
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा अण्णाभाऊ साठे यांचा ध्यास होता. कष्टकरी,दलित,शोषित,पीडित यांचे शोषण संपवण्यासाठी आयुष्यभर ते लढत राहिले.जसे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तसेच अण्णाभाऊ साठे यांचीही उपेक्षा झाली. अण्णाभाऊ साठे सामाजिक बांधिलकी मानणारे समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
शौर्यवान, प्रामाणिक, स्वामीनिष्ठ, धैर्यशील आणि कलंदर कसबी कलावंताच्या मांग जातीत 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, 19 कथा संग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. लहानपणी त्यांनी त्यांच्या वाटेगाव या गावात पाटील कुलकर्णींच्या बेमुर्वतखोर वागण्याचा त्यांच्या अत्याचाराचा आणि चांगुलपणाचाही अनुभव घेतला होता. ग्रामदेवतांच्या यात्रा खेत्रातील उत्सवी वातावरणात त्यांचे बालपण गेले. मुंबईला गेल्यानंतर तेथील झोपडपट्टीतील उघडेवाघडे जगणे त्यांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुकेकंगाल पणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी त्यांची होणारी तरफड अवैध मार्गाचा अवलंब या सार्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि त्त्याचे वास्तव त्यांनी साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते असे म्हणायला हरकत नाही.
त्यांनी त्त्यांच्या लोकनाट्यातून लोकांसमोर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. ‘धोंड्या’ नावाचे एक पात्र निर्माण करून अक्षरशः पुंजापतींच्या वृत्तीप्रवृत्तींवर दगड भिरकावले. प्रबोधन करून परिवर्तन घडविले. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कार केले. मार्क्सवादी विचारांची पेरणी केली. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर होते. मानवमुक्तीचे शिलेदार होते!
~ पूनम निर्भवणे
विभाग – ठाणे
👍🏼