
आज तुझ्यासाठी व्यक्त व्हावस वाटतंय म्हणूंन मनात विचार आला कि तुला पत्रचं लिहावं त्यामुळे माझ्या मनात असलेल्या भावना तुला थेट व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
“हे संविधाना तू सत्तरीचा आणि मी तिशीची, तरी पण काय भारी जुळली आहे मैत्री आपली”. तुला खर खर सांगू तर हल्ली मला तू खूप आवडू लागला आहेस, इतका की तुझा सहवास मी अनुभवतेय, तू आणि तुझ्यातील मूल्ये मला खूप भावतात आणि ती आता माझ्या जगण्याचा भाग होत आहेत, त्यांच्यासोबत जगण्याचा म्हणजेच माझा माणूसपणाचा प्रवास सुरु झालाय आणि हाच प्रवास मला सर्वांना निरपेक्ष प्रेम देण्याची दिशा देतोय. तुला खर सांगू तर मी लहान म्हणजेच दुसरी इयत्तेत असल्यापासून तुझी प्रास्ताविका वाचतेय अगदी तोंडपाठ होती मला ती , शिक्षकांनी माझा आवाज चांगला म्हणून रोज सकाळी शाळेच्या प्रार्थनेत तुझी प्रास्ताविका वाचण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, मला त्यातल्या शब्दांचा अर्थ तर काहीच नाही कळायचा, पण तुझ्यातला प्रत्येक शब्दाचा बिनचूक उच्चार करायचे आणि एका लयीत तुला म्हणायचे, तेव्हापासूनचं मला तू जवळचा वाटला होतास फक्त मी आणि माझ्या शिक्षकांनी तुला कधी समजून नाही घेतलं. पुढे शाळेत इयत्ता सातवीत तुला अजून खोलात वाचता आलं पण तिथे सुद्धा मला परीक्षेत 25 मार्क मिळावे इतकंचं तुला वाचण्याचा प्रयत्न केला आणि इथे सुद्धा तुला समजून घेण्याची संधी मिळाली नाही. पुढे एल. एल. बी.च्या प्रथम वर्षाला देखील तुझी पुन्हा भेट झाली, पण तुझी भीती दाखवणारे तुला खूप कठीण म्हणणारे असे अनेक जण भेटले, आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल ची दहशत तयार झाली, इतकी की तुझं नाव काढलं की भीतीच वाटायची, सर्वजण म्हणायचे की तुझ्या विषयात सगळे नापास होतात इतका किचकट आणि न समजणारा आहेस तू त्यामुळे तुला तितक्या मनापासून वाचलेच नाही मी, तरीही मला तुझ्याच विषयात उत्तम गुण मिळाले. तेव्हा पासूनचं कुठेतरी तुझ्यात आणि माझ्यात काहीतरी असं जवळच नातं आहे जे नेहमी मला तू जवळ असल्याचा भास देत राहतं असंच वाटत राहिलं , पुढे संविधान प्रचारक लोकचळवळ मार्फत तुला भेटण्याची संधी पुन्हा मिळाली, असाही तू लहानपणापासून माझ्या जवळ होताच पण ही भेट मात्र अविस्मरणीय ठरली, इथे आपल्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला तो कधीही न संपण्यासाठीच…या प्रवासात काही महत्वपूर्ण गोष्टी समजल्या ज्या तुझ्या असण्याला अर्थ देतात. जसे की प्रत्येक देशाचं स्वतंत्र असं संविधान आहे, जे आपल्या भारत देशाला सुद्धा तुझ्या रूपात मिळालं. पण आपलं भारताचं संविधान हे जगातलं खूप मोठं संविधान आहे.
आपल्या भारतीय संविधानाची म्हणजेच तुझी विशेषता आहे कि तू प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो, तूझ्यावर कोणाएका व्यक्तीचं, धर्माचं वर्चस्व नाही. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समोर ठेऊन तुझी निर्मिती केली गेली आहे. प्रत्येक व्यक्तीने तुला अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अर्पण केलं आहे. आम्हा सर्वांचं नेतृत्व तुझ्या रूपात होतंय आणि त्यातून सर्वसमावेशक असल्याची भावना येते हे खरंच अभिमानस्पद आहे. तुझ्या प्रेमात पडण्याचं हेच तर खूप मोठं कारण आहे. हल्ली मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही, तुझ्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अधिकारामुळेच तुझ्यावरचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करू शकतेय याचा मला खूप आनंद होतो आहे.
तुझ्यामुळे माणूस म्ह्णून जगता येतंय, आणि तुझ्यामुळेच व्यक्ती म्ह्णून सर्वानाच हक्क आणि कर्तव्य जन्मापासूनच मिळाली आहेत. तू ३९५ कलमांनी नटलेला आहेस, तुला घडवण्यात ज्या ज्या संविधानकर्त्यांनी आणि संविधानाच्या शिल्पकारांनी मेहनत घेतली आहे त्यांना मनापासून सॅल्यूट, आजवर तुला समजून घेण्यात आम्ही व्यक्ती म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून खरंच कमी पडलो आहे. पण मी तुला आज मनापासून वचन देते कि तुला समजून घेण्यासाठी तुझ्यातील मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन. तुझ्यामुळे माणसामाणसांमधली विषमता पूर्णपणे संपली, तुझ्यामुळे सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, आणि त्यामुळेच तू माझ्या नसानसामध्ये भिनतोयस तुझ्यावर असलेल्या ह्याच प्रेमामुळे तुला प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे असं मी समझते. त्यामुळे या प्रवासात मी तुझ्या सोबत नेहमी असेंन आणि तू तर माझ्या अंतिम श्वासापर्यंत माझ्या सोबत आहेच. माणूस म्ह्णून घडण्यासाठी तुझं प्रत्येकाच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच हा देश तू दिलेल्या मूल्यांनुसार घडणार आहे अशी मला मनापासून खात्री आहे.
आयुष्याच्या या प्रवासात न्याय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी आपण एकमेकांसोबत असू हेच वचन तुला….
लव्ह यु,
तुझीच अनु
– एड्. अनुराधा नारकर