
गेली कित्येक वर्ष भारतामध्ये बलात्काराच्या केसेस या कमी होण्या ऐवजी अति प्रमाणात वाढताना दिसत आहे. तो बलात्कार पुरुषांच्या नजरेतून असो, किंवा स्त्रीला केलेल्या जबरदस्तीतुन. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या लैंगिक शोषणाला बळी पडत असतात. काही अल्पवयीन मुली तर कळत नकळत कोणत्याही मार्गाला जाण्यास भाग पडतात. म्हणजे कोणतेही कृत्य पुरुष लहान वयाच्या मुलींकडून करून घेत असतात. ती स्त्री अल्पवयीन असल्या कारणाने, तिला त्या पुरुषाची असणारी हवस माहीत नसल्याने तिला तो पुरुष नको ते अमीश दाखवून त्या स्त्रीला भाग पाडत असतो. अशा अनेक केसेस निदर्शनास आल्याचे पाहायला मिळते. हे सर्व कधी बंद होणार? कधी ती स्त्री समाजात बिनधास्तपणे वावरणार? समाजातील असे पुरुष कधी त्या स्त्रीकडे आई -बहीण म्हणून पाहणार?
बलात्कार जास्त गंभीर स्वरुपाचा व सामाजिक धोक्याचा असतो. कारण अशा गुन्हेगारांकडून असे गुन्हे त्याच व्यक्तीवर वा अन्य व्यक्तींवर वारंवार होऊ शकतात. तरुणी सारखे कुठलेही उत्तेजन देणारे तारुण्यसुलभ कारण, सेक्स अपील वा वर्तणूक नसतानाही कोवळय़ा बालिकांवर (प्रसंगी बालकांवरही) बलात्काराचे येणारे प्रसंग हे अति शारीरिक क्रौर्याचे द्योतक असते.
विवाहांतर्गत बलात्कार हे भारतीय समाजाला हादरवणारे, मान्य नसणारे व तरीही त्याच्या आवाजाने संवेदनशील मने जागी व्हावीत, असे वास्तव आहे. प्रेम, कर्तव्य, अधिकार या सर्व संकल्पनांना तपासणे अपरिहार्य व्हावे, असे हे आव्हान आहे. व्यक्तिच्या संमती शिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार. शारीरिक रचनेमुळे बलात्कारितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते. नऊ वर्षांच्या काळात स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये कितीशी घट झाली आहे? त्याचप्रमाणे आज चार जणांना फासावर चढवल्यामुळे उद्यापासून ताबडतोब सगळ्या महिलांना सुरक्षित वाटायला लागणार नाही. त्यांच्यावर कुटुंबाच्या आत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणारे शाब्दिक, लैंगिक, शारीरिक हल्ले थांबणार नाहीत, तर त्याकरिता बलात्कारामागची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, असे आम्ही मानतो. तसेच स्त्रियाविरूद्ध्च्या गुन्ह्याची प्रकरणे हाताळणाऱ्या सेलचे हेल्पलाइन क्रमांक, रूग्णालये, शाळा, महाविद्यालये यांच्या जागेत व इतर योग्य ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करावे. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्त्रिया व बालके यांच्याविरूद्ध् होणारे गुन्हे हाताळणारे स्वतंत्र डेस्क स्थापन करणे तसेच महिला पोलिस ठाण्यात आवश्यकतेनुसार विशेष महिला पोलिस सेल स्थापन करावे.
माझ्यामते तरी केवळ कायद्यात बदल करून चालणार नाही, तर योग्य एफ.आय.आर घेणे, न्यायवैद्यक पुरावा गोळा करणे, बलात्कार पीडितेचे मनोधैर्य वाढवणे, बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून तिला लवकरात लवकर न्याय मिळवून देणे ही खरी काळाची गरज आहे.
~ पूनम निर्भवणे
विभाग – ठाणे