बोक्या…

या देशातच काय तर जगात शहरं वसली ती म्हणजे कामगारांच्या घामावर, त्यांच्या रक्तावर. त्यांच्या स्वप्नांच्या मढ्यावर वसलेली ही शहरं मात्र कामगारांच्या स्वप्नांची राख करून त्यांना साफ विसरली. कामगार वर्गाच्या कित्येक पिढ्यांचा इतिहास डोळेझाक करत दुर्लक्षित करणाऱ्या शहरांपैकी मुंबई हे आपल्या फार जवळचं, जवळचं म्हणण्यापेक्षा आपलं शहर.  कित्येकांनी आपल्या कपाळाला गावची माती लावत शहरं गाठली आणि उद्योगांनी समृद्ध असलेल्या या आपल्या मुंबई शहराला सोन्याची मुंबई बनवण्यात आपलं योगदान दिलं.

          गणपत जाधव हा सुद्धा असाच कोकणची आपली जन्मभूमी सोडून आपल्या कुटुंबासमवेत मुंबईच्या उदरात आपला उदरनिर्वाह करायला आलेला. कित्येक मेंढरांच्या ताफ्यात नवं मेंढरू शामील व्हावं तसाच हा सुद्धा खाली मान घालून मुकाट्यानं मेंढरांच्या ताफ्यामागे चालायला शिकला. मोठ्या कष्टानं डोक्यावरचं छप्पर उभं करून त्याने कुटुंबाला आसरा केला. साधीच बायको आणि पदरात इवलंसं कोकरू घेऊन त्याने मुंबईच्या काळजात, गिरणीत जागा मिळवली. पदारातलं लेकरू जसजसं वाढू लागलं तसतशी भविष्याची स्वप्नं मोठी होऊ लागली. गावात चाकरमानी म्हणून मान मिळू लागला. मुलाचं शिक्षण, संसाराच्या गरजा यात गुरफटलेल्या गणपतला स्वतःच्या आयुष्याचा जणूकाही विसरच पडला. त्याचं सगळं जग संसाराच्या गरजा, मुलाचं भविष्य आणि गिरणीचा भोंगा यांमध्ये गुरफटलेलं असतानाच त्याला आयुष्य हादरवून टाकणारी बातमी सामना मध्ये वाचायला मिळाली. इतर गिरणी कामगारांची झालेली तीच गत त्याच्या नशिबी आली होती. सामनामध्ये वाचायला मिळालेल्या गिरण्यांना टाळा लागण्याच्या बातम्यांवर हळहळ व्यक्त करणारा गणपत तो स्वतः काम करत असलेल्या गिरणीला टाळा लागणार या बातमीने मात्र पुरता खचला. त्याला त्याचा मनकाच मोडल्या सारखं झालं.

          दिवसामागून दिवस गेले. आंदोलनं करणाऱ्या कामगार संघटना हळूहळू कात टाकू लागल्या. पण याचा मात्र दृढ विश्वास होता तो म्हणजे त्याच्या सारख्या शेकडो-लाखो कामगारांनी हे शहर समृद्ध होण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. या नुसत्या आशेवर पोट भरण्यासाठी मिळेल ती कामं करत तो कितीतरी वर्षे जगत राहिला. पदरातल्या पाखराने शेवटी वयात आल्यावर पंख पसरवण्यासाठी नवीन आभाळ शोधलं. पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी त्याचे पंख झेपावले तेव्हा गणपतच्या घरात इवल्या डोळ्यांच्या, कानावर पांढरे चट्टे असलेल्या, रुबाबदार आणि गोंडस बोक्याने जागा अडवली आणि पोटच्या लेकरासारखं तो त्या उभयतांवर, त्या घरावर हक्क गाजवू लागला.

          कित्येक वर्षांची झुंज देऊन सर्वस्व हरवलेल्या गणपतचा आयुष्यातला शेवटचा आधार म्हणजे त्याची अर्धांगिनी गेली तेव्हा त्याला वार्धक्याने घेरलं होतं. सोबत उरला होता तो म्हणजे गेल्या चौदा वर्षांपासून सोबत राहिलेला बोक्या. बायकोच्या शेवटच्या वेळेत त्याच्यासोबत कर्तव्यदक्ष मुलासारखा हॉस्पिटलच्या वाऱ्या करणारा बोक्या त्याला मुलापेक्षा जवळचा वाटू लागला. कित्येक आश्वासनांना बळी पडलेल्या कामगार वर्गाकडे बघून गणपतला त्यांची आणि स्वतःची कीव येऊ लागलेली. ‘गिरणी कामगारांना मिळणार सरकारी घरं…?’ ही बातमी दर दोन चार महिन्यांनी वृत्तपत्रांमधून झळकू लागली यालाही आता किती वर्षे होऊन गेली ही आकडेमोड त्याची त्यालाही जमेना.

          सरकारी कचेरीत जमतील तेवढी कागदपत्र जमा करूनही हाती काही लागणार नाही हे लक्षात आलं तेव्हा त्याने जगण्याची आसच सोडली. पण मरणही नशिबात नव्हतं. तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन शेवटच्या क्षणांच्या प्रतीक्षेत रेल्वे ट्रॅकवर आडवा पडलेला असताना बोक्या त्याच्या पावलांशी येऊन रेंगाळू लागला. त्याच्या छातीवर, मांडीवर नाक घासत विव्हळू लागला. त्याने त्याची कीव करत घर गाठलं. त्याच्या पोटाची भूक भागवली. डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्याला पाहून त्याला त्याच्या आपल्यावरच्या विश्वासाचं जेवढं नवल वाटलं तेवढंच आपल्या परिस्थितीने हतबल असल्याचा राग येऊ लागला. पण मरण्याची हिंमत चेपली होती.

          गणपतला गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरांमध्ये घर मिळणार असल्याची बातमी मिळताच मुलगा बायको मुलांसहित परतला. पण बरीच वर्ष एकाकी जीवन जगलेला गणपत त्या सगळ्यांच्या खूपच पलीकडे निघून गेला होता. वार्धक्याने वेढलेल्या गणपतला हृदय विकाराचा झटका आला तेव्हा तो सरकारी कचेरीत शेवटचा रकाना भरण्यात व्यस्त होता. दुखऱ्या छातीवर हात ठेवून त्याने शेवटच्या रकान्यात अडीच अक्षरं लिहिली. वारसदार – #बोक्या…

– नागराज पद्मा कौतिकराव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *