भय इथले संपत नाही….!

“सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्ता हमारा…” 

हे वाक्य कानावर पडत अन गर्वाने छाती फुगून येते. भारतमातेच्या पवित्र कुशीत जन्म घेतल्याचा आनंद चेहर्‍यावर ओसंडून वाहू लागतो. मला वाटत जगात आपलाच देश असेल ज्याला आईचा दर्जा मिळाला आहे. म्हणूनच आपला देश भारतमाता म्हणून ओळखला जातो. देशाच्या नावाप्रमाणेच या भारतभूमीत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाईंसारख्या अनेक लढवय्या स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने देशाच्या जडणघडणीत स्त्रिया सुद्धा मागे नाहीत हे सिद्ध केले होते. म्हणूनच या पवित्र भारतभुमीला कर्तबगार स्त्रियांचा समृध्द वारसा लाभला आहे.

या सगळया पाश्र्वभूमीवर अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढते अत्याचार आणि बलात्काराने देशात खळबळ माजवली आहे. आज एकविसाव्या शतकात ही स्त्रीला तिच्या स्वातंत्र्यासाठी, सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. देशात दररोज बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बलात्कार शब्दाचा अर्थही माहीत नसलेल्या लहान मुलींपासून नोकरी करणार्‍या स्त्रियांनाही भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे.

या सर्व प्रकाराला देशातील न्यायव्यवस्था जितकी कारणीभूत आहे, तितकीच देशातील मीडियासुद्धा कारणीभूत आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवणाऱ्या देशातील मिडियाने अलीकडच्या काही वर्षात असंवेदनशीलतेचा कळसच गाठला आहे. सतत सत्ताधारी पक्षाला पाठीशी घालणारी मीडिया अनेक बलात्कार प्रकरणात आरोपींनाच पाठीशी घालताना दिसते तेव्हा तुमच्या माझ्या सारख्या सामान्य नागरिकांचा संताप अनावर होतो. 

या सगळ्यावर कळस ठरलेली घटना म्हणजे उत्तरप्रदेश मधील हाथरस प्रकरण. एका 19 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केला जातो, तिच्या शरीराचे लचके तोडले जातात. प्रकरण समोर आल्यानंतर आरोपींना अटक करण्याऐवजी खुद्द पोलीसच हे प्रकरण दाबण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबियांना कळू न देता मध्यरात्रीच पीडितेच्या मृतदेहाला अग्नी देऊन टाकतात. मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना रामराज्य म्हणवणाऱ्या उत्तरप्रदेश मधील आहे. आजपर्यंत देशाने इतका  भयानक आणि अमानवी प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. याला आरोपींचे समर्थन करणारी, सत्य बाहेर न येण्यासाठी प्रयत्न करणारी मीडियासुद्धा तितकीच जबाबदार आहे. 

मुळात बलात्कार झाल्यानंतर त्याची जात धर्म पक्ष न पाहता आरोपी म्हणूनच कारवाई झाली पाहिजे. यासाठी देशातील मीडियाने संवेदनशीलता दाखवत आवाज उठवणे गरजेचे आहे. तरच देशातील महिला सुरक्षित वावरू शकतील. यासाठी स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत समजणार्‍या नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवणे गरजचे आहे, एकजूट होऊन याविरोधात लढा देणे गरजेचे आहे. तरच आपण अभिमानाने जिजाऊंचा, सावित्रीबाईंचा वारसा सांगू शकू. नाहीतर परस्त्रीला आई मानणार्‍या, गाईला माता समजणार्‍या या सुजलाम सुफलाम सुसंस्कृत गांधीच्या, आंबेडकरांच्या शिवरायांच्या भारतात जन्म न मिळण्याची प्रार्थना मुलींना कराव लागु नये अन   दररोज आपल्यावरही DP काळे करून निषेध व्यक्त करण्याची, मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येऊ नये बस इतकच…!

गंगाप्पा पुजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *