लाल सूर्याचा वंश !

बुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी contractor च्या म्हणण्यानुसार तांबेने कामावर हजेरी लावली. आपण सरकारी नोकर नसलो तरीही प्रचंड इमारतींचं हे वैभवशाली शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या झोपडपट्टीतल्या घाणीत राहणाऱ्या कित्येकांनी तोलून धरलीय याची त्याला जाणीव होती. तो कामावर पोहोचला तेव्हा दोघातिघांनी त्याच्याशी संवाद टाळत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरवलं तर काहींनी कसल्याही प्रकारे त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. कारणच तसं होतं.

       तांबेची कोरोना test positive आल्यानंतर सगळ्यांनीच धसका घेतला होता. सोबतच्या दोघातिघांवर विनाकारण quarantine राहण्याची वेळ आली होती आणि साहजिक या प्रक्रियेतून जाताना त्या सगळ्यांना मनस्ताप भोगावा लागला होता. शेजारी पाजारी तर report यायच्या आधीच दाराला कड्या लाऊन घरात बसलेले. सगळी काळजी घेऊनही तांबेची test positive आली आणि कष्टाने कुटुंबाला सांभाळणारा तांबे इतरांना विनाकारण दुश्मन वगैरे वाटू लागला. या तांबे मुळे आता आपल्यालाही कुटुंबासोबत quarantine व्हावं लागणार म्हणून शेजारीपाजारी आणि मित्रमंडळीही त्याला मनोमन शिव्यांची लाखोली वाहत होते.

             सरकारी दवाखान्यात योग्य उपचार घेऊन तो बरा झाला तरीसुद्धा लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली. लोकांच्या बोचणाऱ्या नजरा कुटुंबीयांना भोगाव्या लागत होत्या तेव्हा तो मात्र दहा बाय बाराच्या झोपडीत स्वतःला कुटुंबियांपासून लांब कसं ठेवता येईल याची दक्षता घेत होता. घरात दम्याच्या आजाराने ग्रासलेली म्हातारी आई, मुलाचं मागच्याच वर्षी लग्नं झालेलं आणि इवलंसं गोंडस बाळ घरी येऊन अजुन दोन महिनेही उलटलेले नव्हते. या सगळ्यात आपल्यामुळे यांच्या जिवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून त्याचा प्रचंड जीव तुटत होता. गावच्या मोकळ्या हवेची त्याला प्रचंड ओढ लागलेली पण गावकऱ्यांनी सरकारच्या आदेशानूसार सगळ्याच वाटा बंद केलेल्या.

                 बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बायकोने सगळंच मळभ झटकून पुरणपोळीचा बेत करायला घेतला तेव्हा कुठे त्याला हलकं वाटू लागलं. त्याने रात्री ताटावर बसल्या बसल्या उद्या कामावर हजेरी लावायची असल्याचा मुद्दा छेडला तेव्हा मुलाने आग्रहाने इतक्यात कामावर रुजू न होण्याचा हट्ट धरला. मुलगा हल्लीच बरं कमवायला लागला होता पण या lockdown मध्ये आर्थिक नुकसानीचं कारण पुढे करत कंपनीने मुलाला घरी बसवलं होतं. आपण कामावर रुजू झालो नाही तर हातचं काम जाईल आणि उपासमारीची वेळ आपल्या कुटुंबावर ओढवेल याची त्याला प्रचंड धास्ती होती. त्यामुळे contractor ने कामावर उपस्थित राहण्यासाठी केलेला call त्याला टाळता येणं शक्य नव्हतं.

                रात्री त्याला नीट झोपच लागली नाही. पुढच्या संकटाच्या भीतीने कितीतरी विचार त्याच्या डोक्यात रात्रभर भिरभिरत राहिले. “सगळं जग घरात बसून असताना त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावून आपण का कचरा काढत रस्त्यावरून हिंडायचं?… आपल्यामुळे जर इतर कुणाला संसर्ग झाला तर?…. बापाचा तर चेहराही आठवत नाही… तो गेला तेव्हा आपण किती वर्षांचे होतो?… बाप गेल्यावर जिने रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलं ती आई आज आपली जबादारी आहे, आणि तिला तिच्या वार्धक्यात सुखरूप ठेऊ शकू एवढीही शाश्वती आपण स्वतःला देऊ शकत नाही…. या दोन महिन्यांच्या जीवाला तर अजून काही कळतही नाही… आपण हॉस्पिटलमधून घरी परतलो तेव्हा त्याला जवळ घेण्यासाठी किती जीव हळवा झाला आपला… या एवढ्याश्या जीवाला काही झालं तर आपण कोणत्या तोंडाने सूने समोर उभं राहायचं पुन्हा?..” अशा कितीतरी विचारांनी त्याच्या डोक्यात भडका उडाला होता.

                  शेवटी चारचा टोला पडला. त्याच्या बायकोला जाग आली तेव्हा तो छताकडे डोळे लाऊन नुसतच पडून होता. “आज पुन्हा झोप नाही लागली का?… पाणी ठेवते अंघोळीला. दात घ्या घासून…” ती सवयीप्रमाणे उठली आणि कामाला लागली सुद्धा. “हिला लग्नापासून सुखाचा एखादा दिवसही देता आला नाही आपल्याला. पण तिची कधी सा

धी तक्रारही नाही. संसार सांभाळण्यात आपण खूपच कमी पडलो खरे!.” तिच्याकडे केविलवाणं पाहत त्याने आवरायला घेतलं.

