वेलेन्टाइन डे, समाज आणि आपण !

  

१४ फेब्रुवारी, वेलेन्टाइन डे म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ असे म्हटले जाते. मित्रहो! आज आपण प्रेमा विषयी जाणून घेणार आहोत. प्रेम म्हणजे काय असत ? याच उत्तर एक नाही अनेक आहेत, कारण प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. माझ्यासाठी प्रेम वेगळं असू शकत आणि तुमच्यासाठी प्रेम वेगळं असू शकत. माझ्यामते ज्या गोष्टी केल्याने मला आनंद, सकारात्मकता आणि शांतता मिळते, ते माझ्यासाठी प्रेम आहे. 

प्रेम म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या नजरेसमोर स्त्री-पुरुष येतात. कारण लहानपणा पासून आपल्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे की, स्त्री-पुरुषच प्रेम करतात. पण आपण एक विचार करत नाही की, गे, लेस्बिन, ट्रांजेंडर, इत्यादी लिंगीय  माणसं ही प्रेम करतात. ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकारालं तेव्हा तुम्ही त्यांना माणूस म्हणून बघाल. अजून जवळचं  उदाहरण घ्यायचं झाल तर मला माझ्या कुटुंबियांशी, मित्र-मैत्रिणींशी, निसर्गाशी, आणि आवडत्या गोष्टींशी असलेली ओढ हेही प्रेम आहे. जर तुम्हाला नव नवीन पदार्थ बनवायला आवडत असेल तर तेही तुमचं प्रेम आहे.  तुम्हाला गाणी गायला आवडतं तर तेही तुमचं तुमच्या गायनाप्रती प्रेम आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडत, तर तेही तुमचं नवनवीन ठिकाण पाहण्याप्रती प्रेम आहे. अशी अनेक उदाहरण देता येतील. 

सामाजिक क्षेत्रातील उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या भारतात अनेक महात्मे होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशासाठी त्याग केला व जीव गमावला. जसे शहीद भगतसिंग तरुण वयात फासावर हसत हसत फाशी स्वीकारली ती आपल्या देशासाठी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 35 वर्ष शिक्षणाला देऊन अनेक पदव्या मिळवल्या व आपल्या समाजातील निरक्षरता दूर करण्यासाठीचा संदेश दिला,  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं. महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली.  कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खरा शिवाजी पोहोचवण्याचा प्रयत्न केल., डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. इत्यादी व्यक्तींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले आणि हे कसं झालं?  कारण त्यांचं देशाप्रती आणि देशातील माणसांप्रती प्रेम होतं. 

सुरवातीला सांगितल्या प्रमाणे प्रेमाची वेगवेगळी व्याख्या असते. माझी आणि तुमची व्याख्या सारखीच असेल असं नाही. मंगेश पाडगांवकर म्हणतात ना “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं नी आमचं सेम नसत” प्रेम ही एक चांगली भावना आहे, तसचं प्रेम हि नैसर्गिक भावना आहे, जी आपल्याला जन्मतःच मिळते. आणि प्रसंगानुरुप वयानुसार वेगवेगळ्या नात्यात, गोष्टीत फुलते,बहरते! फक्त वेलेन्टाइन डे लाच प्रेम करावं अस नाही. आपण रोज प्रेम करावं आणि करत रहावं मग ती कोणतीही गोष्ट असो, व्यक्ति, काम, कुटुंबीय, निसर्ग, माणूस, समाज, इत्यादींशी प्रेम करत रहावं.

            जास्तीत जास्त लोकांना आकर्षण आणि प्रेम यातील फरक माहीत नसतो, फक्त फिल्मी दुनियेतील प्रेम म्हणजे प्रेम अस अनेकांना वाटत असतं. प्रियकराने प्रेयसीला जिंकणं आणि लग्न होणं म्हणजेच प्रेम असा ग्रह आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीने, त्यातील गाण्याने करुन दिलेला असतो. प्रेयसीला मिळवणं,मग ती हिंसेच्या मार्गाने मिळवलेली असो वा वासनेच्या. प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी प्रियकर नायकाने केलेले प्रकार पाहता, त्याला खरचं प्रेम म्हणावं का? असा प्रश्न पडतो. पण चित्रपटात त्याचीच भलामण असल्याने अनेकांना तेच खर वाटू लागतं.

प्रेम आणि आकर्षण दोन्ही महत्वाचं आहे. कारण प्रेम तेव्हाच होत जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होतो आणि आकर्षण तेव्हाच होत जेव्हा प्रेम होतं. फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रेम प्रेमाच्या मार्गाने मिळवावं, हिंसेच्या मार्गाने नाही. प्रेम हे जगायला शिकवतं, मारायला नाही. प्रेमामध्ये आदर असतो, असावा पण प्रेमामध्ये हक्क, अधिकाराची जबरदस्ती नसावी. “जिथे हिंसा आहे तिथे प्रेम नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे हिंसा नाही” 

– संगीता पांढरे

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *