साऊ…

पूर्वीपासून एक पद्धत आहे स्त्री ला किंवा मुलीला मासिक पाळी आली की तिने सर्वांपासून लांब एका जागेवर बसायचं. तिला शिवायच नाही, असे काही शब्द म्हणायचे. म्हणजेच तिला पाच दिवस स्पर्श करायचा नाही, तिची स्वतःची कामे तिनेच करायची, घरातल्या कोणत्याच गोष्टींना मुख्यतः देव घरात जायचे नाही.

 

या सगळ्या पूर्वीच्या रूढी परंपरा आहेत, आता ही खेड्यापाड्यांमध्ये या परंपरांना खतपाणी घातलं जातं. सध्याची पिढी सुशिक्षित, वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे या गोष्टींना मान्यता देत नाही. माझ्या आजी ला मी विचारले, हे सगळं असं का? वेगळं का राहायचं! का नाही? मासिक पाळी आल्यावर सगळीकडे वावरता येत. तर आजी म्हणते, माझ्या खूप पिढ्यांपासून ही पद्धत आहे. पण या गोष्टीचे मूळ काय आहे, याचा कोणी विचार करत नाही. म्हणजेच केवळ हीच गोष्ट नसून पूर्वीच्या  सगळ्याच रुढी परंपरांमध्ये काहीतरी सत्य किंवा काहीतरी समाज हित दडलेले आहे, असे मला वाटते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोणतीही शिकवण प्रसारित केली जाते . खूप पिढ्यांमधून येते मग काही वेळा त्यात काही आपल्या मनाचे किंवा  काही कमी जास्त गोष्टी त्यात वाढवल्या जातात. आणि काहीच नाही जमलं तर त्या देवाशी बांधल्या जातात. जसे मासिक पाळी आलेल्या स्त्री ने स्वयंपाक घरात जायचे नाही देवाच्या मूर्तींना स्पर्श करायचा नाही.

 

पूर्वी स्त्रियांना शेतीची कामे, घरातील कामे, बाराही महिने करावी लागत असे. आणि मासिक पाळीच्या काळात त्यांना क्षणभरही आराम करण्यास वेळ मिळत नसे. आणि गावची कामे ही प्रत्येकालाच माहिती असेल. शेतातील कामे भारा उचलणे, लाकडांची जड मोळी उचलणे, जाते ओढणे, एक कोस लांब विहिरीवरून हंड्यानी पाणी भरून आणने, वरवंटा पाट्याचा वापर करणे, शेणाने घर सारवने, गोठ्यातील गुराढोरांना वैरण पाणी देणे, अश्या नाना प्रकाराच्या कामांनी स्त्री अर्धी होऊन जायची. जड वस्तू उचलणे या कालावधीत तिला शक्य होत नसे. म्हणून तेव्हाच्या काळात कोणी तरी स्त्री चा विचार करून  ही प्रथा सुरू केली असावी. की जेणे करून या सगळ्या पासून स्त्री ला किमान पाच दिवस तरी निदान थोडासा शरीराला आराम मिळावा; आणि मासिकपाळीच्या दुखण्यास स्त्री चे शरीर ते सोसण्याइतके तरी सक्षम व्हावे. पण हळू हळू काळ निघून गेला. आणि देवाला शिवायचे नाही, अशी काही दरिद्री प्रथा सातत्याने सुरू ठेवली. म्हणजे यात सत्यता कुठेच आढळत नाही. केवळ स्त्रीला समाजात कोणतेच स्थान नाही अशी अमानुष वागणूक तिला सोसावी लागते. पूर्वी स्त्रीच्या चांगुलपणाचा विचार करून सांगितलेल्या गोष्टीस आता तिला एक दुय्यम दर्जा दिल्यासारखी वागणूक या प्रथेतून केली जाते. पूर्वीची स्त्री काय आणि सध्याची  स्त्री काय सगळं सारखच आहे. आजही स्त्री ला तिच्या ऑफिस मधून किंवा घरकामातून मासिक पाळीच्या कालावधीत सातत्याने काम करावे लागते.

 

आपण आजही पाहतो स्त्री ही कुठेही कमी नाही.  स्त्री किती सक्षम आहे याची उदाहरणे आपल्याला आजही पाहायला अनुभवायला मिळतात. ज्यांनी ज्यांनी स्त्री ला कमजोर समजले आहे, त्यांना खोटं ठरविण्याची तयारी स्त्री ची आज ही आहेच. कित्येक स्त्रियांना सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे उदाहरण वेळोवेळी आत्मविश्वास वाढवते, क्रांतीची ज्योत साऊ ही आजही आपल्या मनाला प्रकाशमान करते.  खरच ज्या घरात असे होत नाही किंवा मासिक पाळी आल्यावर मुलीची बायकोची बहिणीची काळजी घेतात. त्या घरातील स्त्री खरच खूप नशीबवान असेल किंवा मासिक पाळीच्या कालावधीत प्रत्येक स्त्रीची काळजी घेणे हे तिच्या सहवासातील पुरुषांचे कर्तव्य आहे. किंवा निदान तिच्यावर कामाच जास्त ओझं पडणार नाही याची तरी दक्षता घेणे, काळजी घेणे, महत्वाचे आहे. समाजात स्त्रीचे महत्व खरच खूप आहे. जास्त लांब न जाता घरात आपली आई किती राबते त्यावरूनच अंदाज लावा. पाच दिवस वेदना सहन करून सुद्धा समाजात वावरताना ती आपल्यासमोर हसरा चेहऱ्या मागे स्वतःच्या वेदना लपवत असते.

 

हा लेख आज मुद्दाम तुमच्यासमोर मांडतेय कारण आज क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांचा जयंतीदिन. त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले, की स्त्री ही केवळ ‘चूल आणि मूल’ या विधानांसाठी नाही, तिला सर्वत्र जग जिंकता देखील येतं आणि चार भिंतींना चांगलं कुटुंब देखील बनवता येतं. त्यामुळे खरोखरच मुख्यतः स्त्रियांना अनेक प्रकारच्या यातना सोसून ज्ञानाचे दूध सावित्रीबाईंनी पाजले आहे. अशा वीर पराक्रमी मातेस, माय ज्ञानज्योतिस विनम्र अभिवादन आणि लाल सलाम!

 

म्हणूनच यावर मला शाहीर शीतल साठ्ये यांच्या गाण्यातील काही ओळी येथे नमूद कराव्याश्या वाटतात.

 

 

साऊ…पेटती मशाल साऊ

आग ती जलाल साऊ…

शोषितांचे ढाल साऊ

मुक्तीचे पाऊल….

 

 

~ काजल बच्चे

    विभाग-मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *