निवडणुकीच पाणी!

चिखला नाल्यात गोणपाटाचं छत होतं आमचं!. जव्हां आमचं मिस्टर मूनसीपालटीच्या गाडीवर कचरा भरायला जायचं. येग्येगळ्या जातींच्या लोकांची गर्दी होती आमच्या वस्तीत. दिवस बदललं गोणपाट बदलून घरावर पत्र चढवले, टीनशेड च घर झालं शहरात. पण तरीही सरकारसाठी आमचीच गलिच्छ वस्ती. 

दोन पदरी रस्त्याच्या सिग्नल ला डम्पिंगच्या पाशी झुमाण्यांचं चोरीच्या  पाण्याचं कनेक्शन होतं. डोक्यावर दोन हंडे अन काखतं कळशी घेऊन रातरच्या ३ वाजता आमच्या पाण्याची स्वारी निघायची. सगळं नगरच जणू जत्रा भरल्यावानी हांडे-भांडे घेऊन सिग्नल ला असायचं. एकदा तर त्या दुकानवाल्या शिंगण्याची पोरगी ट्रक खाली गेली अन.. जागीचं मेली कळशीभर पाण्यासाठी!  एवढ्या आगीतून दोन फेऱ्या मारल्यावर खटल्याची अंगोळपाणी व्हायची. आज बरेच वर्ष झाले आम्हांलं! तान्ह पोरगं होतं जाधवीन बाईलं! आता लग्नाला आलंय सम्या. पाण्याचं अंतर सोडून काहीच बाई बदललं नाही. बदललंय तर फक्त राजकारण!

पाच वर्षांपूर्वी पाणी देतो म्हणून तीन वेळा निवडून आलेला आमचा नेता, आज आमच्याकड ढुंकूनही पाहायला तयार नाही. बायको आमदार, स्वतः नगराचा अध्यक्ष, अन पोरगा हायच निवडणुकीचा तयारीत.  पाच मजली इमारत, दहा-पंधरा गाळे, अन नाही नाही त्या ठिकाणी जमिनी घेतल्या आमच्या साहेबांन.  स्वतःला म्हाडी, पोराला गाडी, अन बायकोला  नऊवारी साडी, असं त्यांचं बिऱ्हाडं. काही बोलायचं म्हणलं तर! मिलचे भोंगे जसे बंद झाले, तसे आमचे आवाज ही बंद करणार असं वाटायला लागतं. खुर्चीवर बसलेल्या मंत्र्या पासून वस्तीतल्या अण्णा पर्यंत, सगळे आमच्या मुळावर उठलेत. आमचा गुना एवढाच की पाणी मागितलं सरकारला. 

मूनसिपालटीच्या मोठ्या मोठ्या फ्लेक्सवर लिहिलंय कि, या अर्ज करा पाणी घ्या. तेच केलं आम्ही. आंम्हालं भेटलं काय? तर  पाण्याच्या महिन्या वाल्यांन महिना बंद केला. आमच्या पाण्याला तोटी लावली. तवा कळलं की आमचं पाणी कुठं थांबलय! पाणी इकणारे, महिण्यावाले, अन मूनसिपालटीच्या सायब लोकाची मिलीभगत व्हती. आमचा नेत्यालं म्हणायचं म्हणलं तर त्याचं रामायनचं येगळ. दर येळलं असंच होतं. घरो घरी नळ देतो म्हणतो, अन नेता व्हऊन पळून जातो. अन परत आला तर डायरेक पाच वर्षांनी येतो ते पण मत मागायला, अन ते पण हातात बिसलेरी बॉटल घेऊन. आमच्या भाईन म्हणजे आमच्या नेत्यानं हो वस्तीत दोन येळा पाइपलाइन टाकली अन परत उपसली. याच्यावर दोन इलेक्शन जिकले भाईन! असा  कर्तृत्वान नेता. 

पाणी इकणारा राजकारनी  पक्षाचा माणूस असतो, त्याला पाणी चोरून इकणारा मूनसिपालटीचा असतो. अन त्या सायबाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणा की, जबरदस्ती करून आदेश देणारा पण  राजकारणी पक्ष्याचा नेता असतो. अश्या या फिरत्या सायकल मुळं आजही अधिकाराच्या  पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

            इथं दिवसभर हुडकून आजला गावत नाही अन पाण्यासाठी यांच्या मड्यावर रुपया मोजावा लागतो. कधी कधी असं वाटतं की वरवंट्यावर मसाला वाटावा तस यांचं तोंड ठेचाव. पूना कधी तोंडानं मत मागायची हिम्मत करणार नाही. लेकरा बाळाची शाळा गेली, म्हातारीच म्हातारपण गेलं, बाईला चामड्याचा रोग झाला, सूने च कंबरड मोडलं, बाधे बिऱ्हाडचे-बिऱ्हाडं गुलामीच्या मार्गाला लागल्याती. लेकरा…. नाही-नाही ती जिंदगी झाली. लय महागात पडलं हे निवडणुकीचं पाणी! देश जरी स्वातंत्र्य  झाला असला तरी पाणी मात्र गुलमीतच हाय! 

             पण लेकरा इथंच काय हे संपू देणार नाही आमी. जवर या पाण्याला निवडणुकीच्या तावडीतून सुटका करत नाही; अन मह्या पाण्याला गुलामीतून मुक्त करणार नाही. तव्हर ही लढाई लढतच राहणार आमी. तशी आनंच हाय आमाला बाबासायबाची! 

 ~ प्रविण सुनीता रतन..

विभाग – मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *