पाणी जीवन, की पाण्यासाठी संघर्ष ?

वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यात आपल्या जीवनात असलेले पाण्याचे महत्त्व. अन्न, वस्त्र, निवारा, या मुलभूत गरजा मध्ये पाणी आहेच. पाण्यावर सजीव सृष्टी अवलंबुन आहे. पाण्या शिवाय कोणताही सजीव प्राणी जगू शकत नाही. अन्नाशिवाय माणूस एक दोन दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व सर्वांनाच कळते. उन्हात सर्व सुष्टी भाजून निघते. निसर्गामध्ये पाणी जास्त आहे आणि जमीन कमी आहे. कारण पाणी हा निसर्गाचाच एक घटक आहे.

पूर्वी लोकसंख्या कमी होती. सुधारणा झाली नव्हती.त्यामुळं जंगलाची संख्याही जास्त होती. पाऊस नियमित पडायचा पाणी तेव्हा सहज मिळत होत. मात्र काही वर्षांपासून पूर्ण वातावरणाचा समतोल बिघडला आहे. लोकसंख्या खूपच वाढत आहे. सोबतच जंगल तोड होत आहे. संपूर्ण जंगल नाहीशी करून मोठ्या मोठ्या इमारती उद्योगधंदे उभारले जात आहे जंगल तोडीमुळे जमिनीवरील जलस्रोत आटले आहेत. तसेच आज मोठ्या प्रमाणात माणसांकडून पाण्याचा दुरूपयोग केला जात आहे. पाण्याची कमत रता भासत आहे. पूर्वी सहज उपलब्ध होणारे पाणी आज बाटलीत बंदीस्त करून 15 ते 20 (प्रती लीटर) रुपयांना विकले जात आहे.

आज पाण्यासाठी भांडण, मारामाऱ्या होत आहेत. एवढच नव्हे तर पाण्याची चोरी होत आहे, पाण्याची पळवापळवी होत आहे. आजही मुंबई सारख्या शहरात पाण्यासाठी वणवण करावी लागते. एकदा हिवाळा संपला की झाली पाण्यासाठी लढाई सुरू. मुंबई सारख्या महानगरीत काही  वस्त्यांमध्ये पाण्यासाठी  रात्रं दिवस वणवण करून दाही दिशा फिरावं लागतं. मोठ्या मोठ्या इमारती मध्ये 24 तास पाणी वाहत असत आणि आमच्या झोपडप्टीवासीयांना 4 दिवसात एकदा पाणी मिळत, ते सुध्दा रात्री 3 वाजता! दिवसभर कष्ट करा आणि रात्री पाण्यासाठी जागा आणि जागून पण मिळालं तर मिळालं नाही तर अजून 4 दिवस वाट पाहत बसा. सरकारच एक वाक्य मी ऐकल आहे “हर घर जल” मग आमच्या पर्यंत जल का नाही?

            पाण्यासाठी आज आम्हाला एवढ सहन करावं लागत आहे, तर येणाऱ्या काही वर्षांत आमच्या पुढच्या पिढीला किती तीव्र संघर्ष करावा लागेल? याचा विचार करून पण थक्क व्हायला होतं! आजही कोरोना काळात आमचं सरकार सांगत, सतत हात पाय धुवायला. पण आमच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही, तर आम्ही कसे हात पाय धुणार? सरकारचं म्हणन आहे “हर घर जल” मग आम्हाला आता पण का नाही पाणी? अजून किती वंचित ठेवणार?

             पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे; मग आम्हाला का पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो? आमचा हक्क आम्हा मिळणे आवश्यक आहे. आमच्या समोरच्या मोठ्या इमारतीत हक्काच 24 तास पाणी मिळत, तर ते आम्हाला पण मिळालं पाहिजे. सरकारने पाण्याचे महत्त्व ,त्याची गरज आणि गरजेनुसार पुरवठा, पाण्याचा होणारा अपव्यय  या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

             पाणी मूलभूत अधिकारचं  नव्हे तर मानवाची पहिली गरज आहे. दलित असो, आदिवासी असो किंवा बेघर असो सर्वांना पाणी मिळायलाच हवं. मग मनुष्य कोणत्या जातीचा असो व धर्माचा, गरीब असो वा श्रीमंत. जसे पाणी जात, धर्म, कुळ बघत नाही, तसेच सरकारने पण जात, धर्म, गरीब, श्रीमंत न बघता सर्वाना सहज आणि मुबलक दरात  पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. आशा आहे की सरकार लवकरच आपले डोळे उघडून  माणसाला फक्त माणूस म्हणून बघेल आणि त्यांना जगण्यासाठी असलेल्या पाण्याच्या गरजेचा विचार करेल.

~ अक्षता राजेश्री रामचंद्र बोले 

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *