परिवर्तनाला सुरुवात झालीय….

आज माझ्या एका कवी मित्राला मुद्दाम भेटायला गेलो.  समाजाला पडलेल्या किड्यांना ठेचून मारणाऱ्या कित्येक कविता प्राण कंठात आणून वाचताना ऐकलंय मी त्याला कधीकाळी. त्याला इतक्या दिवसांनी भेटून आज फारच बरं वाटलं. खरं तर गर्वाने छाती भरूनच आली होती म्हणा ना! 

          गेले कितीतरी महिने त्याने आजच्या या दिवसासाठी त्याच्या एका पुस्तकांचं प्रकाशन थांबवून ठेवलं होतं. वाटलं आता या पुस्तकाच्या निमित्ताने तो नजाणो कोणा कोणा नालायकांचे असामाजिक बुरखे टराटरा फाडून त्यांना समाजा समोर नागडं उभं करील. 

         मी म्हणालो “असत्याच्या या युगातही लेखणीची ढाल आणि शब्दांची तलवार करून सत्त्याच्या बाजूने उभा आहेस तू!!! मित्रा! मला तुझा अभिमान वाटतो!!” तो दाढीच्या कोनातून मिश्किलसा हसला… डोळे लालसर… कदाचित झोपला नसावा…

            फोडतात टाहो आज कोंडलेले शब्द हे

            पुस्तकाच्या कागदाशी भांडलेले शब्द हे

            अंकुशांनी वेढलेली लेखणी गुलाम ही

            लेखणीच्या आसवांत सांडलेले शब्द हे

तो बोलू लागला…. मी मनाशीच म्हणालो… वाह्ह!!.. झाली तर सुरुवात… आता आणखी काही वेळाने पेटून उठेल रक्त. तेव्हा त्याला ऐकताना पेटायचं ना, तसंच. पण तो बोलता बोलताच थांबला…  पुढे काहीही बोलणं टाळत त्याने त्याचं ते नवीन पुस्तकं माझ्या हातात दिलं. मला वाटलं थांबूच नये त्याने. पण पुस्तक उघडण्याचा  मोह मला आवरताच आला नसता. 

          “माझ्या लेखणीतून”…..  वाह्हह!!! काय सुंदर शीर्षक पुस्तकांचं. खाली लाल रंगात छान calligraphy केलेलं त्याचं नाव आणि तेवढंच  त्याच्या वास्तववादी कवितांच्या जवळ नेणारं सुंदर मुखपृष्ठ. मी पुस्तक उघडण्या आधीच गर्वाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे किंचितही हलले नाहीत. मी पुस्तक उघडून वाचायला गेलो. पण मुखपृष्ठा पलीकडे वाचायला काहीच नाही. सगळी पानंच्या पानं कोरीच. मी गोंधळून विचारायला जाणार तेवढ्यात तोच म्हणाला… 

“जिथून मी सुरुवात केली आजही तिथेच थांबून आहे सारं… आजवर मी जे लिहिलं त्याने कितीसा बदल घडला समाजात?!!!…. थांबलो!!”….  

मी म्हंटलं 

“अरे थांबून कसं चालेल?…. तुझ्या सारख्या लोकांनीच तर लेखणीतून चाबूक ओढलाय, समाजाला ओरबाडून खाणाऱ्या त्या गिधाडांच्या पाठीवर… तुम्हिच हि अशी माघार घेणं म्हणजे त्या गिधाडांना रान मोकळं झाल्या सारखंच आहे!!…”  तो म्हणाला “समाजाची आता मला चिंता नाही. आपल्या सुखासाठी जराही मेहनत न करता अवताराची वाट पाहत बसणारा हा समाज. परिवर्तनाची भूक कधीच मेलिय त्याची. आणि चमत्कारावर विसंबून राहणाऱ्यांनी परिवर्तनाची स्वप्नं बघूही नयेत… मित्रा… इतकी वर्ष झाली मी कवितेतून चितारलेल्या समाजाच्या सडलेल्या जखमांवर तुझी ‘वाह्ह’ ऐकतोय… पण कविता ऐकताना तुझ्या डोळ्यात पेटलेल्या ठिणगीचा वणवा होताना कधी दिसलाच नाही….” त्याचं म्हणणं कळूनही त्याला प्रत्युत्तर देण्याची हिम्मत आणि धमकही माझ्यात नव्हती. मला अगदी पटतही होतं त्याचं म्हणणं. कारण आज पर्यंत त्याच्या कविता ऐकून मनात निर्माण होणारं वादळ पुढच्या काही क्षणातच कुठे नाहीसं होतं. 

              “मला ना! आजूबाजूला कुणीच जिवंत आहेत असं वाटत नाही.” त्याचा कोंडलेला बांध फुटला… “कितीही केलं तरी त्यांच्या रक्ताला उकळी फुटतंच नाही. कवितेतून त्यांच्याच जखमा उघड्या पडत असताना दाद देणारे; याच शब्दांना काही लोक स्वैराचाराने अंकुश लावु पाहत असताना मूग गिळूण बसून आहेत. म्हणून शब्दांचं हे मौन आज त्यांच्या स्वाधीन करतोय. कदाचित हे मौनच बोलतं करील त्यांना.” त्याच्या लाल डोळ्यात वेगळीच खंत दिसत होती.

          मला आज पहिल्यांदाच रक्ताला उकळी फुटल्याचं जाणवलं. ‘परिवर्तनाची भूक म्हणजे नेमक काय?’ ते रंध्रा रंध्रातून जाणवायला लागलं.  मित्रा तुझ्या या कोऱ्या पुस्तकातून परिवर्तनाच्या निशब्द आरोळ्या ऐकू येताहेत मला. 

 तू लेखणीचा आसूड ओढ

 परिवर्तनाची भूक हरवलेल्या षंढ आतड्यांवर….

 मीही घालीन घाव

 त्यांच्या समाज विघातक विचारांवर….

परिवर्तनाला सुरुवात झालीय….  

● #माझ्या_लेखणीतून ●

 ~ नागराज पद्मा कौतिकराव

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *