ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है… 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र  झाला. भारतात आनंदाच्या प्रवाहात सगळे वाहत असताना दुसऱ्या बाजूला एक मत प्रवाह  तयार होत होता. तो मत प्रवाह  म्हणजे “ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है! अस मत व्यक्त करणारा. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई मधील चिराग नगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी,”ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है”! अशा घोषणा दिल्या. या घोषणा चिराग नगर पुरत्याच मर्यादित नसून, तर त्या भारतातील प्रत्येक वर्ग, प्रत्येक लिंग,प्रत्येक जात, प्रत्येक धर्म यांतील शोषित वर्गाला प्रश्नांकित करणाऱ्या होत्या.

अण्णाभाऊ साठे आपल्या घोषणेत भारतीय व्यवस्थेला प्रश्न करतात की, हे स्वातंत्र्य नेमक कोणासाठी आहे? केवळ उद्योगपतींसाठी,सावकारांसाठी,भांडवलदारांसाठी,जमीनदारांसाठी की देशातील पिढ्यान-पिढ्या असलेल्या शोषितांसाठी, जनतेसाठी, कामगार-कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यांसाठी? ह्या स्वातंत्र्यात कष्टकऱ्यांचा, श्रमीकांचा,शेतकऱ्यांचा किती हिस्सा किंवा वाटा असेल?  नुकतीच १ ऑगस्ट रोजी आपण अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती साजरी केली. स्वातंत्र्याला घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या मनात असलेले प्रश्न आज कित्येक जणांच्या मनात घोंगावत आहेत.

अण्णाभाऊ साठे यांनी तेव्हा या व्यवस्थेला प्रश्न केला म्हणून त्यांना कोणी देशद्रोही नाहीं म्हटले. परंतु आजकल आपल्या व्यवस्थेला असा प्रश्न केला तर देशभक्तिचे आणि देशद्रोहाचे प्रमाणपत्र वाटले जातात. आपल्या प्राणाची आहुती देणारे, कॉम्रेड भगत सिंग म्हणतात की,”केवळ स्वातंत्र्य हा आपला उद्देश नाही, स्वातंत्र्य इंग्रजांच्या हातून जाऊन देशातील मूठभर जमीनदार, भांडवलदार याकडे येईल याचा देशातील सामान्य जनतेच्या जीवनात काही बदल होईल? कामगार, मजुरांना त्यांचे हक्क मिळतील का? स्वातंत्र्य हा केवळ पहिला टप्पा आहे. आपले ध्येय आहे, एक असा देश निर्माण करायचा की जिथे प्रत्येक  लोकांना त्यांचे हक्क मिळावेत,जिथे धर्माच्या नावावर समाज दुभागला जाणार नाही, एक असा देश जिथे माणूस माणसावरील होणारा अन्याय सहन करू शकणार नाही.” भारत हा असा देश आहे जिथे कित्येक भाषा, धर्म, संस्कृती आहेत ज्याला एकत्र जोडून ठेवणे सोपे नाही, पण आज पासुन ह्या  गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर भारत उद्या एक स्वतंत्र देश असेल पण एक भ्रष्ट,शोषक आणि सांप्रदायिक  समाज बनुन राहील. भगत सिंग यांच्या मनात तेव्हा असलेली भीती आज खरी ठरत आहे का? आज आपण धर्माला दिलेले जास्तीचे स्थान त्यामुळे लोकशाही कुठेतरी धोक्यात येते का?

संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “संविधान कितीही चांगले असेल, परंतु ते राबविणारे लोक वाईट असतील तर ते संविधान देखील वाईटच ठरेल आणि संविधान कितीही वाईट असेल, ते राबविणारे लोक चांगले असतील तर ते संविधान चांगले ठरेल”. पण भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात स्वतःच्या देशाचे संविधान त्याच्या राजधानीमध्ये जाळलं गेलं. संविधान जाळणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या लोकशाही जाळणे होय. हे कसले देश प्रेम?

देश स्वतंत्र झाला. परंतु देशातील सामान्य जनता ही खरोखरच स्वातंत्र्यात आहे का? याचे उत्तर आपल्याला देशातील वाढती बेरोजगारी, बलात्कार, वर्गभेद, लिंगभेद, शेतकरी आत्महत्या, सामाजिक असमानता, अन्याय, सतत कोसळत असलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, सतत जाती -धर्मभेदा मुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक , समुदयांवर वाढते हल्ले आणि अत्याचाराचा उच्चांक पाहून समजून येतेच, की आपण किती स्वतंत्र आहोत. कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग हे ठप्प पडले असताना मोठ्या प्रमाणात नाना प्रकारचे नुकसान झाले.(आर्थिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय, कौटुंबिक, व्यक्तिगत, शैक्षणिक) यामध्ये सर्वच देश वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथेच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून येथील  राष्ट्राची संपत्ती, कारखाने उद्योग धंदे भांडवलदारांच्या ताब्यात देऊन देशाचे भविष्य असलेल्या तरुणांच्या हातात नोकऱ्या असण्या ऐवजी मंदिराच्या विटा देणे हे कितपत योग्य वाटते?

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच!“असे लोकमान्य टिळकांनी म्हंटले आहे. ते काही उगीचंच नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य म्हणजेच भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे, आणि मिळत नसल्यास त्यासाठी झुंजत राहणे हे त्याचे कर्तव्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम, संत एकनाथ, गौतम बुद्ध, ताराबाई शिंदे, महात्मा गांधी, भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत जनाबाई असे अनेक प्रकारचे महान पुरुष-स्त्रिया आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हक्कासाठी लढणे म्हणजे काय? समाजातील सर्व वर्गांची स्वातंत्र्य हक्क समान असण्यासाठी वैचारिक क्रांतीद्वारे आपल्याला एक पराक्रमी इतिहास समजावून गेले.

आपला इतिहास आपल्याला धर्मा-धर्मा मध्ये द्वेष न करता. समाजात समानता,बंधुत्व प्रस्थापित करणे शिकवतो. आपला इतिहास आपल्याला गुलामीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याची मशाल हाती घ्यायला शिकवतो. आपला इतिहास आपल्याला बेईमान न राहता स्वाभिमानाने मान वर करून समाजात जगायला शिकवतो. आपला इतिहास आपल्या आया बहिणींना प्रत्येक स्त्री वर्गाला सन्मानाने पाहायला, वागायला शिकवतो. आपला इतिहास आपल्याला समाजात क्रांती करायला शिकवतो. आपला इतिहास आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवतो. जर आपला इतिहास आपल्याला स्वतंत्र राहायला शिकवतोय तर मग कोणासाठी आपण गुलामगिरी भोगतोय, देश स्वतंत्र झाला म्हणजे नेमक काय झालं ? केवळ राजकीय पारतंत्र्य गेल याला तर आपण स्वातंत्र्य बोलु शकतो का? आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत का? भारताचे संविधान म्हणजे अन्यायावर उठवलेला आवाज आहे. भारताचे संविधान हे सूर्य जसा अंधारावर मात करतो तसेच संविधान भारतीय नागरिकांकडे आपल्या लढण्याचे शस्त्र आहे.

स्वातंत्र्यासाठी आपला  प्राण गेला तरी हरकत नाही, परंतु गुलामगिरीत जगण्याची शिकवण आपली नाही. तरीही बहू वर्षानंतर आज आपण खरे स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी पोखरतो. यासाठी प्रवाहाबरोबर वाहून न जाता, अभ्यासपूर्वक एकजूट होऊन संघर्ष करणे हा एकमेव मार्ग आहे. परकीयांच्या गुलामगिरीपासून सुटलो पण हजारो वर्ष चालत आलेल्या देशातील बड्या लोकांच्या  आर्थिक, सामाजिक, धार्मिक  गुलामगिरीतून आपण  सुटलो का ? म्हणूनच मला आठवण करून द्यायचीय …

 

जग बदल घालूनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव . .

 

काजल छाया रोहिदास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *