पाण्याची कहाणी ….

गावाच्या जातीनं घरं सोडली

शहरी येऊन वस्ती बसवली 

सडका नाल्यांन घर बांधली 

कचारपट्टीची जिंदगी झाली

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं…  

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

लांबच्या सिग्नल ला, डम्पिंग च्या पाशी

डब्बा, मडका अन हंडा कळशी

रातरच्या पारी, पाण्याची स्वारी

घेऊन निघाले, सरकार दरबारी .

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

पाण्यासाठी याला निवडून दिला

पक्षासारखा हा र उडून गेला 

पाच वर्षांनी परत हा आला 

बिस्लेरी बॉटल घेऊन संगतीला

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

आमच्या हीश्याचं पाणी चोरलं

प्लास्टिकच्या  बाटलीत बंद ते केलं

आमचं हे पाणी पोरकं केलं

बाजारी जाऊन चोरून इकलं 

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

सत्तेच्या हातात पाण्याची टाकी

माणसं बघून पाणी ईकती

गोरगरिबांची हांडे फेकती,

बेघर म्हणुनिया हाकलून लावती

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

सरकार दरबारी अर्ज हे केले

नियम अटींनी हकलून लावले. 

आंदोलन करून मोर्चे काढले

कोर्टात जाऊन आदेश मिळवले

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

इथचं  का लढाई संपत नाही?

माणसाला पाणी का मिळतं नाही?

जोवर आम्हा पाणी मिळत नाही

आखर चा माणूस लढत राहील.

पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… 

आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं  अ अ……..धृ

~ प्रवीण सुनीता रतन 

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *