
आजार-संडास घेऊन, नदी-नाले करी मुजरा,
श्रीमंतांच वेस्टेज, त्यात गरिबांचाही कचरा,
दोन घास मिळविण्या, कचऱ्यावर या नजरा,
बेशरम होऊन…घाण देशाची काढितो…
…हात आकाशी घालितो
नि डोंगर डोहिवर बांधितो…||
सागरास फाडून, मछला-बोट-नाव पळवून,
मासळी आणली, त्यानं जीवावर खेळून,
नांगरणी ही केली, त्यानं धरती ही भेदून,
मौल्यवान केली धरणी, सोनं यात पिकवून,
वादळ रोखून…वैरण देशाला पुरवितो…
हात आकाशी घालितो
नि डोंगर डोहिवर बांधितो…।।
स्वयंपाक बनवून, त्यांची भांडी ही घासली,
चाकर होऊन, त्यांची गाडी ही चालविली,
झोपडीत राहून, त्यांची इमारत बांधली,
त्यांना शॉवर सोडून…स्वतः घामानं नाहतो…
हात आकाशी घालितो
नि डोंगर डोहिवर बांधितो…।।
फुलं ही उगविली, हार ही बनविले,
पायऱ्या ही बांधल्या, मंदिर ही सजविले,
रूढी-परंपरा जपल्या, अन गोंधळ ही मांडिले,
दगडाची मूर्ती करून…देवाला घडवितो…
हात आकाशी घालितो
नि डोंगर डोहिवर बांधितो…||
क्रीडा क्षेत्रात मिळाले मानाचे स्थान ,
सीमेवर भिजले दुश्मन ज्यांच्या रक्तानं,
त्या शहिदांचा जन्म ही मध्यमवर्गीयांच्या पोटातून,
सरकार अन देश उभा ज्यांच्या पाठीवर,
तोच हीन म्हणोनि ठरतो श्रमिक-कामगार,
ज्वालामुखीत बसून…
आगीशी खेळीतो… हात आकाशी घालितो
नि डोंगर डोहिवर बांधितो…||
– अजय अनिता लक्ष्मण
विभाग – नवी मुंबई