प्रेम आणि मी….

रोजच्या दिनक्रमा प्रमाणे माझा आजचा दिवसही सरला, शिशिरातल्या संध्येच्या दाट छायेत गार वारा झोंबू लागला आणि रात्रीचा प्रहर सुरु झाला. आल्हाददायक, ऊबदार, आणि आपलासा वाटणारा प्रहर म्हणजे रात्र! मलातर रात्रीची वेळ ही कायम माझ्या हक्काची आणि आपुलकीची वाटते. आणि त्यातल्या त्यात माघातल्या महिन्यात सर्वांगाला बोचणाऱ्या थंडीत, बिछान्यातल्या उबदार दुलईतली रात्र कधीच संपू नये असं मला नेहमी वाटतं…

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्रीच्या निवांतक्षणी नेहमीप्रमाणे अनेक गोष्टींच विचारचक्र माझ्या मनात सुरु होतं. उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग,ऑफिसमधली काही उगाच  रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याचा मनाशीच केलेला अट्टाहास, काही क्रिएटीव्ह कल्पना आणि वगैरे..वगैरे…! ऋतूचक्राप्रमाणे रोजचं येणाऱ्या त्या रात्रीत नवीन असं काही घडत नव्हतं.. कानात हेडफोन्स घातले, सवयीप्रमाणे झोपताना मला आवडणारं रफीदा यांच गाणं लावलं.. ”मुझे छू रही है, तेरी गरम सांसे..मेरे रात और दिन ये महकने लगे है…तेरी नर्म सांसो ने ऐसे छुआ है, के मेरे तो पांव बहकने लगे है..” रात्रीच्या निरव शांततेत रेट्रो गाणी ऐकताना मला नेहमी स्वतःच्याच प्रेमात आपण पडलो की काय असं काल्पनिक फील येतं.. मग मनात पुन्हा एकदा नॉस्टेल्जिक कल्पनाविश्वाचं मोहमयी जाळं तयार होतं. मी वेगळ्याच प्रेममयी विश्वात रममाण होते…आणि गाढ झोपून जाते…

त्यारात्री भल्या पहाटे एका अवचित क्षणी मला जाग आली, अशी अवेळी जाग आली ना की झोपमोड होते.. झोप येईना म्हणून अंगावरची उबदार दुलई बाजूला करत मी बाल्कनीत आले, शिशिरातल्या त्या बोचऱ्या थंडीत एक एक नक्षत्राचा दिवा अजूनही आभाळात तेवत होता… चमचमणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश, आभाळातली ती निळाई आणि झोंबणारा तो गार वारा मी एकटीच अनुभवत होते.

अशी धुसरशी प्रणयी चांदणंपहाट मला मोहवून टाकत होती, त्या निरव शांततेत फक्त एकमेव रंग, जो सारा आसमंत व्यापून टाकत होता, कणाकणांनी बहरत होता, काही क्षण असेच गेले, बराच वेळ फक्त शांतता!निःशब्द! कितीतरी वेळ फक्त शांततेचाच नाद होता, निःशब्दांची जुगलबंदीच रंगली होती, कुठेही माणसांची चाहूल नाही, पायरव नाही.. जमली होती ती फक्त काजव्यांची मैफिल अन त्याच्या नादमय चालीन माझी पहाट गुलाबी झाली होती, पहाटेला ही इतका अनवट नाद असतो, हे मी अनुभवत होते. स्वतःच प्रेमात मी पडले होते त्या बहरणाऱ्या रात्रीसाठी..! उद्याचा दिवस सुरु होण्यापूर्वीच्या त्या एकाकी रात्रीत..! ना कुठे आवाज होता, ना माणसांच्या अस्तित्वाची चाहूल, ना कोणी सोबतीला..आणि तरीदेखील मी प्रेमात पडले होते, त्या रात्रीसाठी…! असं म्हणतात की पहाटेच्या साखरशांततेत आपण जो विचार मनापासून करतो तो खरा ठरत असतो. त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार आले. आयुष्याविषयी.. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी..आणि उद्या म्हणून येणाऱ्या असंख्य स्वप्नांविषयी..! मी या सगळ्या विचारांत रममाण झाले होते. ती मोहक शांतता मला हवीहवीशी वाटत होती. बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून कितीतरी वेळ मी निळसर अंधाराशी हितगुज करीत होते. जसे घड्याळातले काटे पुढं सरकत होते तशा आभाळातल्या निळाईच्या अनेक छटा आपलं सौंदर्य उघडपणे दाखवीत होत्या. आभाळातल्या एकच निळ्या रंगांची अनेक रूपं मी त्या रात्री पाहत होते.

रंगांच्या या सोहळ्यात शिशिराची थंडी सुद्धा सर्वांगाला बोचत होती. ती शांततेतली रात्र मला विस्कटायची नव्हती, आणि म्हणून मी अलगद पावलाने स्वयंपाकघरातल्या ओट्यापाशी आले. फारसा आवाज न करता मी कडक वाफाळती कॉफी बनवली, आणि पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसले. कॉफीचा एक एक घोट संपवत मी पुन्हा त्या शांततेतल्या रात्रीत मला रममाण करून घेतलं. आणि त्याच्या स्वाधीन झाले.

माणसं सहसा दिवसाढवळ्या दिसणाऱ्या  निसर्गाच्या प्रेमात पडतात. पण मी मात्र अंधारातल्या त्या देखण्या रात्रीच्या प्रेमात पडले होते. मी म्हणते का नाही पडावं अंधारातल्या रात्रीत..? फिल्म्समध्ये दाखवतात तसं’ ये प्यार क्या होता है?’ असं अगदी भाबडेपणाने नायकाला विचारणारी चित्रपटातील नायिका जेव्हा झाडांच्या मागे पळते, नाचते, बागडते, आणि गाणं सुरु होऊन प्यार क्या है? असं बालिशपणे विचारत आपल्या प्रेमाची कबुली प्रांजळपणे देते. तसं मी या अंधाराला तू देखणा आहेस; असं म्हणत माझं प्रेम दाखवीत होते. प्रेमाची भाषा प्रत्येकाची वेगळी आहे असं कोणी म्हणत असेल तर मी त्यांना म्हणेन प्रेमाच्या भावनेला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदराला तलम, रेशमी असंख्य सुक्ष्म पापुद्रे आहेत. मग त्या प्रत्येक पापुद्र्यात अगणित अलवार, नाजूक भावनांचे बंध आहेत.

माणसांची चाहूल नसलेल्या अस्पर्श कोऱ्याकरकरीत पहाटेशी मी प्रेमाचे अबोल क्षण मनमुरादपणे घालवीत होते. पण त्या कोऱ्या करकरीत पहाटेचं रूपं आता उजाडायला लागलं होतं. बहुदा त्याची निघण्याची वेळ झाली होती. पण पुन्हा रात्री मी भेटायला येईन असं आश्वासन देऊन तो हळूहळू गुडूप होत होता. दिवस उजाडला की आमच्या नात्यातला विरह आणि भेटीची ओढ रोजच्या सारखीच सुरु होणार होती. आता बाल्कनीतला चाफा सुद्धा गारठून आपला सुगंध पसरवित आळस झटकत उठण्याच्या तयारीत होता. काटेरी असल्याने गुलाबाला उठायला जरा उशीर होत असावा, पण तरीदेखील थंडीतही तो गोंडस दिसत होता, सदाफुलीच ही तसंच, मोगऱ्याचा मोहक सुवास मात्र प्रसन्नपणे दरवळत होता.

दिवस सुरु झाला. चहूकडे पाखरांचा किलबिलाट नाद करू लागला. माणसांचा गजबजाट ऐकू आला. गर्दीने पुन्हा एकदा आपापल्या रस्त्यांवर आपली जागा घेतली. इतका वेळ शांत राहिलेला प्रवाह आता पुन्हा धावायला लागला. मी ही पुन्हा झोकून दिलं प्रवाहाबरोबर मला! कारण मला अंतर्मनापासून भेटायचं होतं पुन्हा एकदा माझ्या रात्रप्रेमाला..!!

~ अनुजा मुळे, (RJ ANU, Radio Nagar 90.4FM, अहमदनगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *