लोकशाहीतील मतदानशाही…

आपल्या भारत देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी ठरली आहे, हे आपण सर्वजण बघत आहोत. आणि याची दखल अगदी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. या मध्ये खारीचा वाटा भारत निवडणूक आयोगाचा असून देशातील लोकांनी दिलेली साथ आणि विश्वासाच्या जोरावर ही मतदानशाही टिकून राहिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल करून देशाला बलाढ्य बनवण्याचा संकल्प सुरू झाला. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. म्हणून आपण हा दिवस देशभर ‘राष्ट्रीय मतदार’ दिवस म्हणून साजरा करतो. मतदानाचा हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मानले गेले आहे.

 

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे त्यामुळे राजाने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावत आलेला आहे. परंतु जसे जसे वर्ष सरत गेले, वेगवेगळे पक्ष आले, त्यांनी आपले उमदेवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. व त्यातील काही जिंकूनही आले. पण जिंकून आल्यानंतर जेव्हा विकासाच्या योजना वस्तीत गल्लोगल्लीतील प्रत्येकाला मूलभूत सुविधा जसे राहण्याचा, पाण्याचा, अन्न सुरक्षेचा, आरोग्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचे काम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे असते. परंतु असे होत नाही. कारण लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून वेगवेगळी कारणे दाखवून जनतेला मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जाते. मग असा प्रश्न पडतो की, लोकशाही नक्की कुठे आहे!

 

लोकशाहीचा आधारस्तंभ हा मतदार राजा आहे. पण हा राजा फक्त मतदानाच्या दिवशी लोकप्रतिनिधिना आठवतो. याच्यातही खूप तफावत आहे. देशात अनेक राज्य, शहरे, गाव आहेत, त्यातील काही वस्त्या अधिकृत तर काही अनधिकृत दाखवुन शासन आणि प्रशासन लोकांमध्ये भेदभाव निर्माण करू पाहते असे स्पष्ट दिसते. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर पी/ नॉर्थ वार्ड मालाड येथील मालवणी अंबोजवाडी ही वस्ती अगदी सन 1994 पासून या विभागात आहे. तरीही मूलभूत सुविधा पासून अजूनही वंचित आहे. कारण ह्या वस्तीची महानगरपालिकेच्या डेव्हलमेंट प्लान मध्ये अनधिकृत म्हणून नोंद आहे. हे फक्त अंबोजवाडी पुरते मर्यादित नाही! तर वेगवेगळ्या शहरातील, गावातील  काही भाग विकासाच्या बाबतीत मागे ठेवला गेला आहे. त्याचे कारण असे की, त्या भागातील लोकांचे मतदान, निवडणुकीच्या दिवशी अधिकृत होते आणि निवडणुकी नंतर अनधिकृत होते. मग प्रश्न पडतो की, लोकशाहीतील मतदानशाही जिवंत आहे का? की फक्त तानाशाहीतील लोकांसाठी बांधून दिलेले पैसे कमवायची शिडी. आता तर ईव्हीएम मशीन वर सुद्धा लोकांचा भरवसा राहिला नाही. कारण आताच झालेल्या बिहार निवडणुकीत चुरशीचा सामना बघायला मिळाला. यात एनडीए आणि महाआघाडी असे दोन बलाढ्य पक्ष दिसले. सुरुवातीला महाआघाडी पुढे होती नंतर जसजसे मत परिवर्तन होत गेले तसतसे महाआघाडी खाली येत गेली. आणि एनडीए पुढे गेले. असे चित्र बघून ईवीएम मशीन बरोबर काहीतरी छेडछाड केली असावी. असा संशय आल्या शिवाय राहत नाही. पण बिहार ला नवा नेता भेटला असे म्हणायला हरकत नाही. म्हणून लोकांच्या हितासाठी, विकासासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपर ची मागणी सुरू केली पाहिजे. आपण सर्वजण यावर नक्की विचार कराल आणि लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्वांना समान मत देण्याची संधी अबाधित ठेवाल आणि सुजाण नागरिक बनण्याचे कर्तव्य पार पाडाल.

 

आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानशाही टिकवून ठेवली पाहिजे आणि सर्वांगीण विकास कसा होईल या साठी एकत्र येऊन संविधानातील अधिकार मिळवले पाहिजे. जे लोकप्रतिनिधी, सरकार, महानगरपालिका फक्त मतदानाच्या दिवशी एखाद्या वस्तीला, शहराला, गावाला अधिकृत समजतात आणि मतदाना नंतर अनधिकृत घोषित करतात. अशा लोकांना मतदानाच्या एक्यामधून दाखवुन दिले पाहिजे.

 

लोकशाही… या वाक्यात लोकांचं हित लपलेलं आहे. आणि ते मतदानाच्या जोरावर उभ आहे. हल्ली विधानसभा असो वा लोकसभा या मध्ये जो पक्ष  मोठा असेल किंवा त्यांचे आमदार, खासदार यांची संख्या जास्त असेल तर धोरण, नीती बनवण्याचा अधिकार जणू राखून ठेवलेला असतो. मग यात विरोधी वाले कितीही ओरडले. धोरणातील चुका दाखवुन दिल्या, त्यांना बाहेर काढले जाते. अशा घटनेला आपण लोकशाही विरोधी का म्हणू नये. जर कोणतेही धोरण बनवले जाते यात जर काही चुका असतील आणि त्या लोकांच्या हिताच्या नसतील तर त्या दुरुस्त करायला हव्यात आणि एकमताने निर्णय घेऊन लोकांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतला पाहिजे.

 

मग माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना आवाहन करतो, लोकशाही बळकट करण्यासाठी उमेदवाराची निवड करताना त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचा इतिहास, आणि त्याची काम करण्याची इच्छा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण तरुण विचाराने पुरोगामी वारसा घेऊन संविधानाचा जागर करत स्पष्टपणे आपले मत मांडत राहू. आणि लोकशाहीतील मतदानशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन बदल घडवून आणला पाहिजे. कारण आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचे आहे.

 

~ बाळा कमल सुंदर आखाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *