
प्रेम एक मनाची अवस्था आहे, ती कोणत्याही प्रकारची कृती न्हवे! थोडक्यात काय तर प्रेम हे घडवून आणता येत नाही, मुळात ते घडतं. खरं तर कोणताही स्वार्थ मनात न ठेवता कोणावर तरी जीवापाड प्रेम करणं हा अनुभव प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय ते समजते. ही झाली माझ्या भाषेत प्रेमाची व्याख्या.
परंतु विसाव्या वयात नुकतेच पदार्पण केलेल्या आजकालच्या काही तरुणमंडळींची व्याख्या म्हणजे ” व्हॅलेंटाईन डे जवळ आला यार कोणीतरी BF/GF शोधायला हवा अशी असते. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही, की जेव्हा आकर्षण आणि व्यसन संपते तेव्हा पायाखाली पडलेला भावनांचा पाचोळा तुडवण्यात काहीच अर्थ उरत नाही. जर प्रेम शाश्वत स्वरूपाचे असेल पण त्यात फक्त आणि फक्त स्वार्थ सामावलेला असेल तर ते नैतिकतेचे प्रेम कधीच नसते. नैतिकतेने प्रेम करणे देखील इतके सोप्पे नसते. त्याचं मुख्य कारण म्हणजे समाज! तो किती प्रमाणात तुमचं प्रेम स्वीकारतो हा एक वेगळा भाग आहे. प्रेम करताना नक्कीच समाजाच भान राखलं गेलं पाहिजे. पण जिथे समाजाला गरज आहे खऱ्या अर्थाने आरसा दाखविण्याची तेव्हा तो दाखविला देखील गेला पाहिजे. कोणत्याही जातीचा चालेल पण मुसलमान आणि दलित नको बाबा! असे शब्द तुमच्या कानावर लग्नसमारंभ किंवा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून पडले असतील. अशी अनेक उदाहरण आहेत मंडळी… अशी मानसिकता जिथे असेल तिथे समाजाला वास्तवाची जाणीव करून देण्याची खरी वेळ असते. जातीला उच्च स्थान देऊन प्रेमाला कमी लेखणारा समाज आहे.
परंतु या समाजाच्या दृष्टीकोनाची अनेक रूपं सुद्धा आहेत. एकटी स्त्री पुन्हा संसार करण्याचा विचार मनात आणत असेल तर त्यात वावगं काय आहे. तिच्या चारित्र्यावर बोटे उचलणारे आपण कोण ? इतकंच नाही तर पन्नाशी नंतर जर कोणी वृद्ध महिला किंवा पुरुष लग्न करायचं ठरवतो, तेव्हा तो समाजबाह्य नियमाचे अवलोकन करतोय असे म्हंटले जाते. गोऱ्या मुलीने कृष्णवर्णीय मुलाशी लग्न केले तर तिने ते पैशासाठीच केले असे बिंबवले जाते. आम्हाला सगळं कळतं, आम्ही देखील नवयुगातील क्रांतीच्या सूर्याचे स्वागत अगदी मोठ्या मनाने करतोय, असा दिखावा करू पाहणारे हेच लोक खऱ्या अर्थाने नवयुगाचा पडदा स्वतःच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत गुंडाळून बसलेले असतात. आणि आपला खरा चेहरा त्याच्या आत दडवलेला असतो. जेव्हा केव्हा त्याच्या मनाची कवाडे उघडली जातात तेव्हा तेव्हा त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येतो. त्यांच्या तीक्ष्ण मनात जपलेल्या काही पोकळ समाज नियमाचा त्यांना अभिमान असावा बहुतेक! त्याला वाव कधीच देत बसू नका. कारण अशा समाजाचा आदर्श जर काही समाजथोरांनी ठेवला असता तर विष्णुशास्त्री पंडित ज्यांनी पहिला विधवा विवाह केला ते कधी घडलेच नसते.
अशा अनेक घटना समाजसुधारणेसाठी उदाहरण म्हणून आहेत. समाजातील पोकळ इज्जत राखण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलांची हत्या करण्यापेक्षा खरे समाज नियम काय हे लक्षात घ्या. कोणत्याही लोकांच्या घोळ्यात जाऊन आपण उभे राहिलो तर एक गोष्ट प्रखरतेने जाणवेल, आयुष्यात अशी अनेक मंडळी भेटतील जी पावलापावलाला दृष्टिकोनाचा तथाकथित च्वींगम चावताना दिसतील. त्यामुळे प्रेम करण थांबवू नका. समाज, ते चार लोक आणि नातेवाईक काय म्हणतील यावर तुमचं आयुष्य अवलंबून ठेवू नका मनसोक्त जगा. जे योग्य आहे ते सांगण्यात कोणताच संकोच करू नका. तुमच्या बोलण्यात तथ्य आणि तर्कशास्त्र असेल तर तुमचा विषय निर्भीड होऊन समाजासमोर मांडा. तेव्हाच हा प्रेमाच्या वर्तुळाला लागलेला दृष्टिकोनाचा परिघ तुटेल…
– मयुरी जाधव….
विभाग – ठाणे