प्रेम तिथे माणुसकी..!

              प्रेम या शब्दातच जिव्हाळा, आपुलकी, शांतता, सन्मान,आणि आदर यांचा अर्थ दडलेला आहे. आज आपण अशा समाजात जगतोय जिथे प्रेम या भावनेला किंमत कमी आणि व्यवहार जास्त समजला जातो. प्रेम जे आपण आपल्या आई वडिलांवर करतो, संपूर्ण परिवारावर करतो,  समाजावर करतो, देशावर करतो, आपल्या मित्र परिवारावर करतो,  जे प्रेम आपण आपल्या प्रियसी व प्रियकरावर करतो.

                प्रेम या शब्दात फक्त शारीरिक संबंधाचा समावेश होत नाही तर भावनिक, सामाजिक बांधिलकी, माणुसकी,  आपुलकी देखील असते. थोडक्यातच प्रेमाच्या भावना म्हणजे निर्मळ नात्यांचं जाळ असतं. ज्यात तुझं आणि माझं कमी पण आपलं अशी भावना जास्त असते.

                भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माची,  वर्गाची, भाषेची लोक एकत्र नांदतात मात्र धर्मशाही, हूकूमशाही व पितृसत्ताक  वर्णव्यवस्था हे घटक माणसा-माणसांमध्ये द्वेष निर्माण करून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,  माणुसकी यापासून दूर करतात. ज्यामुळे समाजात विषमता निर्माण होऊन मानव अधिकारांचे हनन होते.

            समान जातीत व समान धर्मात विवाह केला नाही, म्हणून निर्घृण हत्या करणे आपल्या मानव जातीत शोभते का?  विशिष्ट धर्माच्या  व जातीच्या रूढी-परंपरांना नाव ठेवण्यात वेळ घालवला तर सामाजिक बांधिलकीचा अर्थ समजेल का?  जातीत प्रेम केलं तर ते ठीक आहे आणि आंतरजातीय प्रेम विवाह म्हणजे पाप व अपवित्र अशी मानसिकता कितपत योग्य आहे? प्रेमाला पवित्र व अपवित्र ठरवण्याचा अधिकार आपल्याला कसा आणि कोणी दिला?  मानवाला मानव म्हणून न बघता व्यवहार म्हणून बघितलं तर माणुसकी समजेल का?  स्त्री-पुरुष भेद केला तर समानता समजेल का ? आणि हे सगळं समजण्यासाठी माणसांनी माणसाशी माणसासंमं वागणे गरजेचं आहे, माणुसकी टिकवण आवश्यक आहे, विषमतेचे विष तळागाळात पसरवण्यापेक्षा समानतेचं अत्तर पसरवणे गरजेचं आहे.

 उगीच प्रेम या भावनेला बदनाम करण्यात वेळ वाया घालवू नये , यासाठी  प्रेम नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे.  त्याचप्रमाणे आपण हल्ली ऐकतोच की प्रेमात धोका मिळाल्याने कित्येक प्रेमयुगी हे मानसिक आजाराला बळी जाऊन आत्महत्या करतात व आपलं जीवन संपवतात. प्रेमात एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे असं नाही त्या प्रेमात त्याग, सहनशीलता, निःस्वार्थ प्रेम, माणुसकी असणं आवश्यक आहे. एकमेकांना मिळवण्यापेक्षा, एकमेकांना समजून घेतलं, जाणून घेतलं तर मना-मनातील वाट शोधण्यास वेळ लागणार नाही, जी आपल्याला माणुसकीच्या बिंदु पर्यंत पोहचवते, माणुसकी अनुभवण्यास संधी देते.

 ‘बोलतात ना प्रेमाने जग जिंकता येत’   खरं आहे समाजातील प्रत्येकाला प्रेम या शब्दाचा अर्थ समजला तर नक्कीच समाजातील धर्म, जात, लिंग, भाषा,वर्ण,वर्ग यातील विषमतेला समानतेचा प्रवाह मिळेल ज्याने माणूस माणुसकीला आदर देऊन सर्वत्र प्रेमाचा सुगंध निर्माण करेल,  सर्वांना समान अधिकार, संधी व सन्मान मिळेल. माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मिळेल, अपेक्षां पेक्षा समाधानाची पातळी उंचावेल, नकारत्मकतेला सकारत्मकतेची जोड मिळेल, खचलेल्याला आशेचा किरण मिळेल, आणि जगण्याला स्वातंत्र्याचा अनुभव मिळेल. दुष्काळात हिरवळीचा भास होईल,  रागाच्या भावनेत जिव्हाळ्याची जाणीव होईल, द्वेषाला आपुलकीची साथ मिळेल, अन्यायाला न्यायाचे मार्गदर्शन मिळेल, मनावरील अशुद्धेच आवरण जाऊन प्रेमाचं आवरण तयार होईल..

शेवटी काय माणसाला प्रेमाचा अर्थ समजेल व माणुसकीचं वरदान मिळेल. खूप महत्वाचं म्हणजे संविधानाला न्याय मिळेल, संवैधानिक मूल्यांना आदर मिळेल व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मिळेल.

#इश्क_मोहब्बत_जिंदाबाद

#माणुसकी_ जिंदाबाद

#समानता_ जिंदाबाद

#संविधान_ जिंदाबाद

मयुरी लाड

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *