शहर निर्माते…श्रमिक कामगार !

                 शहरांना स्वच्छ करणारे कोण ? शहरांची निगा राखणारे कोण? शहरांचे निर्माणकर्ते कोण?  “पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे” साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे वाक्य आजच्या परिस्थितीची वास्तविकता दर्शवते. आज जगभरात आपण पाहत असलेली शहरांची, गावांची, खेड्या-पाड्यांची सुंदरता ही आपल्यातल्या प्रत्येक कामगारांची कला आहे, त्यांचे कष्ट आहे.

         कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळण्यासाठी आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलने – चळवळी उभ्या  केल्या, हक्कांची लढाई लढण्यासाठी कामगारांनी पूर्ण योगदान दिले. कामगार हक्कांसाठी भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात चळवळी उभ्या राहिल्या. कामगारांचा इतिहास पाहिला असता आपल्याला फार मोठे बदल झाल्याचे दिसून येतील. भारतामध्ये पहिल्या महायुद्धानंतर कामगार चळवळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. श्रमिकांना १२ तासाहून अधिक काम करावे लागत होते आणि या अधिक तासाचा योग्य तो मोबदला देखील मिळत नव्हता. अश्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत कामगार चळवळीला एक दिशा मिळाली आणि १ मे हा महाराष्ट्र सहित इतर काही राष्ट्रांमध्ये जगातील स्तरावर “कामगार दिन” म्हणून साजरा केला जात आहे.

          कामगारां संबंधित कायदे तयार करणे, कामाचे तास बदलणे, कामगारांना त्यांचे हक्क-अधिकार मिळवून देणे, सुट्टी व  श्रमाचा योग्य मोबदला कामगारांना मिळावा यासाठी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया यांसारख्या काही नामिक देशांमध्ये झालेल्या चळवळीचे मोठे योगदान भारतीय कामगार चवळीत दिसून येते. 

           भारतातील कामगार चळवळी मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोलाचे स्थान मानले जाते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ साली ‘बॉम्बे मिल हेड्स’ असोसिएशन नावाची गिरणी कामगार संघटना स्थापन केली. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांनी सातही दिवस काम करणाऱ्या श्रमिकांना त्यांची हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आंबेडकरांना कामगारांप्रति निष्ठा होती. कामगारांना कायदेशीर अधिकार मिळावे याकरिता त्यांनी  प्रयत्न केले व ते प्रयत्न पूर्णत्वास आणले.  ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे कामगारांचे शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. सामाजिक अन्याय-अत्याचार आणि आर्थिक विषमते विरुद्ध कामगारांनी लढले पाहिजे असे आंबेडकरांचे म्हणणे होते. यासारखेच मडके बुवा, अहिल्याताई रांगणेकर, दत्ता इस्वलकर, सुंदर नवलकर यांसारख्या कामगार नेत्यांनी कामगार चळवळीचा पाया धरून ठेवला.

               कामगार हक्कांची लढाई सुरु झाली पण तीच लढाई आजतागायत सुरू आहे. सध्या घडीला देखील कामगारांची मोठी पिळवणूक होताना दिसत आहे. जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, प्रांत, भाषा यांमध्ये विभागणी होताना दिसत आहेत. आजही श्रमचोरी सारखे गुन्हे आपण पाहत आहोत.

             मुंबई सारख्या विकसित शहरातील कामगारांची वाईट स्थिती बघून खंत वाटते. मोठ्या-मोठ्या इमारती, ब्रिज बनवणारे असो अथवा शहराची स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असणारे सफाई कामगार असो, कामाचा योग्य मोबदला मिळणं  दूरच पण स्वतःचे घर देखील नाही. भारतात ९१ ते ९२ % कामगार हा असंघटित क्षेत्रात काम करणारा आहे. ज्यांना सामाजिक सुरक्षा, वेतन योग्य प्रमाणात मिळत नाही.

            “केंद्रसरकार द्वारे कामगारांकरिता नवीन कायदे अंमलात आले, पण त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध जवळ जवळ सर्वच कामगार संघटनांनी केला. सरकारी आकडेवारी नुसार ७१ ते ७२% छोटे कामगार या कायद्यापासून वंचित राहतील. ट्रेड युनियन ने उपस्थित केलेल्या प्रश्नात असे मांडले आहे कि, कामगारावर काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत नऊ कामगार संघटना आहेत. ज्यांना सरकारने चर्चेला देखील बोलावले नाही. नियम करताना सांगितले नाही, कायदे करताना सांगितले नाही, कामगारांचे मुद्दे/मत ग्राह्य धरले नाही. असे वागणे सरकारचे दिसत आहे.” ( झी २४ तास मधील एका मुलाखतीत कॉम्रेड भालचंद्र कांगो यांचे मत.)

           कामगार कायद्यामध्ये सुधारणा/बदल करावे असे मत कामगारांचे होते पण सरकार काही एक ऐकण्यास तयार नाही. 

           अशा या शहरांचे निर्माणकर्त्या कामगारांबद्दल आपले विचार, कामगारांचे प्रश्न, आणि त्यांचे शहराच्या विकासासाठी  योगदान आपण या अंकामध्ये  १ मे कामगार दिनानिमित्त प्रकाशित करीत आहोत.

           युवकांनी कामगार संबंधातील कायदे, कामगार आणि समाजव्यवस्था सांगण्याचा उत्तम प्रयत्न  केला आहे. एवढेच नव्हे तर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात जीव-घेण्या परिस्थितीत कित्येक सफाई कामगार कामाच्या निष्ठेप्रति आपल्या जिवाची तमा न बाळगता कार्यरत आहेत आणि त्यांची एक बाजू लेखात मांडण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कामगाराची सध्य- स्थिती विषयी सुद्धा लिहिले आहे.

              भारतीय संविधानात कामगारांना त्यांच्या हक्कांचे अधिकारांचे कायदे असून देखील ते खूप कमी कामगारां पर्यंत पोहोचत आहे. भारतीय कामगारांप्रती लिहिणाऱ्यांनी, वाचकांनी तसेच प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी जाणून घेणं गरजेचे आहे.

 युवकांनी आपले विचार अभ्यासपूर्वक लेखनात मांडले आहे. वरील सर्व अंक आपणास वाचनास उपलब्ध आहे. यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.

                                              संपादन: पूजा कांबळे, विशाल जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *