मराठी शाळांची अवस्थेची व्यवस्था करूया!

सध्याचे स्पर्धेचे युग, मराठी शाळेत शिकून पुढे काही future नाही, इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही, अशी वेगवेगळी कारणं सांगून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये टाकतो याचा परिणाम म्हणून मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येऊ लागल्या आहेत. प्रथम भाषा म्हणून इंग्रजीची सक्ती करण्यापेक्षा आधी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी चांगली शिकू द्या. प्रथम मराठी छान आली की, कोणतीही भाषा शिकता येते. त्यासाठी इंग्रजीचा अट्टहास नको. प्रथम भाषा इंग्रजी करताना शिक्षकांना तसे योग्य प्रशिक्षण दिले आहेत का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. काठीण्य पातळीचा विचार करता इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून व्यवहार्य नाही.

बहुतांश शाळांमध्ये प्रथम भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली आहे. यातच राज्य सरकारने काही शाळांचे माध्यम इंग्रजी तसेच सेमी इंग्रजी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयांमुळे शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण हे केवळ मराठी आणि समाजशास्त्र या दोनच विषयांसाठी उरेल मग मराठी भाषा टिकणार किंवा वाढणार नाही. मराठी भाषेला म्हणजेच पर्यायाने मराठी जनतेला चांगले दिवस यायचे असतील, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यात वाढ झाली पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे आणि या ध्येयाने संपूर्ण मराठी जनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.

मराठी शाळा टिकवण्यसाठी व्यापक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाचे लोकांना आकर्षण वाटते. एका बाजूला प्रादेशिक भाषांच्या शाळा बंद पाडायचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शाळांची गुणवत्ता घसरेल, असा सर्वतोपरी प्रयत्न सरकारच करतय. तर दुसऱ्या बाजूला विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना खिरापतीसारखी मान्यता मिळते आहे त्यातून प्रादेशिक भाषेच्या शाळात गुणवत्ता नाही असा प्रचार केला जातोय म्हणून पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे आहे. प्रादेशिक भाषेच्या शाळा ओस पडत आहेत.सामान्यपणे मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालत असल्यामुळे त्यांना विविध सरकारी नियमांचं काटेकोर पालन करावं लागत. या उलट मोठमोठ्या इंग्रजी शाळा या वर्षाला  लाखांमध्ये मुलांकडून पैसे घेऊन शाळा चालवतात. शिक्षक भरती, शिक्षकांचे पगार ठरवणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती व पगार आदी सर्व विषय हे त्या त्या शाळांच्या हातात असतात.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेच यासाठी काही ठोस पाऊलं उचलली, तर दरवर्षी नवनवीन सुरू होणाऱ्या इंग्रजी शाळांची संख्या कमी होईल. एकूणच शिक्षक या पेशाकडे समाजाचे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. किंबहुना असंही म्हटलं जातं की ज्याला काहीच करता येत नाही तो शिक्षक होतो. या स्थितीत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. B.Ed. आणि D.Ed. करणाऱ्यांमध्ये सुद्धा इंग्रजीतून ते शिक्षण पूर्ण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे चित्र बदलून उत्तमोत्तम मराठी शिक्षक घडण्याची गरज आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी स्वत:पासून प्रयत्न करायला सुरुवात केली तर भविष्यात हे चित्र नक्की बदललेले दिसेल.

इंग्रजी ही भारतात परकीय भाषा आहे. मुलांना भाषा हा आकलनासाठी अडथळा ठरतो. पालकांच्या आग्रहाखातर इंग्रजी माध्यमामुळे मुलांचे नुकसान होते. यातून मार्ग म्हणजे, प्रादेशिक भाषा शिक्षणाचे माध्यम व दुसऱ्या बाजूला इंग्रजी शिकण्याची उत्तम सोय व उत्तम शिक्षक, भाषेची प्रयोगशाळा असे उपलब्ध झाले तर चमत्कार ठरेल. मलमपट्टीपेक्षा मुळात आजार दुरुस्त करू या!

तेजल मोहिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *