे निरपेक्ष लोकांमध्ये  उत्साह भरून त्यांना कस जगायला शिकवते? हे समजून घेण्यासाठी तसेच समाजमना मध्ये प्रेमाविषयी जो गैरसमज पसरवीला जात आहे, त्याला खोडून प्रेमाची खरी बाजू मांडण्यासाठीचे  युवकांचे विचार  ‘ऐसा भारत बनाएंगे’ या पत्रिकेद्वारे पोहचविण्याची आपली जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडत आहोत.

                  तसा प्रेम हा विषय खूप गंभीर समजला जातो, पण या वेळेस च्या अनियतकालिक साठी मोठ्या संख्येने युवकांनी पूर्ण उत्साहाने प्रेमावर आपले चांगले – वाईट अनुभव तसेच प्रेमविषयीचे आपले मत, समाजाचे मत, प्रेमाचे राजकारण याविषयी लिहायचा प्रयत्न केला आहे. प्रेम हे आई-वडील, भाऊ-बहीण अस कोटुंबिक नात्याच्या पलीकडे घेऊन ते प्रेयसी-प्रियकराचे प्रेम , मैत्रीतल प्रेम, समलेंगीक प्रेम, अनीलिनगिय व्यक्तीच प्रेम, निसर्गावरील प्रेम असे बऱ्याच वेवेगल्या प्रेमाविषयी युवकांनी लिहिले आहे. प्रेमावर लिहीत असताना बऱ्याच साथिणी  कस प्रेमाला जातीच्या धर्माच्या वरणाच्या वर्गाच्या लिंगच्या चषयातून बघून समाज त्याचा धिक्कार करतो आणि त्या प्रेमला संपण्यासाठी नाना प्रयत्न करतो याच दुख व्यक्त केल आहे.

अशी वाईट परिस्थितही समाजात प्रेमाविषयी असतांना सुद्धह प्रेम कस सुंदर आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा युवकांनी केला आहे. प्रेमात लोक आपली जात धर्म  वर्ग वर्ण पुरुषी वर्चस्व गाजविणारी  मानसिकता सोडून, प्रेमामध्ये माणसाला माणूस म्हणून बघन्याची नवीन संस्कृति उदयास येताना दिसत आहे. प्रेमात प्रत्येक व्यक्ति एकामेकांच स्वातंत्र्य जपत आहे, एकामेकांच आदर करत आहे. प्रेम हे  सर्व प्रकारच्या  विषमतेला नष्ट करण्याच कार्य करत आहे.  प्रेमामुळे प्रत्येकाच्या मना मनात माणुसकी  फक्त आणि फक्त माणुसकी नांदत आहे. तर अश्या  ह्या समाजात क्रांतिकारी परिवर्तन आणणाऱ्या प्रेमाला, प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाने जपल पाहिजे. प्रत्येक प्रेम करणाऱ्याचा आदर आपण सर्वानी केला पाहिजे.

संपादन – विशाल, पूजा

#धुराळा..

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

तिला बघितल्यावर माझ्या ह्रदयाचा ठोका

न्यारीच ताल धरायचा.

माझ्या मनातलं सारं तिला सांगण्याची

माझी हिम्मत कधी झाली नाही

माझ्या डोळ्यातून कळतही होतं तिला

प्रेम माझ्या मनातलं

पण तरीही ती कधी काही बोलली नाही.

तीच्या ओठांतला हा अबोल नखरा

मला रोजच छळायचा

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

असच होतं माझं तिच्यावरचं प्रेम.

फॅन्ड्रितल्या जब्या सारखं

सुर्यासारखं प्रखर

पण मावळतीला गेल्या सारखं

मग म्हंटल तिच्या समोर मनातून एकदा व्यक्त व्हावं

भारावलेलं मन एकदा तिच्या समोर रीतं करावं

धावत्याला बांध घालणे ही रितच असते जगाची

मी क्षणभर विसरून गेलो होतो जात तिची न् माझी

माझ्या मनात हा जातीचा वणवा

गुलाबी होऊन जळायचा

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

मी अंधारातला काजवा, तीची जात चांदण्याची

तिच्या माझ्या सोबतीला, साथ फक्त काळोखाची

तिला म्हंटल आभाळातला चंद्र एकदा होऊन बघ

वाटेल तुला आभाळ ठेंगण मिठीत एकदा येऊन बघ

ती नुसतीच हसली, हसत हसत निघून गेली

जाता जाता म्हंटली

राजा इतकीच वाटते खंत

तुझ्या प्रेमाहून खूप मोठीय रे ही जातीची भिंत!

तिच्या जातीपाई नकाराने रोजच जीव जळायचा

तरी तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

जीवन सोनवणे

वेलेन्टाइन डे, समाज आणि आपण !

  

१४ फेब्रुवारी, वेलेन्टाइन डे म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ असे म्हटले जाते. मित्रहो! आज आपण प्रेमा विषयी जाणून घेणार आहोत. प्रेम म्हणजे काय असत ? याच उत्तर एक नाही अनेक आहेत, कारण प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. माझ्यासाठी प्रेम वेगळं असू शकत आणि तुमच्यासाठी प्रेम वेगळं असू शकत. माझ्यामते ज्या गोष्टी केल्याने मला आनंद, सकारात्मकता आणि शांतता मिळते, ते माझ्यासाठी प्रेम आहे. 

प्रेम म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या नजरेसमोर स्त्री-पुरुष येतात. कारण लहानपणा पासून आपल्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे की, स्त्री-पुरुषच प्रेम करतात. पण आपण एक विचार करत नाही की, गे, लेस्बिन, ट्रांजेंडर, इत्यादी लिंगीय  माणसं ही प्रेम करतात. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकारालं तेव्हा तुम्ही त्यांना माणूस म्हणून बघाल. अजून जवळचं  उदाहरण घ्यायचं झाल तर मला माझ्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी, निसर्गाशी, आणि आवडत्या गोष्टींशी असलेली ओढ हेही प्रेम आहे. जर तुम्हाला नव नवीन पदार्थ बनवायला आवडत असेल तर तेही तुमचं प्रेम आहे.  तुम्हाला गाणी गायला आवडतं तर तेही तुमचं तुमच्या गायनाप्रती प्रेम आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडत, तर तेही तुमचं नवनवीन ठिकाण पाहण्याप्रती प्रेम आहे. अशी अनेक उदाहरण देता येतील. 

सामाजिक क्षेत्रातील उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या भारतात अनेक महात्मे होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशासाठी त्याग केला व जीव गमावला. जसे शहीद भगतसिंग तरुण वयात फासावर हसत हसत फाशी स्वीकारली ती आपल्या देशासाठी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 35 वर्ष शिक्षणाला देऊन अनेक पदव्या मिळवल्या व आपल्या समाजातील निरक्षरता दूर करण्यासाठीचा संदेश दिला,  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं. महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली.  कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खरा शिवाजी पोहोचवण्याचा प्रयत्न केल., डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. इत्यादी व्यक्तींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले आणि हे कसं झालं?  कारण त्यांचं देशाप्रती आणि देशातील माणसांप्रती प्रेम होतं. 

सुरवातीला सांगितल्या प्रमाणे प्रेमाची वेगवेगळी व्याख्या असते. माझी आणि तुमची व्याख्या सारखीच असेल असं नाही. मंगेश पाडगांवकर म्हणतात ना “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं नी आमचं सेम नसत” प्रेम ही एक चांगली भावना आहे, तसचं प्रेम हि नैसर्गिक भावना आहे, जी आपल्याला जन्मतःच मिळते. आणि प्रसंगानुरुप वयानुसार वेगवेगळ्या नात्यात, गोष्टीत फुलते,बहरते! फक्त वेलेन्टाइन डे लाच प्रेम करावं अस नाही. आपण रोज प्रेम करावं आणि करत रहावं मग ती कोणतीही गोष्ट असो, व्यक्ति, काम, कुटुंबीय, निसर्ग, माणूस, समाज, इत्यादींशी प्रेम करत रहावं.

            जास्तीत जास्त लोकांना आकर्षण आणि प्रेम यातील फरक माहीत नसतो, फक्त फिल्मी दुनियेतील प्रेम म्हणजे प्रेम अस अनेकांना वाटत असतं. प्रियकराने प्रेयसीला जिंकणं आणि लग्न होणं म्हणजेच प्रेम असा ग्रह आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने, त्यातील गाण्याने करुन दिलेला असतो. प्रेयसीला मिळवणं,मग ती हिंसेच्या मार्गाने मिळवलेली असो वा वासनेच्या. प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी प्रियकर नायकाने केलेले प्रकार पाहता, त्याला खरचं प्रेम म्हणावं का? असा प्रश्न पडतो. पण चित्रपटात त्याचीच भलामण असल्याने अनेकांना तेच खर वाटू लागतं.

प्रेम आणि आकर्षण दोन्ही महत्वाचं आहे. कारण प्रेम तेव्हाच होत जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होतो आणि आकर्षण तेव्हाच होत जेव्हा प्रेम होतं. फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रेम प्रेमाच्या मार्गाने मिळवावं, हिंसेच्या मार्गाने नाही. प्रेम हे जगायला शिकवतं, मारायला नाही. प्रेमामध्ये आदर असतो, असावा पण प्रेमामध्ये हक्क, अधिकाराची जबरदस्ती नसावी. “जिथे हिंसा आहे तिथे प्रेम नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे हिंसा नाही” 

– संगीता पांढरे

विभाग – मुंबई

आरोपी प्रेमाला वाचवा ..

साल-सालो गावकुसाबाहेर चुलीतल्या फुफुटयासारखं जगणं असो की, मलबारहिल मधल्या उंच इमारतीतील ऐशो-आरामचं जिणं प्रेमाचं मोल मात्र एकच असावं परंतु कष्ट हे वेगवेगळे असतात. लहानपणापासून मरेपर्यंत आई वडिलांचं आपल्या बाळांवर, प्रियसी-प्रियकराचं आपल्या जोडीदारावर, मित्राचं आपल्या मैत्रीवर, शेतकऱ्याचं आपल्या शेतीवर, कार्यकर्त्यांचं आपल्या आंदोलनावर आणी सर्वांचं कुठेना कुठे कुणावर तरी प्रेम असत!  मला असं वाटत की हे असायलाच हवं.

काही लोकांना अस वाटतं की जिवन हे अटी- नियमांवर चालतं मला असं वाटतं की हे मूल्यांवर चालतं! बऱ्याच मूल्यांचं मिश्रण होऊन प्रेम तयार होत! विश्वास, भावना, आपुलकी, सहवास आणि काळजी ज्या व्यक्ती बद्दल वाटते त्याच्या वर आपलं प्रेम असतं अस मला वाटतं ! पण प्रेम एवढ साधं सोपं असलं तरी त्याला भले भले घाबरत.

जगातल्या सर्वच धर्मग्रंथ, पोथी पुराणे, एकमेकांशी आपुलकी जपा, माणूस म्हणून जगा, अस म्हणतात मग दुसरीकडे तोच धर्म गावाच्या म्हाराच्या पोरानं सुभेदाराच्या पोरीशी प्रेम केलं ! कळतंच त्यांची कत्तल करतात. अस का? इथली माणुसकीचं काय? प्रेम दोषी नाही, प्रेम करणं दोष नाही. दोष त्या विचारधारेचा जो जात, पंथ, धर्म, वर्ग, लिंग बघून प्रेमाची सीमा तयार करतात. जाती-वर्ग धर्माच्या ठेकेदारांनी प्रेमाला चिखल तुडवावं तस तुडवलंय ! आणि जगाच्या कोर्टात आरोपी म्हणून कटघर्यात उभं केलयं. आपल्या सगळ्यांना मूल्यांच्या आधारावर त्याला निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी संघर्ष करायचा आहे. आणि लव्ह जिहाद च्या नावाखाली प्रेमाचे राजकारण करणाऱ्या मनू  विचाराच्या  हिटलर शाहीला खरी प्रेमाची व्याख्या समजवायची आहे.

प्रेम हे भावनेचे प्रतीक आहे, भावना नैसर्गिक आहे आणि माझ्या जीवनात निसर्गाला पाहिले स्थान आहे. निसर्गाच्या विरुद्ध असणारी समाजव्यवस्था प्रेमाला हीन वागणूक देत असतानाही आपण गार उभे आहोत. याच समाजव्यवस्थेने प्रेम इतकी लाजिरवाणी गोष्ट बनवुन ठेवलीय की मनमोकळे पणाने प्रेम व्यक्त करण  म्हणजे वाईट! प्रेम व्यक्त करतांना  एक भीती मनात निर्माण  करून ठेवलीय…! पण का?

सत्ताधारी सत्ता वाचवण्यासाठी प्रेमाचा वापर करताय आणि मुद्दे रंगवून नात्यामध्ये तेढ  निर्माण करताय.  प्रेमाला गुन्हेगार ठरवून खेळ खेळताय. आपले पणाचे भाव कायम ठेवून या प्रवाह विरुद्ध जाऊ.  प्रेम जगात जो पर्यंत आहे, तो पर्यंत मानवी आस्तित्व आणि मानवता असेल. नाही तर  प्रेम विसरून द्वेष करत मानव मानवाचा वैरी होणार  आणि स्वतःच अंत करून बसणार.

– प्रजा

अडीच अक्षरांच प्रेम….

            प्रेमाची परिभाषा आणि शब्दावली अनेक जण मांडतील, पण अडीच अक्षरांच्या या ‘प्रेमात’ अनेक रूप आणि नाती जोडली जातात हे अगदी खरंय बरं का..!!

कुणाला वाटेल प्रेम म्हणलं की दुरावा, विरह, आठवणी, त्रास, त्रागा, घालमेल! पण या सगळ्या गोष्टी जरी प्रेमात येत असल्या तरी या विरहात, दुराव्यात तितकीच प्रांजळपणे नात्याची गुंफण अधिक घट्ट होत जाते, हे ही तितकंच खरं!

 …प्रेम या अडीच अक्षरातच खूप मोठी जादू आहे .  नाही का …?

कोमेजलेल्याला फुलविण्याची..

उदास असणाऱ्याला हसविण्याची..

खचून गेलेल्याला उभारी देण्याची..

फुलून आलेल्याच फुलण अधिक खुलविण्याची जादू या प्रेमातच आहे…

कुणाच्यातरी प्रेमात गुंतण्याहून आपण कुणावर तरी प्रेम करतोय ही भावनाच खूप गोड आहे, असं धुंद सतावणार प्रेम फक्त धुक्याआडचं लहरत रहावं.. अगदी बेधुंदपणे असं मला वाटतं…!

..प्रेम हा एक उत्सव आहे, मिटल्या पाकळ्यांचा…!

संवेदनांनी उमलू पाहणाऱ्या ज्योतीचा..!

प्रकाशमान होत जाणाऱ्या आंतरिक अवकाशाचा…!

 हा केवळ एक दिवसाचा खेळ नाहीये, की वस्तूतून व्यक्त होणारा हृदयाचा मेळ ही नाही…प्रेम ही एक प्रतिज्ञा आहे,

शब्दाविना आतून उच्चारलेली,

एकमेकांच्या सोबतीन शिखरावर घेऊन जाणारी…

एक नव आत्मबळ देणारी..समजूतदार वाटेवर डोळ्यांनीच सावरणारी..तरीही नव्या आशेन चालत रहायला शिकवणारी एक सुंदरतेची आराधना म्हणजे प्रेम…! शब्दा आधीची शांतता अन शब्दानंतरची शांतता यातही अडखळलय एक नवखं प्रेम….! जस अंतराळात विरून जाणं, प्रेम समजून घेता घेता राख होऊन पुन्हा प्रेमात पडण..हीच तर प्रेमाची किमया…!

आणि अशीच शिशिराची एखादी झुळूक येते, त्यातली काही पिवळी पान म्हणजे ऋतूअखेर नसतो..ती एक नवी सुरुवात असते, ते ही शिशिरवारं निघून जात..कोवळ्या फांदीतून चैत्र पुन्हा बहरतो, झुळूक ही पुन्हा ओलावते, माती पुन्हा धुमारते….नव काही घडवण्यासाठी…! असचं असतं ना अडीच अक्षरांच प्रेम…  

 #अडीचअक्षरांचप्रेम❤

#Valentine_special❤

#Love_is_always_forever

– RJ Anu ( अनुजा )

विभाग – अहमदनगर

“तुझं आणि माझं नात”

प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय,पण एकच श्वास..!  असाच हा प्रेमाचा एक गोड प्रवास असतो. त्या प्रेमाच्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रेम म्हटलं की भांडण,शंका,राग या गोष्टी तर आल्याच,पण त्या गोष्टी म्हणजेच प्रेम. त्या व्यक्तीवर हक्क दाखवणे आणि मन मोकळे करून त्या व्यक्तीशी मनसोक्त बोलणे हे प्रेमामध्ये चालूच असते.

स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे हा प्रेमातला एक भाग.आणि दुसऱ्याच अस्तित्व हिरावून  न घेणे हा दुसरा भाग. बुद्धांनी म्हटले होते  फुल आपल्याला आवडले तर ते आपण तोडून घेतो.पण जेव्हा तुमच त्या फुलावर प्रेम असेल तर ते तोडत नाही. तर त्याची निगा राखतो. तर तसच प्रेमाच देखील आहे. प्रेमाचे नाणे हे वाजवावे  लागत नाही. ते प्रत्येकाच्या आयुष्यात वाजतच!! पण ते वाजलेले जगाला कळत नाही. पण ते ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतच.

प्रेमामध्ये आपले हृदय खूप जपून ठेवावे लागते. ते खूप नाजूक असते. खूप लहान लहान म्हणजेच बारीक सारीक गोष्टींचे त्यावर प्रभाव पडत असतात. एखादी व्यक्ती अतिशय प्रेम व्यक्त करते तेव्हा त्या व्यक्तीला काय प्रतिमा द्यावी त्यांचे आभार कसे मानायला हवे. हे मुळात समजत नाही. खरे प्रेम मिळवण्याची क्षमता प्रेम दिल्याने,प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही प्रेमामध्ये अडकून असे तर नाही म्हणता येणार पण केंद्रित व्हाल तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे माहित होत जाईल की प्रेम निव्वळ भावनाच नाही. तर तुमचे ते शाश्वत अस्तित्व आहे. मग कोणी कितीही प्रेम कोणत्याही रूपात व्यक्त केले तरी तुम्ही स्वतःला आपल्या स्वचेतनेत स्थिर असलेले बघाल.

            व्यक्ती प्रेमामध्ये का पडतो? त्या समोरच्याच्या गुणांमुळे? आत्मीयता किंवा जवळकीच्या भावनेमुळे? तर प्रेम हे होते, कारण त्या त्या व्यक्तीची सवय झालेली असते. त्या व्यक्तीला सतत आपल्या आजूबाजूला पाहण्याची आपल्याला सवय असते. हळूहळू त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये आकर्षण वाटू लागते. म्हणजे सोप्या भाषेत फीलिंग्स मनात येत असतात. म्हणजेच त्या व्यक्तीवर आपले प्रेम होत जाते. त्या प्रेमात आपण कशाचीही  जबाबदारी न घेता, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे गैरसमज न ठेवता,क्षणभरच त्या व्यक्तीवर नाराजी  ठेवतो. आणि त्यावेळी आपण अशा स्थितीला येतो,जिथे सगळे प्रश्न आणि मतभेद गळून पडतात. आणि त्यात फक्त प्रेम दिसते.

प्रेमाच्या नावाखाली आपण दुसऱ्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो. तो व्यक्ती परिपूर्ण आणि दोषरहित असावा, असे प्रत्येकालाच वाटते. हे वाटणे ही अगदी नैसर्गिक असते. प्रेमामध्ये त्या व्यक्तीचे दोष न बघता त्याच्या सोबत राहणे आणि त्यांना दोषमुक्त ठरवणे हे आपण पसंत करतो. कारण त्या व्यक्तीला आपल्याला गमवायचे नसते.आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षा देखील तशाच असतात. म्हणून प्रेम हे नेहमी योग्य त्या व्यक्तीवरच करावे. यालाच प्रेम म्हणतात.

– पूनम निर्भवणे

विभागठाणे

गोड गोड बोलुन भुलवनारा तो नाही ….

गोड गोड बोलुन 

भुलवनारा तो नाही 

आणि 

भुलनारी मीही नाही 

दोघेही जानतो 

वास्तव काय आहे… 

दोन शरीर ऐक प्राण

म्हणनारा तो नाही 

आणि मीही नाही

जानतो आम्ही 

दोघांचेही वेगवेगळे 

अस्तित्व आहे…

आवडत त्याला माझ लाजन

आणि मलाही त्याचा राकटपना

पण नाहीला नाहीच समजण्याची समज

त्याच्यातही 

आणि 

माझ्यातही आहे…

मालकी हक्क गाजवणार 

डोक्यावर पदर घे म्हणणार 

तो कोण होता 

हा कोण होता

तु त्याच्याशी 

ह्याच्याशी का बोलत होती 

लिपस्टिक फेंट कर 

अस काही बाही बोलत नाही  तो

कारण 

त्याच माझ्यावर प्रेम आहे …

मिही नाही विचारल त्याला कधी 

तुझा फोन व्यस्त का होता म्हणून 

आणि 

खुप दिवस झाले 

आठवण येत नाही का माझी म्हणून 

त्याच्या सोबत 

त्याच्या 

मैत्रीणीण वरही तितकच प्रेम करते

कारण तो माझा 

त्याच्या सकल गुण दोशा सह 

मीही त्याची सर्व गुण-दोष संपन्न 

मग उगाच 

आणाभाका आणि स्वप्नाच्या

आखलेल्या चौकटीची उपमा 

का द्यावी नात्याला

माझ्या अशा अनंत प्रेमावर

कविता लिहीण्याची 

गरज काय आहे ???

– दिशा पिंकी शेख

औरंगाबाद

“उधानलेलं प्रेम”

प्रेम या शब्दाचा उलगडा लहानपणापासूनचं होत गेला, घरच्यांपासून ते इतर नवनवीन माणसांकडून प्रेम हे भरभरून मिळत गेलं, अनेकांना प्रेम हे फक्त माणसांमध्ये दिसतं मला ते इतर अनेक घटकांमध्ये अधिक जाणवतं त्यामध्ये ही मला लहानपणापासून समुद्र खूप जवळचा वाटतो. कारण मुंबई मध्ये वाढल्यामुळे जास्त संबंध हा समुद्राशी आला.  शाळा ही समुद्राच्या जवळ, कॉलेज ही समुद्राजवळ आणि त्यानंतर पुढे काम ही समुद्राजवळ त्यामुळे आयुष्यच समुद्र झालंय जिथे उधाण येतं प्रेमाला, भरती येते सुखाला आणि लाटे सरशी विरघळून जातातं दुःख!  त्यामुळेच त्याच्याशी हळू हळू इतकं जवळचं आणि विश्वासाचं नातं तयार झालं की तो जिवलग झाला.  आयुष्यात काहीही नवीन गोष्ट घडली की ती पहिली त्याला सांगावीशी वाटते, आणि त्याला ही ती भावली की मग तो आनंदाची उधळण करत लाटांमार्फत उसळत राहतो. मग असं वाटतं की जणू काही मला मिठीत घेण्यासाठी तो आतुरलाचं आहे. हा समुद्र जितका माझ्या सुखाचा साथीदार आहे तितकाच दुःखाचा ही, मी कधी दुखावले, अस्वस्थ झाले की त्याच्याच जवळ तासंतास त्याला बघत राहावंसं वाटतं, आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं  ” माझं नशीब , लाटांसारखं… कधी अवखळ ….कधी संथ, किनाऱ्यावर उध्वस्त होणं, हाच ठरलेला अंत !

                     असं जरी होत असलं तरी हाच समुद्र भाग पाडतो लिहायला. घरात बसून चहा घेताना कधी सकाळी मन जात समुद्र किनारी, त्याचं ते सकाळच्या वेळी असलेल रम्य वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. अन संध्याकाळी तर तो इतका आकर्षक वाटतो की त्याच्याकडे  पाहिलं की दुःख, निराशा, विसरायला होते.  त्याचं ते शांत असणं आणि सर्वांना क्षणात एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणं मला खूप भावतं आणि म्हणूनच तो मला दिवसेंदिवस आणखी आवडत राहतो, आणि मी नव्याने त्याच्या प्रेमात पडत राहते.  मला त्याला जवळ घ्यावस वाटलं की मी मुक्त पणे त्यात भिजते आणि त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबातल्या त्याला इतकं घट्ट कवटाळते की मग तो मला रोमांचित करतो आणि तो माझ्या अधिक जवळ येत राहतो. त्याच्या प्रेमाने मी इतकी विरघळते की त्याच्या सारखाच जिवलग मला जोडीदार म्हणून मिळावा याची स्वप्न पाहते. मला सतत वाटत राहतं की माझ्या जोडीदाराचं आणि माझं प्रेम हे समुद्रासारखं निरपेक्ष असावं.  ज्यामध्ये आम्ही एकमेकांची स्वातंत्र्य जपू, एकमेकांना समजून घेऊ, मला हवं तेव्हा मी त्याच्यासमोर अशीच मुक्तपणे व्यक्त होतं राहीन, जशी समुद्राजवळ व्यक्त होत राहते.  माझं जेवढं प्रेम हे समुद्रावर आहे तेवढंच प्रेम हे चळवळीवर आहे.  त्यामुळे समतेच्या लढ्यात नेहमी माझा जोडीदार माझ्या सोबत खंबीरपणे उभा रहावा आणि मी त्याच्या प्रेमाच्या महासागरात अखंड बुडावं, त्याच्या सोबत समतेच्या नावेला किनारी लावावं, मग येईल उधाण बंधुत्वाला अन स्वातंत्र्याच्या लाटा धडकतील किनाऱ्याला मग येईल त्सुनामी मानवमुक्तीच्या विचारांची आणि वाट मोकळी होईल माणुसपणाची….

ऍड. अनुराधा शोभा भगवान नारकर

मुंबई

प्रेमाच्या वर्तुळाला लागलेला दृष्टिकोनाचा परिघ..

प्रेम एक मनाची अवस्था आहे, ती कोणत्याही प्रकारची कृती न्हवे! थोडक्यात काय तर प्रेम हे घडवून आणता येत नाही, मुळात ते घडतं. खरं तर कोणताही स्वार्थ मनात न ठेवता कोणावर तरी जीवापाड प्रेम करणं हा अनुभव प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय ते समजते. ही झाली माझ्या भाषेत प्रेमाची व्याख्या.

परंतु विसाव्या वयात नुकतेच पदार्पण केलेल्या आजकालच्या काही तरुणमंडळींची व्याख्या म्हणजे ” व्हॅलेंटाईन डे जवळ आला यार कोणीतरी BF/GF शोधायला हवा अशी असते. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही, की जेव्हा आकर्षण आणि व्यसन संपते तेव्हा पायाखाली पडलेला भावनांचा पाचोळा तुडवण्यात काहीच अर्थ उरत नाही. जर प्रेम शाश्वत स्वरूपाचे असेल पण त्यात फक्त आणि फक्त स्वार्थ सामावलेला असेल तर ते नैतिकतेचे प्रेम कधीच नसते. नैतिकतेने प्रेम करणे देखील इतके सोप्पे नसते. त्याचं मुख्य कारण म्हणजे समाज! तो किती प्रमाणात तुमचं प्रेम स्वीकारतो हा एक वेगळा भाग आहे. प्रेम करताना नक्कीच समाजाच भान राखलं गेलं पाहिजे.  पण जिथे समाजाला गरज आहे खऱ्या अर्थाने आरसा दाखविण्याची तेव्हा तो दाखविला देखील गेला पाहिजे. कोणत्याही जातीचा चालेल पण मुसलमान आणि दलित नको बाबा!  असे शब्द तुमच्या कानावर लग्नसमारंभ किंवा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून पडले असतील. अशी अनेक उदाहरण आहेत मंडळी… अशी मानसिकता जिथे असेल तिथे समाजाला वास्तवाची जाणीव करून देण्याची खरी वेळ असते. जातीला उच्च स्थान देऊन प्रेमाला कमी लेखणारा समाज आहे.

 परंतु या समाजाच्या दृष्टीकोनाची अनेक रूपं सुद्धा आहेत. एकटी स्त्री पुन्हा संसार करण्याचा विचार मनात आणत असेल तर त्यात वावगं काय आहे. तिच्या चारित्र्यावर बोटे उचलणारे आपण कोण ? इतकंच नाही तर पन्नाशी नंतर जर कोणी वृद्ध महिला किंवा पुरुष लग्न करायचं ठरवतो, तेव्हा तो समाजबाह्य नियमाचे अवलोकन करतोय असे म्हंटले जाते. गोऱ्या मुलीने कृष्णवर्णीय मुलाशी लग्न केले तर तिने ते पैशासाठीच केले असे बिंबवले जाते. आम्हाला सगळं कळतं, आम्ही देखील नवयुगातील क्रांतीच्या सूर्याचे स्वागत अगदी मोठ्या मनाने करतोय, असा दिखावा करू पाहणारे हेच लोक खऱ्या अर्थाने नवयुगाचा पडदा स्वतःच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत गुंडाळून बसलेले असतात. आणि आपला खरा चेहरा त्याच्या आत दडवलेला असतो. जेव्हा केव्हा त्याच्या मनाची कवाडे उघडली जातात तेव्हा तेव्हा त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येतो. त्यांच्या तीक्ष्ण मनात जपलेल्या काही पोकळ समाज नियमाचा त्यांना अभिमान असावा बहुतेक! त्याला वाव कधीच देत बसू नका.  कारण अशा समाजाचा आदर्श जर काही समाजथोरांनी ठेवला असता तर विष्णुशास्त्री पंडित ज्यांनी पहिला विधवा विवाह केला ते कधी घडलेच नसते.

अशा अनेक घटना समाजसुधारणेसाठी उदाहरण म्हणून आहेत. समाजातील पोकळ इज्जत राखण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलांची हत्या करण्यापेक्षा खरे समाज नियम काय हे लक्षात घ्या. कोणत्याही लोकांच्या घोळ्यात जाऊन आपण उभे राहिलो तर एक गोष्ट प्रखरतेने जाणवेल, आयुष्यात अशी अनेक मंडळी भेटतील जी पावलापावलाला दृष्टिकोनाचा तथाकथित च्वींगम चावताना दिसतील. त्यामुळे प्रेम करण थांबवू नका. समाज, ते चार लोक आणि नातेवाईक काय म्हणतील यावर तुमचं आयुष्य अवलंबून ठेवू नका मनसोक्त जगा. जे योग्य आहे ते सांगण्यात कोणताच संकोच करू नका. तुमच्या बोलण्यात तथ्य आणि तर्कशास्त्र असेल तर तुमचा विषय निर्भीड होऊन समाजासमोर मांडा. तेव्हाच हा प्रेमाच्या वर्तुळाला लागलेला दृष्टिकोनाचा परिघ तुटेल…

 – मयुरी जाधव….

विभाग – ठाणे

प्रेम म्हणजे काय?

            दोन जीव एकत्र येणे नाही !तर दोन्ही मने एकत्र जुळणे . तो पहिलावहिला क्षण ज्यात पहिली भेट विथ कॉफी वाली डेट. एकमेकांच्या नावा पासून अगदी एकमेकांच्या पसंतीला एकमेकांची पसंत बनवणे हे असते प्रेम. कधी रुसवे-फुगवे असतात ह्या प्रेमात. तर कधी समाजाचा विरोध ही असतो ह्या प्रेमात. आज वर पाहत आलीये  प्रियसी प्रियकराला वेगवेगळं होताना का असं? मला त्यात हेच कळत नाही की लोक प्रेम सोडून सगळं काही का बघत बसतात? प्रेम म्हणजे एक अथांग सागर ज्यात कधीच कसलाच अंत नाही फक्त प्रवाह जो अथांग आहे,  जो अनंत आहे, जो निर्मळ ही आहे. ह्या वर माझे काही प्रश्न ही आहेत ज्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत..

तर लोक आजकाल जात बघतात पण प्रेम नाही!

लोक आजकाल पैसा  बघतात पण प्रेम नाही!

१) प्रेम त्यांचा, संसार त्यांचा, सुख त्यांचं मग आपण कोण आहोत त्यांचा न्यायनिवाडा करणारे ?

२) पसंती त्यांची मन पण त्यांची मग आपण कोण त्यांना सांगणारे की हे चुकीचे ते बरोबर?

आता द्या ह्या प्रश्नांची उत्तरे का आता बसलात ना गप्प. अहो ‘प्रेम म्हणजे फक्त मजा मस्ती नाही.  प्रेम म्हणजे एकमेकांवर एकमेकांनी लावलेला जीव”.  प्रेम म्हणजे फक्त शारीरिक सुख नाही, तर प्रेम म्हणजे एकमेकांना एकमेकांनी दिलेली सहानभूती, विश्वास , तुझ्या सोबत मी कायम असेन ही शाश्वती. माणूस एकटा असला ना की खूप विचार करतो की, मी हे केलं तर लोक काय म्हणतील, मी ते केलं तर लोक काय म्हणतील. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीची सोबत त्या व्यक्तीला भेटते ना तेव्हा तो व्यक्ती खूप काही करून जातो. बहुदा प्रेम हे प्रेम करणाऱ्याला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातो. एवढ ग्रेट असत हे कधीच समाजाला न कळलेल प्रेम.

प्रेम सगळ्यांच्या मनात असत फक्त काही जण व्यक्त करायला घाबरतात, तर काही  जण बिनधास्त पणे सामोरी जातात.   खरच ह्या आयुष्यावर शतदा: प्रेम करा पण कोणाकडूनच कोणतीच अपेक्षा न ठेवता.

कारण;

“प्रेम हे प्रेम असतं तुमचं काय? आमचं काय सर्वांचं samech असत!!!

विभावरी

विभाग – मुंबई  

स्वतंत्र

की तुम आना इस अ-स्वतंत्रत जहां में

हमारे स्वतंत्र इश्क़ की खुशबू लिए

मैं देखूंगी तुम्हारी आंखों में

पीड़ा दर्द अत्याचार के वह मंजर

कुछ पल ठहरूंगी,

और लगाऊंगी तुम्हें अपने गले

हम एक दूसरे की बाहों में कैद हो

कर देंगे एक दूसरे को आजाद।

मैं सुनाऊंगा तुम्हें गीत उत्पीड़न के

जो सुने होंगे मैंने आते वक्त रास्तो में

मैं लाऊंगा अपने साथ गर्माहट

उस क्रांति की चिंगारी कि

जिसकी तपिश से, फिर जिंदा हो उठेगा हमारा दिल और यह जो बदन ठंडा हो गया था

अत्याचार सहते सहते

फिर उसमें होगा ऊर्जा का संचार

तेरे मेरे आलिंगन से।

जब मेरे लब टकराएंगे तेरे लबों से

और हम कर देंगे एक-दूसरे को मौन

उस क्षण चीखेगी हमारी आत्मा

जो अस्थिर कर देगी व्यवस्था को

लगेगा इंकलाब का नारा, मशाले लिए सड़कों पर उतरेंगे लोग

अपने अत्याचारों का हिसाब मांगने

तोड़ने हर उस दीवार को जिसने

वंचित रखा उन्हें उनके हकों से।

और स्थापित करेंगे व्यवस्था समता से समानता की, जो इंकार करेगी हर उन मान्यताओं का जो रोकती है एक इंसान को इंसान बने रहने से,

और स्थगित कर देगी हर व्यवस्था जो बांधती है हमें दायरों में।

जहां काले रंग को नहीं निकाला जाएगा सुंदर रंगों की श्रेणी से

और काला रंग दर्शाएगा अपनी सुंदरता

तुम्हारी काली जुल्फों काली आंखों काले काजल और नजर के काले टीके में।

हम चुराएंगे परचम हर राष्ट्र, हर जाति,

हर धर्म, हर लिंग, हर समुदाय का

और जोड़ेंगे उन्हें

अपने लहू के धागों और आवाजों की सुई से

और लहराएंगे परचम

वासुधैव कुटुंबकम का।

मानसी उषा, रिझवान चौधरी
विभाग – मुंबई

तुझ्या सोबतीने…

तुझ्या श्वासातला सुगंध 

देईल दरवळ संघर्षाची ,

तुझ्या ओठी येणारे शब्द 

होतील गाणी लोक युद्धाची ,

सोडून लाज…

पावलावर पाऊल ठेवीत खडतर वाटेवरी ,

तुझ्या सोबतीने,मी लढेल स्वतःशी एकदा तरी…

तुझे नजरेचे तीर करतील घायाळ 

माझ्या वासनेला..

कविता-गाणी आहेत 

रेंगाळत तुझ्या लांब केसांवर

तू देशील समर कहानी माझ्या लेखणीला… 

संस्कृतीचं थडगं पेटवशील तुझ्यासाठी रचलेल्या सरणावरी ,

तुझ्या सोबतीने, मी लढेल स्वतःशी एकदा तरी…

कमरेच्या बांधावरून मी घसरत असतो,

अंगाच्या रंगावर धसत असतो…

पण तुझ्या प्रेमाने दिलाय धडा आयुष्याचा ,

लाल नाही.. प्रेमाचा रंगही प्रेमाचाच असतो…

आता माझं तुझं भेटणं जातीच्या घाटावरी ,

तुझ्या सोबतीने,मी लढेल स्वतःशी एकदा तरी…

मी गुंतलोय, फसलोय, नकळत रडतोय,

परंपरा-धर्म-रूढी पुरुषी अहंकाराच्या गाळात…

मी माझाच नाही मी हरलोय 

तुझ्या योनीतून बाहेर मला तू घेतलसं तुझ्या कुशीत..

परत घेशील का मला ?

पुरुषी मानसिकतेने रक्तबंबाळ केलेल्या पदरात…

त्रासात ही बळ देतेस तू, खळखळून हसणारी,

तुझ्या सोबतीने, मी लढेल स्वतःशी एकदा तरी…

– अजय अनिता लक्ष्मण

विभाग – नवी मुंबई

“What is Real Love..?”

प्यार, मोहब्बत! मोहब्बत के बिना जिंदगी तो कुछ भी नही, जिंदगी का दूसरा नाम ही मोहब्बत हैं।  हम सब आज कुछ भी कर रहे हैं, मोहब्बत के लिए ही कर रहे है।   क्योंकि हम एक दूसरे से मोहब्बत कर रहे हैं।  हर किसी को अपनी मोहब्बत का इज़हार करने के लिए February month का इंतजार नही करना चाहिए। मुझे तुमसे मोहब्बत हैं ये कहने के लिए किसी time, month, year,  day, night, की जरूरत नही हैं| February month तो Love festival हैं यार ! मुझे खुशी है की February month love festival को हमारे इंडिया में लोग फॉलो करते हैं।  मुझे ऐसा लगता है की हर religions का अपना अलग अलग festival होता हैं।  तो प्यार का भी होना चाहिए और इसमें कोई गलत बात नहीं हैं। This is my point of view!

अब हम बात करेंगे सच्चा प्यार क्या हैं? कुछ लोग बोलते हैं, मैंने उसे पहली बार देखा और  एक नजर मे प्यार  उससे  प्यार हो गया।  यह सब बोलने की बात हैं।  सच्चे प्यार को होने में वक़्त लगता हैं।  Attraction ,crush, feelings, lust, attachment  यह सारी चीज़े प्यार नहीं हैं। यह सारी चीज़े वक़्त के साथ बदल जाती हैं। लेकिन एक सच्चा प्यार कभी नहीं बदलता true love never die! दो लोग साथ में मोहब्बत में  हैं और दोनों लोगों की सोच मिलती जुलती हैं, तब तक ठीक हैं।  जहा पर एक थोड़ा अलग सोचने लगा  वहा  लड़ाई झगड़े होने लगते हैं।  बस इसी तरह लोग प्यार करते हैं और इसी को प्यार समझते हैं।  imagination कर रहे होते है की, ऐसा लाइफ पार्टनर चाहिए और ऐसा कोई सामने आ जाए तो बस attraction ,crush, feelings, lust, attachment  हो जाती हैं।  किसी के लम्बे बाल अच्छे लगते हैं,  किसी की गोरी चमड़ी अच्छी लगती हैं, किसी की स्माइल अच्छी लगती हैं, किसी की हाईट अच्छी लगती हैं,  लेकिन यह  सब एक  वक्त  मे  ख़तम हो जाता है। ऐसा प्यार ऐसी फीलिंग्स ! 

 बिल्ली दिन भर चूहे के बारे में सोचती रहती हैं, इसलिए सोचती हैं,  क्योंकि बिल्ली को चूहे से मोहब्बत हैं ऐसा नहीं उसे अपनी भूख  मिटानी हैं।  बस इसी तरह लोग अपने भूख को मिटाना चाहते हैं।  फिर क्या होता हैं जहा रिश्ते जरूरत से बनते हैं टूट जाते हैं। 

उसके बाल अच्छे लगना, उसकी गोरी चमड़ी अच्छी लगना, उसकी हाईट अच्छी लगना, उसकी मुस्कुराहट अच्छी लगना, उसकी बॉडी अच्छी लगना यह सारी चीज़े एक ज़रूरत ही तो हैं।  इस तरह के प्यार में लोग boar हो जाते हैं बहुत जल्दी relationship को खत्म कर देते हैं। 

                सच्चे प्यार की शुरुआत खुद से होती हैं। अगर आप किसी से मोहब्बत करते हैं, उसे देखते ही आपको ऐसा लगे की आप उसमे खुद को देख रहे हैं, तो आप कह सकते हैं की, आप मोहब्बत में हैं।  जब किसी से सच्चा प्यार हो जाता है तो इंसान उसमे अपने आपको देखता हैं।  उसको खुद से अलग नहीं समझता।  इंसान अपने आपसे तो कभी boar  नही होता और सच्चे प्यार की फीलिंग्स कभी खत्म नही होती।  हम उसे रोज़ देखें तो भी ऐसा लगता है बस पहेली बार देख रहे है।  जहां ‘तू’  हैं, में ‘हूं ‘वहां मोहब्बत नहीं हैं, जहा सिर्फ हम हैं, वहां मोहब्बत है। 

         माँ  के केस में भी ऐसे ही होता हैं, माँ बोलती हैं ये मेरा बेटा हैं,  ये मेरी बेटी है, लेकिन माँ के लिए वो मेरा नहीं हैं, वो में हू! माँ  सिर्फ ऐसा बोलती है!  सच में तो माँ अपने बच्चों में खुदको देखती है। माँ बोलती है ना, मुझे कुछ भी हो जाए मेरे बच्चों को कुछ नही होना चाहिए; बस यहीं प्यार हैं। माँ भी अपने बच्चों से कभी boar नहीं होती।  सच्चे प्यार की शुरुआत खुद से होती हैं, फिर वो माँ हो या आपसे मोहब्बत करने वाला कोई इंसान। जहां लोग तुम्हें खुद से अलग समझते है, वहा  मोहब्बत नही है।   जो लोग आपसे सच्चा प्यार करेंगे वो तुम्हें अलग नहीं मानेंगे, वो तुम्हें अपना ही वजूद का हिस्सा मानेंगे।  यही मेरी नज़र में रियल लव हैं.

– सायमा खान

विभाग – मुंबई

प्रेम तिथे माणुसकी..!

              प्रेम या शब्दातच जिव्हाळा, आपुलकी, शांतता, सन्मान,आणि आदर यांचा अर्थ दडलेला आहे. आज आपण अशा समाजात जगतोय जिथे प्रेम या भावनेला किंमत कमी आणि व्यवहार जास्त समजला जातो. प्रेम जे आपण आपल्या आई वडिलांवर करतो, संपूर्ण परिवारावर करतो,  समाजावर करतो, देशावर करतो, आपल्या मित्र परिवारावर करतो,  जे प्रेम आपण आपल्या प्रियसी व प्रियकरावर करतो.

                प्रेम या शब्दात फक्त शारीरिक संबंधाचा समावेश होत नाही तर भावनिक, सामाजिक बांधिलकी, माणुसकी,  आपुलकी देखील असते. थोडक्यातच प्रेमाच्या भावना म्हणजे निर्मळ नात्यांचं जाळ असतं. ज्यात तुझं आणि माझं कमी पण आपलं अशी भावना जास्त असते.

                भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माची,  वर्गाची, भाषेची लोक एकत्र नांदतात मात्र धर्मशाही, हूकूमशाही व पितृसत्ताक  वर्णव्यवस्था हे घटक माणसा-माणसांमध्ये द्वेष निर्माण करून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,  माणुसकी यापासून दूर करतात. ज्यामुळे समाजात विषमता निर्माण होऊन मानव अधिकारांचे हनन होते.

            समान जातीत व समान धर्मात विवाह केला नाही, म्हणून निर्घृण हत्या करणे आपल्या मानव जातीत शोभते का?  विशिष्ट धर्माच्या  व जातीच्या रूढी-परंपरांना नाव ठेवण्यात वेळ घालवला तर सामाजिक बांधिलकीचा अर्थ समजेल का?  जातीत प्रेम केलं तर ते ठीक आहे आणि आंतरजातीय प्रेम विवाह म्हणजे पाप व अपवित्र अशी मानसिकता कितपत योग्य आहे? प्रेमाला पवित्र व अपवित्र ठरवण्याचा अधिकार आपल्याला कसा आणि कोणी दिला?  मानवाला मानव म्हणून न बघता व्यवहार म्हणून बघितलं तर माणुसकी समजेल का?  स्त्री-पुरुष भेद केला तर समानता समजेल का ? आणि हे सगळं समजण्यासाठी माणसांनी माणसाशी माणसासंमं वागणे गरजेचं आहे, माणुसकी टिकवण आवश्यक आहे, विषमतेचे विष तळागाळात पसरवण्यापेक्षा समानतेचं अत्तर पसरवणे गरजेचं आहे.

 उगीच प्रेम या भावनेला बदनाम करण्यात वेळ वाया घालवू नये , यासाठी  प्रेम नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे.  त्याचप्रमाणे आपण हल्ली ऐकतोच की प्रेमात धोका मिळाल्याने कित्येक प्रेमयुगी हे मानसिक आजाराला बळी जाऊन आत्महत्या करतात व आपलं जीवन संपवतात. प्रेमात एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे असं नाही त्या प्रेमात त्याग, सहनशीलता, निःस्वार्थ प्रेम, माणुसकी असणं आवश्यक आहे. एकमेकांना मिळवण्यापेक्षा, एकमेकांना समजून घेतलं, जाणून घेतलं तर मना-मनातील वाट शोधण्यास वेळ लागणार नाही, जी आपल्याला माणुसकीच्या बिंदु पर्यंत पोहचवते, माणुसकी अनुभवण्यास संधी देते.

 ‘बोलतात ना प्रेमाने जग जिंकता येत’   खरं आहे समाजातील प्रत्येकाला प्रेम या शब्दाचा अर्थ समजला तर नक्कीच समाजातील धर्म, जात, लिंग, भाषा,वर्ण,वर्ग यातील विषमतेला समानतेचा प्रवाह मिळेल ज्याने माणूस माणुसकीला आदर देऊन सर्वत्र प्रेमाचा सुगंध निर्माण करेल,  सर्वांना समान अधिकार, संधी व सन्मान मिळेल. माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मिळेल, अपेक्षां पेक्षा समाधानाची पातळी उंचावेल, नकारत्मकतेला सकारत्मकतेची जोड मिळेल, खचलेल्याला आशेचा किरण मिळेल, आणि जगण्याला स्वातंत्र्याचा अनुभव मिळेल. दुष्काळात हिरवळीचा भास होईल,  रागाच्या भावनेत जिव्हाळ्याची जाणीव होईल, द्वेषाला आपुलकीची साथ मिळेल, अन्यायाला न्यायाचे मार्गदर्शन मिळेल, मनावरील अशुद्धेच आवरण जाऊन प्रेमाचं आवरण तयार होईल..

शेवटी काय माणसाला प्रेमाचा अर्थ समजेल व माणुसकीचं वरदान मिळेल. खूप महत्वाचं म्हणजे संविधानाला न्याय मिळेल, संवैधानिक मूल्यांना आदर मिळेल व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मिळेल.

#इश्क_मोहब्बत_जिंदाबाद

#माणुसकी_ जिंदाबाद

#समानता_ जिंदाबाद

#संविधान_ जिंदाबाद

मयुरी लाड

विभाग – मुंबई

प्रेमविवाह आणि समाज…

प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात, तर काहींना अपयश येते. जे यशस्वी होतात ते विवाहबद्ध होतात. खरे तर प्रेमविवाह करणा-यांना समाजाकडून तुच्छ आणि हीन लेखले जाते. त्यामुळे ख-या प्रेमी युगुलांच्या वाट्याला शिव्याशाप येतात.

आता काळ बदलला आहे. या बदलणा-या काळाचा वेध समाजाने घेणे गरजेचे आहे. कारण प्रेमविवाह करणा-यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीय होत आहे. मात्र त्यांना मिळणारी वागणूक निंदनीय आहे. त्यातच आंतरजातीय विवाह असेल तर लोकांना चर्चेला नवीन विषय मिळतो. भारतात धर्मांध व जातीयवादी लोकांनी जातीयवादाला खतपाणी घालण्यातच धन्यता मानली आहे.

त्याचा परिणाम म्हणजे इतरांशी रोटी-बेटीचे संबंध होत नाहीत.

1918 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाचा कायदा संमत करून आपल्या दूरदृष्टीचे प्रमाणच दिले आहे. म्हणूनच असे वाटते की समाजाने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. अमुक मुलगी पळून गेली अथवा अमुक मुलाने आत्महत्या केली. अशा बातम्या क्वचितच कानावर पडतील. समाजाकडून लक्ष्य केले गेलेल्या अशा माता-पित्यांनाही मोकळा श्वास घेता येईल. समाजाने आता तरी बदलावे आणि येणा-या काळाचे स्वागत करावे.

माझ्या मते आंतरजातीय, सजातीय हा भाव सोडून दोन सज्ञानी,सुशिक्षित व समजदार जीव एकत्र येऊन नांदू इच्छितात तर आपण त्यांना नुसते शुभाशिर्वाद न देता पुरस्कृत केले पाहिजे. ते उद्याचे खरे समाज सुधारक ठरतील. जात पात, वर्ण भेद ह्या भिंती तोडण्याचा हा सर्वोंत्तम पर्याय आहे. आपण आपला भारत आणखी एकरूप करू शकतो आणी त्यातूनच एकसंघ राष्ट्र  ही निर्माण होवू शकते.

– विनायक तांभीटकर

विभाग – मुंबई