
साथी, आपल्या मूलभूत गरजा तुम्हाला माहीत असतील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आणि आरोग्य. आपल्याला दैनंदिन जीवनात या मूलभूत गरजांची आवश्यकता असते. त्यामध्येच पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी पाणी सर्वात महत्वाचे ठरते.
माकडापासून माणूस होईपर्यंत आपले निसर्ग खूप छान आणि सुंदर होत. सगळं काही विनामुल्य होते. स्वच्छ होते. जसजसा माणसाचा मेंदू विकसित होत गेला तसा आपल्याला निसर्गाकडून मोफत मिळणाऱ्या गोष्टींचे बाजारीकरण होऊ लागले. इतिहासात पाहिलं की आपल्याला कळेल, पाण्यासाठी लोकं वणवण भटकायचे, पाण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या आणि बरच काही व्हायचं आणि आता ही तसच चाललंय. खेड्यापाड्यातच नाही तर मुंबई सारख्या शहरात ही लोकांना पिण्याचं पाणी मिळवण खूप कठीण जाते. पाण्यासाठी वणवण भटकून आपलं जीवन जगावं लागतं. अजून कधी पर्यंत पाण्याच्या मूलभूत अधिकार पासून वंचित राहावे लागेल? असा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे? कारण प्रश्न विचारल्या शिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाही.
‘मुंबई…’ सर्वांना वाटतं “मुंबई स्वप्ननगरी आहे.” पण या स्वप्ननगरीत खोलवर जाऊन पाहिलं तर आजही लोकं कसे न कसे तरी आपली पाण्याची तहान भागवत आहे. मग त्या मध्ये येते विहिरी, बोरिंग, शौचालयाच्या नळातील पाणी, दुकानातील पाणी, एखाद्या फुटलेल्या पाईप मधील पाणी, एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या घरातील पाणी.
विचार करायला हवं. देशाची आर्थिक राजधानी मुबई. तरीही इथे पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर गावी, खेड्यापाड्यात काय अवस्था असणार? जे पाणी आपल्याला विनामूल्य मिळालं पाहिजे, आज त्याच पाण्याची किंमत 200 ते 300 रुपये महिने (काही वेळा त्या पेक्षा ही जास्त) आणि 10 ते 20 रुपये 20 ते 25 लीटर कॅन या दरात मिळते. ज्यांची पाणी विकत घेण्याची क्षमता आहे ते घेतील. पण जे लोकं पाणी विकत घेऊ शकत नाही त्यांचं काय ? कधी विचार केलाय?
मी शाळेत असतांना पाहिले, एका रस्त्याच्याकडेला एक नाला होता, त्या नाल्यात घाण पाणी वाहत होतं आणि तेच पाणी काही श्रमिक बेघर माणसे आपल्या भांड्यात भरून घेत, ते सुध्दा पिण्यासाठी, रोजच्या वापरा साठी! ज्या देशात आपण राहतो, त्या देशात साधी पाण्याची तहान भागवता येत नाही. कारण नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाजारीकरण!
तुम्ही ऐकलं असेल “पाणी आडवा पाणी जिरवा”, “पाणी वाचवा जीवन वाचवा”, “पाणी है तो सबकुछ है”, “जल है तो कल है, इत्यादी. पण नक्की अस होत का ? क्वचितच लोक पाण्याचं महत्व समजतात. बाकी पाणी वाया घालवणार पण समोर आलेल्याला एक हंडा पाणी भरून देणार नाही. आणि एक हंडा पाणी भरून दिल असेल तर त्या पाण्याची अधिक किंमत वसूल करतील. मी जे उदाहरण देत आहे, ते माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहेत काही अनुभवाची आहे. मग मला नेहमीच प्रश्न पडतो, खरचं विकास होत आहे का? की विकासाच्या नावाखाली आपलं शोषण होत आहे? हक्काचं पाणी मिळत आहे का? या सगळ्याची उत्तरे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण प्रश्न विचारु.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केलेला, ते का केलं? तर विशिष्ट वर्गाच्या लोकांना त्या तळ्यातील पाणी घेण्यास मनाई केली होती. डॉ.बाबासाहेबा आंबेडकरांचं म्हणणं होतं की जातीवाद सोडून पाणी हे सगळ्यांना समान मिळाले पाहिजे. पाण्याची ही लढाई आजही सुरू आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आसिफ!
आजही जात, वर्ग, पेहराव पाहून पाणी नाकारले जाते. आपण हा जातीभेद, वर्गभेद बाजूला ठेऊन माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीला पाहिलं तर नक्कीच परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मुंबई सारख्या शहरात पाण्यासाठी परावंलबी असलेल्या नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने करायला हवा. कारण एकीकडे पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे २४ तास पाणी, आणि त्यामुळे त्याचा अत्यंत बेजबाबदार वापर.पाणी प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाणी प्रत्येक सजीवाचा मूलभूत अधिकार आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या पाण्याच्या हक्काचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाला समान पाण्याचे वाटप केले पाहिजे…
~ संगीता पांढरे
विभाग – मुंबई