
लहान असताना टिव्ही चालू केला आणि कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली , तर बहुतेक दर एका महिन्याने बातमी असायची ती ‘बलात्कारा’ची! मग त्या वयात प्रश्न पडायचा की, हे बलात्कार म्हणजे नक्की काय ? तो मुलींवरचं कसा काय होतो ? कोण करतं ? का करतं ? रुग्णालयात न्यावं लागतं, एवढं होतं तरी काय ?
लहानपणीच्या त्या गोड जगात सर्व गोडचं वाटतं, आपल्या आजूबाजूची माणसं आपले लाड करतात असचं वाटतं. परंतु वाढतं वय खूप काही शिकवत असते. आपल्या आजूबाजूची लोकं, त्यांच्या नजरा, पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांमधून कळू लागतं की बलात्कार घडतो कसा! जेव्हा माणसातील माणूस मरून त्याच्यातील कामवासना, आसुरी इच्छा किंवा मनातील द्वेष यांचे बांध फुटून त्याच्यातील राक्षस त्याचा ताबा घेतो आणि अशावेळी एका स्त्रीविरूद्ध क्रूर कृत्य केलं जातं ते म्हणजे ‘बलात्कार’! एकविसाव्या शतकात छळण्याच्या बाबतीतही जग पुढे चाललं आहे याचा जणू पुरावाचं!
बलात्कार झाला की प्रचंड शारिरीक यातना भोगणार्या त्या पीडित अबलेची कूस मानसिक यातना आणि सामाजातील मानहानी यांनी भरली जाते. बलात्कार फक्त शरीराचा कुठे होतो, तो होतो पीडित मुलीच्या संपूर्ण आयुष्याचा, तिच्या अब्रूचा, तिच्या आत्म्याचा! न्याय मागायला ती उभी राहिल ही, परंतु प्रश्न पडतो न्याय मिळेल का? न्याय मिळेपर्यंत समाजाचे टोमणे आणि वखवखलेल्या, तुच्छ नजरा तिचे लचके तोडायला असतातचं की! याचमुळे अनेक स्त्रिया कोर्टात धाव न घेता असे अत्याचार तोंड दाबून सहन करतात.
असं म्हणतात की ‘स्त्री ही कळी असते, तिला शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फुलवायचं असतं’ परंतु बलात्कारासारख्या अघोरी कृत्यामुळे ती कुसकरली, चिरडली जाते. शारीरिक बलात्कार तर आहेचं पण दररोज जो लैगिंक अत्याचार स्त्रियांना सहन करावा लागतो त्याचं काय? म्हणजे कळत-नकळत प्रत्येक स्त्रिचा बलात्कार होतचं असतो. कधी शारिरीक दृष्ट्या तर कधी नजरेने. मग ह्या बलात्काराला शिक्षा तरी कोणत्या न्यायालयात देणार ?
नुकताच महाराष्ट्र सरकारने ‘शक्ती’ विधेयकाला मंजूरी दिली आहे. या विधेयकानुसार बलात्कार करणार्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. सर्व आदिशक्तींना या ‘शक्ती’ कायद्यातंर्गत नवीन शक्ती मिळण्याची शक्यता आहे.
~ प्रणाली केशव नलावडे
विभाग-ठाणे