
पाणी हे जीवन आहे, या वाक्यावरून पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते आपण बघत आलेलो आहोत. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सर्व काळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही.
आपण वरील वाक्य वाचलात, वाचून किती बरं वाटतं, खरचं पाणी हे किती महत्वाचं आहे या सजीवसृष्टी साठी हे यावरून लक्षात येत. तरीही पाणी आपल्याला विकत घ्यावं लागतं हे दुर्दैव आहे आणि ते नाकारू शकत नाही. या सर्व गोष्टी शासन, प्रशासन, वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना माहिती आहे तरीही त्यांनी अनेक वस्त्या, गावे, शहरे पाण्यापासून वंचित ठेवल्या आहेत. पाणी हे नैसर्गिक साधन संपत्ती असून ती प्रत्येकाला समान पुरवठा करणे आणि तेही मुबलक प्रमाणात ही जबाबदारी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगर पालिका ने निभावली पाहिजे, परंतु तसे होत नाही.
भारतीय संविधानाने जगण्याच्या हक्का मध्ये पाणी हा मूलभूत अधिकार दिला गेला. तरीही गेली 70 वर्षे मुंबई सारख्या प्रगत शहरात राहत असलेल्या श्रमिक, कष्टकरी, कामगार, महिला, बालके अशा अनेक लोकवस्ती मधील लोकांना पाण्यापासून अनधिकृत घोषित करून 1995 वर्षा नंतर राहणाऱ्या लोकांना पाणी मिळणार नाही, असा फतवा काढणारे महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेतील सत्ताधारी वर्ग, मुंबईतील उच्च व उद्योगपती यांच्या वेगवेगळ्या संभाषणातून आपण सर्वांनी ऐकली असेल आणि बघत ही असाल हे सत्य आहे. तसेच युनायटेड नेशन ने पूर्ण जगासाठी 17 शास्वती ध्येय बनवली आहे. त्यात ध्येय नंबर 6 आहे ,जे स्वच्छ पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता या गोष्टी प्रत्येकाला मिळाल्याचं पाहिजे आणि हे ध्येय 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहे, असं युनायटेड नेशन सांगत आहे. तरीही महानगर पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे यावरून याचे गांभीर्य दिसून येते.
याचाच भाग म्हणून मुंबईत मानखुर्द मंडाला, अंधेरी संघर्ष नगर , कांदिवली क्रांतीनगर, बोरिवली नेशनल पार्क आदिवासी पाडा, दहिसर गणपत पाटील नगर, मालाड ईस्ट मधील आंबेडकर नगर अशा अनेक असंघटित क्षेत्रातील वस्त्या आहेत, जिथे अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यात रस्त्यावर राहणारे बेघर ही पाण्यासाठी भटकंती करताना आपण स्टेशनवर, रस्त्यावर पाहत असतो. पाण्यासाठी ३० ते ३५ लिटरच्या कॅनसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहे. पाण्यासाठी सायकल घेउन मुंबई सारख्या प्रगत शहरात मालाड मालवणी मधील अंबोजवाडी वस्ती मध्ये 1 ते 2 किलो मिटर वरून पाणी आणावे लागते, त्यामुळे अनेक लहान बालके, मुली यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ही वस्ती मालाड पश्चिम मालवणीतील भागात 1994 पासून वसलेली आहे तरीही परिस्थिती जशी तशी आहे.
पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी केला, या सत्याग्रहाला जवळपास 90 वर्षे झाली आहेत. आता तरी महानगरपालिकेने सर्वांना पाण्याचा अधिकार बहाल केला पाहिजे, आणि तेही स्वच्छ पाणी सर्वांनी समान दिले पाहिजे.
पाण्याचा संघर्ष अजूनही थांबला नाही, अंबोजवाडी वस्तीत लोकांच्या एकजुटीने पाणी हक्क समिती, युवा, घर बचाओ घर बनाओ आंदोलन, सारख्या अशा अनेक संघटनानी मोर्चे – आंदोलने करून कट ऑफ डेट न लागता अनधिकृत, अधिकृत हा दूजाभाव न करता पाणी द्यावे अशी घोषणा केली आणि आता कुठे तरी तो दिवस उजाडला आहे. प्रत्येकाला पाणी मिळवून देण्यासाठी महानगरपालिका सकारात्मकता दाखवत आहे. आणि हळूहळू का होईना महानगरपालिकेला जाग आली आहे.
आता महानगरपालिकेने मुंबईतील काही वस्तीत पाइपलाइन टाकून पाणी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु यातही मोठी तफावत आहे, ते म्हणजे पाणी माफियांची चाललेली लूट जास्तीचे पैसे घेऊन लोकांना कुठलीही कायदेशीर दिरंगाई न करता लवकर पाणी कनेक्शन मिळवून देणे. यामुळे कायद्याने पाणी कनेक्शन मिळण्याकरिता खूप कालावधी लागत आहे . यात अधिकाऱ्यांकडून डॉक्युमेंट्स मध्ये जाणून बुजून चुका काढल्या जातात , तारीख पे तारीख दिल्या जातात, आज साहेब बाहेर आहेत अशा गोष्टी सांगितल्या जातात आणि मग लोक फेऱ्या मारून थकून जातात आणि शेवटी नाईलाजाने लोकांची पावले अधिकाऱ्यांच्या मदतीने पाणी माफिया कडे पैसे कमवायची सिडी बनवून पाठवले जातात. यात अधिकाऱ्यांची लूट दिसून येते आणि महानगरपालिकेवर जो विश्वास आहे लोकांचा तो कुठेतरी कमी होतो. म्हणून या ही गोष्टीवर आपण सर्वांनी पुढाकार घेउन अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना सहज सोप्या पद्धतीने घेता येईल अशी व्यवस्था आपण प्रत्येक नागरिकांनी या प्रशासनाला करण्यास भाग पाडले पाहिजे.
महानगरपालिकेने अजूनही अनेक वस्त्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे सर्व समावेशक असणारं पाणी प्रत्येकाला मिळावं म्हणून पाण्याचं संघर्ष असाच चालू ठेवावा लागेल. जो पर्यंत पाणी घराघरात, गल्लोगल्ली शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत ही हक्काची लढाई संविधानाच्या मार्गाने पुढे घेऊन आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपला क्रांतीचा जयजयकार इतिहास साक्ष झाला पाहिजे असा निर्धार करू, तरच युनायटेड नेशन चे आणि भारताचे SDG 6 चे ध्येय पूर्ण होईल.
जिंदाबाद!!
!! पानी है जीवन के लिए, नहीं देंगे मुनाफे के लिए!!
~ बाळा कमल सुंदर आखाडे
विभाग – मुंबई