
जेष्ठ मराठी साहित्यीक आणि कवी व.पु काळे यांचे हे शब्द प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना असावी. स्त्री चे शरीर तिच्या साठी अमूल्य आहे. आपल्या शरीराला कोण पाहणार, कोण हात लावणार हे जो पर्यंत स्त्री स्वतः ठरवत नाही; तो पर्यंत कोणालाही अधिकार नाही स्त्री च्या शरीराला पाहण्याचे, स्त्री च्या शरीराला हात लावण्याचे.
‘तिच्यावर बलात्कार झाला’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु तिला जाणवणाऱ्या वेदना मात्र कोणालाही कळू शकणार नाहीत. कारण बलात्कार म्हणजे शारीरिक , मानसिक जखमा. ज्या सावरण्यासाठी बराच काळ जातो. माझ्या मते बलात्कार करणारा प्रत्येक पुरुष पृथ्वीतलावर राक्षसिवृत्ती घेऊनच जन्माला आले असावेत. या सगळ्यांना चालना देण्याचे काम कोणी करत असेल तर तो आहे हा ‘समाज.’ एका बाजूला एकविसाव्या शतकाचे आपण ताशे सतत वाजवत एका उत्तम संगणकीय युगाची वाट पाहत असतो. आज स्त्रियांनी देखील शिखर गाठले आहे. पण आधुनिक काळातील स्त्री खरचं माणूस म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली आहे का? हा प्रश्न नेहमी मला पडतो.
आजही महाभारताची पुनवृत्ती दिल्ली व महाराष्ट्र या आधुनिक राज्यात दिसून येत आहे. कारण द्रौपदी आणि ययाति पुत्री माधवी यांच्यावरील पुरुषी वर्चस्वावरील कहाण्या सर्वश्रुत आहेत. म्हणूनच आजच्या नवयुगात देखील स्त्रीचे वस्तुपन काही संपलेले नाही. समाजात एकूणच समाज व्यवस्थेत स्त्रीचे चारित्र्य हनन करणे या इतकी सोप्पी गोष्ट नाही ‘स्त्री म्हणजे काचेचे भांडे आहे एकदा तडकले की परत सांधता येत नाही.’ हा समाजव्यवस्थेतील अलिखित नियम आहे. याच पुरुषी मानसिकतेतून स्त्रीला कमजोर बनवून नेहमीच दाबलं आहे. कितीही म्हंटल “गौरवाची सुभाषिते असोत” तरीही परिस्थिती प्रत्यक्षात कधी बदलणार हे निसर्गालाच ठाऊक.
पण संघर्ष अटळ आहे आणि तो प्रत्येक स्त्री जातीला करावाच लागणार आहे. शेवटी इतकंच म्हणेण नदी, धरती, आग, हवा ही सर्व स्त्री रूपं आहेत, जेव्हा ‘ती’ मौन मोडून आक्रोश करेल तेव्हा ‘भोग’ या शब्दाचा अर्थ काय आहे, हे त्या दिवशी कळेल व सर्व पुरुषप्रधान व्यवस्थेत तिच्या प्रती निष्ठा, आशा, उदारता, प्रितीची बीजे रुजतील आणि म्हणतील तू आहेस म्हणून आम्ही आहोत….
~ मयुरी जाधव
विभाग- ठाणे