प्रेम म्हणजे फक्त प्रेम असते..

१४ फेब्रुवारीला प्रेमाचा उत्सव साजरा करण्यात येतो. “व्हॅलेंटाईन डे” या दिवशी सर्व प्रेमी आपल्या प्रेमाची कबुली देत हा उत्सव साजरा करतात, हातामध्ये लाल गुलाब आणि हृदयात प्रेम डोळ्यात असंख्य अशा अपेक्षा आणि भावी आयुष्यातील सोबत उराशी बाळगून अनेकांना आपण या दिवशी पाहत असतो. अनेक प्रेमी या दिवशी एकमेकांना भेटतात आणि आयुष्यभर एकत्र येऊन सुखाने संसार करताना दिसतात. प्रेम म्हणजे फक्त प्रेम, म्हणजे बाकी काही नाही. प्रेमात तू आणि मी संपतं आणि सर्व आपलं होऊन जातं. संपूर्ण जगात एखादी व्यक्ती आपल्या मनात घर करून जाते आणि आयुष्य सुंदर होउन जातं.  

पण सगळे सुखी होतातच असे नाही. जेव्हा प्रेमात स्वार्थ, घमेंड, अविश्वास, व्यभिचार आणि समाज, जातीयवाद, राजकारण समाविष्ट होते तेव्हा प्रेमाचा रंग बदलू लागतो. पण बऱ्याचदा आपण प्रेमभंग झालेले जोडपे पाहतो. पार दु:खी आणि नैराश्यामध्ये डुबलेली, जगण्याची उमेद सोडून दिलेले दिसतात. असे घडते कारण याला बरीच वेगवेगळी कारण असतात. गैरसमज असणे किंवा एकमेकांवर शंका घेणे या गोष्टी सुद्धा सुंदर प्रेमाचे नाते संपण्यास कारणीभूत ठरतात.

कधीकधी व्यसनांमुळे बरेच संसार उध्वस्त होतात. पुरुषांची मानसिकता सतत बदलत असते याचा स्त्रीच्या मनावर अतिशय वाईट परिणाम होतो. स्त्री पुरुषा वर डिपेंड असली की पुरुषाला फार घमेंड येतो हे खूप वाईट आहे याने समानता संपते आणि पुन्हा मी आणि तू सुरू होते कारण घमेंड ही दारुप्रमाणे असते जी स्वतःला सोडून इतर सर्वांना कळते किती चढली आहे…म्हणून निर्व्यसनी असणे ही गोष्ट प्रेमाचं अस्तित्व कायम राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण कविता चुकली तर पान फाडता येते पण प्रेम तर चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात. प्रेमामध्ये जातीयवाद आला की सैराट सारख्या घटना घडतात राजकारण आले की लव्ह जिहाद सारख्या कायद्याच्या कसोटीवर प्रेमाला बळी पडावे लागते..

        प्रेमाच्या नात्यात self-respect फार महत्त्वाचा असतो, कारण एखादी स्त्रीला तिच्या नवऱ्याची साथ असेल तर झोपडीतही संसार करू शकते पण जर नवऱ्याची साथ प्रेम आणि आदर नसेल तर तुमचा महाल ही तिच्यासमोर फिका आहे.. बायकोच्या कष्टांची दखल घेणारा नवरा,आणि नवर्‍याच्या छोट्या-छोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे गणित छान जुळलं की भले भले संसार सुखी होतात,जर आपली इच्छा असेल की आपल्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करावं तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करावी कारण निसर्गाचा नियमच आहे की जे पेराल तेच उगवेल.

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही..

प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही..

कारण प्रेम करण्यापेक्षा प्रेम निभावणं जास्त महत्वाचं आहे…..

प्रेमाचा आणखी एक रंग आहे मैत्रीचा. दोघेही एकमेकांना पसंत करतात पण काही कारणांमुळे एकत्र येऊ शकत नाही. प्रेम म्हणजे लग्न करून एकमेकांचे न होताही एकमेकांच्या सुख-दुःखात आधार बनून शेवटपर्यंत साथ देणं म्हणजे खरं प्रेम.. जर मैत्रीचे नाते बनले नसते तर माणसाला कधी विश्वासच बसला नसता की अनोळखी लोकसुद्धा आपल्या माणसांपेक्षा चांगले असू शकतात.

नातं तुझं माझं नेहमी असंच असावं,

कधी मैत्री कधी प्रेमात दिसावं…

चुकलं कोणी, दोघांनी समजून घ्यावं असच प्रेम करत राहावं..

कधी बोलावं कधी न बोलताही मनातल ओळखाव..

थोडं-थोडं भांडावं, रुसावं.. कधीकधी खूप हसाव..

नातं तुझं माझं त्याची गोड आठवण! खोल-खोल मनामध्ये त्याची असेल साठवण!

मित्रांनो व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याआधी ,वील यू बी माय व्हेलेंटाईन म्हणण्याआधी स्वतः व्हॅलेंटाईन सारखे प्रेम करता का यावर विचार करा मग प्रपोज करा हॅपी व्हॅलेंटाइन डे!

निर्मल मानवतावादी भारतीय समाज

नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *