पाणी, पाउस, आणि मानवी संस्कृती..!!

निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान;

ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान.

काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;

एकाएकी कोसळला पाऊस मधाचा!!

या ओळी वाचल्या ना की मला एखादा कवितेने सजलेला नवा ऋतू सुरू होतोय की काय असंच वाटतं.. तसं  बघायला गेलं तर मानवी संस्कृतीचा आणि ऋतूमानाचा खूप जवळचा संबंध आहे. पाऊसमान चांगलं असलं की संस्कृती भरभराटीला येते आणि पाऊसमान कमी झाले, की तिचा ऱ्हास सुरू होतो. आजच्या काळातही हा इतिहासाचा संदर्भ महत्त्वाचा आहे. आजही आपण मान्सूनवर बऱ्यापैकी अवलंबून आहोत. कारण पाण्याचा मुख्य आणि महत्वाचा स्त्रोत म्हणजे पाउस!  हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा, विविध माध्यमांचा वापर करून पाऊस साठविणे आणि दुष्काळी परिस्थितीचा तडाखा कमी करणे आपल्या हातात आहे.  

पाणी आणि पाऊस हे आपल्या सगळ्यांचेच जिव्हाळ्याचे विषय आहेत. पाऊस यंदा वेळेवर सुरू होणार का? पाण्याचे प्रमाण काय असेल, याविषयीच्या चर्चा उन्हाळ्याच्या प्रारंभी रंगू लागतात. प्रत्येक शेतकरी आपापले आडाखे बांधतो. सरकारी संस्थांच्या आकडेवारीकडे डोळे लावून बसतो. हे सारे होणारच; कारण आपण सारे आजही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहोत. पाऊस नीट पडला नाही, की आपले अर्थकारण गडबडते. अर्थात; ही फक्त आजची गोष्ट नाही. माणूस शहाणा झाला, तेव्हापासूनच तो पाऊस पडणे आणि न पडणे यांच्या चक्रात अडकलेला आहे. याची एक गोष्ट तुम्हांला सांगते.

माणूस आणि पाण्याची! गोष्ट सुरू होते पुराश्मयुग पासून. या काळामध्ये माणूस शिकार करू लागला. त्यासाठी दगडाची हत्यारे बनवू लागला. या काळात हत्यारे बनविण्याच्या पद्धतींत बदल झाले. शिकार करणे आणि अन्न संकलन करणे या गोष्टी या काळातील माणूस करत होता. तेव्हा तो पावसावर अवलंबून होता. पाऊस चांगला पडल्यास पाणीसाठा उपलब्ध व्हायचा, प्राण्यांची संख्या वाढली, मुबलक अन्न मिळू लागले, धान्याचा वापर जास्त प्रमाणात व्हायला लागला, शेतीसाठी पाणी साठवण्याचे तंत्र त्याने विकसित केले आणि मानवाच्या राहणीमानात हळहळू बदल होऊ लागला. एवढे साधे गणित त्याकाळात होते. मानवाची प्रगती झाली, प्रगत होण्याच्या या कालखंडात पावसाचा मोठा हातभार लागला. पाऊस जास्त असला, की अन्न चांगले मिळते आणि पाऊस कमी झाला, दुष्काळ पडला, की अन्नाची भ्रांत निर्माण होते, हे मानवाच्या लक्षात आले. शेतीचा शोध अशाच गरजेतून लागला आहे. शेती सोपी नव्हतीच. चांगला नांगरही नव्हता, तरी देखील मानवाने प्रयत्नपूर्वक शेती केली, जनावरे माणसाळवली; कारण पर्यावरण बदलत होते. आजही शिलालेख, जुन्या दगडी पाण्याच्या टाक्यांची रचना, महाराष्ट्रातील सातवाहन राजघराण्यात केली गेलेली पाणी संरक्षणाची योजना दिसून येते. 

थोडक्यात, मानवी संस्कृतीच्या विविध काळावर पर्यावरणाचा ठसा आहे. पर्यावरण, पाऊसमान चांगले असले, की मानवी संस्कृतीचा उत्कर्ष होतो आणि हे बिघडले की मानवाचा ऱ्हास सुरू होतो. आजही आपण या पावसावरच अवलंबून आहोत. निसर्गाच्या या चक्रावर कदाचित पूर्ण मात करता येणार नाही; परंतु हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. निसर्गाचे संवर्धन करणे, पुढील संकटाला सामोरे जाण्याची तयारी करणे, हे गरजेचे आहे. पर्यावरण आणि संस्कृती या दोन गोष्टी समांतर रेषेत चालणाऱ्या आहेत. आणि यदाकदाचित जर पाऊस चांगला पडला, तर पुन्हा सारे मागे पडते. हे आपले चक्र झाले आहे. तेही आपण भेदायला हवे. सातत्याने प्रगती हवी असेल, तर पाण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे इतिहास सांगतो, वर्तमानही तेच सांगतो आणि भविष्यकाळाचा तोच सांगावा असेल.. नाही का??

आर.जे.अनु ( अनुजा )

विभाग – अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *