मी दिसेन तुला बंधुतेचे बीज पेरताना…

जातीची दाहकता लक्षात कधी आलीच नव्हती. पण धक्का तेव्हा बसला, जेव्हा तु ‘नाही’ म्हणालास ! इतकी वर्षे प्रेम करणारा माझ्यावर तु; जेव्हा घरच्यांपुढे हतबल झालास तेव्हा माझ्या लक्षात आले  कि, जात किती महत्वाची असते. तुझं माझ्यावर जरी प्रेम असलं, तरीही समाजव्यवस्थेला सांभाळण्याचा तुझा तु करत असलेला आटापिटा माझ्या नजरेआड झाला नाही. मला तुझं माझ्यावर असलेलं अथांग प्रेम माहित होतं. इतक्या वर्षात तु माझ्याकडून कुठली ही अपेक्षा न करता तुझं माझ्यासाठी माझ्यासोबत असणं, हेच माझ्या प्रेमाला पुरेसं होतं.

गेल्या दहा वर्षात तुझ्या आयुष्यात असणारी माझी जागा काय होती, हे सिद्ध करण्यासाठी मला कुठल्याही पुराव्याची गरज लागली नव्हती. इतकी आपली मने एकरूप झाली होती. तुझ्या बोलण्यातुन, माझ्यासाठी कासावीस होण्यातुन, मी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे; हे मलाही कळून चुकले होते. पण आपलं प्रेम समाजमान्य करणार नाही, त्यासाठी तुझी कावरी बावरी  आणि अपराधीपणाची नजर भविष्यात आपण एकत्र राहु शकणार नाही; याची जाणिव करून देत होती मला. आणि भविष्यातल्या मनासारख्या जोडीदाराला आपण गमावतोय म्हणून अस्वस्थ होणारा तु अन तुझा चेहरा आजही मला हुबेहूब आठवतोय. मी समजून घेत नाही किंवा माझी होणारी चिडचिड पाहुन तुझी होणारी हतबलता माझ्या नजरेतुन कधीच सुटली नाही.

मी तुझ्यावर नव्हते चिडत ‘ राजा ‘ तर मी चिडत होते, त्या समाजव्यवस्थेवर ज्याने आपणाला चुकीचे संस्कार दिले. मी चिडत होते त्या वैचारीक मानसिकतेवर ज्याने आपल्या प्रेमाला मर्यादा घातल्या. कारण दोष तुझा नव्हताच!  मला कळत होतं म्हणुन मी बदलाची भाषा करत होते. आपणाला चान्स आहे परिवर्तनाचा. उचलायचा का पाउल लग्नाचा? झुगारून सगळ्या समाजाला? म्हणून खुप वेळा झालेले आपल्यातील वैचारीक वाद आपल्या नात्याला खुप वेळा ब्रेक करत होते. आपल्या प्रेमाचा इतिहास घडवून दोघांनी क्रांती घडवण्याची भाषा फक्त माझी होती.  कारण मी परिवर्तनवाद ऐकला होता. माझा परिवर्तनावर विश्वास होता. मी परिवर्तनाचा स्वीकार केला होता.  यातून दोघांनी घेतलेल्या निर्णयाने आपण थांबलो खरं. वेगवेगळ्या वाटा शोधल्या. समाजाव्यवस्थेपोटी असणारं तुझ प्रेम जिंकल खरं, पण आपल्या प्रेमाची दाहकता अजिबात कमी नाही झाली. आपल्या ब्रेकअप मुळे मला खरी समाजव्यवस्था कळाली.  मी खऱ्या अर्थाने वैचारिक झाले. माझ्या विचारांना नवा जन्म मिळाला. समाजातील भयानक जातिव्यवस्था समोर आली.

आपल्या ब्रेकअप पेक्षाही समाजातले प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. इथे माणसाला माणूस म्हणुन स्वीकारलं जात नाही, तर गरिब-श्रीमंत, काळा-गोरा, आतला-बाहेरचा, लहान-मोठा अशी प्रत्येक दरी खोल आहे;  ही दिसुन आली. धर्म, जात, भाषा, प्रांत यावर आधारलेल्या मर्यादीत प्रेमाची भाषा माझी बदलत गेली. आपल्या ब्रेकअप मुळे मला ऐकता आली, कित्येक प्रेम युगुलांची गाथा!  मला समजता आली माणूस म्हणून एकत्र येण्यासाठी धडपडणाऱ्या प्रेम युगुलांची होणारी तडफड!  आपल्या ब्रेकअप मुळे मला अथांग प्रेमाची नसलेली मर्यादा लक्षात आली! मला कळालं लग्न हा प्रेमाचा अंतिम टप्पा नाहीच. तर लग्न हे समाजाने नियम करुन लादलेल प्रत्येक माणसांवरच बंधन आहे.  जात, धर्म, भाषा, प्रांत विसरून मनाने एकत्र येणाऱ्या दोन जिवांना लग्न हा संस्कार आडवू शकत नाही. लग्न नाही केलं, तर प्रेम थांबतं का? आणि जे थांबलंय ते प्रेम असू शकतं का? लग्नापेक्षाही श्रेष्ठ प्रेम आहे, हे आपण वेगळे झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं मला ! कारण प्रेम संपत नाही.  आपले प्रयत्न, संपला तो संवाद, पण संपत नाही प्रेम!

बर झालं कि तुच नाकारलं मला! नाहीतर मी ही त्या बंधनात अडकले असते बघ. तुझ्या नकाराने मी कित्तेक दिवसांनी माझ्यावर झालेल्या समाजव्यवस्थेने घातलेली सगळी बंधनांची काटेरी कुंपण तडातड तोडून टाकलीय बघ. आणि प्रेमाच्या वाटा तुडवत मी कित्तेक कोस दूर निघून आले. जिथे फक्त मला माझे हवे तसे बहरण्यासाठी. माणुसकीचे फुललेले माळरान दिसत होते. जिथे फक्त प्रेमाचीच भाषा समजते. जिथे माणुसकीचे रोपटे वाढते. कधीतरी तुला माझी आठवण  झालीच तर तु वेळ काढून नक्कीच येवुन बघ. मी असेन त्या माळरानावर  मानवतेची फुलबाग फुलवत. मी दिसेन तुला त्या फुलबागेत माणसांच्या हृदयात प्रितीची मशागत करताना. तुला मी दिसेन फुलपाखरू होवुन बागडताना मानुसकीच्या या माळरानातल्या फुलबागेत. रुजणाऱ्या माणसांच्याच्या हृदयात बोचणारे विषमतेचे काटे बाजुला सारत. समतेच्या पाण्याचा पाट मोकळा करत  फुलबागेत.  मी रंगीबेरंगी फुलांमध्ये बहरताना दिसेन. प्रेम शिकताना, जगाला प्रेम देताना. मी दिसेन पुन्हा एकदा नव्या प्रेमाला जन्म देताना.  त्या माळरानातील बहरलेल्या माणसांच्या थव्यात जात, धर्म, भाषा, प्रांत, काळा-गोरा, उच्च-नीच, गरिब-श्रीमंतांच्या भेदा पलीकडे जाऊन माणसा- माणसांच्या नात्यामध्ये बंधुतेचे बीज पेरताना….!

~ कवी- कविता अनुराधा अनंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *