कितीदानव्याने तुला आठवावे…

 कसं आहे आपली परंपरा , नीती नियम , लग्नसंस्था हे सारं आपल्याला सतत बंदिस्त कडी कोंड्यात आयुष्य जगायला भाग पाडते. पण आज मला

बाईपणाची लाज थोडी बाजूला ठेऊन मला द्यायची आहे कबुली .  नाही विसरले त्याला आजही केलं ज्याच्यावर प्रेम अगदी मनापासून. जे आजही इतक्या वर्षानंतर मनाच्या तळात असं घट्ट रुतून राहिलंय माझ्या.

त्या क्षणांची आठवण झाली की मन नुसतं हलकं पिसासारखं होतं माझं. मन सैरभैर होऊन कोसो दूर धावायला लागत माझं.

त्याच्यासाठी…हो..त्याच्यासाठीच!

खूप प्रेम करायचे मी त्याच्यावर.

त्याचं वागणं…बोलणं…त्याची लकब…आणि त्याचं दिलखुलास हास्य.

अरे……मी अजूनही विसरले नाही हं तुला. इतकं मात्र खरं!

आता लग्न झालं.मुल झाले.

सगळं छान चाललंय रे माझं.

पण काय आहे ना …

नुसतं सगळं जवळ असूनही कधी कधी मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतलेली तुझी आठवण आली की अस्वस्थ होते… तूझ्या सोबतचे क्षण …घेतलेल्या आणाभाका …आपण एकत्र पाहिलेली स्वप्न हे सारंच आठवतं आणि मग माझी मी उरतच नाही . तूझ्या आठवणीत इतकी रमते की आजही कधी कधी सोबत आहेस असाच भास होतो. कधी कधी ठरवते तुला भेटूया पण इथल्या समाजाला ते मान्य नाही लग्न झालेल्या स्त्रीने परक्या पुरूषाचा साधा विचार जरी मनात आणला तरी तो व्यभिचार आहे असं इथे म्हटलं जात .

मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांनी मला उंबरा लांघायला मज्जाव केला. तेव्हापासून नजर कैदेसारखा श्राप घेऊन जगत असते इथल्या संस्कृतीच्या जोखडात बांधून ठेवलेली प्रत्येक भारतीय स्त्री. माणसाला अपूर्णतेचा शाप असतो हे तितकच खरं आहे . सगळं आपल्या मनासारखंच होईल याची स्वप्नं बघत बघत हे वय सरत चाललंय माझं. तरीही….

 वेड्या तुझ्या आठवणीची एक झुळूक..माझ्या मनाला स्पर्शून जाते ना…तेंव्हा नुसतंच रडणं होतं माझं आणि लिहिते कधी कधी तूझ्या आठवणीत काळजात होणारी घुसमट…

तू हवा होतास रे सोबत.

अगदी शेवटपर्यंत .

पण जाती-पाती आणि संस्कृतीच्या कुंपणावरून कोणी उडी मारून जायचा प्रयत्न केला.. तर खूप हाल होतात.

तुला समजत होतं सारं.

आणि मलाही समजत होतं.

तरीही आपल्या जातीच्या बंधनांनी आपल्याला जखडून ठेवलं. आणि मनातला तू मनाच्या तळाशीच घर करून राहिलास.

आजही मी एकटी असले की हृदयाच्या खोल गाभाऱ्यात  उघडून बघते मी… तुझी माझ्या नजरेत दडलेली सारी चित्र .

तुला आठवताना आणि मनातल्या मनात तुझ्याशी गप्पा मारताना कधी झोपून जाते कळतच नाही, तर कधी तू डोळ्या समोरचा हलतच नाहीस … जेव्हा असं होत तेव्हा मी प्रचंड खुष असते, कारण तू तुझ्यातही आणि माझ्यातही नकळत सोबत असतोस .

खरचं कधी कधी वाटतं आपल्या भारतातली एक जुनी पद्धत चालू करावी माणसांनी.पूर्वीच्या काळी होती ना ती स्वयंवराची पद्धत.

आपला जोडीदार आपण स्वतः निवडण्याचा नैतिक अधिकार इथल्या पुरुषसत्ताक संस्कृतीत रुजायला हवा. त्यासाठी इथल्या मानसिकतेत बदल व्हायला हवा.

आज हे सगळं आठवतंय कारण….

तुला आठवत आहे का तू मला पहिलं गुलाब कधी दिलं होतस की विसरलास … मला मात्र आजही लख्ख आठवतंय!

आणि  ते आठवून आतून ढवळून गेले मी.पुन्हा जुन्या जखमेची खपली काढली गेली.

कठोर आहेस तू. अगदीच.

सारखं माझ्या मनाला अशांत ठेवतोस. आजही या आभासी दुनियेत इनबॉक्स मध्ये सहानुभूती दाखवून; चान्स मारणाऱ्या लोकांचं क्षणिक प्रेम पाहून वाटतं…तुझ्यावर मी केलेलं राधेसारखं निरागस प्रेम…

इथल्या आभासी दुनियेत नक्कीच नाही. मला येऊ वाटतं रे तुझ्याकडं. पण पुरुषांनी केलेली शेकडो लफडी माफ असतात इथं.पण स्त्री ने लग्नानंतरही एखाद्यावर मानसिक प्रेम केलं तर इथं महाभारत घडतं. आणि एक सांगू का रे तुला…स्त्रीला मानसिक गुंतायला आवडतं.

शारीरिक प्रेम म्हणजे फक्त मासाच्या घर्षणाने मिळालेली क्षणिक तृप्ती असते. पण ती क्षणिक तृप्ती म्हणजे जगणं नव्हे.

एक मृगजळचं रे ते.

रामायण,महाभारत हे नवीन नाही आपल्याला.

सांग ना या युद्धांचा केंद्रबिंदू काय होता.?

बाई……

याच बाईतली आई, बायको, मुलगी… मात्र आजपर्यंत  कुणाला समजून घेताच आली नाही.

कळलंच नाही लोकांना बाईचं मन.

सगळं समजून घ्यायला आणि तसं वागायला आजची परिस्थिती पोषक नक्कीच नाही रे.

मानसिक तृप्तीची व्याख्या खूप वेगळी असते. भावना, संयम आणि एकमेकांचं मन जपत केलेली प्रत्येक कृती प्रेम असते.

हे कळायला इथं खूप वेळ लागेल रे. तोपर्यंत मला तुला माझ्या काळजात जपायचं आहे.

क्रश बनून तू आजही माझ्या मनात आहेस .

या देहाची जेंव्हा राख होईल ना….तेंव्हा तुझी आठवण अशीच राखेत मिसळून जाईल माझ्याबरोबर . अरे पुढचा जन्म ही असेलच संकल्पना तर

मला भेटायचं आहे तुला पुढल्या जन्मात. त्यावेळी मात्र जातीचं लेबल नको…

फक्त प्रेम अमर रहावं.

        शेवटी तुला एकच आठवण करून द्यायला आवडेल …

” आठवतंय का तुला आपल एकांतात भेटणं…

ओठ उमलत असताना पापण्याच मिटनं  … !”

      – माधुरी शिंदे सोनावणे (बदलापूर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *