प्रिय संविधान,

कशी आहेस तू?  माहित आहे मला तू रागावली  असणार, तुझ्या जन्माचं सार्थक होणं गरजेचं आहे, पण तें इथे भारतात कुठे शक्य होतंय.

मला आठवतंय तुझा जन्म २६ नोव्हेंबर १९४९ रोजी, २ वर्ष ११ महिने १८ दिवस नंतर झाला.  यासाठी भारतातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव , आणि इतर काही कळकळीचे नेते यांच्या अथक प्रयत्नातून तुझा जन्म आमच्या सर्वांच्या भल्या साठी झाला. तुझ्यामुळेच वंचितांना न्याय , हक्क , समता , बंधुता , एकता एक अमूल्य मंत्र मिळाला. ज्यामुळे एक मानवधर्म निर्माण होऊन जात, वर्ग ,वर्ण ,धर्म,भाषा या कोणत्याही आधारावर भेदभाव न होता समानता स्थापित होईल अशी आशेची किरण या अंधार असलेल्या देशात आली.

आज मला तुझ्या सोबत या पत्राद्वारे व्यक्त व्हायचंय.  “संविधान म्हणजे आमचा श्वास आणि प्राण तुच आमच्या जगण्याचं किरण”!  पण काय करणार ज्यांना तू समजलीस त्याने तुझा आदर केला, तुझ्यावर  प्रेम केलं ! पण ज्यांना तू कळलीच नाहीस ते  तुझ्या सारख्या अमृताचा अपमान करतात. संविधानाचा आपल्या स्वार्थासाठी वापर   करताना दिसत आहेत. खुप त्रास होत असेल ना  ग तुला ? कारण तुझ्या सारखं अमृत सगळ्यालाच  मिळत नाही.

समाजातील काही वंचित घटक जसे;  महिला , बालके , दलित वर्ग , असमाविष्ट वर्ग , अनुसूचित वर्ग यांना अलिप्त ठेवलं जातंय. असं म्हंटल्यावर तुला तर चीड येत असणार ना ! अश्या  धार्मिक , जातीय , राजकीय , हुकूमशाही  प्रवृत्तीचा जे तुझ्या सारख्या अमृता पासून वंचित घटकाला दूर ठेवत आहेत. खरंतर या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. तेही तुला चांगलं माहित असेल.

तुझ्या तर्फे मिळणारे स्वतंत्र, म्हणजे  मोकळा श्वास ! तू आम्हाला दिला आहेस . परंतु  धर्माच्या , जातीच्या , नावावर सतत अन्याय – अत्याचार नागरिकांवर होत आहेत. तूच सांगितलं आहेस ना ! सर्वाना व्यक्त होण्याची मुभा आहे, पण इथे जो नागरिक सत्याच्या मार्गाने व्यक्त होईल त्याचा आवाज दाबला जातो.  कधी कधी त्या व्यक्तीला नाही- नाहीस केलं जात. परंतु ह्या सगळ्या अंधकारात एक प्रकाशाची ज्योती हि मी तुझ्या कडे शोधत येत आहे, आणि तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हेच अमृत पिऊन आम्हा वंचित घटकाला संघर्ष करण्यास सामर्थ्य येईल. मग भलेही त्या अमृता पासून या धार्मिक व राजकीय शक्तीने दूर करण्याच्या प्रयत्नात जीव गेला तरी चालेल. बोलतात ना ! माणसं मेल्यावर देवाच्या घरी जातात  तसंच मी तुझ्या घरी येऊन स्वतंत्र अनुभवेन.

मी आता इतकं बोलून थांबते ! पण हो जाता जाता एक वचन देऊन जाते तुझा जन्म असाच व्यर्थ नाही जाऊ देणार आम्ही! कारण सत्याचा सूर्य अजून उजाडायचा  बाकी आहे.  संघर्षाची लढाई अजून आम्हाला जिंकायची आहे. तू ( संविधान ) सांगितल्या प्रमाणे “मानवधर्माची” स्थापना तुझ्या मदतीने करायची आहे. आणि आम्ही ती करणार… !!

 

कोटी कोटी प्रणाम !

जय संविधान !

संविधान झिंदाबाद !

तुझीच मयुरी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *