
“मुंबई शहर” प्रत्येक तरुणांच्या स्वप्नातील नगरी. देशाच्या अनेक राज्यातील ग्रामीण भागातील लोक, तरुण मंडळी ही रोजगाराच्या शोधात, शिक्षणाच्या शोधात व उत्तम जीवनशैली लाभेल या आशेनं आपली पावलं मुंबई शहराकडे वळवतात. मात्र इथे आल्यावर त्यांना स्वतःच हक्काचं घर मिळणं कठीण असते. त्यांना भाड्याने एखाद्या झोपडी मध्ये किंवा फुटपाथ वर, रेल्वे च्या ठिकाणी, व जंगल जमिनीवर आपलं वास्तव्य करावं लागतं. जवळपास ६०% लोकसंख्या हि मुंबई स्लम मध्ये राहतात.
समाजकार्य क्षेत्रात काम करत असताना मुंबई मध्ये पाणी अधिकारासाठी कार्यरत असणाऱ्या “पाणी हक्क समिती” सोबत मी जोडले गेले. पाणी हक्क समिती जी मुंबई मधील पाण्यापासून वंचित घटकांना त्यांच्या पाण्याचा अधिकार मिळावा या करीता अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. पाणी हक्क समिती मध्ये कार्यरत असतांना पाण्यासाठी सामान्य नागरिकांद्वारे करण्यात आलेला संघर्ष मी जवळून पाहू शकले.
“पाणी हे आपले जीवन आहे” हे सर्वांना माहित आहे. मात्र पाणी या घटकाला घेऊन अन्याय – अत्याचार हे अजून हि चालुच आहेत. अनेक झोपडपट्टी मध्ये पाणी हे “पाणी माफिया” कडून विकत घ्यावे लागते. जर लोकांच्या दरमहा ६ हजार पगारातून पाण्याच्या खर्चासाठी दरमहा जर १५००- ते २००० हजार खर्च येत असेल तर इतर जीवनावश्यक गरजा लोक कशा भागवेल . तसेच मिळणारे पाणी हे पिवळसर व उत्तम गुणवतेचं नसते. एका प्लास्टिक च्या पाईप ने घरात पाणी भरावं लागत असल्याने त्या पाईप द्वारे वस्तीतील सांडपाणी व अस्वच्छ रस्त्यातील किटाणूंचा प्रवेश हा पाण्याद्वारे शरीरात होतो. ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळ, ताप इतर आजारांना बळी जावं लागते. या आजारांवर उपचार घेण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती हि हालाकीची असते. यामुळे संपुर्ण वस्तीचे आरोग्य हे धोक्यात येते. सामान्य लोक याविषयी तक्रार ही बी.एम.सी मध्ये करू शकत नाही. कारण पाणी हे कायदेशीर पद्धतीने बी.एम.सी द्वारे प्रत्यक्षात मिळतं नाही, तर ते बीएमसी च्या सहाय्याने दलालांकडून बेकायदेशीर पद्धतीने जास्त पैसे देऊन मिळविले असते.
तसेच पाण्याची वेळही निश्चित नसते, पाणी कधी मध्यरात्री, तर कधी दुपारी असं ऐनवेळी येते. ज्याने लोक सतत पाण्याच्या विचाराने त्रस्त होतात. ज्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता ही वाढू शकते. सर्वांना समान पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वस्ती मध्ये खूप भांडणे होतात, लोक एक- मेकांना मारझोड करायलाही मागेपुढे पाहत नाही आणि या भांडणामुळे सामाजिक ऐक्य व बांधिलकी ही कमजोर होत जाते.
अनेक शाळकरी मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येतात. कारण स्वच्छ कपड्यांसाठी व शारीरिक स्वच्छतेसाठी पाण्याचा अभाव असतो. मुलींना मासिक पाळी च्या कालावधीत स्वतःची स्वच्छता ठेवायला पाण्याची कमतरता असते. घरात आई – वडील कामाला जात असल्याने लहान मुलांना आपला अभ्यास बाजूला ठेऊन पाणी भरावं लागते. ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या, खेळण्या- बागडण्याच्या वयात जबाबदारीच ओझं पडते व यामुळे शालेय गळतीची समस्या वाढून त्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाला आळा बसतो आणि त्यांचे बाल हक्क धोक्यात येतात.
थोडक्यातच जेवणासाठी, पिण्यासाठी व स्वछतेसाठी पाण्याचा खूप कमी प्रमाणात वापर केला जातो. काही वेळा लोकांना आपला रोजगार सोडावं लागतो. ज्या मध्ये जास्त महिलांना आपल्या रोजगाराच्या हक्काचा त्याग करावं लागतो. वस्तीतील तरुण मंडळी रोजगाराच्या निमित्त घराच्या बाहेर जात असल्याने पाणी भरण्याची जबाबदारी ही वयोवृद्ध लोकांवर येते. ज्यामुळे त्यांच आरोग्य बिघडण्याची समस्या ही वाढते. त्याचबरोबर स्वच्छ पाण्याची उपलब्धता नसल्याने, दुरून पाणी आणावं लागत असल्याने गरोदर माता व बाळ या दोघांच्या आरोग्यावर व विकास वाढीवर वाईट परिणाम होतो. झोपडपट्टीतील नागरिकांना मूलभूत हक्क व सुविधां पासून वर्षानुवर्षे वंचित राहावं लागते. राजकारणी नेते येतात, लोकांना भेटतात, जेव्हा त्यांना मतं हवी असतात. थोडक्यातच पाणी या घटकाचा वस्तीतील सामाजिक, आर्थिक, मानसिक आरोग्यविषयक समस्यांशी निकटचा संबंध येतो.
“पाणी हे जीवन आहे” अश्या घोषणा देऊन भाषणे देऊन काही होत नाही, पाणी हे जीवन आहे हे अनुभवण्यासाठी सामान्य नागरिकांना पाणी हक्क देणे, ते सहजरित्या पुरवणे हे जास्त गरजेचं आहे. जर ग्रामीण भागात याच लोकांना रोजगार व शिक्षणाच्या चांगल्या संधी व सेवा – सुविधा पुरवल्या तर का त्यांचा स्थलांतर ह्या शहरात होईल. याचाही विचार करणे आवश्यक आहे.
श्रीमंत व गरीब यातील दरी मिटवून सर्वाना समान पाणी हक्क मिळावं या साठी “पाणी हक्क समिती” सज्ज आहे, मात्र या साठी लोकांची साथ महत्वाची आहे. लोकांना एकत्र येऊन संघटित होऊन आपल्या पाणी हक्कासाठी संघर्षं करावा लागेल, आवाज उठवावा लागेल. या करीता पाणी हक्क समिती नेहमीच प्रयत्नशील आहे व राहील. तर मग चला तरुणांनो उठवूयात आवाज आपल्या मूलभूत हक्कांसाठी आणि पाहुयात पुन्हा एखादा स्वप्न आपल्या “स्वप्नातील मुंबई नगरीच” अन् घडवुयात विकास सर्वांचं.
#पाणी_हक्क_समिती_जिंदाबाद
#ऐसा_भारत_बनाऍंगे
#संविधान_जिंदाबाद
~ मयूरी लाड
विभाग – मुंबई