                दुपारी त्याने जेवणाचा डबा उघडला तेव्हा कालच्या शिळ्या पुरणपोळीचा सुगंध घमघमला. एरवी डब्यात हक्काने हात टाकणारे मित्र अंतरावर बसून आपापला डबा मुकाट्याने खात होते. नवाज नुकताच हातपाय धुवून आला होता. त्याने पुरणपोळी पाहताच डबा हातात घेतला. “भाभी नं मला पाठवली असणार साल्या… एकटाच भिडलाय..” त्याने डबा हातात घेत पुरणपोळीवर मस्त ताव मारायला सुरुवात केली तेव्हा बाकीचे त्याला कुत्सित नजरेने पाहत होते. “देखता क्या है.. हे घे माझा डबा खा… वैसे भी भींडी और मेथी खाऊन जेवण नको वाटायला लागलंय आता.” तांबेने भेंडीची भाजी आवडीने खाल्ली. परक्या गावात बालपणीचा मित्र भेटल्यावर होतो तेवढा आनंद त्याला झाला होता. शेवटी नवाजने दोन पोळ्या संपवल्या आणि दोन पोळ्या तांबेला म्हणून खायला ठेवल्या. पण तांबेचं पोट मात्र मित्र सापडल्याच्या समधानानेच गच्चं झालं होतं.

                 कामावरून घरी जायला निघाला तेव्हा समोरचं दृश्य पाहून तांबे अचानक थबकला. रस्त्याच्या कडेला एक दीड वर्षाच्या बाळाला बसवून त्याची आई कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काहीतरी शोधत होती. फेकून दिलेले जेवणाचे अर्धे भरलेले कंटेनर वेचून तिने बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्याच्या पोटात ढवळायला लागलं. “एsss… ये खाकर मरना हैं क्या?” त्याचा आवाज ऐकून समोरची वीस पंचवीस वर्षाची पोरगेली माय थांबून त्याच्याकडे केविलवाणी पाहू लागली. मग पुन्हा तिच्या कामात गुंतली तेव्हा मात्र त्याला आवरेच ना… “वो बच्चा तेरा हैं ना!… ये सब खायेगी तो बच्चा बिमार पड जायेगा….” तांबे पोटतिडकीने सांगत होता. “तो पड़ने दो ना… आपका कुछ जा रहा है क्या.. “ती हे बोलली तेव्हा तिच्या कपाळावरची ठसठस करणारी शिर तांबेच्या नजरेतून सुटली नाही. “किधर रेहती हैं?…” तिचं लक्षच नाही पाहून त्याने पिशवितला डबा बाहेर काढून समोर धरला.. “वो छोड… ये ले खा…” त्याच्या हातातला डबा पाहून ती थांबली. दबक्या पायांनी त्याच्याकडे सरकू लागली तेव्हा ते लेकरू निर्जन हायवे वर निर्धास्त होऊन हिंडत होतं. तिने धावत जाऊन आधी त्या पोराला उचलून जवळ घेतलं. मग उकिडवी बसत तांबे समोर पदर पुढं केला. तांबेंनं डब्यातल्या पोळ्या काढून तिच्या पदरात टाकल्या. पदराला हात पुसत तिनं त्या पोळ्या कोरड्याच घशाखाली ढकलायला सुरुवात केली. त्या काळया सावळ्या गोंडस बाळाला पाहून तांबेला अगदी गलबलून आलं. “रोज इथेच असतेस का?… मी डबा आनत जाईन उद्या पासून… हे कचऱ्यातलं उचलून खाऊ नकोस. पोराचा तरी विचार करायचा ना जरा.”  “उसके बारेमे सोच कर ही तो ये करना पडा… कुछ काम नही हात में… गटर साफ करते है… Contractor बोला काम नहीं तो पैसा नहीं… ब्रिज के नीचे रहते थे, उधर से निकाल दिया… ये सरकार गरीब का थोड़ी है… कितना दिन ऐसे रहेंगे… गाव वापस जाने का तो गाड़ी वाडी बंद है सब… डेढ़ सौ किलोमीटर भूखे पेट चलके गए तो contractor का फोन आया काम हैं करके… घर जाके भी क्या खाते थे!… डेढ़ सौ किलोमीटर चलकर वापस आए… आदमी को काम मिला आज, मै बैठी है… वो काम करेगा तब आज शाम को दो-तीन सौ मिलेगा… लेकिन खाने का किधर?… हाटेल भी तो बंद है सब…. ये गाड़ी वाले आते है झोपड़पट्टी में खाना बाटने को उनको बोली तो वो ना बोले… तीन दिन से पानी पीकर चल रहे है, बच्चे को क्या खिलाऊ?… दूध भी नहीं आ रहा…  इधर भूखा मरेगा… बीमार पड़ेगा तो हासपितल में तो भर्ती करेंगे… बच्चे को तो मिलेगा खाने को कम से कम…”

                तांबे घरी पोहोचला तरी त्याच्या डोळ्यांपुढून ते दृश्य हललं नव्हतं. त्याने हातातली पिशवी खाली ठेवली. अंगावरचे माखलेले कपडे त्याने दारातच काढायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या म्हातारीने बाळाला मांडीवर घेतलेलं… रडणाऱ्या बाळाला शांत करत ती अंगाई म्हणत होती…

तुह्यापुढं आभाळ हे 

ठेंगणं होईल

डोळ्यात लेकरा

तूह्या उजेड दिसू दे

रडू नको लेकरा

तूहा वंश लाल सूर्याचा

अंधार ह्यो युगाचा

तुह्या तेजानं दीपु दे 

– नागराज पद्मा कौतिकराव (कविरंग)

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *