पाण्यापासून बहिष्कृत मुंबई शहराचे निर्माते….

            हजारो वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत; सिद्धार्थ गौतमाचा रोहिणी नदीचा संघर्ष असो वा महात्मा फुले यांचा शूद्रांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र विहीर खुली करण्याचा असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड चवदार तळे सत्याग्रह असो. समान पाणी वाटपाचा हा संघर्ष  हजारो वर्षांपासून चालूच आहे. हजारो वर्षांपासून जातीच्या, धर्माच्या, उच्च-नीच्चतेच्या  भेद-भेदाच्या, विषमतेच्या विचारधारेमुळे माणसानेच माणसाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. या विषयी आपण इतिहासामध्ये वाचत आलेलो आहोत. 

           पण मात्र आज आधुनिक युगात सुद्धा पाणी वाटपातील विषमतेच्या इतिहासातील पाऊलखुणा जागोजागी उमटताना दिसतात. ही पाणी वाटपाची विषमता कुठे गावा-कुसात, खेड्यात नसून अक्षरशा: भारताची आर्थिक राजधानी, डेव्हलप सिटी, स्वप्नाची नगरी ‘मुंबई’  मध्ये आहे. असं सांगितलं तरी कुणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण मात्र हे न पचनारं कटू सत्य आहे.

             आजही मुंबईत वीस लाख श्रमिकांना म्हणजेच; मुंबई शहराच्या निर्मात्यांनाच पाण्यापासून वंचित ठेवले गेले आहे. हे तेच श्रमिक आहेत जे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आपला प्राण पणाला लावून गटार नाले, संडास स्वच्छ ठेवायचे काम करतात. शहराच्या विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपलं मोठं योगदान देतात, जेव्हा जेव्हा देशावर संकट आले आहे तेव्हा तेव्हा कुठलीही तमा न बाळगता आपलं काम पूर्ण निष्ठेने करतात. हे आपण कोरोना च्या प्रादुर्भाव मध्ये ही पाहताच आहोत. असं असलं तरी आज ही विना अपमान दोन हंडी पाणी मिळण यांच्यासाठी तारेवरची कसरतचं! 

            पूर्वी स्पृश्य-अस्पृश्य या विषमतावादी विचारधारेने लोकांना पाणी नाकारले जात असे. आज मात्र या आधुनिक युगात आधुनिक पद्धतीने जाणीवपूर्वक मुंबई महानगर पालिका 20 लाख श्रमिकांना पाणी नाकारत आहे. जरी भारतीय संविधान, संयुक्त राष्ट्र संघ, आंतरराष्ट्रीय मानव आयोग, शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals-6) या नुसार प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याचा अधिकार आहे, असं जगभरात मान्य झाले असलं. तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका मुंबईतील 20 लाख श्रमिकांना (दलित, मुस्लिम इतर अल्पसंख्यांक) रेल्वे जमिनीवर,मिठागरेच्या जमिनीवर, वन विभागाच्या जमिनीवर, फुटपाथ वर स्थायिक असल्याने तसेच बेघरांना सुद्धा कायदेशीर पाण्यापासून वंचित ठेवत आहे.  पण मात्र महानगरपालिकेचे हेच अधिकारी ह्याच श्रमिकांना बेकायदेशीर पद्धतीने दलालांसोबत मिळून जास्त पैसे घेऊन पाणी देत आहे. आणि आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवीत आहेत. आणि पाणी मिळविण्यासाठी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीत अडकवून पाण्यासाठी नागरिकांना गुन्हेगार बनण्यास प्रवृत्त करीत आहे.

             डॉ. बाबासाहेबांनी महाड चवदार तळे सत्याग्रहच्या वेळी सांगितल्या प्रमाणे हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे…..” याची प्रेरणा घेऊन मुंबईतील विषमतापूर्वक पाणी वाटपाचा जे कट कारस्थान चालू आहे त्याला चोप बसवायला आणि लोकांन मध्ये आपले हक्क आणि कर्तव्याची जनजागृती करून त्यांना आपल्या हक्कांसाठी स्वतः लढायला, संघर्ष करायला कृतिशील करण्यासाठी पाणी हक्क समिती आणि अश्या बरेच लोकसंघटन लोकांची साथ,संगत, सोबतीने हक्कासाठी लढत आहे. आपण कधीतरी एक वाक्य ऐकलं असेलंच; आपला जन्म हा संघर्ष करण्यासाठीच झाला आहे. आणि हक्क मागून मिळत नसतो तर तो संघर्ष करून मिळवावा लागतो. तेव्हा देशात चालल्या प्रत्येक विषमतेच्या विरोधात पाणी हक्क समिती आणि या सारख्या लोकसंघटनाची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रत्येकाने पूर्ण जबाबदारीने सर्वांना समान बघण्याचा दृष्टिकोण निर्माण करण्याच्या चळवळीत सामील होऊन आपल्या  हक्कांसाठी लढत राहू आणि आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडू…

~ विशाल पुष्पा पद्माकर जाधव

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *