बदलते स्त्री जीवन…

आज सकाळी भांडी घासता घासता लक्ष्मी बाई माझ्याशी बोलत होती. ती आज जरा जास्तच मोकळे पणाने बोलत होती. मनातील क्रोध भांड्यांवर काढत होती. भांडी अधिकच स्वच्छ निघत होती. लक्ष्मी बाई सांगत होती “बाई माझा नवरा काही मेला नाही! मीच घराबाहेर काढले त्याला, सरळ हाकलून लावले त्याला.रोज दारू पिऊन तमाशा करायचा, दारू प्यायचा आणि मारहाण करायचा, रोजचा तमाशा नुसता पैशापरी! पैसे जात होते. पोराचा अभ्यास पण होत नव्हता. माझी मोठी बारावीला आहे. आणि धाकटा दहावीला . मी कष्ट करते, पोर पण हातभार लावतात. सुखात आहोत आम्ही तिघ.”  लक्ष्मी बाईच ऐकुन मनात आले,  किती बदलले आहे  “स्त्रीजीवन” ……!  नवऱ्याला देव मानणाऱ्या, ‘पती मेरा देवता हे ‘  या समाजात म्हणनांऱ्या एका अशिक्षित स्त्रीने आपल्या व्यसनी नवऱ्याला खरा रस्ता दाखवला. आता या लक्ष्मी बाईला अशिक्षित का म्हणायचे?  तर ती शाळेत नाही गेली म्हणून! पण ती आज आपल्या मुलांना शिकवत आहे . तिला शिक्षणाचे महत्व कळले आहे.

आज एकविसाव्या शतकात  स्त्री जीवनात मोठ्या प्रमाणात बदल झाले , त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला शिक्षणाचा मार्ग, तिला कळलेले फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार, तसेच सावित्री बाई फुले, आगरकर , महर्षी कर्वे , आणि इतर अनेकांच्या प्रयत्नांतून तिला विद्यालयाची कवाडे उघडी झाली. पाटी पेन्सिल हातात घेतलेल्या स्त्रीने अगदी अल्प काळात विद्यापिठाच्या परीक्षाही पार केल्या. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कसोटीत ती पुढे आहे. मग राजकारण , समाजकारण ,  शिक्षण कोणतेही म्हणा. संसद , न्यायालय  पासून ते अगदी अंतराळातही तिने आपली छाप सोडली आहे.  असे कोणतेच  क्षेत्र  नाही जे आज तिने यशस्वी रित्या पार केले नाही. अगदी परदेशात जाऊन ती आज देशाचा अभिमान बनली आहे. पण हे झाले असामान्य स्त्री बाबत.

सर्व सामान्य स्त्रिबाबत काय आढळते….? ती  ही सुविद्य झाली, जागरूक झाली आहे. तिला आत्मभान आले आहे. तिच्या स्वतःच्या मताची जाणीव तिला झाली आहे. घरात फक्त चूल आणि मुल सांभाळणारी स्त्री आज स्वतःचे निर्णय तर घेतच आहे. तसेच घरातील अनेक चर्चा मध्ये ती ही सहभागी होत आहे आणि आपले मत मांडत आहे. आपल्या मुलांच्या आणि आपल्या संसाराबाबत ती स्वतः निर्णय घेत आहे.

नाही चालणार संसार …..

            एकट्याच्या मर्जीवर….!

 

असे म्हणत,  ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे, आणि दोघं मिळून कमवू आणि दोघं घर चालवू या वर भर देत आहे. म्हणून आजची स्त्री एक रिक्षा ड्रायव्हर देखील दिसून येते.

आजच्या स्त्रीने एक सत्य जाणले आहे. आता ती कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. ती स्वतःच्या पंखांनी उडान भरून, स्वतःच्या पायावर उभे राहून, ती जास्तीत जास्त  स्वावलंबी  होत आहे. नोकरी बरोबर उद्योग, व्यापार क्षेत्रातही ती आपले कर्तृत्व दाखवत आहे. अगदी घरात राहणारी स्त्री पण आपल्या फुरसतीच्या वेळात काहीना काही काम करून अर्थार्जन करते. एके काळी स्वयंपाकाची कामे करणे, मुले सांभाळणे ही कामे कमी प्रतीची मानली जात होती. पण बदलत्या काळानुसार आज पोळी भाजीचे केंद्र चालवणारी स्त्री स्वयंपाकीण समजली जात नाही, तर ती उद्योजक मानली जाते. आणि पाळणाघर चालवणे ही तर समाजसेवाच समजली जाते. आता “स्त्री अबला राहिली नाही, तर तिने आपली क्षमता जाणली आहे. ती आता सबला झाली आहे. ती सक्षम आहे.”

कामा प्रमाणे स्त्रीने आपल्या राहणीमानात, आणि पोशाखातही बदल केला आहे. आणि आता ते कोणालाच खटकत नाही. साडी पेक्षा, सलवार कुर्ता आणि जिन्स टॉप हे पोशाख तिला अधिक सुटसुटीत आणि सोयीचे वाटतात. आजची स्त्री आपल्या स्वास्थ्यासाठी जागरूक आहे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती रोज योगा, व्यायाम करते. आणि अनेकांना याची शिकवण ही देते आहे. आजच्या कुटुंबात  मुलगा मुलगी यांच्यात आणि त्याच्या संगोपनात कोणताही फरक केला जात नाही .

बेटी बेटा एक समान…

                       दोनों को मिले एक सम्मान..!

 

 शहरातील हा आधुनिक विचार हळूहळू खेड्यापाड्यात झिरपत आहे. आणि त्याला अनेक लोक प्रतिसाद देऊन मुलगा वंशाचा दिवा आहे;  तर मुलगी ही आज त्या दिव्याची वात समजली जाते.  अनेक लोक तर मुलीला दिवा नाही तर पणती म्हणतात. ते म्हणतात ना,  “मुलगी शिकली प्रगती झाली”  त्याप्रमाणे मुलीला शिकवीन एक घर नाही तर अनेक कुटुंब ती शिक्षित करत प्रगती करत आहे.

 

दरिया की कसम,

मौजो की कसम,

ये ताना बाना बदलेगा,

तू खुदको बदल!

तू खुदको बदल!

तब ही तो जमाना बदलेगा…

 

हे  समजुन स्त्रीने आज खरचं समाजात अनेक बदल घडवून आणले आहे.

 

आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे.  ती प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार करू लागली आहे. तिची आता अंधश्रद्धाच्या नावाखाली फसवण कठीण नाही तर अशक्य झाली आहे. ती आज काळानुसार बदलू पाहतेय. गेल्या काळातील स्त्री आणि आजच्या शतकातील स्त्री यात मोठे अंतर निर्माण झाले आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग जात आहे फक्त आणि फक्त विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे.

~ पूजा फंगाल

   विभाग-मुंबई

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *