“हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस …” – अण्णाभाऊ साठे

1 ऑगस्ट साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती दिनानिमित्त आपण या वेळेस ‘ऐसा भारत बनाऍंगे” अनियतकालिक चा 8 वा विशेषांक अण्णाभाऊंच्या गुलामांमध्ये निर्माता घडविणाऱ्या झुंजार, क्रांतिकारी लेखणीची प्रेरणा घेऊन आम्ही युवक आपल्या लिखाणातून समाजाचे वास्तव्य मांडून अण्णांना अभिवादन करून प्रकाशित करीत आहोत.

 अण्णाभाऊ साठे जयंती दिनानिमित्त लिहिण्यासाठी आम्हा युवकांना अण्णाभाऊंची लिखाणातून आणि सांस्कृतिक उपक्रमातून व्यवस्थेला घाव घालणारी चळवळ समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामी चळवळीतील ख्यातनाम लोकशाहीर साथी संभाजी भगत यांनी साथ दिली आणि आपल्या या युवकांच्या प्रक्रियेला समाजमना मध्ये कसे पुढे घेऊन जाता येईल याचे योग्य मार्गदर्शन केले.  त्याबद्दल आम्ही ‘ऐसा भारत बनाऍंगे’ च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. 

अण्णाभाऊंनी स्वतःची ओळख “मी असा-तसा कलावंत नाही. “फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला मी कलावंत आहे.” अशीच सांगितली. ते म्हणायचे “कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही. त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो.” हे त्यांच सांगण त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होत. जमीनिवरच्या लोकांची परिस्तीथी, त्यांच जगण, जाती-पातीरहीत समाजात माणूस म्हणून जगण्याच्या संघर्षाची वास्तविकता आपल्या विद्रोही लिखाणातून मांडणारे मराठी साहित्यातील ते एकमेव.  इथल्या नीच व्यवस्थेने ज्या समुदायाची पिढ्यान पिढ्या शोषण, पिळवणूक केली, ज्यांच्या निर्माणाच्या योगदानाला हजारो वर्षांपासून नाकारलं, बहिष्कृत केलं. अश्या प्रस्थापितांना “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून दलित, शोषीत व कष्टकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे” अस ठणकावून सांगुन शोषितांच समाज निर्माणातील योगदान जगासमोर मांडले. 

        ज्या शोषित समुदायाचे व्यवस्थेकडून, प्रस्थापितांकडून शोषण होत होते, ज्यांना हजारो वर्षांपासून गुलाम बनविले, अश्या शोषित समाजाला “हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहे” असे आपल्या लिखाणातून व्यवस्थेने गुलाम केलेल्या गुलामांना स्वतंत्रपणाची जाणीव करून देऊन नायक बनवले. मराठी साहित्यात प्रस्थापित लेखकांनी कधीच दलितांची व्यथा आपल्या लेखणीतून मांडली नाही; म्हणून अण्णाभाऊ आपल्या एका भाषणात लेखकांना सांगतात की, “हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे.. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही, तोपर्यंत तो दलितांचे साहित्य निर्माण करू शकत नाही.”

           अन्नाभाऊंच्या जयंती दिनानिमित्त लिहीत असतांना आम्ही सर्व युवकांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यांचा अभ्यास केला आणि त्यांचे विचार, त्यांची लिखाण शैली, त्यांच्या लिखाणाचे केंद्र बिंदु म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या शोषित, पीडित, दीन-दुबळ्या समाजाचे वास्तव्य आणि आपल्या लिखाणातून व्यवस्थेला घाव घालून समाजाला शोषण मुक्त करण्याचा त्यांचा संघर्ष यावरून अण्णांच्या लिखाणाच्या हेतु विषयी जाणीव झाली आणि लिहिण का महत्वाचे आहे हे समजून आले.  हे सर्व समजून घेतल्यानंतर युवकांनी आपल्या लिखाणातून सामाजिक मुद्द्यावर पुढील प्रकारे मांडणी केली: जसे की, आपण निर्माते होऊन शोषण मुक्त समाजाचे निर्माण करणार अशी अपेक्षा अण्णांची होती पण आपण हिंसक, द्वेषरहित समाज निर्माण केला अशी समाजाची वास्तविकता पत्राद्वारे मांडली, जेव्हा सरकार जबाबदारी विसरते आणि नागरिक त्यांना प्रश्न करतात तेव्हा आत्मनिर्भरतेच्या ढोंगाखाली नागरिकांना कसे मॅनिप्युलेट केले जाते यावर प्रकाश टाकला, क्रांतिकारी लिहिलेलं वाचून आपली जबाबदारी संपत नसते, तर ते लिहिलेलं समाजात रुजविण्यासाठी जमिनीवर येवून व्यवस्थेशी दोन हात करावे लागतात झालेल्या या जाणिवेबद्दल लिहीलं, लिखाण जगण्याला कस बळ देत हे स्पष्ट केले, शासन-प्रशासन यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उभा करून त्यांना जवाबदेही बनविण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी असे आवाहन केले, समाजात जाती-भेद नष्ट करून समता-समानता प्रस्थापित करून परिवर्तनाची लाट येईल हा विश्वास व्यक्त केला. अश्या महत्वपूर्ण विषयावर अभ्यासपूर्व, अनुभवातून युवकांनी निर्भीडपणे लिहिले. 

          “जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव” या अण्णाभाऊंच्या आवाहनाला ‘ऐसा भारत बनाऍंगे’ अनियतकालिक च्या माध्यमातून आम्ही युवक समाजातील जात, धर्म, वर्ण, वर्ग आधारित विषमता, हुकुमशाही, द्वेष याचा विरोध करून; स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही प्रस्थापित करून माणसाने माणसाला फक्त माणूस म्हणून बघावं हा दृष्टिकोण समाजमना मध्ये रुजवून अण्णांच्या स्वप्नाचा शोषण मुक्त समाज निर्माण करण्यासाठी  कटिबद्ध आहोत.  अण्णा हेच तुम्हाला आमचे अभिवादन !!  

संपादन- विशाल जाधव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *