पाण्यापासून बहिष्कृत मुंबई शहराचे निर्माते….

            हजारो वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत; सिद्धार्थ गौतमाचा रोहिणी नदीचा संघर्ष असो वा महात्मा फुले यांचा शूद्रांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र विहीर खुली करण्याचा असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड चवदार तळे सत्याग्रह असो. समान पाणी वाटपाचा हा संघर्ष  हजारो वर्षांपासून चालूच आहे. हजारो वर्षांपासून जातीच्या, धर्माच्या, उच्च-नीच्चतेच्या  भेद-भेदाच्या, विषमतेच्या विचारधारेमुळे माणसानेच माणसाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या विषयी आपण इतिहासामध्ये वाचत आलेलो आहोत. 

           पण मात्र आज आधुनिक युगात सुद्धा पाणी वाटपातील विषमतेच्या इतिहासातील पाऊलखुणा जागोजागी उमटताना दिसतात. ही पाणी वाटपाची विषमता कुठे गावा-कुसात, खेड्यात नसून अक्षरशा: भारताची आर्थिक राजधानी, डेव्हलप सिटी, स्वप्नाची नगरी ‘मुंबई’  मध्ये आहे. असं सांगितलं तरी कुणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण मात्र हे न पचनारं कटू सत्य आहे.

             आजही मुंबईत वीस लाख श्रमिकांना म्हणजेच; मुंबई शहराच्या निर्मात्यांनाच पाण्यापासून वंचित ठेवले गेले आहे. हे तेच श्रमिक आहेत जे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आपला प्राण पणाला लावून गटार नाले, संडास स्वच्छ ठेवायचे काम करतात. शहराच्या विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपलं मोठं योगदान देतात, जेव्हा जेव्हा देशावर संकट आले आहे तेव्हा तेव्हा कुठलीही तमा न बाळगता आपलं काम पूर्ण निष्ठेने करतात. हे आपण कोरोना च्या प्रादुर्भाव मध्ये ही पाहताच आहोत. असं असलं तरी आज ही विना अपमान दोन हंडी पाणी मिळण यांच्यासाठी तारेवरची कसरतचं! 

            पूर्वी स्पृश्य-अस्पृश्य या विषमतावादी विचारधारेने लोकांना पाणी नाकारले जात असे. आज मात्र या आधुनिक युगात आधुनिक पद्धतीने जाणीवपूर्वक मुंबई महानगर पालिका 20 लाख श्रमिकांना पाणी नाकारत आहे. जरी भारतीय संविधान, संयुक्त राष्ट्र संघ, आंतरराष्ट्रीय मानव आयोग, शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals-6) या नुसार प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याचा अधिकार आहे, असं जगभरात मान्य झाले असलं. तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका मुंबईतील 20 लाख श्रमिकांना (दलित, मुस्लिम इतर अल्पसंख्यांक) रेल्वे जमिनीवर,मिठागरेच्या जमिनीवर, वन विभागाच्या जमिनीवर, फुटपाथ वर स्थायिक असल्याने तसेच बेघरांना सुद्धा कायदेशीर पाण्यापासून वंचित ठेवत आहे.  पण मात्र महानगरपालिकेचे हेच अधिकारी ह्याच श्रमिकांना बेकायदेशीर पद्धतीने दलालांसोबत मिळून जास्त पैसे घेऊन पाणी देत आहे. आणि आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवीत आहेत. आणि पाणी मिळविण्यासाठी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीत अडकवून पाण्यासाठी नागरिकांना गुन्हेगार बनण्यास प्रवृत्त करीत आहे.

             डॉ. बाबासाहेबांनी महाड चवदार तळे सत्याग्रहच्या वेळी सांगितल्या प्रमाणे हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे…..” याची प्रेरणा घेऊन मुंबईतील विषमतापूर्वक पाणी वाटपाचा जे कट कारस्थान चालू आहे त्याला चोप बसवायला आणि लोकांन मध्ये आपले हक्क आणि कर्तव्याची जनजागृती करून त्यांना आपल्या हक्कांसाठी स्वतः लढायला, संघर्ष करायला कृतिशील करण्यासाठी पाणी हक्क समिती आणि अश्या बरेच लोकसंघटन लोकांची साथ,संगत, सोबतीने हक्कासाठी लढत आहे. आपण कधीतरी एक वाक्य ऐकलं असेलंच; आपला जन्म हा संघर्ष करण्यासाठीच झाला आहे. आणि हक्क मागून मिळत नसतो तर तो संघर्ष करून मिळवावा लागतो. तेव्हा देशात चालल्या प्रत्येक विषमतेच्या विरोधात पाणी हक्क समिती आणि या सारख्या लोकसंघटनाची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रत्येकाने पूर्ण जबाबदारीने सर्वांना समान बघण्याचा दृष्टिकोण निर्माण करण्याच्या चळवळीत सामील होऊन आपल्या  हक्कांसाठी लढत राहू आणि आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडू…

~ विशाल पुष्पा पद्माकर जाधव

विभाग – मुंबई

पाण्याचे रंग वेगवेगळे…

पाणी हे आपल्या रोज मरणाच्या जीवनात अत्यंत गरजेचे असते. पाण्याचे रंग बदलतात हे वाचून आपणांस आर्श्चय वाटले असेल ना ? हो पाण्याचे रंग बदलतात! 

पाणी किती महत्वाचे आहे, हे आपल्याला संतांनी, महामानवांनी पाण्याचे महत्व सांगितले आहे. संत कबीर, संत रहीम , तुकाराम महाराज यांनी पाणी प्रत्येकाला मिळाले पाहिजे असे  सांगितलं आहे. संत गाडगे महाराजांनी तहानलेल्या पाणी द्या! असे सांगितले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला पाणी पुरेसे मिळावे म्हणून; डोंगर तिथे किल्ला व त्या किल्यावर पाण्याचे तलाव व त्या तलावाचे पाणी सर्व सामान्य रयतेला मिळावं या धोरणाची अंमलबजावणी केली. महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या घराचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याच राज्यातील गुलाम म्हणून कैद असलेल्या लोकांना एकत्र करून कोल्हापूर शहराची तहान भागवण्यासाठी राधानगरी धरण बांधलं. आणि आपणास माहित आहे; डॉ. बाबासाहेब यांनी महाड चवदार तलावात जाऊन स्वतः अस्पृश्यांना चवदार तळ्याचे दार खुले करून दिले. फक्त खुलं करून दिल नाही तर भारतीय संविधानात पाणी हे  मूलभूत अधिकाराची  मांडणी केली व पाणी हे प्रत्येक सजीवाला मिळाले पाहिजे असा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. हे आपण सर्वांनी वाचलं असेल किंवा ऐकलं तरी असेलचं. 

या स्वप्नांच्या नगरीत, मुंबईत महानगरपालिका सर्व सामान्य श्रमिक नागरिकांना वेगवेगळे रंग दाखवते. आंबेडकर नगर, मालाड (पूर्व)  ठिकाणी २१ व्या शतकात कोणतीही शुद्धीकरण न करता मला पिण्यासाठी विहिरीचं पाणी घ्यावं लागते. हे पाणी आठवड्यातून 3 दिवसानंतर दिल जात. आणि हे पाणी कधी रात्री २ वाजता तर कधी ३ वाजता येते. याचा सर्व त्रास आईला होतो. याचं वस्तीत राजकीय दलालांनी पाणी चा बाजार मांडला आहे. ते सरकारी पाणी चोरून  बेकायदेशीर पद्धतीने याच वस्तीला जास्तीचे पैसे घेऊन पाणी पुरवतात आणि श्रमिक लोकांकडून लूट करत आहेत. प्रत्येक कुंटुबाकडून ३०० रु. प्रति महिना लूट चालू आहे. 

मालाड पश्चिम येथे अंबुजवाडी वस्तीमध्ये १९९२ पासून आता पर्यत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांनी बँनर लावले पाणी येणार व पाण्याच्ये उदघाटन सुद्धा करण्यात आली. हे सर्व पाहून असं वाटतं कि, लोकांच्या जीवना बरोबरचं खेळ मांडून ठेवला होता. आता पर्यत ३ ते ४ वेळा पाण्याच्या लाईन टाकल्या व निवडणूक संपल्या की पुन्हा काढल्या जात होत्या. वस्तीतील लोकांचा गेल्या ११ वर्षाच्या संघर्षांनंतर आता वस्तीत पाण्याच्या वाहण्या पोहचल्या आहेत. तरी राजकीय दलालांनी इथे सुद्धा बाजार मांडलेला दिसतोय, जे पाणी कनेक्शन घेण्यासाठी ७ हजार ते १० हजार मध्ये पाणी मिळू शकते, तेच राजकीय दलाल ३५ हजार ते ५० हजार पर्यत खर्च लोकांकडून घेऊन श्रमिकांची लूटमार सुरू केली आहे. कायदेशीर रित्या पाणी घेण्यासाठी लोक महानगरपालिकेकडे धावपळ करत आहेत. पण त्याच महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या पाणी अधिकाराला नाकारून, पाणी कसे थांबवता येते या कडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहे आणि राजकीय दलालां सोबत व्यवहार करून लाच खाण्यात जास्त लक्ष देत आहेत . 

         अशी ही पाण्याची दलाली, बाजारीकरण  संपवण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्का प्रती जागृत राहील पाहिजे. भारताच्या वेवेगळ्या धर्मामध्ये, संस्कृती मध्ये  पाण्याचे महत्व सांगितलं आहे. पाण्याचा धर्म आणि तहाणलेल्या पाणी पाजायची आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. मुंबई महापालिकेला पाण्याच्या शुद्धता चांगली आहे म्हणून जगभरात ओळखल जाते. पण  मात्र महापालिकेने चालू केलेलं पाण्याचे बाजारीकरण थांबवले पाहिजे. आणि आपण ही नागरिक म्हणून आपल्या अधिकारासाठी आणि कर्तव्यासाठी जागृत राहील पाहिजे. जिथे जिथे सरकार आपल्या हक्का आड येत असेल तिथे आपल्या हक्कासाठी सरकार विरोधात बंड पुकारून संघर्ष केला पाहिजे.  

~ योगेश राजेश्री रामचंद्र बोले

विभाग – मुंबई

पाणी जीवन, की पाण्यासाठी संघर्ष ?

वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यात आपल्या जीवनात असलेले पाण्याचे महत्त्व. अन्न, वस्त्र, निवारा, या मुलभूत गरजा मध्ये पाणी आहेच. पाण्यावर सजीव सृष्टी अवलंबुन आहे. पाण्या शिवाय कोणताही सजीव प्राणी जगू शकत नाही. अन्नाशिवाय माणूस एक दोन दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व सर्वांनाच कळते. उन्हात सर्व सुष्टी भाजून निघते. निसर्गामध्ये पाणी जास्त आहे आणि जमीन कमी आहे. कारण पाणी हा निसर्गाचाच एक घटक आहे.

पूर्वी लोकसंख्या कमी होती. सुधारणा झाली नव्हती.त्यामुळं जंगलाची संख्याही जास्त होती. पाऊस नियमित पडायचा पाणी तेव्हा सहज मिळत होत. मात्र काही वर्षांपासून पूर्ण वातावरणाचा समतोल बिघडला आहे. लोकसंख्या खूपच वाढत आहे. सोबतच जंगल तोड होत आहे. संपूर्ण जंगल नाहीशी करून मोठ्या मोठ्या इमारती उद्योगधंदे उभारले जात आहे जंगल तोडीमुळे जमिनीवरील जलस्रोत आटले आहेत. तसेच आज मोठ्या प्रमाणात माणसांकडून पाण्याचा दुरूपयोग केला जात आहे. पाण्याची कमत रता भासत आहे. पूर्वी सहज उपलब्ध होणारे पाणी आज बाटलीत बंदीस्त करून 15 ते 20 (प्रती लीटर) रुपयांना विकले जात आहे.

आज पाण्यासाठी भांडण, मारामाऱ्या होत आहेत. एवढच नव्हे तर पाण्याची चोरी होत आहे, पाण्याची पळवापळवी होत आहे. आजही मुंबई सारख्या शहरात पाण्यासाठी वणवण करावी लागते. एकदा हिवाळा संपला की झाली पाण्यासाठी लढाई सुरू. मुंबई सारख्या महानगरीत काही  वस्त्यांमध्ये पाण्यासाठी  रात्रं दिवस वणवण करून दाही दिशा फिरावं लागतं. मोठ्या मोठ्या इमारती मध्ये 24 तास पाणी वाहत असत आणि आमच्या झोपडप्टीवासीयांना 4 दिवसात एकदा पाणी मिळत, ते सुध्दा रात्री 3 वाजता! दिवसभर कष्ट करा आणि रात्री पाण्यासाठी जागा आणि जागून पण मिळालं तर मिळालं नाही तर अजून 4 दिवस वाट पाहत बसा. सरकारच एक वाक्य मी ऐकल आहे “हर घर जल” मग आमच्या पर्यंत जल का नाही?

            पाण्यासाठी आज आम्हाला एवढ सहन करावं लागत आहे, तर येणाऱ्या काही वर्षांत आमच्या पुढच्या पिढीला किती तीव्र संघर्ष करावा लागेल? याचा विचार करून पण थक्क व्हायला होतं! आजही कोरोना काळात आमचं सरकार सांगत, सतत हात पाय धुवायला. पण आमच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही, तर आम्ही कसे हात पाय धुणार? सरकारचं म्हणन आहे “हर घर जल” मग आम्हाला आता पण का नाही पाणी? अजून किती वंचित ठेवणार?

             पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे; मग आम्हाला का पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो? आमचा हक्क आम्हा मिळणे आवश्यक आहे. आमच्या समोरच्या मोठ्या इमारतीत हक्काच 24 तास पाणी मिळत, तर ते आम्हाला पण मिळालं पाहिजे. सरकारने पाण्याचे महत्त्व ,त्याची गरज आणि गरजेनुसार पुरवठा, पाण्याचा होणारा अपव्यय  या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

             पाणी मूलभूत अधिकारचं  नव्हे तर मानवाची पहिली गरज आहे. दलित असो, आदिवासी असो किंवा बेघर असो सर्वांना पाणी मिळायलाच हवं. मग मनुष्य कोणत्या जातीचा असो व धर्माचा, गरीब असो वा श्रीमंत. जसे पाणी जात, धर्म, कुळ बघत नाही, तसेच सरकारने पण जात, धर्म, गरीब, श्रीमंत न बघता सर्वाना सहज आणि मुबलक दरात  पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. आशा आहे की सरकार लवकरच आपले डोळे उघडून  माणसाला फक्त माणूस म्हणून बघेल आणि त्यांना जगण्यासाठी असलेल्या पाण्याच्या गरजेचा विचार करेल.

~ अक्षता राजेश्री रामचंद्र बोले 

विभाग – मुंबई

#टॅंकर

टॅंकर अजूनही पोहोचला नव्हता. शेजारच्या गावातल्या सुकत आलेल्या विहिरीतून मोजकीच भांडी भरायची परवानगी मिळाली खरी, पण जास्तीच्या पाण्यासाठी सगळच कुटुंब वणवण फिरत होतं. सरकारी कचेरीत खूप विनंती केल्या नंतर एक टॅंकर उपलब्ध झाला होता. घरात पाहुणे मंडळींची रैलचैल, लेकीच ‘राणी’चं लग्न, आणि भीषण दुष्काळाने वेढलेलं गाव.

          “मा वं!…. मले हाळद लागली का नई… तं मंग मह्या रानाला बी हाळदीच बोट लावजो बरं!”

दुष्काळात कुटुंबाला हातभार म्हणून रोजगारासाठी कुठेतरी शहरात राहणाऱ्या राणीने घरच्या गायीला वासरू झालंय हे आईकडून कळलं तेव्हा मोठ्या उत्साहाने सांगितलं. तिने त्याचं ठेवलेलं ‘राना’ हे नाव आईला खूप आवडलं होतं. घरच्या गाईला आठच दिवसांपूर्वी झालेलं वासरू ओल्या बाळंतिणीसोबत सरकारी चारा छावणीत ठेऊन घरच्या मंडळींना लग्नाच्या धावपळीत गुंतणं भाग होतं.

          राणी सुट्टी मिळवून हळदीच्याच दिवशी गावात पोहोचलेली. काटकसर करून वाचवलेल्या पैशांतून लहानांसाठी खाऊ आणलेला आणि मायसाठी लग्नात नेसायला जरिकाठाची सहावारी साडी. अप्पांना मात्र काही आणता न आल्याची सल मनात होतीच. आल्या पासूनच तिची रानाला भेटण्यासाठी तगमग सुरू होती. रानासाठी आणलेली तांब्याची नक्षीदार घंटा कधी एकदा त्याच्या गळ्यात बांधतेय असं तिला झालेलं. आल्यापासून तिचा रानाला भेटण्याचा हट्ट माय वेगवेगळी कारणं देऊन मागे सारत होती.

“मा वं!!! ऊन्ह त् जसा विस्तव है जनू!.. मह्या रानाला छप्पर हाये का वं तीठं?” मायला तिच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं सुचत नव्हतं.

“आवं राने दहा बारा गावाह्यचे ढोरं नेऊन ठेवेल हैत तीठं… छप्पर नसतं त मंग लोकाह्यनं तीठं ठेवले असते का जनावरं एवढ्या उन्हाचे ?”

“आन पानी का टॅंकर न देऊ राहिलेत का ढोराह्यला?” राणीचा पुढचा सवाल तयारच होता.

” अन् मंग!… माणसाह्यचं काय है!… ते शोधत्यात कुठबी पानी… पन सरकार मुक्या जनावरासाठी जास्त लक्ष देऊ राहिलय… बक्कळ पानी है लगे तीठं.”

“अन् महा राना?”

“आता तू परतवनीला आली का परत त जाऊन पाह्यजो!… मह्ये कान नको किटवू बाई!”

आईने कसं बसं राणीला थोपवून धरलं.

चारा छावणी घरापासून बरीच लांब होती. आणि नवरीला हळद उतरवून देवाचा आशीर्वाद घेई पर्यंत कुठेही जायला परवानगी नव्हती. गोतावळ्यातून सवडही मिळत नव्हती. तिची त्यामुळे गोची झाली होती.

          दिवे लागणीची वेळ झाली… गेले दिवस लाईटचाही पत्ता नव्हता. उन्हाच्या झळांनी सगळ्यांच्या अंगाची नुसती लाहीलाही होत होती. टॅंकर आणायला गेलेला  शेजारचा किश्या धापा टाकत धावत आला…  “अर्रर्र… लय बेक्कार झालं आप्पा! वाटत लोकाह्यंन टॅंकर अडवला अन् पार रिकामाच केला. मी हातापाया पडू पडू सांगू राह्यलो घरात कार्य ह्ये बाबाहो! पण कोन ऐकून राह्यलय. लोकाह्यले आडवायले डीरायवर पुढं झाला त् लोकाह्यनं बेसुद पडेस्तोवर हानलाय! म्या जीव तोडून चींगाट पळालो तवा जीव वाचलाय मव्हा!”

          किश्याच्या बातमीने घरात शोककळा पसरली. मायनं धावत जाऊन घरातली भांडी तपासली. रात्रीच्या जेवणापूरतं पाणी होतं. पण मग सकाळची न्याहारी!… आणि इतक्या लोकांच्या आंघोळी पांघोळी!! अन् आता इतक्या ऊशिरानं दुसरा टॅंकर तरी कुठून मागवायचा! आधीच पाण्यासाठी मारामाऱ्या. तिनं फुटलेल्या माठावरचं झाकण सरळ केलं. सकाळी सगळं वऱ्हाड आंघोळी शीवायच दामटायचं. तिने मनाशी पक्क केलं. 

          एकीकडे अर्धमेल्या सरपणाला फुंकून फुंकून जिवंत करण्याच्या प्रयत्ना सोबत रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. तर दुसरीकडे म्हाताऱ्या बींदुनं हळदीचे खडे पेलाभर पाण्यात भिजवून पाट्यावर वाटायला सुरुवात केली. वातावरण हळू हळू रंग धरू लागलेलं. लहान मुलांचा तर भुकेने जीव कासावीस झालेला. त्यांनी आपापल्या आयांच्या मागे हिंडत भोकाड पसरायला  सुरुवात केलेली. अप्पांच काळीज तर धडकता धडकता अचानक थांबेल की काय असच वाटू लागलेल.

“एे सायब्या… वाड्यात जाऊन सांग सगळ्याह्यला… जमल तितक्याह्यनं थोडं थोडं पाणी आणून द्या म्हणा. घरात कार्य ह्यें देतील आणून ज्याह्यला जमतंय तेवढे!… जाय व्हय पटकन…!”

सायब्याला माहित होतं. आत्ता लोक एक वेळेस ढुंगणाचं फेडून देतील पण पाणी काही द्यायचे नाहीत. पण तरीही तो वाड्याच्या दिशेने मुकाट निघाला.

          नवऱ्या मुलीला पाटावर बसवत हळदीच्या सोहळ्याला अंधारातच सुरुवात झाली. 

“पाणी थोडं थोडं घ्या वं! राती अंधारात काही सुदरनार नई म्हनून दुपारीच अंघोळ घातलीय म्या तिलं!” पाटाशेजारी अर्धी भरलेली कळशी टेकवत माय म्हणाली. 

म्हातारी बिंदू पुढं काही बोलणार तितक्यात मायनं तिचा हात दाबत तिला गप्प केलं. आणि हळदीच्या परातीत बोट टेकवून नवरीच्या गलांवर दोन बोटं उमटवली. चंद्राच्या पिवळ्या जर्द प्रकाशात राणी अगदीच खुलून दिसत होती. मायने तिच्या गालांवरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडून तिची नजर काढली. चंद्राच्या चांदण्यात राणीला तिच्या मायच्या गालावरून ओघळणाऱ्या मोत्यांच्या धारा स्पष्ट दिसू लागल्या. तिला गदगदून आलं तस बिंदुबाईनं हळदीनं भरलेला हात तिच्या चेहऱ्यावर फिरवत तिला मायेनं गोंजारायला सुरुवात केली. हळदीनं माखलेल्या नवरीच्या अंगावर कळशीतल्या पाण्याचा पहिलाच पेला रिकामा होत होता तोवर सायब्या धावतच आला…  त्याच्या ओरडण्यानं वातावरण अचानक स्तब्ध झालं..

“आप्पा… नवऱ्याकडच्या लोकाह्यला पोलिसांनं धरून नेलं म्हणत्यात… नवरदेवाला बी ठेसनात ठेवलंय त्याह्यनं!”

“ऐ… दारू पिऊन आला का रे तू भाड्या?… तोंड फोडू का तूव्ह!!!” अप्पांचं काळीज आणखी जोरानं धडकायला लागलं. त्यांच्या रागाचा पारा आता आभाळ शिवू लागला होता. सायब्याला मात्र रडू आवरत नव्हतं…

“आवं नई ना… खरंच ना आप्पा… पोलिस पाटील खबर घेऊन आलाय आत्ताच… त्याह्यनं पाण्याचा टँकर अडवून लुटला म्हनी… अन् डीरायवरला इतकं हानलय की जागीच मेलाय त्यो. साऱ्या गावात बोलन सुरूय आप्पा… तुमचा सोयरा चोर है… टॅंकर चोरलाय त्याह्यनं… आपला टॅंकर चोरलाय …”

आप्पांनी डोळे मोठ्ठे करत डोक्याचं उपरण काढून छातीला लावलं. मायच्यातर पायाखालची जमीनच सरकली. भीतीनं तिला कापरं भरलं. 

          राणीनं हुंदका आवरत पाटावरचा एक पाय खाली घेतला… मायचा हळदीनं माखलेला हात पदरानं पुसत ती कापऱ्या आवाजातच मायला म्हणाली…

“मा वं… आता तरी रानाला भेटायला जाऊ का वं छावनीत?”

अन् माय न हंबरडा फोडला!

– नागराज पद्मा कौतिकराव (कविरंग )

विभाग – मुंबई

“पाणी” प्रत्येक नागरिकाचा अधिकार!

              साथी, आपल्या मूलभूत गरजा तुम्हाला माहीत असतील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आणि आरोग्य. आपल्याला दैनंदिन जीवनात या मूलभूत गरजांची आवश्यकता असते. त्यामध्येच पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी पाणी सर्वात महत्वाचे ठरते.

              माकडापासून माणूस होईपर्यंत आपले निसर्ग खूप छान आणि सुंदर होत. सगळं काही विनामुल्य होते. स्वच्छ होते. जसजसा माणसाचा मेंदू विकसित होत गेला तसा आपल्याला निसर्गाकडून मोफत मिळणाऱ्या गोष्टींचे बाजारीकरण होऊ लागले. इतिहासात पाहिलं की आपल्याला कळेल, पाण्यासाठी लोकं वणवण भटकायचे, पाण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या आणि बरच काही व्हायचं आणि आता ही तसच चाललंय. खेड्यापाड्यातच नाही तर मुंबई सारख्या शहरात ही लोकांना पिण्याचं पाणी मिळवण खूप कठीण जाते. पाण्यासाठी वणवण भटकून आपलं जीवन जगावं लागतं. अजून कधी पर्यंत पाण्याच्या मूलभूत अधिकार पासून वंचित राहावे लागेल? असा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे? कारण प्रश्न विचारल्या शिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाही.

                ‘मुंबई…’ सर्वांना वाटतं “मुंबई स्वप्ननगरी आहे.” पण या स्वप्ननगरीत खोलवर जाऊन पाहिलं तर आजही लोकं  कसे न कसे तरी आपली पाण्याची तहान भागवत आहे. मग त्या मध्ये येते विहिरी, बोरिंग, शौचालयाच्या नळातील पाणी, दुकानातील पाणी, एखाद्या फुटलेल्या पाईप मधील पाणी, एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या घरातील पाणी.

 विचार करायला हवं. देशाची आर्थिक राजधानी मुबई. तरीही इथे पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर गावी, खेड्यापाड्यात काय अवस्था असणार? जे पाणी आपल्याला विनामूल्य मिळालं पाहिजे, आज त्याच पाण्याची किंमत 200 ते 300 रुपये महिने (काही वेळा त्या पेक्षा ही जास्त) आणि 10 ते 20 रुपये 20 ते 25 लीटर कॅन या दरात मिळते. ज्यांची पाणी विकत घेण्याची क्षमता आहे ते घेतील. पण जे लोकं पाणी विकत घेऊ शकत नाही त्यांचं काय ? कधी विचार केलाय?

              मी शाळेत असतांना पाहिले, एका रस्त्याच्याकडेला एक नाला होता, त्या नाल्यात घाण पाणी वाहत होतं आणि तेच पाणी काही श्रमिक बेघर माणसे आपल्या भांड्यात भरून घेत, ते सुध्दा पिण्यासाठी, रोजच्या वापरा साठी! ज्या देशात आपण राहतो, त्या देशात साधी पाण्याची तहान भागवता येत नाही. कारण नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाजारीकरण!

          तुम्ही ऐकलं असेल “पाणी आडवा पाणी जिरवा”, “पाणी वाचवा जीवन वाचवा”, “पाणी है तो सबकुछ है”, “जल है तो कल है,  इत्यादी. पण नक्की अस होत का ? क्वचितच लोक पाण्याचं महत्व समजतात. बाकी पाणी वाया घालवणार पण समोर आलेल्याला एक हंडा पाणी भरून देणार नाही. आणि एक हंडा पाणी भरून दिल असेल तर त्या पाण्याची अधिक किंमत वसूल करतील. मी जे उदाहरण देत आहे, ते माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहेत काही अनुभवाची आहे. मग मला नेहमीच प्रश्न  पडतो, खरचं विकास होत आहे का? की विकासाच्या नावाखाली आपलं शोषण होत आहे? हक्काचं पाणी मिळत आहे का? या सगळ्याची उत्तरे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण प्रश्न विचारु.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केलेला, ते का केलं? तर विशिष्ट वर्गाच्या लोकांना त्या तळ्यातील पाणी घेण्यास मनाई केली होती. डॉ.बाबासाहेबा आंबेडकरांचं म्हणणं होतं की जातीवाद सोडून पाणी हे सगळ्यांना समान मिळाले पाहिजे. पाण्याची ही लढाई आजही सुरू आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आसिफ!

          आजही जात, वर्ग, पेहराव पाहून पाणी नाकारले जाते. आपण हा जातीभेद, वर्गभेद  बाजूला ठेऊन माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीला पाहिलं तर नक्कीच परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मुंबई सारख्या शहरात पाण्यासाठी परावंलबी असलेल्या नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने करायला हवा. कारण एकीकडे पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे २४ तास पाणी, आणि त्यामुळे त्याचा अत्यंत बेजबाबदार वापर.पाणी प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाणी प्रत्येक सजीवाचा मूलभूत अधिकार आहे. महानगरपालिकेने  नागरिकांच्या पाण्याच्या हक्काचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाला समान पाण्याचे वाटप केले पाहिजे…

~ संगीता पांढरे

विभाग – मुंबई

The Precious Drop!

It is a problem of water,

Day by day it’s becoming shorter.

For what purpose we fight , 

we discriminate, 

If there is no use of that water 

which is unlimited.

There is scarcity of water but 

people makes it scantity by saying it’s pure

If you mean it are you sure ?

There are some motto’s 

which is made for preserving H2O 

If there will be no rain ,

there will be no grain .

This is how the living being chain will break 

then you will not able to say “It’s your mistake ” 

There will be drought ,

and you will become distraught .

This is how there will be no water ,

day by day it’s becoming shorter .

In this country for water ,

we supposed to pay .

If we are thirsty and,

 we don’t have rupee ,

than how can we stay.

One day we will definitely awake,

from sleep.

The sleep will be ,

fulfil but we will not able

to see the water in the lake.

One day we will definitely realize,

that there is no water on land.

Which we were seeing till today,

It is nothing but a sand,.

This is how one day,

the water will become a brand,

One day the water will also be in great demand.

This is how you have observe it ,

So it’s my respect to preserve it,

Because in future the new generation

Deserve it….!

~ vibhavari

Mumbai

Pani Haq, the Water Rights Struggle in Mumbai – the story

The water rights struggle in Mumbai is an iconic struggle that underscores the resilience of Mumbai’s public in the face of intense hardships to access something as basic as everyday water access. The event on Feb 16, 2021 was organized to celebrate eleven years of struggle for municipal water supply in Mumbai. It included songs, speeches, felicitation of and by organizers (more than half the organizers were women) from Mumbai’s bastis as they narrated their struggles for water access in their communities. In their speeches, the organizers narrated stories about standing up against politicians, local thugs, plumbers, agents and municipal officials, all of whom together foster systems of corruption and restrict people’s access to basic water supply. In a way PHS struggle represents a collective energy for social justice organizing for basic rights of people living in slums, including water,  toilets, drainage, roads, safe housing and so on. This is a short account of the water rights struggle in Mumbai’s settlements, its current status and future plans, written based on the speeches by veteran activist Avinash Kadam and PHS convener Sitaram Shelar.

The story for water rights in Mumbai, activist Avinash Kadam narrated, began with the struggle in Andheri East, in the K/East ward of Mumbai municipal corporation, and then spread to other parts of Mumbai. What emerged earlier as the Mumbai Pani group, later became the Pani Haq Samiti, a broader movement focusing on water rights for slum dwellers in Mumbai. By the 2000s, the population in Mumbai’s unauthorized settlements increased to almost 60 % proportion of the total population. The system to regularize the older bastis become embroiled in electoral vote bank politics and corruption. The cut-off dates system for recognizing slums officially came to institutionalize the inhumane and painful processes of denial of water access and waiting for things as basic and essential for life, as the daily water supply!

PHS organizers have sought different strategies to advance the movement including RTI applications, international agreements for universal water access and so on. By 2011, it was pretty clear that the government was not serious about giving municipal water access to slum dwellers and delivering on the promise of universal water access. In 2011, a decision was made to file a public interest litigation petition that subsequently led to a court battle from 2012- 2014. The 2014  High Court ruling in the favor of the PHS was a major win as well as a relief for the organizers.  The ruling stated that water is a fundamental right and it must be provided by the state to all residents irrespective of where they live.

Despite the judgement and the Mumbai High Court recognizing water as a fundamental right, BMC officials continued to be  evasive and delayed the implementation of this rule. Even when they finally passed the “water for all” rules in January 2017, they ensured to include exceptions; thus despite the name “water for all”, under the new rules, water access would not really be extended to everyone. The exceptions included people who live in settlements on private land, forest, footpath dwellers, near the seacoast and land allotted by the state or municipal government for development projects. But the PHS organizers decide to use this rule as a starting point to push for access at least for some communities, if not for all!

Sitaram Shelar, the convener of the PHS, described how water belongs to all living beings, trees, animals as he mused on the connections between water and life. He energized the group with chants of “we will not give up, we will not give bribes…and we will take water that is ours, that is our right!” and pani hai jeevan ke liye, nahi denge munaafe ke liye [water is for living, and not for profits] conveying feelings of solidarity, love and resistance. Further he said that they are looking ahead for an intensified struggle for water rights. In the context of COVID, water and sanitation have attained a renewed importance as: one, water is essential for frequent hand washing which is the first line of defense against COVID; two, water, sanitation and hygiene access and practices need to be facilitated in a manner that people can implement social distancing during their daily chores. Sitaram Shelar cited a recent report developed by the PHS team that encapsulated the impact of COVID-19 crisis on water sanitation access; it included recommendations for the BMC to aid peoples’ resilience at the time of the pandemic. The PHS will call for a larger protest if BMC’s lack of action continues and alongside continued follow up processes for water applications. In addition, Sitaram Shelar noted that there may be a need for struggles that will seek judicial interventions such as PIL petitions, especially for the communities who have been unfairly excluded from the BMC’s 2017 water rules. 

Contributors/inputs:

Speeches by Sitaram Shelar & Avinash Kadam,

11 years of Pani Haq Samiti event,

February 16, 2021

Editor: Poonam A

समाजघटकांकडून आरोपी घोषित केलेल्या प्रेमाची निर्दोष मुक्तता करण्यासाठीचा संघर्ष करायला युवा सज्ज !!

 आधुनिक भारतात जिथे विज्ञानाला स्वीकारून बऱ्याच नवनवीन गोष्टी घडत आहे, विकसित होत आहेत. तिथे प्रेमाला मात्र धर्माचं, जातीचं, वर्गाचं, वर्णाचं, आणि नको त्या त्या गोष्टीचं कुंपण घालून प्रेम करणाऱ्यांवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर भलं मोठ बंधन इथल्या दहा तोंडी समाजव्यवस्थेने, धर्म, रूढी, परंपरेने लादलेले आहे. बऱ्याच साथीनी यातून स्वता:ला मुक्त केलेले आहे, काही संघर्ष करत आहेत, तर काहींना अक्षरक्षा: मृत्यू पत्करावा लागलेला आहे. तरीसुद्धा मृत्युला ही न घाबरता लोकांचा प्रेमावर विश्वास आणि प्रेमाविषयीचा आदर कायम आहे. आणि आजही हेच सर्व प्रेम करणारे साथी ‘प्रेमाचा सन’ म्हणून 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ मोठ्या उत्साहाने साजरे करतात.  

       14 फेब्रुवारीला ‘व्हेलेनटाईन डे’ या दिनानिमित्त आपण ‘ऐसा भारत बनाएंगे’ अनियतकालिक च्या पाचव्या अंकात  प्रेम नक्की आहे काय? प्रेमाचा लोक विरोध का करतात? आणि त्यामागील राजकारण हे काय आहे? तसेच प्रेम हे निरपेक्ष लोकांमध्ये  उत्साह भरून त्यांना कस जगायला शिकवते? हे समजून घेण्यासाठी तसेच समाजमना मध्ये प्रेमाविषयी जो गैरसमज पसरवीला जात आहे, त्याला खोडून प्रेमाची खरी बाजू मांडण्यासाठीचे  युवकांचे विचार  ‘ऐसा भारत बनाएंगे’ या पत्रिकेद्वारे पोहचविण्याची आपली जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडत आहोत.

                  तसा प्रेम हा विषय खूप गंभीर समजला जातो, पण या वेळेस च्या अनियतकालिक साठी मोठ्या संख्येने युवकांनी पूर्ण उत्साहाने प्रेमावर आपले चांगले – वाईट अनुभव तसेच प्रेमविषयीचे आपले मत, समाजाचे मत, प्रेमाचे राजकारण याविषयी लिहायचा प्रयत्न केला आहे. प्रेम हे आई-वडील, भाऊ-बहीण अस कोटुंबिक नात्याच्या पलीकडे घेऊन ते प्रेयसी-प्रियकराचे प्रेम , मैत्रीतल प्रेम, समलेंगीक प्रेम, अनीलिनगिय व्यक्तीच प्रेम, निसर्गावरील प्रेम असे बऱ्याच वेवेगल्या प्रेमाविषयी युवकांनी लिहिले आहे. प्रेमावर लिहीत असताना बऱ्याच साथिणी  कस प्रेमाला जातीच्या धर्माच्या वरणाच्या वर्गाच्या लिंगच्या चषयातून बघून समाज त्याचा धिक्कार करतो आणि त्या प्रेमला संपण्यासाठी नाना प्रयत्न करतो याच दुख व्यक्त केल आहे.

अशी वाईट परिस्थितही समाजात प्रेमाविषयी असतांना सुद्धह प्रेम कस सुंदर आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा युवकांनी केला आहे. प्रेमात लोक आपली जात धर्म  वर्ग वर्ण पुरुषी वर्चस्व गाजविणारी  मानसिकता सोडून, प्रेमामध्ये माणसाला माणूस म्हणून बघन्याची नवीन संस्कृति उदयास येताना दिसत आहे. प्रेमात प्रत्येक व्यक्ति एकामेकांच स्वातंत्र्य जपत आहे, एकामेकांच आदर करत आहे. प्रेम हे  सर्व प्रकारच्या  विषमतेला नष्ट करण्याच कार्य करत आहे.  प्रेमामुळे प्रत्येकाच्या मना मनात माणुसकी  फक्त आणि फक्त माणुसकी नांदत आहे. तर अश्या  ह्या समाजात क्रांतिकारी परिवर्तन आणणाऱ्या प्रेमाला, प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाने जपल पाहिजे. प्रत्येक प्रेम करणाऱ्याचा आदर आपण सर्वानी केला पाहिजे.

संपादन – विशाल, पूजा

#धुराळा..

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

तिला बघितल्यावर माझ्या ह्रदयाचा ठोका

न्यारीच ताल धरायचा.

माझ्या मनातलं सारं तिला सांगण्याची

माझी हिम्मत कधी झाली नाही

माझ्या डोळ्यातून कळतही होतं तिला

प्रेम माझ्या मनातलं

पण तरीही ती कधी काही बोलली नाही.

तीच्या ओठांतला हा अबोल नखरा

मला रोजच छळायचा

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

असच होतं माझं तिच्यावरचं प्रेम.

फॅन्ड्रितल्या जब्या सारखं

सुर्यासारखं प्रखर

पण मावळतीला गेल्या सारखं

मग म्हंटल तिच्या समोर मनातून एकदा व्यक्त व्हावं

भारावलेलं मन एकदा तिच्या समोर रीतं करावं

धावत्याला बांध घालणे ही रितच असते जगाची

मी क्षणभर विसरून गेलो होतो जात तिची न् माझी

माझ्या मनात हा जातीचा वणवा

गुलाबी होऊन जळायचा

तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

मी अंधारातला काजवा, तीची जात चांदण्याची

तिच्या माझ्या सोबतीला, साथ फक्त काळोखाची

तिला म्हंटल आभाळातला चंद्र एकदा होऊन बघ

वाटेल तुला आभाळ ठेंगण मिठीत एकदा येऊन बघ

ती नुसतीच हसली, हसत हसत निघून गेली

जाता जाता म्हंटली

राजा इतकीच वाटते खंत

तुझ्या प्रेमाहून खूप मोठीय रे ही जातीची भिंत!

तिच्या जातीपाई नकाराने रोजच जीव जळायचा

तरी तिच्या प्रेमाचा लालबूंद रंग

माझ्या मनात दररोज धूराळा खेळायचा.

जीवन सोनवणे

वेलेन्टाइन डे, समाज आणि आपण !

  

१४ फेब्रुवारी, वेलेन्टाइन डे म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ असे म्हटले जाते. मित्रहो! आज आपण प्रेमा विषयी जाणून घेणार आहोत. प्रेम म्हणजे काय असत ? याच उत्तर एक नाही अनेक आहेत, कारण प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. माझ्यासाठी प्रेम वेगळं असू शकत आणि तुमच्यासाठी प्रेम वेगळं असू शकत. माझ्यामते ज्या गोष्टी केल्याने मला आनंद, सकारात्मकता आणि शांतता मिळते, ते माझ्यासाठी प्रेम आहे. 

प्रेम म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या नजरेसमोर स्त्री-पुरुष येतात. कारण लहानपणा पासून आपल्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे की, स्त्री-पुरुषच प्रेम करतात. पण आपण एक विचार करत नाही की, गे, लेस्बिन, ट्रांजेंडर, इत्यादी लिंगीय  माणसं ही प्रेम करतात. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकारालं तेव्हा तुम्ही त्यांना माणूस म्हणून बघाल. अजून जवळचं  उदाहरण घ्यायचं झाल तर मला माझ्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी, निसर्गाशी, आणि आवडत्या गोष्टींशी असलेली ओढ हेही प्रेम आहे. जर तुम्हाला नव नवीन पदार्थ बनवायला आवडत असेल तर तेही तुमचं प्रेम आहे.  तुम्हाला गाणी गायला आवडतं तर तेही तुमचं तुमच्या गायनाप्रती प्रेम आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडत, तर तेही तुमचं नवनवीन ठिकाण पाहण्याप्रती प्रेम आहे. अशी अनेक उदाहरण देता येतील. 

सामाजिक क्षेत्रातील उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या भारतात अनेक महात्मे होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशासाठी त्याग केला व जीव गमावला. जसे शहीद भगतसिंग तरुण वयात फासावर हसत हसत फाशी स्वीकारली ती आपल्या देशासाठी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 35 वर्ष शिक्षणाला देऊन अनेक पदव्या मिळवल्या व आपल्या समाजातील निरक्षरता दूर करण्यासाठीचा संदेश दिला,  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं. महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली.  कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खरा शिवाजी पोहोचवण्याचा प्रयत्न केल., डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. इत्यादी व्यक्तींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले आणि हे कसं झालं?  कारण त्यांचं देशाप्रती आणि देशातील माणसांप्रती प्रेम होतं. 

सुरवातीला सांगितल्या प्रमाणे प्रेमाची वेगवेगळी व्याख्या असते. माझी आणि तुमची व्याख्या सारखीच असेल असं नाही. मंगेश पाडगांवकर म्हणतात ना “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं नी आमचं सेम नसत” प्रेम ही एक चांगली भावना आहे, तसचं प्रेम हि नैसर्गिक भावना आहे, जी आपल्याला जन्मतःच मिळते. आणि प्रसंगानुरुप वयानुसार वेगवेगळ्या नात्यात, गोष्टीत फुलते,बहरते! फक्त वेलेन्टाइन डे लाच प्रेम करावं अस नाही. आपण रोज प्रेम करावं आणि करत रहावं मग ती कोणतीही गोष्ट असो, व्यक्ति, काम, कुटुंबीय, निसर्ग, माणूस, समाज, इत्यादींशी प्रेम करत रहावं.

            जास्तीत जास्त लोकांना आकर्षण आणि प्रेम यातील फरक माहीत नसतो, फक्त फिल्मी दुनियेतील प्रेम म्हणजे प्रेम अस अनेकांना वाटत असतं. प्रियकराने प्रेयसीला जिंकणं आणि लग्न होणं म्हणजेच प्रेम असा ग्रह आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने, त्यातील गाण्याने करुन दिलेला असतो. प्रेयसीला मिळवणं,मग ती हिंसेच्या मार्गाने मिळवलेली असो वा वासनेच्या. प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी प्रियकर नायकाने केलेले प्रकार पाहता, त्याला खरचं प्रेम म्हणावं का? असा प्रश्न पडतो. पण चित्रपटात त्याचीच भलामण असल्याने अनेकांना तेच खर वाटू लागतं.

प्रेम आणि आकर्षण दोन्ही महत्वाचं आहे. कारण प्रेम तेव्हाच होत जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होतो आणि आकर्षण तेव्हाच होत जेव्हा प्रेम होतं. फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रेम प्रेमाच्या मार्गाने मिळवावं, हिंसेच्या मार्गाने नाही. प्रेम हे जगायला शिकवतं, मारायला नाही. प्रेमामध्ये आदर असतो, असावा पण प्रेमामध्ये हक्क, अधिकाराची जबरदस्ती नसावी. “जिथे हिंसा आहे तिथे प्रेम नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे हिंसा नाही” 

– संगीता पांढरे

विभाग – मुंबई

आरोपी प्रेमाला वाचवा ..

साल-सालो गावकुसाबाहेर चुलीतल्या फुफुटयासारखं जगणं असो की, मलबारहिल मधल्या उंच इमारतीतील ऐशो-आरामचं जिणं प्रेमाचं मोल मात्र एकच असावं परंतु कष्ट हे वेगवेगळे असतात. लहानपणापासून मरेपर्यंत आई वडिलांचं आपल्या बाळांवर, प्रियसी-प्रियकराचं आपल्या जोडीदारावर, मित्राचं आपल्या मैत्रीवर, शेतकऱ्याचं आपल्या शेतीवर, कार्यकर्त्यांचं आपल्या आंदोलनावर आणी सर्वांचं कुठेना कुठे कुणावर तरी प्रेम असत!  मला असं वाटत की हे असायलाच हवं.

काही लोकांना अस वाटतं की जिवन हे अटी- नियमांवर चालतं मला असं वाटतं की हे मूल्यांवर चालतं! बऱ्याच मूल्यांचं मिश्रण होऊन प्रेम तयार होत! विश्वास, भावना, आपुलकी, सहवास आणि काळजी ज्या व्यक्ती बद्दल वाटते त्याच्या वर आपलं प्रेम असतं अस मला वाटतं ! पण प्रेम एवढ साधं सोपं असलं तरी त्याला भले भले घाबरत.

जगातल्या सर्वच धर्मग्रंथ, पोथी पुराणे, एकमेकांशी आपुलकी जपा, माणूस म्हणून जगा, अस म्हणतात मग दुसरीकडे तोच धर्म गावाच्या म्हाराच्या पोरानं सुभेदाराच्या पोरीशी प्रेम केलं ! कळतंच त्यांची कत्तल करतात. अस का? इथली माणुसकीचं काय? प्रेम दोषी नाही, प्रेम करणं दोष नाही. दोष त्या विचारधारेचा जो जात, पंथ, धर्म, वर्ग, लिंग बघून प्रेमाची सीमा तयार करतात. जाती-वर्ग धर्माच्या ठेकेदारांनी प्रेमाला चिखल तुडवावं तस तुडवलंय ! आणि जगाच्या कोर्टात आरोपी म्हणून कटघर्यात उभं केलयं. आपल्या सगळ्यांना मूल्यांच्या आधारावर त्याला निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी संघर्ष करायचा आहे. आणि लव्ह जिहाद च्या नावाखाली प्रेमाचे राजकारण करणाऱ्या मनू  विचाराच्या  हिटलर शाहीला खरी प्रेमाची व्याख्या समजवायची आहे.

प्रेम हे भावनेचे प्रतीक आहे, भावना नैसर्गिक आहे आणि माझ्या जीवनात निसर्गाला पाहिले स्थान आहे. निसर्गाच्या विरुद्ध असणारी समाजव्यवस्था प्रेमाला हीन वागणूक देत असतानाही आपण गार उभे आहोत. याच समाजव्यवस्थेने प्रेम इतकी लाजिरवाणी गोष्ट बनवुन ठेवलीय की मनमोकळे पणाने प्रेम व्यक्त करण  म्हणजे वाईट! प्रेम व्यक्त करतांना  एक भीती मनात निर्माण  करून ठेवलीय…! पण का?

सत्ताधारी सत्ता वाचवण्यासाठी प्रेमाचा वापर करताय आणि मुद्दे रंगवून नात्यामध्ये तेढ  निर्माण करताय.  प्रेमाला गुन्हेगार ठरवून खेळ खेळताय. आपले पणाचे भाव कायम ठेवून या प्रवाह विरुद्ध जाऊ.  प्रेम जगात जो पर्यंत आहे, तो पर्यंत मानवी आस्तित्व आणि मानवता असेल. नाही तर  प्रेम विसरून द्वेष करत मानव मानवाचा वैरी होणार  आणि स्वतःच अंत करून बसणार.

– प्रजा

अडीच अक्षरांच प्रेम….

            प्रेमाची परिभाषा आणि शब्दावली अनेक जण मांडतील, पण अडीच अक्षरांच्या या ‘प्रेमात’ अनेक रूप आणि नाती जोडली जातात हे अगदी खरंय बरं का..!!

कुणाला वाटेल प्रेम म्हणलं की दुरावा, विरह, आठवणी, त्रास, त्रागा, घालमेल! पण या सगळ्या गोष्टी जरी प्रेमात येत असल्या तरी या विरहात, दुराव्यात तितकीच प्रांजळपणे नात्याची गुंफण अधिक घट्ट होत जाते, हे ही तितकंच खरं!

 …प्रेम या अडीच अक्षरातच खूप मोठी जादू आहे .  नाही का …?

कोमेजलेल्याला फुलविण्याची..

उदास असणाऱ्याला हसविण्याची..

खचून गेलेल्याला उभारी देण्याची..

फुलून आलेल्याच फुलण अधिक खुलविण्याची जादू या प्रेमातच आहे…

कुणाच्यातरी प्रेमात गुंतण्याहून आपण कुणावर तरी प्रेम करतोय ही भावनाच खूप गोड आहे, असं धुंद सतावणार प्रेम फक्त धुक्याआडचं लहरत रहावं.. अगदी बेधुंदपणे असं मला वाटतं…!

..प्रेम हा एक उत्सव आहे, मिटल्या पाकळ्यांचा…!

संवेदनांनी उमलू पाहणाऱ्या ज्योतीचा..!

प्रकाशमान होत जाणाऱ्या आंतरिक अवकाशाचा…!

 हा केवळ एक दिवसाचा खेळ नाहीये, की वस्तूतून व्यक्त होणारा हृदयाचा मेळ ही नाही…प्रेम ही एक प्रतिज्ञा आहे,

शब्दाविना आतून उच्चारलेली,

एकमेकांच्या सोबतीन शिखरावर घेऊन जाणारी…

एक नव आत्मबळ देणारी..समजूतदार वाटेवर डोळ्यांनीच सावरणारी..तरीही नव्या आशेन चालत रहायला शिकवणारी एक सुंदरतेची आराधना म्हणजे प्रेम…! शब्दा आधीची शांतता अन शब्दानंतरची शांतता यातही अडखळलय एक नवखं प्रेम….! जस अंतराळात विरून जाणं, प्रेम समजून घेता घेता राख होऊन पुन्हा प्रेमात पडण..हीच तर प्रेमाची किमया…!

आणि अशीच शिशिराची एखादी झुळूक येते, त्यातली काही पिवळी पान म्हणजे ऋतूअखेर नसतो..ती एक नवी सुरुवात असते, ते ही शिशिरवारं निघून जात..कोवळ्या फांदीतून चैत्र पुन्हा बहरतो, झुळूक ही पुन्हा ओलावते, माती पुन्हा धुमारते….नव काही घडवण्यासाठी…! असचं असतं ना अडीच अक्षरांच प्रेम…  

 #अडीचअक्षरांचप्रेम❤

#Valentine_special❤

#Love_is_always_forever

– RJ Anu ( अनुजा )

विभाग – अहमदनगर

“तुझं आणि माझं नात”

प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय,पण एकच श्वास..!  असाच हा प्रेमाचा एक गोड प्रवास असतो. त्या प्रेमाच्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रेम म्हटलं की भांडण,शंका,राग या गोष्टी तर आल्याच,पण त्या गोष्टी म्हणजेच प्रेम. त्या व्यक्तीवर हक्क दाखवणे आणि मन मोकळे करून त्या व्यक्तीशी मनसोक्त बोलणे हे प्रेमामध्ये चालूच असते.

स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे हा प्रेमातला एक भाग.आणि दुसऱ्याच अस्तित्व हिरावून  न घेणे हा दुसरा भाग. बुद्धांनी म्हटले होते  फुल आपल्याला आवडले तर ते आपण तोडून घेतो.पण जेव्हा तुमच त्या फुलावर प्रेम असेल तर ते तोडत नाही. तर त्याची निगा राखतो. तर तसच प्रेमाच देखील आहे. प्रेमाचे नाणे हे वाजवावे  लागत नाही. ते प्रत्येकाच्या आयुष्यात वाजतच!! पण ते वाजलेले जगाला कळत नाही. पण ते ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतच.

प्रेमामध्ये आपले हृदय खूप जपून ठेवावे लागते. ते खूप नाजूक असते. खूप लहान लहान म्हणजेच बारीक सारीक गोष्टींचे त्यावर प्रभाव पडत असतात. एखादी व्यक्ती अतिशय प्रेम व्यक्त करते तेव्हा त्या व्यक्तीला काय प्रतिमा द्यावी त्यांचे आभार कसे मानायला हवे. हे मुळात समजत नाही. खरे प्रेम मिळवण्याची क्षमता प्रेम दिल्याने,प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही प्रेमामध्ये अडकून असे तर नाही म्हणता येणार पण केंद्रित व्हाल तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे माहित होत जाईल की प्रेम निव्वळ भावनाच नाही. तर तुमचे ते शाश्वत अस्तित्व आहे. मग कोणी कितीही प्रेम कोणत्याही रूपात व्यक्त केले तरी तुम्ही स्वतःला आपल्या स्वचेतनेत स्थिर असलेले बघाल.

            व्यक्ती प्रेमामध्ये का पडतो? त्या समोरच्याच्या गुणांमुळे? आत्मीयता किंवा जवळकीच्या भावनेमुळे? तर प्रेम हे होते, कारण त्या त्या व्यक्तीची सवय झालेली असते. त्या व्यक्तीला सतत आपल्या आजूबाजूला पाहण्याची आपल्याला सवय असते. हळूहळू त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये आकर्षण वाटू लागते. म्हणजे सोप्या भाषेत फीलिंग्स मनात येत असतात. म्हणजेच त्या व्यक्तीवर आपले प्रेम होत जाते. त्या प्रेमात आपण कशाचीही  जबाबदारी न घेता, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे गैरसमज न ठेवता,क्षणभरच त्या व्यक्तीवर नाराजी  ठेवतो. आणि त्यावेळी आपण अशा स्थितीला येतो,जिथे सगळे प्रश्न आणि मतभेद गळून पडतात. आणि त्यात फक्त प्रेम दिसते.

प्रेमाच्या नावाखाली आपण दुसऱ्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो. तो व्यक्ती परिपूर्ण आणि दोषरहित असावा, असे प्रत्येकालाच वाटते. हे वाटणे ही अगदी नैसर्गिक असते. प्रेमामध्ये त्या व्यक्तीचे दोष न बघता त्याच्या सोबत राहणे आणि त्यांना दोषमुक्त ठरवणे हे आपण पसंत करतो. कारण त्या व्यक्तीला आपल्याला गमवायचे नसते.आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षा देखील तशाच असतात. म्हणून प्रेम हे नेहमी योग्य त्या व्यक्तीवरच करावे. यालाच प्रेम म्हणतात.

– पूनम निर्भवणे

विभागठाणे

गोड गोड बोलुन भुलवनारा तो नाही ….

गोड गोड बोलुन 

भुलवनारा तो नाही 

आणि 

भुलनारी मीही नाही 

दोघेही जानतो 

वास्तव काय आहे… 

दोन शरीर ऐक प्राण

म्हणनारा तो नाही 

आणि मीही नाही

जानतो आम्ही 

दोघांचेही वेगवेगळे 

अस्तित्व आहे…

आवडत त्याला माझ लाजन

आणि मलाही त्याचा राकटपना

पण नाहीला नाहीच समजण्याची समज

त्याच्यातही 

आणि 

माझ्यातही आहे…

मालकी हक्क गाजवणार 

डोक्यावर पदर घे म्हणणार 

तो कोण होता 

हा कोण होता

तु त्याच्याशी 

ह्याच्याशी का बोलत होती 

लिपस्टिक फेंट कर 

अस काही बाही बोलत नाही  तो

कारण 

त्याच माझ्यावर प्रेम आहे …

मिही नाही विचारल त्याला कधी 

तुझा फोन व्यस्त का होता म्हणून 

आणि 

खुप दिवस झाले 

आठवण येत नाही का माझी म्हणून 

त्याच्या सोबत 

त्याच्या 

मैत्रीणीण वरही तितकच प्रेम करते

कारण तो माझा 

त्याच्या सकल गुण दोशा सह 

मीही त्याची सर्व गुण-दोष संपन्न 

मग उगाच 

आणाभाका आणि स्वप्नाच्या

आखलेल्या चौकटीची उपमा 

का द्यावी नात्याला

माझ्या अशा अनंत प्रेमावर

कविता लिहीण्याची 

गरज काय आहे ???

– दिशा पिंकी शेख

औरंगाबाद

“उधानलेलं प्रेम”

प्रेम या शब्दाचा उलगडा लहानपणापासूनचं होत गेला, घरच्यांपासून ते इतर नवनवीन माणसांकडून प्रेम हे भरभरून मिळत गेलं, अनेकांना प्रेम हे फक्त माणसांमध्ये दिसतं मला ते इतर अनेक घटकांमध्ये अधिक जाणवतं त्यामध्ये ही मला लहानपणापासून समुद्र खूप जवळचा वाटतो. कारण मुंबई मध्ये वाढल्यामुळे जास्त संबंध हा समुद्राशी आला.  शाळा ही समुद्राच्या जवळ, कॉलेज ही समुद्राजवळ आणि त्यानंतर पुढे काम ही समुद्राजवळ त्यामुळे आयुष्यच समुद्र झालंय जिथे उधाण येतं प्रेमाला, भरती येते सुखाला आणि लाटे सरशी विरघळून जातातं दुःख!  त्यामुळेच त्याच्याशी हळू हळू इतकं जवळचं आणि विश्वासाचं नातं तयार झालं की तो जिवलग झाला.  आयुष्यात काहीही नवीन गोष्ट घडली की ती पहिली त्याला सांगावीशी वाटते, आणि त्याला ही ती भावली की मग तो आनंदाची उधळण करत लाटांमार्फत उसळत राहतो. मग असं वाटतं की जणू काही मला मिठीत घेण्यासाठी तो आतुरलाचं आहे. हा समुद्र जितका माझ्या सुखाचा साथीदार आहे तितकाच दुःखाचा ही, मी कधी दुखावले, अस्वस्थ झाले की त्याच्याच जवळ तासंतास त्याला बघत राहावंसं वाटतं, आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं  ” माझं नशीब , लाटांसारखं… कधी अवखळ ….कधी संथ, किनाऱ्यावर उध्वस्त होणं, हाच ठरलेला अंत !

                     असं जरी होत असलं तरी हाच समुद्र भाग पाडतो लिहायला. घरात बसून चहा घेताना कधी सकाळी मन जात समुद्र किनारी, त्याचं ते सकाळच्या वेळी असलेल रम्य वातावरण मनाला खूप प्रसन्न करतं. अन संध्याकाळी तर तो इतका आकर्षक वाटतो की त्याच्याकडे  पाहिलं की दुःख, निराशा, विसरायला होते.  त्याचं ते शांत असणं आणि सर्वांना क्षणात एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणं मला खूप भावतं आणि म्हणूनच तो मला दिवसेंदिवस आणखी आवडत राहतो, आणि मी नव्याने त्याच्या प्रेमात पडत राहते.  मला त्याला जवळ घ्यावस वाटलं की मी मुक्त पणे त्यात भिजते आणि त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबातल्या त्याला इतकं घट्ट कवटाळते की मग तो मला रोमांचित करतो आणि तो माझ्या अधिक जवळ येत राहतो. त्याच्या प्रेमाने मी इतकी विरघळते की त्याच्या सारखाच जिवलग मला जोडीदार म्हणून मिळावा याची स्वप्न पाहते. मला सतत वाटत राहतं की माझ्या जोडीदाराचं आणि माझं प्रेम हे समुद्रासारखं निरपेक्ष असावं.  ज्यामध्ये आम्ही एकमेकांची स्वातंत्र्य जपू, एकमेकांना समजून घेऊ, मला हवं तेव्हा मी त्याच्यासमोर अशीच मुक्तपणे व्यक्त होतं राहीन, जशी समुद्राजवळ व्यक्त होत राहते.  माझं जेवढं प्रेम हे समुद्रावर आहे तेवढंच प्रेम हे चळवळीवर आहे.  त्यामुळे समतेच्या लढ्यात नेहमी माझा जोडीदार माझ्या सोबत खंबीरपणे उभा रहावा आणि मी त्याच्या प्रेमाच्या महासागरात अखंड बुडावं, त्याच्या सोबत समतेच्या नावेला किनारी लावावं, मग येईल उधाण बंधुत्वाला अन स्वातंत्र्याच्या लाटा धडकतील किनाऱ्याला मग येईल त्सुनामी मानवमुक्तीच्या विचारांची आणि वाट मोकळी होईल माणुसपणाची….

ऍड. अनुराधा शोभा भगवान नारकर

मुंबई